नाशिक लगत असलेल्या ओझरच्या आसपासचं उपनगर. कुटुंब ठिकठाक. एक हिंदुस्तान एराॅनाॅटीक्स लिमिटेड HAL कंपनीतुन सेवानिवृत्त झालेले आजोबा वयोमानामुळे घरीच बसुन. साहजीकच सुनेवर सर्व भार. आधी किरकोळ कुरबुर. मग बाचाबाची. त्यानंतर कडाक्याची भांडणं. सुनेचं म्हणणं. घरी बसुन ऐत्यासारखं खावु नका. काम करुन हातभार लावा संसाराला. पण बाबा थकलेले. शेवटी सुनेचे टोमणे खाण्यापेक्षा घर सोडायचं त्यांनी ठरवलं. मुलानेही अडवलं नाही.
*आले नाशिकला. कुणी म्हातारा म्हणुन काम देईना आणि भूक जगू देईना. भीक मागण्या वाचून पर्याय उरला नाही शेवटी गंगेकाठी.*
बाहेरच मुलाला भेटुन, लाज टाकून ,बाबा विचारायचे, *"येवु का रे बाळा घरी रहायला?"*
"बाळ" म्हणायचे, *"मला काही त्रास नाही बाबा, पण "हिला" विचारुन सांगतो."*
पण, *"या बाबा घरी, "असा निरोप बाळाकडून कधी आलाच नाही !*
*"बाबाचे स्वताचे रिटायरमेंट नंतर बांधलेलं घर म्हणजे बंगला....म्हातारपणाचा खोपा.....पण आजी अचानक गेली...व एच ए एल ला पेंशन नाही. कारभार सुनेच व मुलाच राज्य"*
......आता बाबा अट्टल भिकारी झाले. झाले , कि त्यांना केलं गेलं....?
असाच एके दिवशी एका मित्राच्या आईच्या तेराव्याच्या कार्यक्रमास गोदातिरी गंगेवर गेलो असता.... भीक मागताना माझी न् त्यांची भेट झाली व आम्ही एकमेकांना ओळखले सुध्दा.मि पंचायत समितीच्या निवडणुकीत उभा होतो तेव्हा याच बाबांनी प्रचारात आर्थिक मदतही केली होती व मि निवडुनही आलो तेव्हा टाऊनशिप ला घरी बोलावून माझा सत्कार सुध्दा घेतल्याचे माझ्या लक्षात होतेच. मला सर्व अजुनही नेतेच म्हणतात.बोलताना बाबा म्हणायचे, *"नेते म्हातारपण म्हणजे नाजुक वेल हो. वेलीवरच्या सुंदर फुलांकडे सगळ्यांचं लक्ष जातं, पण या फुलांना अंगाखांद्यावर खेळवणाऱ्या वेलीकडे कुणाचंच लक्ष नसतं. वेल बघा नेहमी झुकलेली आणि वाकलेलीच असते. कुणाचाच आधार नसतो म्हणून. तसंच हे म्हातारपण. झुकलेलं आणि वाकलेलं. निष्प्राण वेलीसारखं.!*
बाबांची वाक्य ऐकून काटा यायचा अंगावर माझ्याही!
*"नाव, पत्ता, पिनकोड सहित टाकून पत्र पत्त्यावर पोचत नाहीत नेते, त्याला पोस्टाचं तिकिट लावलं तरच ते पत्त्यावर पोचतं. नाहितर वर्षानुवर्षे पडून राहतं धुळ खात पोस्टातच. तसंच आमचं आयुष्य! नाव पत्ता सग्गळं बरोबर ! पण देव आमच्यावर तिकिट लावायला विसरला, म्हणून आम्ही इथं पडलेले." असं बोलून ते हसायला लागतात. त्यांचं ते कळवळणारं हसू आपल्यालाच पीळ पाडून जातं.
मी म्हणायचो, "बाबा हसताय तुम्ही. पण हे हसू खोटं आहे तुमचं."
तर म्हणायचे. "आयुष्यभर सुखी असल्याचं ढोंग केलं. हसण्याचं नाटकच केलं. आता या वयात तरी खरं हसू कुठुन उसनं आणू ?" मी निरुत्तर !
