मोबाईल वाजला, म्हणून स्वयंपाकघरातून बाहेर येत होते. तोवर नवऱ्यानं, “घे, चार दिवस वाट बघत होतीस ना, मिहीरचा फोन आहे,” म्हणत फोन हातात दिला.
“बोल बाळा...”
“आई, चार दिवस फोन करायला जमलंच नाही. खूप म्हणजे खूपच काम होतं.” थोड्याश्या अपराधी स्वरात मिहीर म्हणाला. माझी नाराजी माझ्या स्वरात थोडीही उमटणार नाही, याची दक्षता घेत मी उत्तरले,
“अरे, हरकत नाही, बोल...ठोंब्या काय म्हणतोय? नाताळची सुट्टी लागली ना?”
या माझ्या प्रश्नात एक उपप्रश्न दडला होता.
“(मग इथे येताय ना?)” पण तो मी ओठावर येऊ दिला नाही.
माझ्याच प्रश्नाचा धागा पकडून मिहीर म्हणाला,
“हो, सुट्टी आहे त्याला… म्हणून आम्ही मॉरिशसला जातोय. नवीन वर्ष साजरं करायला.”
“हो का? छान, छान...” माझा उसना उत्साही स्वर.
“हे घे, नेहाशी बोल...” असं म्हणून त्यानं नेहाला फोन दिला.
इकडचं तिकडचं बोलत असताना, नेहानं दोन तीनदा सांगितलं, अगदी मनापासून.
“आई, काळजी घ्या हं. सांभाळून रहा. बाबांनाही सांगा…”
“Happy journey, enjoy!” असं म्हणून मी फोन ठेवला.
“मॉरिशसला जातायत. इकडे नाही येताहेत.” नवऱ्याला बातमी देत मी सोफ्यावर टेकले.
“आता तू सुरू होऊ नकोस हं. ‘दोन दिवस इकडे येऊन मग जायचं ना?’ वगैरे, वगैरे…” नवऱ्यानं टोकलं.
मी हसून म्हटलं, “अरे, समजूतदारपणा कसा असावा याचे इतके धडे तू वेळोवेळी मला देत असतोस ना, की मी आता अगदी समजूतदारपणाची ‘पुतळी’ झालेय. नको काळजी करूस !
“शब्दशः ‘पुतळी’! अजिबात भावना व्यक्त न करणारी.”
“यातूनही राग दिसतोय तुझा, मेधा…” नवरा म्हणाला.
“अनेकदा मी तुम्हा सगळ्यांना सांगत असते. आता मला अशा गोष्टींचा राग येत नाही, चिडचिड होत नाही की मी वाईट वाटून घेत नाही. पण.
“असं वागणं मला पटत नाही आणि पटणारही नाही. आपल्या मित्रांच्या गोतावळ्यातही तुमचा सगळ्यांचा आणि वादाचा मुद्दा हाच असतो की ‘अपेक्षा नाही ठेवायची’
“ते ‘आनंदात’ आहेत ना... मग बास. आपल्याला काय हवंय दुसरं !”
“अरे, माझा कशाला आक्षेप असेल या गोष्टीला? पण आपणही दुसरा आनंदात रहावा म्हणून ‘आनंदाचं देणं’ द्यायला हवं ना !
“आजपर्यंत आपली पिढी हे करत आलीय. मग मुलांकडून ही अपेक्षा ठेवायची नाही हे चूक वाटतं मला. पाठीस घालता तुम्ही आजच्या पिढीचं वागणं. “त्यांना वेळ नसतो, त्यांना खूप stress असतो, त्यांना त्यांची space हवी असते. सगळं मान्य करूनही ‘आनंद देण्या’चे क्षण ही पिढी शोधत नाही. त्यांचा आनंद त्यांच्यापुरता मर्यादित असतो. त्यात दुसऱ्यांना सामावून घेण्याचा आनंद ना ते घेत, ना दुसऱ्याला देत. दोन दिवस मुंबईत काढून पुढे पाच दिवस फिरायला गेले असते, तर आपल्याला आणि ठोंब्याला आजी आजोबांना बरोबर राहता आलं, म्हणून केव्हढा आनंद झाला असता! हे ‘देणं’ अवघड नाहीये. या पिढीला ते सुचत नाही वाटतं !”
या एका फोननं माझ्या विचारांना चावीच मारली जणू. गेल्या महिन्यात माझ्या वाढदिवसाला श्रुतीनं साडी gift म्हणून online पाठवली. माझ्याच अगदी आवडीच्या पॅटर्नची आणि रंगाची. पाठोपाठ फोन… ‘शुभेच्छां’चा वर्षाव… अगदी मनापासून.
“आई, आज खूपच packed शेड्युल आहे गं, म्हणून साडी online पार्सल पाठवली. आवडली?”
“अगं, खूप आवडली…!” मीही मनापासून दाद दिली.
