सोमवार, १६ डिसेंबर, २०२४

1616. आईने काहीच शिकवलं नाही का ?

 "अगं चालतांना जरा हळुवार चालत जा, आता साडी घालायची प्रॅक्टिस कर, जरा स्वयंपाकात लक्ष घालत जा, दोन चार पदार्थ करून बघ. नाहीतर तुझी सासू म्हणेल आईने मुलीला काहीच शिकवलं नाही." असले टोमणे रोजच्याच दिनचर्येचा भाग बनले होते.
     राणीला वाटायचं लग्न म्हणजे नक्की काय? आपल्या आवडीनिवडी, आपलं राहणीमान, आपला स्वभाव सगळं बदलवून माप ओलांडायचा? आणि खरंच सासू इतकी दृष्ट असते का? त्यात माझं लक्ष माझ्या करिअर आणि नोकरीकडे त्यामुळे हे असं स्वयंपाक घरात राबायला मला जमेल का? आणि मुळात मीच का बदलायच ? असले कितीतरी प्रश्न राणीच्या मनात रोज यायचे पण समीर शी बोलल्यावर तिला खूप मोकळं वाटायचं कारण तिचा होणारा भावी नवरा खूप समजदार आणि तिला तिची स्पेस देणारा होता त्यामुळे निदान नवरोबा समविचारी आहे म्हणून  तिला धीर यायचा. माप ओलांडून राणी खरोखर समीरची राणी झाली. दोघांनीही काही दिवसांच्या सुट्या टाकलेल्या. चार दिवस नातलग, पाहुणे सर्व मंडळी लग्नघरी असल्यामुळे राणीवर कोणतीच जवाबदारी पडली नाही मात्र आज राणीची एंट्री तिच्या हक्काच्या प्रांतात म्हणजे स्वयंपाकघरात होणार होती . सासू, सासरे, नणंदबाई आज राणी के हाथोसे बनाई रसोई जेवणार होते.
      नवीन सुनबाई काहीतरी छान बनवणार याची उत्सुकता पणाला गेलेली होती. राणीच्या मदतीला घरातील खूप जुनी मोलकरीण जया थांबलेली होती, नक्की कशात काय आहे? हा मोठा गहण प्रश्न राणीपुढे होता. खरं म्हणजे स्वयंपाक घरात आल्याआल्या तिला थोडं धडधडायला लागलं. शेवटी जमेल तसं जया च्या मदतीने आणि कधीतरी आई गावाला गेलेली असतांना जे ती बनवायची ते मेनू तिने बनवले..
नवीन घर, नवीन वस्तू त्यामुळे स्वयंपाक घरात  वावरतांना तिची तारांबळ उडाली, पण तिला महिलामंडळाचं वाक्य आठवलं, " तुझी सासू म्हणेल आईने काहीच शिकवलं नाही," बस तेच आठवून राणीने आमटी, भरली वांगी बनवली आणि हुश्श म्हणून एकदाचा सुटकेचा निश्वास सोडला. सर्वजण ताटकळत डायनींग टेबलबर हजर. राणीने पानं वाढायला घेतली. इतक्यात सासूबाई म्हणाल्या, "तू पण बस कि."
"नको, मी बसते नंतर, खरं म्हणजे राणीला सर्वांच्या सोबत बसून जेवण जाणार नाही हे तिला ठाऊक होतं. राणी आणि जया वाढत होती आणि सर्वजण भोजनाचा यथेच्छ आस्वाद घेत होते, "वाह वहिनी, तुझ्या हाताला खूप चव आहे गं." राणीची नणंद भरभरून तिचं कौतुक करत होती.
जेवण आटोपल्यावर आईने चक्क हातातले तोडे काढून राणीला दिले आणि तिच्या कपाळावर ओठ टेकवत, "गुणाची पोर म्हणत निघून गेल्या". राणी खूप खुश होती. तिला वाटलं स्वयंपाकासारखं इतकं छोटं आणि चिल्लर काम, आणि माझ्या कडच्या बायका उगाचच मला घाबरवत होत्या, 'आहे किनई मी हुशार. निभावली ना वेळ. असं काहीच नाही जे मला जमत नाही.' राणी मनातल्या मनात स्वतःशीच बोलून आनंद व्यक्त करत होती. वाटलं आताच माहेरी फोन करून सांगावं. Nothing is impossible for me.
सर्व आवरून झाल्यावर तिने ताट वाढून घेतलं आणी बेडरुममध्ये गेली. समीरशी गप्पा मारता मारता जेवण करूया, शिवाय त्याच्याकडून माझी प्रशंसा अजून बाकी आहे, म्हणून राणी ताट घेऊन बेडरूममध्ये गेली.
"काय समीर, पहिल्याच  बॉलमध्ये मारलाना मी सिक्सर....तुझे आई, बाबा, बहीण किती कौतुक करत होते माझं. असं काहीच नाही जे मी करू शकत नाही. बघा किती नशीबवान आहात तुम्ही इतकी वेल एज्युकेटेड, हुशार बायको भेटली तुम्हाला".
राणीचं बोलणं ऐकून समीर गालातल्या गालात हसला आणि म्हणाला, "अगं, कौतुक पुरे आता, आधी जेवण कर".
राणीने मस्त तोऱ्यात चपातीचा तुकडा आमटीमध्ये बुडवला आणि डोळे बंद करुण घास घेतला, आणि क्षणात ब्रह्मांड तिला दिसलं. डोळ्यातून पाणी येऊ लागलं.
समीरने पाण्याचा ग्लास देत हसून तिला विचारलं, "आमटी कशी झाली?"    
राणीने नक्की 'आमटीत तिखट टाकलं कि तिखटात आमटी' तीच विचारात पडली. दुसरा घास घेतला. भाजीत अजिबात मीठ नव्हतं. तिला स्वतःचीच लाज वाटायला लागली. तिने ताट तसंच स्वयंपाकघरात ठेवलं आणि समोर हॉलमध्ये जावून सासूबाईला आवाज दिला.
राणीचा आवाज ऐकताच त्यांनी टी व्ही बंद केला आणि तिला त्यांच्याजवळ बोलावले. 
"काय गं, काही हवंय का तूला?"
क्षणभर राणी त्यांच्या डोळ्यात एकसारखी बघू लागली. नजरेत कोणतेच तिरस्काराचे, रागाचे भाव नव्हते. फक्त आपुलकीचा, प्रेमाचा झरा त्या माऊलीच्या डोळ्यात राणीला दिसला. राणीने "आई" म्हणत कडकडून मिठी मारली आणि रडक्या स्वरात  विचारलं, "तुम्ही कोणीच शब्दही न काढता इतकं बेचव जेवण का जेवला ? का नाही रागावला मला !"
राणीच्या पाठीवरून हात फिरवत सासूबाईने तिचे डोळे पुसले आणि तिला समजावून सांगितलं, "हे बघ राणी, तू इतक्या आपुलकीनं जेवण बनवलं. मग त्यात मीठ आहे कि नाही, तिखट जास्त कि कमी, हे गौण आहे. अगं जगात असं कोणीच परफेक्ट नाही. कधी कधी आमचाही अंदाज चुकतो. त्यामुळे इतकं मनाला लावून घेऊ नकोस. शिकता शिकता येईल सर्व. आमच्या काळात बायकांना  दिवसभर स्वयंपाकघर सुटायचं नाही. त्यामळे ना कोणते छंद जोपासता आले ना स्वतःची ओळख मिळवता आली. तू हुशार आहे, स्वावलंबी आहे. स्वयंपाक काय, आज ना उद्या येईलच. मी शिकवेल तुला. पण तुलाही माझ्यासाठी काहीतरी करावं लागेल. खूप दिवसांपासून गाडी शिकायची हौस होती. तू शिकवशील मला."
सासूबाईचं बोलणं ऐकून राणी सुखावली. सासू सुनेच्या नात्याला एक वेगळी ओळख मिळाली.
     ह्या प्रसंगातून खूप काही शिकायला मिळते. कोणतीही मुलगी लग्न करून जेव्हा येते तेव्हा तिलाही खूप ऍडजेस्टमेंट करावी लागते. नवीन घर, नवीन नाती, नवीन विचार माहेरच्या सावलीतून आलेली मुलगी आधीच मनाने हळवी झालेली असते. अशावेळी तिला गरज असते आपुलकीची, जिव्हाळ्याची, विश्वासाची. घर नावाच्या नवीन दुनियेत तिला नवऱ्याबरोबर इतर नात्याचीही गरज असते. राणीच्या सासूबाईने तिला  जेवतांनाच जर रागावले असते, किंवा अपमान केला असता, तर राणीच्या मनात जी सासू नावाची दृष्ट प्रतिमा आहे ती कायम राहली असती. कदाचित राणीने चूक मान्यही केली नसती. राणीला तिची चूक स्वतःलाच कळली. त्यामुळे नवीन घरात आपलं कोणीच नाही हि भावना तिच्या मनात आली नाही.
     एका छोट्या प्रसंगातून नाती दुरावतात आणि घट्ट हि होतात. राणी आणि सासूबाईंच्या नात्याची वीण आणखी घट्ट झाली. थोडासा अहंकार, मोठेपणा दूर ठेवून सासूबाईने राणीचं मन जिंकलं आणि तिच्याही मनात त्यांच्यासाठी जागा निर्माण झाली‌. आणि तुझी सासू म्हणेल, "आईने काहीच शिकवलं नाही का?" हा वाक्प्रचार  राणीला खोटा वाटू लागला.


"दिनेश चव्हाण"
काळेश्वरी भक्त 
भाईंदर ठाणे 
"श्री स्वामी समर्थ महाराज"
( परमभक्त चोळप्पा महाराजांचे पाचवे वंशज अण्णु महाराज गुरुजी ह्यांचा शिष्य. )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...