वाळलेल्या सुकलेल्या पालापाचोळ्यासारखं आयुष्य झालंय. कुणीतरी येतं आणि आम्हाला गोळा करतं. टोपलीत ठेवतं. वाटतं चला, कुणाला तरी आपली दया आली. नंतर कळतं कि सुकलेले आहोत म्हणुन जाळण्यासाठी, शेकोटी पेटवण्यासाठी आपल्याला टोपलीत ठेवलंय. सुकलेल्या पालापाचोळ्याचा नाहीतरी दुसरा वापर काय होणार म्हणा ? बाबांच बोलणं ऐकून, मीच आतून तुटून जायचो. काहीतरी काम करा बाबा, असं सांगून मी त्यांना विनवायचो, पण आता उमेद गेली होती. बाबा कामाला तयार नव्हते.!
म्हणायचे,"गंगाच आमची आई, ईथ जेवण मिळते, निवारा मिळतो, पैसे ही मिळतात. पण "आज आहे मातीवर, उद्या मातीखाली जायचं. किती दिवस राहिलेत आता ? आज कुणी विचारत नाही, पण उद्या मेल्यावर हेच लोक अंत्यदर्शनाला येवुन पाया पडतील. श्राद्धाला ईथेच जेवताना चांगला होता हो बिचारा असं म्हणतील."
*नाटक असतं हो सगळं आयुष्यच. प्रत्येकजण आपापली भूमिका पार पाडत असतं इतकंच !*
इतकं असुनही , एके दिवशी सहजच गंगेवर फेरफटका मारतांना .... बाबांना कामाला तयार केलंच. माझ्या मित्राच्या सानप यांच्या बटऱ्याच्या दुकानात सानप यांना बॅटरी विकण्यासाठी.... त्यांना मदत करण्यासाठी. शे पाचशे रुपये रोज कमावतात बाबा आता. भिक मागत नाहीत.
मागच्या महिन्यात अन्याय अत्याचार निर्मुलन समितीच्या वतीने आंबेडकर नगर च्या माता रमाई हाॅल मध्ये जागतिक महिला दीनानिमित्ताने आदर्श समाज सेवा पुरस्कार याच बाबांना देवुन त्यांचा सत्कारही घेतला... !
आज हे आठवायचं कारण म्हणजे, आज मला हे बॕटऱ्या विकताना रस्त्यावर भेटले. मला जरा बाजुला घेऊन गेले. म्हणाले, एक गंमत सांगायचीय नेते !
सुनेला कळलंय माझ्या, मी दहा पंधरा हजार कमावतो. तर मला शोधत माझा मुलगा आला होता नाशकात आणि म्हणाला, "हिने" तुम्हाला घरी बोलवलंय, झालं गेलं जावु दे म्हणते. पाया पडुन माफी मागायला तयार आहे. बाबा, मला पण तुमच्या धंद्यात घ्या, एकत्र मिळुन करु."
मी स्तिमित झालो, तीन वर्षं आपल्या बापाला/सासऱ्याला भिक मागायला लावली. आता पैसा दिसायला लागल्यावर सगळी नाती जवळ यायला लागली.?
नेते काय करु ? सल्ला द्या....!
साहजीकच मी बोललो, ज्यांनी तुमच्यावर ही वेळ आणली , त्यांना थारा देण्याचा प्रश्नच नाही, त्यांना तुम्ही नाही , पैसा हवाय तुमचा, आता त्यांना जवळ नका करु !
बाबा म्हणाले, "नेते मला कळतंय हे सगळं, पण एक सांगू? आज मी माझ्या पोराला हात दिला नाही तर उद्या माझ्या जागेवर माझा पोरगा दिसंल भीक मागताना ! चालेल तुम्हाला ?"
मी माझ्या माघारी, त्याला भिकारी बनवून जाईन का?
*अहो, चुकतात तीच पोरं असतात. माफ करतो तोच *"बाप"* असतो.
अहो, लहानपणापासुन *प्रेम म्हणजे काय. माया म्हणजे काय, भक्ती म्हणजे काय, दया म्हणजे काय हे शिकवत आलो.* त्यातून तो किती शिकला , माहिती नाही. बहुतेक नाहीच शिकला, नाहीतर , ही वेळ नसती आली माझ्यावर. असो !
पण आता आयुष्याच्या शेवटच्या वळणावर तरी,
*"क्षमा"* म्हणजे काय हे मला त्याला शिकवू द्या नेते...!
"आता जर तो हे शिकला नाही तर तो कधीच शिकणार नाही, आणि कधीच कोणाला *"क्षमा"* करणार नाही. "
"काही नाही ,काही नाही, तर जाता जाता एवढं तरी , शिकवू द्या मला , नेते...!
असं म्हणाले ते, आणि हसत हसत चालायला लागले आणि मी बसलो मागे डोळ्यातलं पाणी आवरण्याची कसरत करत.
संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा