गुरुवार, १५ जून, २०२३

402. मार्गदर्शिका...

 उमेश तनुजाच्या कॅबिनला येऊन तिच्या समोर उभा राहिला जसा कोर्टाचे समन्स घेऊन आल्यासारखा.
"काय रे, काय विषय? का बोलावलेय त्यांनी? त्यांना कळव मी अर्ध्या तासाने येऊन त्यांना भेटते म्हणून..
""ओ मॅडम, त्यांनी सांगितलेय तुम्हाला पुढे घालूनच ये म्हणून.. चला चला.. वेळ काढू नका.. नाहीतर साहेब मला ओरडतील.."त्याचे हे हुकुमाचे बोलणे ऐकून तनुजा चमकली.
 "काय रे, काय झाले? काही समस्या आहे का?""होय मॅडम. 
तुमच्या त्या पोराने परत काही राडा केलाय.. आणि साहेब खूप गरम झालेत..आणि कॉलेजचे प्रेसिडेंट आणि सेक्रेटरी पण तुमची वाट बघतायेत.."
"माझा पोर? अरे तो तर शाळेत आहे.. ह्या इंजिनिअरिंग कॉलेजात तो कशाला येईल आणि काय करेल?"
अहो तो रजत.. तुमचा मानसपुत्र.. लंडनहून आलेला.."आता तनुजाच्या डोक्यात प्रकाश पडला..ह्याची भानगड आहे होय.. तिने पटकन हातातले पेन खाली टाकले आणि उमेशपेक्षा तीव्र गतीने ती प्रिन्सिपॉल सरांकडे धावली. कारण रजत आणि त्याचा कारभार हे नक्कीच गंभीर विषय आहेत हे तिला अपेक्षितच होते.कर्नाटकातील बेंगळूरात असलेले हे इंजिनीरिंग कॉलेज खूपच प्रतिष्ठित तांत्रिक महाविद्यालय.. उत्तम शैक्षणिक प्रतिमा असलेले आणि नावाजलेले.तीस ते चाळीस वर्षांपासून सतत उच्च क्रमांकावर असलेले आणि हुशार, गुणी, होतकरू विद्यार्थ्यांचे स्वप्नातले.. राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेत पहिल्या शंभर गुणवत्तेत उतीर्ण विद्यार्थ्यांना मात्र तिथे शिकायला मिळायचे..अशा ह्या प्रतिष्ठित कॉलेजात तनुजा इलेक्ट्रॉनिक्स विभागात प्रोफेसर म्हणून चार वर्षांपूर्वी लागली होती.. एक चांगली शिक्षिका असलेली तनुजा एक सहृदयी व्यक्ती होती.शैक्षणिक जबाबदारीबरोबर महाविद्यालयात प्रत्येक प्राध्यापकाला बाकीच्याही बाबतीत गुंतविले जायचे. जसे विद्यार्थ्यांचे प्रोजेक्ट काम..त्यांचा वैयक्तिक आणि व्यक्तिमत्व विकास.. नोकरीसाठी भरती. शैक्षणिक आणि सांस्कृतिक वाढ वगैरे मग प्रत्येक प्राध्यापकाला मार्गदर्शक (मेंटर) म्हणून नेमले जायचे आणि त्याच्या किंवा तिच्या खाली काही विद्यार्थी विद्यार्थिनी मार्गदर्शनासाठी विभागले जायचे. अशा दहा इंजिनीरिंग विद्यार्थ्यांच्या यादीतील तनुजाला दिलेला एक विद्यार्थी 'रजत' होता. जेव्हा तनुजा प्रिंसिपलच्या ऑफिसला पोचली तेव्हा तिने दुरूनच पाहिले. कॉलेजच्या ट्रस्टचे चार मातब्बर सदस्य तिथे गंभीर चेहऱ्याने बसले होते. कोपऱ्यात रजत उभा होता..त्याच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये.. आणि त्याच अविर्भावात. झोपाळू डोळे.. बेफिकीर चेहरा.. आणि तोंडावर असलेला तोच उध्दट आणि अहं श्रेष्ठत्वाचा भाव.. तनुजाला थोडी चुटपुट लागली..काय करावे बाई ह्या पोराचे..नेहमीच काहीतरी गोंधळ घालून ठेवतो.. मला निस्तरताना नाकी नऊ येतात.. पण माझे मन काही मला त्याला सोडू देत नाही. कोठेतरी थोडासा ओलावा ह्या मुलासाठी आहे. आत येताच तनुजाला जाणवले की प्रिन्सिपॉल खूप रागात आहेत ते. एरवी तनुजा दिसली की त्यांच्या तोंडावर हास्य दिसायचे.त्यांना तनुजाबद्दल खास आपुलकी होती कारण उत्कृष्ट प्राध्यापकांच्या यादीत तिचे नाव उंचावर होते.पण आज त्यांनी तिला पाहून अगदी कोरडेपणाने बसायला सांगितले. पुढेच दोन तास खूप बोचक गेले. मामलाच गंभीर होता.भरल्या वर्गात रागावलेल्या रजतने एका मुलाला आपल्या बाबाचे रिव्हॉल्व्हर दाखवून नेम धरला होता.आणि संतापाच्या भरात त्याने गोळीपण मारली असती. प्रसंगावधानाने बाकीच्या मुलांनी मागून गराडा घालून त्याला धरले होते आणि त्याच्या हातातील ते रिव्हाल्वर हिसकावून घेतले होते..खूप मोठा अनर्थ टळला होता. पण प्रसंगाचे गांभीर्य इतके मोठे होते की आपल्या देशात तेही बेंगळूरसारख्या प्रसिद्ध शहरात अगदी टॉपवर असलेल्या कॉलेजात अशी घटना घडणे खूपच धक्कादायक होते. सगळ्या मुलांनी रजतविरुद्ध तक्रार केली होती आणि त्याला कॉलेजमधून काढून टाकण्याची मागणी केली होती. आणि ते रास्तच दिसत होते. एखाद्या विद्यार्थ्याच्या अशा बेशिस्त आणि बेजबाबदार वागण्याला सहसा त्याच्या मार्गदर्शकाला दोषी ठरवून योग्य मार्गदर्शन दिले नाही असे गृहीत धरले जाते. आणि म्हणूनच प्राचार्यानी तनुजाला पाचारण करायला सांगितले होते.रजत लंडनमध्ये जन्मलेला आणि शिकलेला हुशार मुलगा होता. त्याचे आईवडील लग्नानंतर कामानिमित्ताने तिथे स्थायिक झाले होते. त्याला एक बहिणपण होती. दोन्ही मुले जेव्हा माध्यमिक शाळेत शिकत होती तेव्हा भारतातील एका छोट्या शहराला दोन्ही पालकांना वयोवृद्ध मातापिता आणि इस्टेटीच्या कारणामुळे परत यावे लागले. लंडनात शिकणाऱ्या दोन्ही मुलांनी त्यांच्याबरोबर यायला नकार दिला..मग दोन्ही मुलांना बोर्डिंग शाळेत घालून पालक भारतातच राहिले.जेव्हा बारावी संपली तेव्हा रजतच्या वडिलांनी त्याला ह्या प्रख्यात कॉलेजात विदेशी आरक्षणात शिकायला नोंदले होते. त्याची वागणूक त्याच्या पालकांनापण डोकेदुखी झाली होती...तो कोणालाही सकारात्मक घेत नव्हता.. डॉक्टरांनी मनोरुग्ण ठरवलेला रजत दररोज खूप गोळ्या आणि औषधे घ्यायचा...त्यामुळे तो नेहमी सुस्त आणि असमतोल असायचा. परदेशात जन्मलेल्या आणि शिकलेल्या रजतला एक मोठी मानसिक समस्या होती. आपण भारतीय मुलांपेक्षा राहण्यात, दिसण्यात आणि अभ्यासात श्रेष्ठ आहोत असे त्याला नेहमी वाटत असे.पहिल्या सेमिस्टरपासून त्याची त्याच्या वर्गमित्रांशी तुलना सुरु झाली.. त्याचे कोणाशी जमेना आणि पटेना. त्याला इलेक्ट्रॉनिक्स ह्या विषयात विशेष प्राविण्य होते.. मग त्याचे प्राध्यापकांशीसुद्दा वादविवाद सुरु झाले.. एकंदरीत रजत सगळ्यांना नकोसा झाला. आणि सगळ्यात विचित्र गोष्ट ही होती की त्याला काहीही उमगत नव्हते.. त्याला कळतही नव्हते की त्याचे काय चुकते ते..त्याला नेहमी वाटत राहायचे की इथले लोकच वाईट आहेत..त्याच्याशी पटवून घेत नाहीत.. सगळे शिक्षक तेवढे बुद्धिमान नाहीत वगैरे वगैरे. आणि असा हा विद्यार्थी प्राचार्यानी मुद्दाम तनुजाला मार्गदर्शनासाठी सोपवला होता. कारण त्यांना खात्री होती की तनुजा नक्कीच त्याला सुधारेल. मग गेल्या चार महिन्यापासून तिने त्याला सुधारण्याचा विडाच उचलला होता. जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा ती रजतला स्टाफरूमला बोलावत असे. सुरुवातीला त्याने तनुजालाही धुडकावून टाकले होते की माझ्या निजी मामल्यात तुम्ही जास्ती दखल देऊ नका..मला ते बिलकुल आवडत नाही. आमच्या तिथे असे कोणी कोणाच्या वैयक्तिक विषयांत लक्ष घालत नाही वगैरे. पण तनुजा चिकाटीने प्रयत्न करत राहिली त्याचे मानसिक न्यूनगंड काढण्यात.. त्याला समजावण्यात. त्याचे व्यक्तित्व सुधारण्यात.. त्याला अभ्यासावर केंद्रित करण्यात. आणि आता आज एकदम तो वर्गात असा वागला होता.. खरंच चिंताजनक बाब होती. प्राचार्यांना तनुजाने विनविले...
”आपल्याला त्याला सुधारण्याचा आणखी एकच महिना द्या; मी स्वतःच त्याची पूर्ण जबाबदारी घेईन. एक महिन्यानंतर तो सुधारला नसेल तर त्याला तुम्ही कॉलेजातून काढून टाकू शकता”असे लेखी प्रमाणपत्र देऊन तनुजाने रजतला पुढच्या दिवशी तिला भेटायला सांगितले. 
       आतापर्यंत तनुजाला कळून चुकले की फक्त रजतला बुद्धी सांगितले तर तो काही सुधारणार नाही..ह्यात त्याच्या आजूबाजूचे वातावरणपण बदलले पाहिजे. सगळ्यांनी मिळून त्याला सुधारण्यात हातभार लावला पाहिजे.. त्याचा भारतीयांबद्दल असलेला गैरसमज दूर केला पाहिजे. शिक्षकांबद्दल असलेले नकारात्मक मत बदलले पाहिजे..आणि मूलतः त्याची असामान्य असलेली बुद्धिमत्ता चमकली पाहिजे आणि त्यामुळे त्याला फायदा झाला पाहिजे आणि कॉलेजचेही नांव झाले पाहिजे. मग दुसऱ्याच दिवशी तिने त्याच्या वर्गमित्रांबरोबर गुप्तपणे चर्चा केली. एक महिन्याचा करार त्यांना समजावून सांगितला... त्याच्या मनात असलेले आपल्या देशबांधवांबद्दल, शिक्षकांबद्दल, संस्कृतीबद्दल असलेले गैसमज दूर केले पाहिजे हे समजावून सांगितले. त्याच्या पूर्वजीवनाबद्दल त्यांना मोकळेपणाने कळविले.आपल्या सगळ्यांचे सहकार्य, समजूतदारपणा, त्याच्याबद्दल सहानुभूती आणि अनुकंपाच त्याला बदलवू शकतील हे ठामपणे त्यांच्या मनावर बिंबविले. मग सुरु झाला सगळ्यांचा गनिमी कावा...त्याच्या मानसिक समस्येला हरवून टाकण्याचा. त्याचे दुर्गुण मिटविण्याचा. त्याच्या मनातील अवाजवी अहंकाराला पळवून टाकण्याचा. तिसऱ्या दिवसापासून सगळ्यांची त्याच्याबरोबर वागण्याची पद्धत बदलली.कोणी त्याच्या रागाला दुर्लक्ष्य करू लागले. कोणी त्याच्या उपहासावर हसून दाद देऊ लागले. प्राध्यापकांनी त्याच्या बुद्धिमत्तेचे खुलेपणाने कौतुक करणे सुरु केले. हे सगळे रजतला अनपेक्षित होते. तो मनोमन खजील होऊ लागला. त्याची वर्गाकडे बघण्याची दृष्टी बदलली. प्राध्यापकांच्याकडून आपली आणि जास्ती वाहवा व्हावी म्हणून धडपडून अभ्यास करू लागला. मानसोपचारावरील त्याच्या गोळ्या आणि औषधेसुद्दा कमी होत गेली. तनुजाच्या सहृदयी मेहनतीने, बाकी प्राध्यापकांच्या सहकार्याने आणि वर्गमित्रांच्या मदतीने रजतात आमूलाग्र बदल दिसून येऊ लागला. प्राचार्यानी त्याला कॉलेजातून काढून टाकण्याचा निर्णय सोडून टाकला.अशी बाकीची चार वर्षे भरभर निघून गेली. रजतने शेवटच्या वर्षी केलेल्या प्रोजेक्टचे खूप महत्व होते. मग त्याने त्याच्या शोधाचे ‘पेटंट' आपल्या नावावर करून घेतले. तांत्रिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याने आपली स्टार्टअप स्थापन केली. त्याच्या तंत्रज्ञानाचा शोध अविकसित देशांसाठी खूप उपयोगी होता. काही वर्षांनी त्याच्या कंपनीच्या बऱ्याच देशांत शाखा काढल्या गेल्या. हा समजुदार, कुशाग्र आणि जबाबदार रजत एक यशस्वी उद्योजक बनला. आता दरवर्षी रजत आपण शिकलेल्या कॅालेजातील इंजिनिअरिंगच्या किमान दहा मुलानांतरी आपल्या कंपनीत त्यांचे शैक्षणिक प्रोजेक्ट करायला देतो.. आपल्या कंपनीत नोकरी देववतो.. आजही ते कॉलेज रजतसारख्या लक्षणीय विद्यार्थ्यामुळे उत्कृष्ट्य क्रमांकावर विराजमान आहे. जर तनुजासारख्या आत्मीय आणि सहृदयी मार्गदर्शकिने एका महिन्याची मुदत घेतली नसती तर... सगळ्यांनी सहकार्य देऊन हात जुळविले नसते तर.. तर...रजत भूतकाळातील एक नकोसा आणि बहिष्कृत विद्यार्थी म्हणून गणला गेला असता.

******संध्या राजन******

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...