एकदा एक अतिशय हुशार चोर एका श्रीमंत माणसाच्या बंगल्यावर चोरी करण्यासाठी गेला. त्यादिवशी एक संत महात्मे त्याठिकाणी भागवत कथा वाचण्यासाठी आले होते.ते परमेश्वरांच्या लीलांचे भावपूर्वक वाचन करीत होते,घरांतील मंडळी अगदी मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते.चोर मागच्या दाराने बंगल्यात शिरला त्याने पाहिले सर्व भागवत ऐकण्यात गुंग आहेत. त्याच वेळेस संत महात्मे श्रीकृष्णाच्या मुर्तिचे वर्णन करीत होते.ते वर्णन असे सुरू होते की,यशोदा माता आणि रोहिणी माता दररोज श्रीकृष्ण आणि बलरामांना सोन्याचे दागिने घालत असत.संत महात्मे श्रीकृष्ण भगवंताच्या रत्नांच्या हारांचे व अलंकाराचे किती अनमोल आहेत, मृत्युलोकांत तसे अलंकार कुठेच नाहीत असे भक्तीभावाने वर्णन करीत होते. चोराने कानोसा घेतला आणि त्या अलंकाराचे वर्णन ऐकले.चोराचे लक्ष चोरीवरून निघाले आणि तो विचार करू लागला की, इतके अमूल्य रत्न अलंकार ज्याच्याकडे आहेत त्या दोन्ही भावांचा पत्ता या साधुला मी विचारतो.श्रीकृष्ण आणि बलराम कोणत्या ठिकाणी गाई चारायला जातात हे विचारू आणि त्यांच्या रत्नांच्या माळा, अलंकार हिसकावून घेऊ.इतकं द्रव्य आपल्याजवळ आल्यावर आपण खूप श्रीमंत होऊन जाऊ की आपल्याला चोरी करण्याची गरजच पडणार नाही. असा विचार करून तो घरातून बाहेर पडला व बंगल्याच्या थोडं दूर जाऊन साधुचे प्रवचन संपण्याची वाट पाहू लागला.
श्रीकृष्ण भगवंताची लीला पहा. त्या चोराने भागवत आणि भक्तीचे प्रसंग याआधी कधीच ऐकले नव्हते,कारण चोर तो चोरच. तो दुर्व्यसनी लोकांच्या संगतीत राहणारा,त्याला संतसमागम माहितच नव्हता. चोरी करणे, लुटमार करणे,दरोडे घालणे हेच त्याला माहित होते. आता तो चोर सुनसान रस्त्यावर उभा राहून साधु येण्याची वाट पाहू लागला आणि कधी तो साधु येईल आणि मी त्या दोन्ही भावांचा पत्ता विचारेन असे त्याला झाले. तिकडे प्रवचन झाले आणि संत महात्मे बंगल्याच्या बाहेर आले व रस्त्याने आपल्या पर्णकुटीत जायला निघाले.साधु समोरून येत असल्याचे पाहून चोराने चाकू काढला आणि साधुसमोर जाऊन उभा राहिला.चाकूचा धाक दाखवत साधुला विचारले की, "तुम्ही ज्या दोन भावांबद्दल बंगल्यात सांगत होता,त्यांचा पत्ता मला सांगा.नाहीतर यमलोकी जायला तयार व्हा." संत महात्म्यांना भीती वाटली पण त्यांनी उत्तर दिले की,"अरे बाबा..!! मी भागवत कथा सांगत होतो"चोर म्हणाला, "मला फसवू नका."
त्या दोन्ही भावांच्या दागिन्याची किंमत खूप आहे.ते अमूल्य रत्नांनी बनलेले आहेत असं तुम्ही सांगत होता.मला त्यांचा पत्ता द्या. संत त्या चोराला समजावून सांगत होते.पण तो ऐकेना.मग संतांनी विचार केला की,या द्रव्यलुब्ध, अविवेकी मुर्ख माणसाला ज्ञानाच्या गोष्टी कळणार नाहीत. याच्या मनात फक्त सोने अलंकार,सोने याचाच विचार आहे आणि संताना त्या चाकुचेही भय वाटत होते. म्हणून आपला जीव वाचवण्यासाठी संत म्हणाले, "वृंदावनात जा तिथे दोन्ही भाऊ सकाळी सकाळी गाई चारायला येतात."तिथेच तुला ते भेटतील. एवढे बोलून तेथून संत महात्म्यांनी काढता पाय घेतला.जाता जाता चोराने त्यांना म्हटले की,"त्या दागिन्याचा अर्धा हिस्सा मी तुम्हाला देईन."
चोर वृंदावनाकडे जायला निघाला.भराभर चालत त्याने वृंदावन गाठले.संध्याकाळच्या सुमारास तो पोहचला होता.त्याने तेथील ग्रामस्थ लोकांना विचारले की,कृष्ण आणि बलराम गाई चारण्यासाठी कुठे येतात. लोकांनीही अगदी निर्मळ मनाने ती जागा दाखवली. चोर तिथे वृंदावनात गेला व एका झाडावर जाऊन बसला.मनात फक्त श्रीकृष्ण भगवंताचाच विचार होता.नकळत का होईना श्रीकृष्ण नामाचा जप सुरू होता. रात्रभर त्याला झोप आली नाही.पूर्ण रात्रभर त्याला तहान भूक कशाचीच पर्वा नव्हती.त्याच्या मनात एकच उत्सुकता होती. कधी त्या दोन्ही भावांचे अलंकार हिसकावून घेईन. तो मोठ्या उत्कंठेने सुर्योदयाची वाट पाहत होता.रस्त्याकडे पाहायचा.नकळत श्रीकृष्ण श्रीकृष्ण नामाचा उच्चार त्याच्या मुखातून निघत होता,आणि मनातही तेच नाम जपले जात होते. अरूणोदय झाला चोराची उत्कंठा अधिकच वाढली.थोड्याच वेळात त्याने एक अलौकिक असा प्रकाश समोरून येतांना पाहिला. निरखून पाहिल्यावर दोन मुले येतांना दिसली.तो त्या मुलांना एकटक पाहू लागला.याआधी इतके सुंदर मनमोहक रूप त्याने कधीच पाहिले नव्हते.मी कोण, काय,कशासाठी इथे आलो हे सर्व विसरला.श्रीकृष्ण आणि बलराम जवळ आल्यावर त्याला आठवले की,अरे आपण तर चोर आहोत आणि या दोघांचेही अलंकार घेण्यासाठीच येथे आलेले आहोत आणि त्याने श्रीकृष्ण आणि बलराम यांना धमकावायला सुरूवात केली.स्वत: पुढे येऊन सर्व दागिने काढायला लागला तेव्हा भगवंतांनी स्मित हास्य करून त्याला दागिने नेण्यास परवानगी दिली. चोराला परमेश्वराच्या अंगाचा अलौकिक स्पर्श अतिशय सुखावह वाटला.अलंकार घेऊन तो तेथून लगेच पसार झाला आणि त्या श्रीमंत माणसाच्या बंगल्याजवळ येऊन साधु येण्याची वाट पाहू लागला.साधु समोरून येताच त्याने म्हटले,
"त्या दोन्ही भावांचे दागिने मी आणले आहेत तुम्ही आपला वाटा घ्या."
साधु खूप अस्वस्थ झाले आणि त्याला म्हणाले, "तू कोणत्या मुलांचे दागिने आणले.?" चोर म्हणाला, "विसरलात काय,मी तुम्हाला कृष्ण आणि बलराम यांचा पत्ता विचारला होता.तुम्ही म्हणाला वृंदावनात जा तिथे गेलो आणि त्याचे नांवही विचारले आणि त्यांच्याकडून हे दागिने आणले. संत खूप आश्र्चर्यचकित झाले आणि त्याला म्हणाले, "मला त्या मुलांना भेटायचे आहे तिथे घेऊन चल." चोर म्हणाला चला आणि दोघेही वृंदावनात पोहोचले.तेथे कृष्ण आणि बलराम एका वृक्षाखाली बसलेले दिसले.चोर म्हणाला,ते बघा तिकडे आहेत... पण साधुला काहिच दिसेना. फक्त चोरालाच दर्शन होत होते.साधुला आणखीणही आश्र्चर्य वाटले आणि दुःखही वाटले.
चोर श्रीकृष्ण भगवंताला व बळीरामाला म्हणाला, "तुम्ही या महात्म्यांना का दिसत नाही? तुम्ही त्यांनाही दिसा नाहीतर ते मला लबाड समजतील."त्या चोर भक्ताच्या हट्टापायी महात्म्यांनाही परमेश्र्वराचे दर्शन झाले.
साधुच्या डोळ्यातून अश्रू आले आणि रडायला लागले व म्हणाले,
हे भगवंता मी अनेक वर्षांपासून भागवत कथा करतो.जन्मभर मी आपलेच स्मरण करत आलो पण अशी कृपा माझ्यावर केली नाही. या चोराला तर फक्त अलंकार पाहिजे होते.याला आपल्या ईश्र्वरत्वाबद्दल काहिच माहीत नव्हते.मग याला आपण दर्शन का दिले.? भगवंत म्हणाले,कारण त्या उत्कंठेने,उत्कंठ भावनेने तू मला कधी बोलावले नाहीस म्हणून.
संत महात्मे खूप रडायला लागले,
"पुढे भगवंत सांगु लागले की, नकळत का होईना त्याचा संतांच्या शब्दांवर दृढ विश्वास होता. भलेही त्याला माझ्याबद्दल काही माहित नव्हते. पण मला शोधण्याची उत्कंठा त्याच्या अंतःकरणात होती. रात्रभर तो माझेच स्मरण करीत होता. म्हणून मी त्याला दर्शन दिले. तशी उत्कंठा तुझ्या अंतःकरणात कधीही नव्हती. आताही तुला त्याच्या हट्टामुळेच दर्शन होत आहे. हे सर्व दृश्य पाहून चोराचे मन परावर्तित झाले. तो खूप आनंदीत झाला व त्या संताच्या सहवासात श्रीकृष्ण भगवंताचा परमभक्त झाला.
म्हणून,
संतांच्या शब्दांवर विश्वास ठेवावा. संसारूपी सागरातून तरून जाण्यासाठी संतांचे शब्द हीच नाव आहे.
|| जय जय राम कृष्ण हरी ||
आपला संतसेवक.
राजेंद्र पाटील. सांगवड
वारकरी मंच महाराष्ट्र राज्य,पाटण तालुका अध्यक्ष
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा