सोमवार, १९ जून, २०२३

405. "दानधर्म"

      तिर्थयात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंना घेऊन ट्रेन निघाली होती. काही अंतर कापल्यावर यात्रेकरू विसावले. गप्पा सुरु झाल्या. बहुतेकांनी साठी ओलांडली होती. विषय पुण्यसंचयाचा निघाला. अत्यन्त उंची कपडे घातलेला गृहस्थ खिडकी जवळ बसला होता.  बाहेर दिसणाऱ्या समुद्राकडे बोट दाखवून तो म्हणाला, तो समुद्र पाहिलात ? माझे पुण्य त्याच्या एव्हढे आहे आम्ही जमीनदार. आमच्या वाड्यावरून कोणीच रिकाम्या हाताने परत गेला नाही. सगळा गाव आम्हाला दानवीर म्हणून ओळखतो. दान हीच आमच्या घराण्याची ओळख आहे.
त्याच्या समोर साध्या कपड्यातील दुसरा गृहस्थ बसला होता. जमीनदाराने त्याला विचारले....तुम्ही काय करता ? मी शिक्षक होतो, निवृत्त झालो. म्हणजे सहा तास काम करायचे आणि महिन्याला पगार मोजून घ्यायचा. तुम्हाला कुठे दानधर्म करायला जमणार ? हो ना !
शिक्षक हसला, म्हणाला...हो, खरं आहे.. गप्पा ऐन भरात होत्या. बरेच अंतर पार झाले होते. तेवढ्यात ट्रेन अचानक थांबली.  20 किलोमीटर पुढे असलेल्या गावात तुफान दंगल सुरू होती. रेल्वेचे रूळ उखडण्याचा प्रयत्न झाला. त्यादिवशी तरी ट्रेन पुढे सरकणार नाही अशी माहिती गार्डने दिली.
       त्या कमालीच्या छोट्या गावात राहायचे कुठे...ना लॉज ना धर्मशाळा. जमीनदार साहेब त्रागा करु लागले.    स्टेशन मास्तर मात्र भला माणूस होता. त्याने वेटिंग रूम, ओळखीची घरे अशा जागी यात्रेकरूची सोय करून दिली.  शिक्षकाचा चेहरा पाहून तो त्यांच्या पायावर कोसळलाच.  सर, ओळखलं मला ? मी मुकुंद देशमुख. वडील वारल्या नंतर शिक्षण सोडण्याची वेळ आली होती. तुम्ही दहावीची परीक्षा फी भरली म्हणून पुढे शिकलो.  स्टेशनमास्तर झालो.  शिक्षकाचे डोळे भरून आले. त्यांची बॅग हातात घेऊन मुकुंद घरी घेऊन जात होता.त्यांनी मुकुंदला थांबवले...एका मिनिटात आलोच ! अस्वस्थ पणे उभ्या असलेल्या जमीनदाराला ते म्हणाले, साहेब, माझे पुण्य समुद्रएव्हढे निश्चितच नाही. मी दानधर्मही केला नाही.मी जे केले त्याला कर्तव्य म्हणतात. ज्या कामासाठी पगार घेतला, ते काम पूर्ण निष्ठेने केले. या मुकुंदा सारखे शिष्य त्या कर्तव्य निष्ठेची फळे आहेत.हे विद्यार्थी असे पायावर वाकले ना, की मग तिर्थयात्रेचे पुण्य आमच्या खात्यावर जमा होत असते. माझ्या सोबत येता की थांबताय? जमिनदारही खालच्या  मानेने त्यांच्या मागून निघाला.

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...