पण ‘आनंदाचं देणं’ काय असतं तर, अगदी सुट्टीच्या दिवशी वेळ काढून, आमच्या आवडत्या दुकानात दोघी गेलो असतो. चार साड्या अंगावर घेऊन, कशा दिसतायत ते ठरवत, एकमतानं आवडीची साडी घेऊन आलो असतो, तर आनंदाला पारावर राहिला नसता. हा खरेदीचा सोहळा, आपल्या मुलीसोबतचा. हे ‘आनंदाचं देणं’ आहे, ते या पिढीच्या लक्षात येत नाही. माझा आक्षेप याला आहे की, आनंद देण्यानं तुमचा आनंद वाढतो आणि ती व्यक्ती समाधानी, तृप्त होते; हे विचारात घ्यायला हवंच. ही पिढी अशी वागत नाही, म्हणून सतत आपल्या पिढीनं तडजोड करतच रहायचं आणि वर ‘आम्ही कसे मिळून मिसळून राहतो’, ‘आमच्यात कसे वाद होत नाहीत’, याचा टेंभा मिरवायचा. त्यांच्यात ‘विचारल्या’शिवाय मधे पडायचं नाही, असं ठरवून हळूहळू त्यांच्या भल्याचं सांगायचा हक्कही आपण गमावून बसतोय. त्यांचं वागणं जाणून बुजून नसतंच. दुखवायचाही हेतू नसतो पण lifestyle च्या रेट्याखाली विसरत चाललेल्या चांगल्या गोष्टींची जाणीव जर करून दिली, तर बिघडतं कुठं? ‘प्रेम’ हे मुख्य जेवण मानलं, जे त्यांचं नक्कीच असतं आपल्या माणसांवर, तर भावनेचा ओलावा, आत्मीयता, प्रत्यक्ष भेट, त्या वयाला समजून घेणं हे ताटातले डावे, उजवे पदार्थ आहेत. नुसत्या पोळी-भाजीनं पोटाचं समाधान होत नाही, तसं नुसत्या प्रेमानं मनाचं समाधान होत नाही. दोन कौतुकाचे शब्द, पाठीवर दिलेली शाबासकी, एखादी भेटवस्तू, अचानक साजरा केलेला एखादा दिवस, अडचणीत असणाऱ्याची विचारपूस, आपली उपस्थिती ही आणि अशी अनेक आयुधं आपल्या हातात असतात, ‘आनंदाचं देणं’ देण्यासाठी. इच्छा किती असते, त्यावर वापर असतो ना !
यावरून परवा घडलेला प्रसंग आठवला…
दहा-बारा जणं, नाष्ट्यापासून दुपारच्या चहापर्यंत आमच्याकडे जमलो होतो. आमच्या मावशी माझ्या बरोबरीनं सगळ्यांची सरबराई करत होत्या. बरेच पदार्थ त्यांनी केले होते. सगळ्यांनी स्तुती करत आडवा हात मारला.
आमची एक मैत्रीण जाताना हळूच स्वयंपाकघरात आली. मावशींचं तोंड भरून कौतुक करून झटकन पाचशेची नोट त्यांच्या धरलेल्या हातात सरकावली.
एकदम गडबडलेल्या मावशींच्या चेहऱ्यावर, पैशानं नाही पण तिच्या कौतुकानं आनंद पसरला. पुढं दोन दिवस मावशी भारावलेल्या होत्या. पैशांपेक्षाही ‘दखल घेतल्या’चा आनंद खूप असतो. आजची पिढी हे आवर्जून करताना दिसत नाही, एवढंच म्हणणं आहे माझं ! ‘Money based’ आनंद घेतात आणि देतात.
‘एकच रविवार मिळतो’, म्हणून मावशीकडे नाही येत. “आई, हे gift नक्की दे तिला…” आणि “टॅक्सी book करतो तुमच्यासाठी…” हे संवाद घराघरात ऐकू येतात.
“आई, बाबा… तुमच्यासाठी ही tour book करतोय…”
“आई, बाबा… आता हा टीव्ही बदलून दुसरा select करा, म्हणजे मी order करेन...”
तत्सम अनेक गोष्टी त्यांच्या ‘उपस्थिती’शिवाय करत असतात, पण...
काय झालंय ना, बऱ्याच कारणांमुळं आज ज्येष्ठ नागरिक स्वतंत्र राहतायत. त्यांना आपली कोणी दखल घेतंय किंवा आपल्याला कार्यक्रमात, विचारात, सल्ला मसलतीत सामावून घेतलं जातंय, याचा खूप आनंद होतो. समाधानानं तृप्त होतात ते !
जाऊ दे… तुम्ही म्हणाल, ‘आनंदाचं देणं’ सांगताना हिनं आपलं ‘रडगाणं’ गायलं !
‘घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे.’
यात थोडा बदल करून म्हणावंसं वाटतं,
‘देता देता घेणाऱ्याचे मन जिंकावे !’
- नीलिमा जोशी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा