बुधवार, ४ डिसेंबर, २०२४

1589. तृप्ती

 संपतराव बाहेर फिरुन घरात शिरत नाही तोच त्यांचा नातू त्यांना म्हणाला.
"आबा पप्पांचा फोन आला होता. तुम्हाला तयार व्हायला सांगितलंय. आपल्याला पप्पांच्या मित्राच्या वाढदिवसाला हाॅटेलमध्ये जायचंय."
वाढदिवसाच्या पार्टीला आणि तेही हाॅटेलमध्ये हे ऐकून संपतरावांच्या कपाळावर आठ्या पडल्या.
"मी नाही येत पार्टीला. तुम्ही जा." ते उद्वेगाने म्हणाले आणि आपल्या रुममध्ये निघून आले. नातू त्यांच्याकडे बघतच राहीला. आजकाल संपतरावांना हाॅटेलमध्ये जेवायला जाणं अजिबात आवडत नव्हतं. सात सात दिवस अगोदर बनवून ठेवलेल्या एकाच प्रकारच्या ग्रेव्हीमध्ये अनेक वेगवेगळे पदार्थ तेही अनावश्यक मसाले वापरुन त्यांची मुळची चव घालवून टाकलेली असते असं त्यांचं म्हणणं. त्यातून आजकाल हाॅटेलमध्ये काय भयानक प्रकार चालतात. उरलेले उष्टे पदार्थ एकत्र करुन त्याला फोडणी देऊन नवीन पदार्थ करणं असो की सडलेल्या, खराब भाज्या वापरणं असो नाहीतर नकली पनीर, केमीकलयुक्त रंग वापरणं असो. असे पदार्थ खाणं म्हणजे स्वतःचं आरोग्य बिघडवून घेणं असं संपतरावांचं स्पष्ट मत होतं. एका कंपनीत ते सेल्स एक्झिक्युटिव्ह होते. सगळं आयुष्य प्रवासात गेलेलं. अर्थातच बऱ्याचदा जेवणं बाहेर हाॅटेलातच व्हायचं. त्यामुळे त्यांना आता या हाॅटेलच्या जेवणाचा अक्षरशः वैताग आला होता. घरचं साधंसुधं जेवण तेही बायकोच्या हातचं त्यांना अतिशय आवडायचं. पण दोन वर्षांपूर्वी बायकोचं निधन झालं. सुन नोकरी करणारी. संध्याकाळी स्वयंपाकाचा कंटाळा आला की हाॅटेलमध्ये जाणं नाहीतर झोमॅटो, स्विगीवरुन बाहेरुन जेवण मागवणं नेहमीचं होऊन गेलं होतं आणि तेच संपतरावांना आवडत नव्हतं. ते आपल्या रुममध्ये पुस्तक वाचत बसलेले असतांनाच सुजीत आत आला.
"नाना तयार व्हा ना.आपल्याला पार्टीला जायचंय"
"तुम्ही जाऊन या ना. मला आजकाल पार्ट्यांना जायचा कंटाळा येतो. असंही तिथे माझ्या ओळखीचं कुणी नसतं "
" असं कसं म्हणता? प्रथमेशचे वडील तुम्हांला चांगलंच ओळखतात. त्यांनीच मला "तुझ्या वडिलांना नक्की घेऊन ये असं सांगितलंय. वाटल्यास त्यांना तुम्हाला फोन करायला सांगतो."
"नको नको. खरं सांगतो तुम्ही जा. मी खाऊन घेईन सकाळचं काही उरलं असेल तर."
"सकाळचं काहिही उरलेलं नाहिये. आणि नाना आता फक्त तुमच्यासाठी किर्तीला स्वयंपाक करायला लावू नका. तीही थकून भागून येते. अशा पार्टीच्या निमित्तानेच तिला आराम मिळतो."
     संपतराव चुपच झाले. खरंतर सुजीतला एवढा गलेलठ्ठ पगार असतांना सुनेने नोकरी करणंच त्यांना आवडत नव्हतं. पण एकदा ते असं म्हंटले होते तेव्हा किर्ती उसळून म्हणाली होती "मग नाना माझ्या वडिलांनी मला इतकं शिकवलं ते काय फक्त रांधा, वाढा, उष्टी काढायलाच का? ते काही नाही. मी नोकरी सोडणार नाही." तिचंही म्हणणं योग्यच होतं. संपतरावांना ते पटतही होतं. पण नवराबायको दोघंही नोकरीला असले की घराला घरपण रहात नाही असं त्यांना वाटायचं. म्हणून तर त्यांनी त्यांची बायको सावित्रीबाई उच्चशिक्षित असतांनाही तिला नोकरी करु दिली नव्हती. अर्थात त्यावेळच्या मुली घर संसाराला पहिलं प्राधान्य द्यायच्या. त्यामुळे सावित्रीबाईंनी संपतरावांचा निर्णय सहजगत्या स्विकारला होता आणि तो स्विकारण्यातही त्यांना कोणताच कमीपणा वाटला नव्हता. आजकालच्या मुली शिकल्या, आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र झाल्या पण त्यामुळे नवीनच पारिवारिक प्रश्न निर्माण झाले. त्यांच्या सुनेलाही करिअर महत्वाचं वाटत होतं. करिअर आणि घर सांभाळतांना बाईची जी प्रचंड ओढाताण होते तिचा सर्वप्रथम परिणाम स्वयंपाक करण्यावर होतो. त्यातूनच मग बाहेरुन जेवण मागवण्याचे किंवा वारंवार हाॅटेलमध्ये जाऊन जेवण्याचे प्रकार वाढले होते. संपतरावांना हे कळत होतं म्हणून तर त्या दिवसापासून संपतरावांनी तोंडाला कुलुप लावून घेतलं होतं.
     सुजीतच्या आग्रहाखातर ते हाॅटेलमध्ये जायला निघाले खरे पण तिथे जेवणाच्या कल्पनेने त्यांची भुकच मरुन गेली होती. कुठलंस थ्री स्टार हाॅटेल होतं. जेवणाचे रेटही तगडेच असणार होते. प्रथमेशच्या वाढदिवसाची जय्यत तयारी हाॅटेलने केलेली दिसत होती. खरंतर तीन परीवारांची मिळून इनमीन १५-१६ माणसं होती. घरीसुद्धा हा कार्यक्रम करता आला असता. पण म्हणतात ना हौसेला मोल नसतं. त्यातून पैसा भरपूर असला की तो उधळायला निमित्तच लागतं. जो कार्यक्रम १-२ हजारात होऊ शकला असता त्यासाठी अनावश्यक १५-२० हजार खर्च केले जाणार होते. प्रथमेशचे आईवडीलही आले होते पण त्यांच्याही चेहऱ्यावर विशेष आनंद दिसत नव्हता. बरोबरच होतं. वाढदिवसाचे सोज्वळ,पवित्र सोहळे पाहिलेली ही माणसं. असे भडक दिखाऊ कार्यक्रम त्यांना कसे रुचावेत?
टेबलवर भला मोठा केक आणला गेला. मागे कुठलंतरी वेस्टर्न म्युझिक सुरु झालं. कडक थ्री पीस सुट घातलेल्या प्रथमेशने केकवरच्या मेणबत्त्या विझवून केक कापला तसा सगळ्यांनी एकच जल्लोष केला. एकदोन जणांनी केकवरच आयसिंग उचलून प्रथमेशच्या तोंडाला फासलं. या किळसवाण्या प्रकाराची तर संपतरावांना अतिशय चीड होती. जो पदार्थ खाण्यासाठी आहे तो चेहऱ्यावर फासण्यात कसली आली मजा? केक एकमेकांना भरवून फोटो सेशन झालं. दुर उभं राहून संपतराव हे सगळे प्रकार पहात होते. त्यांना स्वतःच्या वाढदिवसाची आठवण आली. सावित्रीबाई त्यांना पाटावर बसवून ओवाळायच्या. त्यांना प्रेमाने पेढा भरवायच्या. मग ते सगळ्या मुलांना जवळ घ्यायचे. घरात गोडाधोडाचा स्वयंपाक असायचा. एका पेढ्याव्यतिरिक बाहेरचा कोणताही पदार्थ घरात न आणण्याकडे सावित्रीबाईंचा कटाक्ष असायचा. त्या आठवणीने संपतरावांना गहिवरल्यासारखं झालं. केक कापण्याचा सोहळा आटोपल्यानंतर साताठ वेटर आले. त्यांनी आता जेवणाची तयारी सुरु केली. समोर पडलेलं भलंमोठं मेनू कार्ड संपतरावांनी चाळायला सुरुवात केली. "बापरे !काय भयंकर महाग पदार्थ आहेत. एकही भाजी तीनशेच्या खाली नाही. साधी चपाती सुध्दा तीस रुपयाची? खरंच इतक्या महागड्या जेवणाची शरीराला गरज असते?" ते मनातल्या मनात बडबडले.
     वेटरने चायनीज चवीचं सुप आणून टेबलवर ठेवलं. सोबतीला मसाला पापड. मग वेगवेगळ्या प्रकारचे स्टार्टर आले. तंदूरी मंचुरियन, पनीर चिली, हराभरा कबाब आणि बरंच काहीबाही. हे स्टार्टर खाण्यातच पोट भरणार होतं. मग जेवणार कसं आणि किती? हा प्रश्न विचारायचं संपतरावांच्या ओठावर आलं होतं. पण पार्टी दुसऱ्याची होती. अर्थात ही पार्टी सुजीतची जरी असती तरी हा प्रश्न विचारण्याचं धाडस संपतरावांना झालं नसतं. त्यांनी प्रत्येक स्टार्टरचा एक एक तुकडा घेऊन फक्त त्याची चव घेतली. त्यांनी आयुष्यात इतके पदार्थ खाल्ले होते की या पदार्थांची नवलाई त्यांच्यासाठी संपली होती. स्टार्टर संपले आता जेवणासाठी वेगवेगळ्या भाज्यांच्या ऑर्डर्स दिल्या जात होत्या. इतक्या भाज्यांची खरंच गरज होती का? दाबून स्टार्टर खाऊन झाल्यावर खरंच इतकी भुक शिल्लक आहे? काही वाया तर जाणार नाही? पैसा आहे म्हणून वाटेल ते ऑर्डर करत बसायचं का? हे प्रश्न त्यांच्या मनात आले. पण मघाप्रमाणेच ते आताही चुप बसले. असंही आजकालच्या तरुण पोरांना म्हाताऱ्यांचं‌ बोलणं पटतं कुठे? त्यांनी बसलेल्या सगळ्यांकडे नजर फिरवली. मसालेदार आणि भरपूर तेल, बटर घातलेले पंजाबी पदार्थ खाऊन जवळजवळ सर्वच लठ्ठ झाले होते. अपवाद होता तो प्रथमेशच्या आईवडिलांचा आणि त्यांचा स्वतःचा. साधं, सकस, भरपूर पोषक मुल्य असलेलं महाराष्ट्रीयन जेवण आजकाल मराठी माणसांना का आवडत नाही याचं संपतरावांना नेहमीच कोडं पडायचं. नाहीतरी मराठी माणसाला आपल्या परंपरांचा, आपल्या भाषेचा, आपल्या खाद्य संस्कृतीचा अभिमानच नाही हे त्यांनी बऱ्याचदा अनुभवलं होतं. नाहीतर महाराष्ट्रात पंजाब्यांची आणि दाक्षिणात्यांची एवढी हाॅटेल्स उघडीच नसती. आणि म्हणूनच तर हाॅटेल्सच्या मेनूकार्डमधून मराठी पदार्थ गायब झाले होते.
     जेवण झालं. त्यांच्या अंदाजानुसार भरपूर भाज्या उरलेल्या पाहून संपतरावांचा जीव कळवळला. या उरलेल्या पदार्थांमध्ये कमीतकमी ५-६ माणसं आरामात जेवली असती. हाॅट वाॅटर बाऊल्स आली. पण त्यात हात न धुता संपतराव उठून बेसीनजवळ गेले. तिथे त्यांनी चुळ भरुन तोंड धुतलं. सध्या दंतवैद्यांचे दवाखाने या हाॅट वाॅटर बाऊल्सच्या थेरांमुळेच तुफान चालताहेत असं त्याचं मत होतं. घरी गेल्यावर आपल्या नातवांना ते खळखळून तोंड धुवायला सांगणार होते. डायनिंग टेबलवर ते परत आले तेव्हा सगळी मंडळी तोंडात शोप कोंबून निघण्याच्या बेतात होती. टेबलवर बऱ्याच भाज्यांच्या डिशेस हातही न लावलेल्या स्थितीत पडलेल्या पाहून संपतरावांना रहावलं नाही. ते प्रथमेशला म्हणाले
" अरे प्रथमेश हे एवढं उरलेलं पॅक तरी करुन घे. कुणा गरीबाचं तरी पोट भरेल."
"कुणाला देणार काका हे? आमच्या सोसायटीत तर कुणी हे घेणार नाही."
"ठिक आहे. मला दे पॅक करुन. मी बघतो कुणाला द्यायचं ते"
" नाना कशाला घेताय ते "सुजीत नाराज होऊन म्हणाला "आपल्याकडे तरी कुणाला देणार? आणि ते चांगलं तरी वाटतं का?"
"सुजीत अरे नाना बरोबरच म्हणताहेत. वाया जाण्यापेक्षा कुणाच्या पोटात गेलं तर चांगलंच. नाही का?" प्रथमेशचे वडील म्हणाले तसा सुजीत चुप बसला पण त्याची नाराजी मात्र गेली नव्हती. उरलेल्या चार भाज्या दोन बिर्याणी, तीन दाल तडका,आठ बटर पराठे हे सर्व वेटरने पार्सलमध्ये पॅक करुन आणलं आणि संपतरावांच्या हातात दिलं. एवढ्या पदार्थात ४-५ माणसांचं जेवण नक्की झालं असतं. निरोप घेऊन सगळे आपापल्या गाड्यांमध्ये बसले. ड्रायव्हिंग करणाऱ्या सुजीतला संपतरावांनी सहज विचारलं.
"किती बिल झालं रे जेवणांचं?"
" काही जास्त नाही. फक्त बारा हजार रुपये"
संपतरावांना धक्का बसला. एवढ्या पैशात एखादं कुटूंब महिनाभर गुजराण करतं. त्यांना एकदम आठवण आली की आपल्या सोसायटीच्या केअरटेकरला फक्त दहा हजार पगार आहे. घरात त्याची तीन मुलं आणि बायको मिळून पाच सदस्य आहेत. कसा भागवत असेल तो? मनातल्या मनात त्यांनी त्याला आणि त्याच्या बायकोला सॅल्युट ठोकला.
"आता हे पार्सल कुणाला देणार आहात नाना?" किर्तीने विचारलं
"आपला केअरटेकर-शांताराम आहे ना ! त्याला देऊन टाकू"
"आता रात्रीचे दहा वाजलेत. त्यांची जेवणंसुध्दा झाली असतील आणि तो असं उरलेलं घेईल का? तसा तो स्वाभिमानी आहे."
"बघू या विचारुन. नाही घेतलं तर समोर बांधकाम चालू आहे. तिथल्या मजुरांना देऊन येईन"
किर्तीने तोंड वाकडं केलं. तिच्या मते नाना हा उगीचचा फालतूपणा करत होते. गाडी थांबली.गाडीतून उतरता उतरता संपतराव  म्हणाले.
" तुम्ही जा सगळे वरती. मी आलोच शांतारामकडे जाऊन"
शांतारामने बेसमेंटमधल्या दोन छोट्या रुममध्ये संसार थाटला होता. रुमचं दार उघडं पाहून संपतरावांना हायसं वाटलं.
" नमस्कार नाना "त्यांना दारात पाहून शांताराम आश्चर्यचकीत झाला "काही प्राॅब्लेम आहे का नाना?"
"नाही नाही. तुमची जेवणं झालीत का?"
"पोरांची झाली. माझं आणि घरवालीचं राहिलंय. मी जरा गावाला गेलतो. आताच आलो.का हो नाना?"
"अरे आज हाॅटेलमध्ये पार्टीला गेलो होतो. तिथे ऑर्डर केलेलं बरंच जेवण उरलं होतं. भरमसाठ मागवून ठेवतात आणि वाया घालवतात. म्हंटलं वाया जाण्यापेक्षा कुणाला दिलं तर त्याचं पोट तरी भरेल. उष्टं नाहिये बरं का ! अगदी हातही लावलेला नाहीये"
" तो काही प्राॅब्लेम नाहीये नाना. तुम्ही तसं काही देणार नाही याची खात्री आहे मला. पण घरवालीने मेथीची भाजी आणि बाजरीची भाकरी करुन ठेवलीये. ती वाया जाईल ना!"
मेथीची भाजी आणि बाजरीच्या भाकरीचं नाव ऐकूनच संपतरावांचे डोळे चमकले. अचानक त्यांना सपाटून भुक लागल्याची जाणीव झाली. आपण हाॅटेलमध्ये थोडंसंच खाल्ल्याचं त्यांना आठवलं. ते एकदम उत्साहाने म्हणाले
"ती भाजी भाकरी मला दे. मी ती खातो. तुम्ही हे खा." बोलताबोलता त्यांनी ते पार्सल त्याच्या हातात दिलं.
"पण नाना, तुमचं जेवण तर झालंय ना?"
" मला नाही आवडत ते हाॅटेलचं जेवण. मी काहीच जेवलो नाही तिथे आणि महाग किती ! एकेक भाजी तीनशे रुपयांची. साधा पराठा शंभर रुपयाचा"
शांतारामने डोळे विस्फारले. त्याच्या बायकोने ताटात तीन भाकरी आणि मेथीची भाजी आणली.
"नाना वर घेऊन जाताय ना?"
"नाही नाही. मी इथंच बसतो. या तुम्हीही. आपण बरोबरच जेवू "
संपतराव तिथंच फतकल मारुन बसले.
"अहो नाना, पाट तरी घ्या बसायला"
"राहू दे रे. सवय आहे मला असं खाली बसून जेवायची"
शांतारामच्या बायकोने सगळं वाढून घेतलं. भाजीभाकरीचा पहिला घास घेताच संपतरावांना जणू स्वर्गप्राप्तीचा आनंद झाला.
" नाना हिरव्या मिरचीचा ठेचा देऊ?"
"अरे दे ना ! व्वा मजा येणार जेवायची." संपतराव खुश होऊन म्हणाले.
" नाना हे जेवण पण खुप छान आहे. तुम्हांला कसं आवडलं नाही?" शांतारामने बिर्याणीचा घास घेत  विचारलं.
"अरे कधीतरी खाणाऱ्याला ते चांगलंच वाटणार. आम्ही दर आठवड्याला हाॅटेलमध्ये जातो. कसं आवडणार ते आम्हांला?"
जेवण झालं. संपतरावांनी तीन भाकरी सहज संपवल्या होत्या. पाणी पिऊन तृप्तीचा ढेकर त्यांनी दिला. त्यांनी पाहिलं. शांताराम आणि त्याच्या बायकोच्या चेहऱ्यावरही तृप्ती आणि समाधान विलसत होतं. संपतरावांच्या डोक्यात अचानक एक कल्पना चमकून गेली.
" शांताराम मला कधी खायची इच्छा झाली तर मला भाजीभाकरी करुन पाठवशील. मी पैसे देईन त्याचे "
"अहो नाना. तुम्ही केव्हाही सांगा. मी स्वतः आणून देईन आणि तुम्ही आमच्या वडिलांसारखे. वडिलांकडून कुणी जेवणाचे पैसे घेतं का?"
संपतराव समाधानाने हसले. ते वर घरात आले तेव्हा सुजीत त्यांचीच वाट पहात होता.
"बराच उशीर केलात नाना आणि काय झालं? आनंदात दिसताय."
"काही नाही. शांतारामशी गप्पा मारत बसलो होतो.आणि त्याला आणि त्याच्या बायकोला हाॅटेलचं जेवण खुप आवडलं बरं. थ्री स्टार हाॅटेलचं एवढं महागडं जेवण करायला मिळालं म्हणून दोघंही खुप खुश झाले.उरलेलं जेवण उद्या सकाळी मुलांना देणार आहेत "
"चला बरं झालं. मलाही आवडत नाही हो नाना असं अन्न वाया घालवायला. पण काय करता ! आपलं स्टेटस् आडवं येतं. पण मी आता यापुढे लक्षात ठेवेन. पार्ट्यांमध्ये अन्न उरणारच नाही इतकंच मागवायचा आग्रह धरीन आणि उरलंच तर पॅक करुन गरिबांना वाटून देण्याची सगळ्यांना विनंती करेन."
त्याच्या या म्हणण्याने संपतरावांच्या चेहऱ्यावरची तृप्ती अधिकच गडद झाली.

©️ दीपक तांबोळी
     9503011359
(ही कथा माझ्या " वाटणी " या पुस्तकातील आहे.कोणताही बदल न करता शेअर करण्यास हरकत नाही.माझ्या पुस्तकाबद्दलच्या अधिक माहितीसाठी कृपया वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...