आई,
आज तुझ्या इच्छापत्राचे वाचन झाले. अंदाज होता तसेच घराची समान वाटणी केली होतीस. पैशाची वाटणी जरी समान दिसत होती तरी तू जिवंत असताना किती पैसे माझ्या खात्यात भरले होते ते फक्त आपल्या दोघींनाच ठाऊक. तुझे कित्येक दागिने प्रत्येक सणानिमित्त मलाच तर दिले होतेस, त्यामुळे दागिन्यांची वाटणी करायचा प्रश्नच नव्हता. सगळ्यांना ही वाटणी योग्य वाटत असली तरी पण मला माहीत होते की,तुझे म्हणून काय काय होते आणि तू किती सारे आधीच मला देऊन ठेवले होते. म्हणूनच आज मला खूप खूप अपराधी वाटत आहे. आज इतक्या वर्षात प्रथमच तुझ्याविना स्वतंत्र विचार करत आहे. आज मला महत्वाचा निर्णय घ्यायचा आहे. तू असताना तुझ्यासमोर जे बोलता आले नाही, जे तू कधीच समजून घेऊ शकली नाहीस ते सर्व तुझ्याशी बोलायचे आहे. कारण आधीच खूप उशीर झाला आहे पण आज बोलले नाही तर कधीच जमणार नाही, म्हणून !
आई !
खूप कष्ट करून तू हे घर सजवले होतेस, दादा आणि मला चांगले संस्कार देऊन वाढवले होतेस. स्वतःचे करीयर बाजूला ठेवून घर उभे केले होतेस. सर्व नातेवाईक जोडून ठेवले होतेस. तू लहानपणापासूनच दादाच्या बरोबरीने मला वागवलेस. शाळा कॉलेज, एक्स्ट्रा क्लासेस, दोंघांचे इंजिनीअरिंगचे, मेडिकलचे शिक्षण, ट्रीप, मित्र मैत्रिणी, पिक्चर, बाहेर फिरणे, वाढदिवस, नवीन ड्रेसेस या सगळ्यात मला दादाच्या बरोबरीने वागणूक दिलीस. मुलगी म्हणून कधीच कुठले बंधन माझ्यावर घातले नाहीस. किंबहुना घरात माझेच लाड जास्त झाले आहेत. कारण तुमच्या बरोबरीने दादा सुद्धा माझे लाड करत होता. काळ कसाही असला तरी तू कुठलीच पर्वा न करता दोन्ही मुलांना समान वागणूक कायमच दिलीस आणि म्हणूनच तू आम्हा भावंडांचा आदर्श होतीस आणि कायम असशील.
पण हळूहळू चित्र बदलत गेले. तू माझ्या बाबतीत जास्तच काळजी करू लागलीस. माझे लग्न ठरवताना तुझे नवीनच रूप मला दिसले. शहरातल्या आई-मुलीवर एवढे जोक कसे येतात त्याचे प्रत्यक्ष प्रमाणच मिळू लागले. तुला जरी सून गावाकडची हवी होती तरी मुलगी इथेच शहरात द्यायची होती. मुलीचे सासू सासरे गावाला राहणारे हवे होते पण मुलगा आपल्याच शहरात सेटल झालेला हवा होता. घरजावई नाही पण घरा जवळचा जावई हवा होता. आणि तू असेच स्थळ शोधून काढलेस देखील. अर्थात मला हे स्थळ आवडले म्हणूनच मी होकार दिला आणि आमचे लग्न झाले. पण कुठेतरी मला वाटत असलेली भीती खरी होऊ लागली. आईचा सुद्धा सासुरवास मुलीला होऊ शकतो हे मी अनुभवू लागले.समोरासमोर गप्पा मारल्या सारखे तुझे केव्हाही फोन करणे, मी माहेरी येऊन भेटून जावे म्हणून आग्रही असणे. बाजाराला गेलीस की आवडलेली प्रत्येक वस्तू जे मिळेल ते माझ्या घरासाठी सुद्धा आणणे. माझ्या घरातील प्रत्येक छोट्या मोठ्या निर्णयात महत्त्वाची बाजू बजावणे. जसे मी पूजा कधी घालायची, कोण नातेवाईक बोलवायचे, मुलांचा वाढदिवस कसा करायचा, स्वयंपाकाचा बेत काय ठेवायचा. माझी खूप घालमेल होत होती ग. माहेरच्या नातेवाईकांचे कुठलेच केळवण मी माझे म्हणून वेगळे केले नाही, कायमच तुमच्यात माझे सांगत आले. माझे माहेरचे नातेवाईक माझ्या घरी कधीच भेटायला आले नाहीत कारण मी, माझी मुले, माझा नवरा त्यांना तुझ्याच घरी भेटत होतो. सगळे एकत्र असण्याचा तुझा अटटहास, याचे प्रमाण इतके वाढले होते की आपले नातेवाईक आणि शेजारीपाजारी असे समजायला लागले की माझा नवरा घरजावई झाला आहे.
माझ्या मुलांना तुझे घर आजोळ वाटलेच नाही तर स्वतःचे वाटत होते. कधीतरी आजोळी येण्यात जी ओढ असते ती त्यांना अनुभवता आली नाही. आजीची आठवण यावी इतकी ही आजी कधी लांबच गेली नाही. खरं सांगू आई रोज माहेरी येण्यामुळे मलासुद्धा माहेरची ओढ लागलीच नाही. सासरचे सुख तू रोजच पाहत होतीस त्यामुळे माहेरी जाऊन सासरचे कौतुक अभिमानाने सांगणे मला अनुभवता आले नाही. आमची भांडणे माहेरी लपवणे जमलेच नाही. आमचा संसार सगळाच उघड्या पुस्तका सारखा चालला होता. तोही तुझ्यामुळे ! हो तुझ्यामुळेच ! आई, तू उच्चशिक्षण देऊन मला माझ्या पायावर उभे केले होतेस पण निर्णय घेण्याची क्षमता दिली नाहीस. माझी प्रत्येक गोष्ट तुला हवी तशी उत्तम असावी या नादात माझे सर्वच निर्णय तू घेऊन मोकळी होत होतीस. तुला सांगायचा खूप प्रयत्न केला की आता मी मोठी झाले आहे, मला निर्णय घेता येतात, मी चुकेन कदाचित पण मला चुकू दे , धडपडू दे, माझ्या संसारासाठी झटू दे. कळू दे मला संसारातील चटके, कळू दे मला सासरच्या मंडळींसाठी मनातील इच्छा कधीतरी कशा मागे टाकाव्या लागतात, ठरवू दे मला मी नातेवाईक कसे जपायचे ते. आई, माझ्या आनंदासाठी, सुखासाठी तुझी असलेली धडपड मला प्रत्येकवेळी लाचार बनवत होती ग. माझी स्वप्ने हिरावून घेत होती. माझ्या सासरच्या स्वाभिमानाला ठेच पोचवत होती. सासर आणि माहेर जोडून ठेवताना माझी तारांबळ उडत होती.
दादाचे लग्न ठरले तेव्हा तर आजपर्यंत मॉडर्न वाटणारी तू इतरांसारखीच सासू आहेस हे मला जाणवू लागले. आजपर्यंतची सगळी समानता बाजूला पडली होती. दोन्ही मुले सारखीच मानणारी तू आज माझ्या बाजूने प्रेमाचे पारडे जड करत होतीस. माझ्या लग्नात लाखो खर्च करणारी तू दादाच्या लग्नात जमेल तो खर्च त्याच्या सासरच्यांकडून करून घेत होतीस. कधीच न भेटलेल्या जावयाला सोन्याची अंगठी, वळे करणारी तू सख्या मुलाचे दागिने समोरच्याकडे मागत होतीस ? मुलीला दागिन्यांनी मढवणारी तू सुनेला फक्त मंगळसूत्र करणार होतीस. मुलीच्या लग्नात नेमके पाहुणे बोलवणारी तू मुलाच्या लग्नात आठवून आठवून बोलावणी करत होतीस. त्यावेळेस प्रथमच मला हे जाणवत होते की माझ्यावर केलेल्या खर्चाचे पारडे दादा पेक्षा जड होऊ लागले आहे आणि कर्तव्याचे पारडे मात्र दादा पेक्षा हलके केले गेले आहे. दोघांच्या लग्नापासून तू असमानता करायला लागलीस आणि मला ते नक्कीच आवडले नव्हते. कारण ही असमानता या पुढे अजुनच वाढली होती. माझ्यासारखी मोकळीक वहिनीला कधीच देत नव्हतीस. जावई मुलीचे ऐकतो याचे कौतुक करत होतीस तर मुलगा सुनेचे ऐकतो म्हणून घरात भांडत होतीस. धोंड्याच्या महिन्यात जावयाचे पाय पुसत होतीस आणि दादाला मात्र रोज काहीतरी करणे काढून बोलत होतीस. घरात नवीन वस्तू आणायची तर माझे मत विचारत होतीस कारण माझा या घरावर अधिकार आहे. पण वहिनी ? ती कायमाच बाहेरून आलेली मुलगी. तिला कोण विचारतय. तिने भाजी सुद्धा तुलाच विचारून करायची. तू सुनेला मुलगी म्हणत होतीस पण तिचे लाड कधीच करत नव्हती आणि जावयाला मुलगा म्हणत होती पण त्याला एकही काम सांगत नव्हतीस.
