सोमवार, २६ जून, २०२३

412. स्टेटस ची मोजपट्टी

ती : तुझं ते वनलायनर वाचण्यात आलं.   
मी : कोणतं?
ती : आजच्या व्यवहारी जमान्यात खरी नाती ex ex तीच, ज्यांना स्टेटसच्या सर्टिफिकेटची गरज पडत नाही.    
मी : कुठे वाचलं? 
ती : मैत्रिणीने स्टेटसला ठेवलं होतं.  
मी : ओके. 
ती : अक्षय काही प्रश्न विचारू ?
मी : हो. 
ती : तुला एखादी मुलगी आवडली, तर? 
मी : तर ?
ती : तर तू तिच्यासमोर तुझ्या प्रेमाची कबुली देशील, की जगाला ओरडून सांगशील?
मी : साहजिकच तिच्यासमोर प्रेमाची कबुली देईल.  
ती : जगाला का ओरडून सांगणार नाहीस? 
मी : कारण माझ्या मनातील भावना, जगापेक्षा तिला समजणं गरजेचं आहे.   
ती : याच विषयावर बोलायचं आहे.  
मी : ओके.    
ती : मात्र त्याआधी थोडक्यात माझा परिचय देते. 
मी : चालेल. 
ती : मी ३१ वर्षांची व पेशाने वकील आहे.  
मी : ग्रेट. 
ती : माझे मिस्टर चार्टर्ड अकाऊंटट आहेत. 
मी : ओके. 
ती : माझं लग्न झाल्यानंतर अवघ्या २ महिन्यांनी माझ्या सासूबाईंचा वाढदिवस होता.   
मी : मग?
ती : तेव्हा रात्री १२ वाजता माझ्या दोन्ही मोठ्या जाऊबाईंनी सासूबाईंसाठी लांबलचक स्टेटस ठेवलेले.   
मी : लांबलचक स्टेटस? 
ती : त्यांच्या व्यक्तिमत्वाचं आणि स्वभावाचं कौतुक करणारे लघुनिबंध. 
मी : ओके. 
ती : सासरी नवखी असल्याने, स्टेटस ठेवण्यापेक्षा मी मात्र त्यांना सकाळी सर्वातआधी थेट शुभेच्छा दिलेल्या. 
मी : साहजिकच. 
ती : मात्र त्यामुळे माझ्या सासूबाईंनी गैरसमज करून घेतला.    
मी : म्हणजे?
ती : त्यांनी संध्याकाळी केक कापताना माझ्याकडे पाहून टोमणा मारला.   
मी : काय?
ती : त्या म्हणाल्या की, मनातून आत्मीयता वाटत असेल तर शब्दातून व्यक्त करता येते.  
मी : अरे.. 
ती : मलाही ती गोष्ट खूप खटकली होती, मात्र मी त्याकडे दुर्लक्ष केलं.  
मी : गुड. 
ती : त्यानंतर माझ्या सर्वात मोठ्या जाऊबाईंचा वाढदिवस आला.   
मी : मग?
ती : त्यांनी तर स्टेटसला त्यासर्वांचे स्क्रिनशॉट ठेवले.  
मी : कुणाचे?
ती : ज्यांनी ज्यांनी त्यांना दिवसभरात शुभेच्छा दिल्या होत्या. 
मी : किती स्क्रिनशॉट असतील? 
ती : बरेच होते.  
मी : शक्तीप्रदर्शन.
ती : अगदी. 
मी : त्याचं काय?
ती : त्याहीवेळी मी स्टेटस ठेवण्यापेक्षा, त्यांना थेट शुभेच्छा दिल्या होत्या. 
मी : मग?
ती : तर त्यांनाही मी स्टेटस न ठेवण्याचा राग आला. 
मी : मग?
ती : त्यामुळे आठवडाभर त्या मला टोमणे मारणारे स्टेटस ठेवत होत्या. 
मी : अरे रे.. 
ती : साधारणतः ४ महिन्यांनी माझा वाढदिवस आला.   
मी : ओके. 
ती : अक्षय माझ्या माहेरी सर्व लोक सुशिक्षित आहेत.  
मी : ओके.   
ती : त्यामुळे स्टेटस वगैरे प्रकाराला आमच्याकडे फार महत्व नाही.   
मी : ओके.
ती : सासरी मात्र स्टेटसला सर्टिफिकेट समजलं जायचं.  
मी : कसलं? 
ती : नात्यातील जिव्हाळा सर्टिफाय करणारं सर्टिफिकेट.  
मी : नवीन ट्रेंड. 
ती : माझ्या वाढदिवसालाही माझ्या नवऱ्याने..  
मी : काय?
ती : जणू काही कौतुकाचा पोवाडा लिहिला होता.   
मी : मग?
ती : मी मात्र त्यांच्या वाढदिवसाला अगदी मनातल्या भावना बोलून दाखवल्या.  
मी : ओके. 
ती : त्यानंतर आला आमच्या लग्नाचा वाढदिवस.   
मी : मग?
ती : तेव्हाही माझ्या नवऱ्याने भलामोठा स्टेटस ठेवला, मात्र मी काही अपलोड केलं नाही.  
मी : का?
ती : कारण मी त्याला रात्री १२ वाजता शुभेच्छा दिल्या होत्या.  
मी : ओके. 
ती : तेव्हा तर मला भयंकर अनुभव आला. 
मी : कसला?
ती : मी स्टेटस न ठेवल्याने, आमच्यात काहीतरी बिनसलं आहे असा बहुतेकांनी गैरसमज करून घेतला.   
मी : काय? 
ती : काहींनी तर परस्पर ठरवून टाकलं, की आमच्या दोघांमध्ये वाद असल्याने मी स्टेटस ठेवला नाही.  
मी : च्यामारी.  
ती : अक्षय घडणाऱ्या सर्व प्रकारांनी मी अक्षरशः त्रासले होते. 
मी : का बरं?
ती : कारण नात्यातील जिव्हाळा दाखवण्याची स्पर्धा मला नकोशी झाली होती. 
मी : मग?
ती : त्यानंतर आपल्या आयुष्यात कोरोना आला. 
मी : अनपेक्षित होता.
ती : आणि नात्यांची खरी परीक्षा सुरु झाली. 
मी : कशी? 
ती : माझ्या सासूबाईंची तब्बेत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत खूप खालावली. 
मी : मग?
ती : त्यावेळी लागोपाठ लोक अत्यवस्थ होत असल्याने, सर्वत्र दहशतीचं वातावरण होतं.  
मी : हो.  
ती : त्यावेळी घरातील कुणीही सासूबाईंसोबत राहायला तयार नव्हतं.   
मी : का बरं?
ती : त्या सतत खोकत असायच्या. 
मी : मग?
ती : मी त्याकाळात एकटीने त्यांची काळजी घेतली आणि त्यांना मानसिक आधार दिला. 
मी : हॅट्स ऑफ.. 
ती : सासूबाईंवर कौतुकाचे निबंध लिहिणाऱ्या माझ्या दोन्ही जाऊबाई तर रूममधून बाहेरही पडत नव्हत्या.  
मी : जिव्हाळ्याचा दिखावा. 
ती : त्यानंतर मात्र माझ्या सासूचं मनपरिवर्तन झालं.    
मी : म्हणजे? 
ती : म्हणजे त्यांना कळून चुकलं, की प्रेम दाखवणं आणि असणं यात खूप फरक असतो.   
मी : सहमत. 
ती : लॉकडाऊनमुळे सर्वजण २४ तास घरात होते. 
मी : बरोबर. 
ती : कधी नव्हे ते आम्ही नवरा बायकोही दिवसभर एकमेकांसोबत होतो. 
मी : हो. 
ती : मात्र त्याकाळात आम्हाला एकमेकांचे गुण समजले, तसे काही दोषही समजले.  
मी : म्हणजे? 
ती : नवऱ्याच्या काही सवयी मला त्रासदायक ठरायच्या.   
मी : मग?
ती : म्हणून आमचे खटके उडायला लागले.  
मी : ओह.. 
ती : आणि मग एकदिवस आमच्यात कडाक्याचं भांडण झालं.  
मी : का?
ती : त्याने मला शिवी दिली होती. 
मी : मग? 
ती : मला ती गोष्ट अजिबात आवडली नव्हती. 
मी : साहजिकच.  
ती : म्हणूनच मग मी त्यांना माफ करण्यासाठी एक अट घातली. 
मी : कोणती?
ती : प्रेम स्टेटस ठेवून दाखवता ना, मग माफीही स्टेटस ठेवून मागायची.   
मी : मग?
ती : त्याला मात्र नवरा तयार नव्हता.   
मी : का?
ती : कारण सर्वांसमोर प्रेम दाखवणं आणि सर्वांसमोर स्वतःची चूक कबूल करणं वेगळं.  
मी : हो. 
ती : आम्ही कसे हॅप्पी कपल आहोत, हे दाखवण्याची जणू सोशल मीडियावर शर्यत सुरु असते.  
मी : गरज नाही.  
ती : मात्र प्रत्येक जोडप्यात प्रेम असतं, त्याप्रमाणे मतभेदही असतात. 
मी : सच बात. 
ती : म्हणूनच जे काही असेल ते त्या दोघांना जाणवायला हवं आणि ते अगदी प्रामाणिक असायला हवं. 
मी : १००%
ती : अखेरीस माझ्या नवऱ्याने माफी मागणारा स्टेटस ठेवला आणि त्याला लागोपाठ मेसेज आले.   
मी : कुणाचे?
ती : मित्र, नातेवाईक, हितचिंतक..   
मी : कसले?
ती : आमच्यातील भांडणाची चौकशी करणारे.
मी : अरे.. 
ती : त्या दिवसानंतर मात्र..  
मी : काय?
ती : आमच्यातील गोष्टी आमच्या दोघांमध्ये राहायला लागल्या. 
मी : बदल. 
ती : कोरोनाचा सर्वच क्षेत्रांवर खूप वाईट परिणाम झाला.  
मी : हो. 
ती : माझ्या मोठ्या दीराचं रेस्टॉरंट आहे. 
मी : ओके.  
ती : कोरोनामध्ये रेस्टॉरंट बंद असल्याने, त्यांच्याकडे उत्पन्नाचं कुठलं साधन उरलं नव्हतं.  
मी : मग? 
ती : त्यातच जागेच्या मालकाने त्यांच्याकडे रेंटसाठी तगादा लावला.  
मी : किती महिन्यांचं भाडं? 
ती : जवळजवळ दीड वर्षाचं.   
मी : बाप रे.. 
ती : त्यांची सर्वबाजूने कोंडी झाल्याने, त्यांनी नाईलाजाने आमच्याकडे मदत मागितली.   
मी : मग?
ती : त्यांच्याशी बोलून आम्हाला समजलं की, जवळच्या सर्वच लोकांनी हात वर केले आहेत.  
मी : सर्वजण अडचणीत होते. 
ती : अक्षय मी मागचा पुढचा विचार न करता, लग्नातील माझं नेकलेस आणि बांगड्या नवऱ्याला मोडायला सांगितल्या.     
मी : क्या बात!
ती : जाऊबाईंच्या हातात ती रक्कम दिल्यावर तर त्यांचे डोळे पाणावले होते.   
मी : भावनिक क्षण. 
ती : ह्या त्याच जाऊबाई होत्या, ज्यांनी कधीकाळी स्टेटस ठेवून शक्तिप्रदर्शन केलं होतं.    
मी : ओह.
ती : तू ते हिंदी गाणं ऐकलं आहेस ना? 
मी : कोणतं?
ती : सुख के सब साथी, दुःख में ना कोई..  
मी : हो. 
ती : आयुष्याचंही अगदी तसंच आहे. 
मी : कसं?
ती : सुखाचे बरेच वाटेकरी असतात, मात्र दुःख वाटून घेणारे कमी असतात. 
मी : खरं आहे. 
ती : म्हणूनच मला तुझ्या माध्यमातून सर्वांना एकच सांगायचं आहे.  
मी : काय? 
ती : स्टेटस नात्यातील जिव्हाळ्याची पात्रता ठरवणारं सर्टिफिकेट असूच शकत नाही. 
मी : सच बात.
ती : कारण स्टेटसवरून आपण नात्यांना मार्क द्यायला लागलो, तर. 
मी : तर?
ती : तर जिव्हाळ्याचा दिखावा करणारी कित्येक खोटी नाती पास होतील आणि.  
मी : आणि?   
ती : आणि खरोखर मनातून आपल्यासाठी आत्मीयता बाळगणारी काही अबोल खरी नाती मात्र कायमची दूर जातील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...