बाबा दवाखान्यात होते तेव्हापण आई तू विचित्र वागली होतीस. तुझ्या दृष्टीने तुमचे दुखणे खुपणे बघणे ही मुलगा आणि सूनेचीच जबाबदारी होती. मुलगी ही माहेरवाशीण म्हणून तिने तिच्या सोयीने भेटायला यायचे, बस ! आई जर दादा आणि मी समानतेने वाढवले गेले आहोत तर कर्तव्य करताना माझा वाटा कमी का ?? कशासाठी ? तुझा माझ्यावर विश्वास नव्हता का की माझ्या आई वडिलांच्या दुखण्या खुपण्यात त्यांचा आर्थिक, शारीरिक, मानसिक भार वाहण्या इतकी सक्षम मी आहे कि नाही ? तुमचा जावई हा खरोखरच मुला समान आहे हे दाखवण्याची संधी तू आम्हाला घेऊच दिली नाहीस. मी कुठलीच आर्थिक मदत करू शकले नाही ही टोचणी मला आयुष्यभर लागून राहीली ना ग ! अग लग्नानंतर आयुष्यात आलेल्या माझ्या सासू सासऱ्यांचे दुखणे खुपणे बघणारी मी, माझ्याच आई वडिलांना माझ्या घरी आरामासाठी बोलवू शकले नाही, माझ घर इतके लहान पडले की मला आईची समजूत घालता आली नाही याहून दुखः ते काय ? इतर वेळेस माझ्या घरातील निर्णय घेणारी आई , त्यावेळेस तुला आठवले की ते घर जावयाचे आहे म्हणून ? अग एका क्षणात तू मला परक केलेस की ग.
खरतर आई तू वाईट कधीच नव्हतीस. नात्यांना बाधून ठेवण्याचा हा तुझा मार्ग योग्य नव्हता. त्यामुळे माझा आणि दादाचा संसार सुखी नव्हता. दादा आणि माझे नातं किती निर्मळ आणि सुंदर होते. वहिनी माझी मैत्रीण आणि माझा नवरा दादाचा मित्र बनलो होतो. पण तुझा माझ्यावरच्या अती प्रेमामुळे मी आणि दादा तुझ्यासमोर एकमेकांचा विषयसुद्धा टाळत होतो. न जाणो तुझा माझ्या बद्दलचा सॉफ्ट कॉर्नर कधी जागा होईल आणि तू अर्थाचा अनर्थ करशील हे आम्ही सांगूच शकत नव्हतो. इच्छापत्रात माझ्यासाठी घरात समान अधिकार देणे हे म्हणजे माझे माहेर जोडून राहावे यासाठी केलेली तजवीज आहे. आई, तुझी इच्छा खाली पडू द्यायची नाही म्हणून आयुष्यभर मी तुझ्या इच्छेचे पालन करत आले. पण कसं सांगू तुला या चार भिंतीशी जोडून ठेवलेस तर त्यातल्या माणसांशी जोडून राहू शकणार नाही मी. माझे माहेर म्हणजे हि वास्तू नाही तर हे घर आणि घरातील माणसे आहेत. तू मला आधीच किती आणि काय देऊन ठेवले आहेस ते बोलून दाखवले नाही तरी इथे सर्वानाच माहीत आहे. सर्वांचे माझ्यावर प्रेम आहे आणि तुझी माझ्याविषयी काळजी सर्वानाच माहीत होती म्हणून कोणी कधीच या गोष्टीत पडले नाही. पण आज तुझ्या नंतर या वाटणीमुळे मी या माझ्या माणसांना गमावून बसेन. मग मला सांग काय उपयोग या वाटणीचा? आम्ही या नंतर एकत्र दिसू पण असणार नाही. नातं असेल पण प्रेम नसेल. आजपर्यंत तुझ्या हट्टामुळे मी निर्णय घेऊच शकले नाही पण आज माझा निर्णय मीच घेणार आहे. आई देवाच्या कृपेने माझी आर्थिक परिस्थिती उत्तम आहे. माझ्या सासरी माझी पण हक्काची “वास्तू” आहे जिला “घर” म्हणून आम्ही सगळे सजवत आहोत. माझ्या पायांवर मी उभी आहे. ते बळ आणि स्वाभिमान तूच तर मला दिला आहेस. म्हणूनच मला ठरवायला हवे कि मला माहेरची “वास्तू” हवी की “घर”?
आई , हि वास्तू तुम्ही दोघांनी बांधली, आपण सर्वांनी सजवली. दादा आणि वहिनी ती सांभाळत आहेत. म्हणूनच कुठलीही अट न ठेवता मी या ‘वास्तू” वरील माझा हक्क सोडत आहे आणि आयुष्यभरासाठी दादाच्या घरात आणि वहिनीच्या मनात स्थान मिळवत आहे. हक्काने या घरात माझे स्वागत व्हावे म्हणून “वास्तू” वरील हक्क सोडत आहे ….. तुझ्याच इच्चेप्रमाणे माझे माहेर जपत आहे !
आई खरच मला समजून घे ! मला “वास्तू” नको “घर” हवे आहे . तुझ्या माघारी माझे राहील असे हक्काचे “माहेर” हवे आहे !
तुझीच,
समनाधिकारी (?) माहेरवाशीण !
© सौ रश्मी साठे उन्हाळे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा