अलकाची ताई अवंतिका हिच्या लग्नाला एक वर्ष पण झाले नव्हते. मे मध्ये लग्न झाले. तिचा नवरा मुंबईला नोकरी करत होता. त्यामुळे ती अधेमधे माहेरी आलीच नाही. लग्ना नंतर ती डायरेक्ट पहिल्या दिवाळ सणालाच आली ते सुद्धा जोडीनेच. तो सुध्दा सोबत आला होता. तसा तो तिच्या ताईचे लग्न झाल्यावर अधेमधे यायचा. त्याची मीटिंग असायची. तेव्हा त्याला त्यांच्या गाववरूनच जावे लगायचे. मग काय त्याला घरी यायला निमित्यच मिळायचे. पण त्याचे अंतरंग काही कधी समजले नाही. खूप मस्करी करायचा. मोठया भावाची मेव्हणी म्हणून सारखा अलकाला चिडवत राहायचा. म्हणायचा काय मग लग्न करते का माझ्यासोबत? ताईचा धाकटा दीर, असतो एकेकाचा स्वभाव मोकळा म्हणून कुणीच तसे मनावर घेतले नाही. त्यात हा इंजिनीअर माणूस. त्यामुळे अलकाला चुकून सुध्दा त्याच्या बद्दल काही वाटले नाही. अलकाला वाटायचे माझ्या सारख्या अत्यन्त गरीब घरातील तसेच दिसायलाही अगदी सामान्य अश्या मुलीसोबत का लग्न करेन हा? हाच विचार घरातील सगळ्याच्या मनात यायचा. तो खूप ओपन माइंडेड होता. एक दिवस अकल्पितच घडले. तो नोव्हेंबर महिन्याचा चौथा शनिवार होता. अलकाचे बाबा बँकेत गाडीवर ड्राइवर होते. नुकतेच बाहेरगावचा दौरा करून आले होते. तो सुध्दा त्या दिवशी अलकाकडे आला होता. मनात लग्नाचे ठरवूनच. नास्ता , चहापाणी झाले. गप्पा मारता मारता तो म्हणाला
मामाजी मला लग्न करायचे आहे !
तुमचा काय विचार आहे ?
अलकाचे बाबा म्हणाले, माझा काय विचार असणार ?
तुम्ही लग्न करताय चांगली गोष्ट आहे !
कशी मुलगी पाहिजे ते सांगा ?असेल तुम्हाला साजेशी तर नक्की सांगेन !
तुम्ही इंजिनिअर !
तेव्हा तुमच्या अपेक्षा काय आहे ?
हे खूप महत्वाचे आहे .तशी मुलगी शोधतो मग तुमच्यासाठी.
त्यांचे उत्तर ऐकुन सगळे अचंबीतच झाले.
तो म्हणाला मी मुलगी पाहून ठेवली आहे !
तुम्ही फक्त हो म्हणा !
अलकाच्या बाबांचा भाबडा प्रश्न.
अहो माझा हो म्हणायचा काय समंध ?
त्याचे अनपेक्षित असे उत्तर.
अहो तुमचाच खूप मोठा समंध आहे कारण मुलगी तुमच्या घरातीलच आहे !
अलकाचे बाबा, अच्छा माझ्या लहान भावाच्या मुली बद्दल बोलताय ?
ठीक आहे बोलतो मी भावाशी आणि लवकरच तुम्हाला काय ते कळवतो? नकार देईल असे वाटत नाही. तुम्ही निर्धास्त व्हा !
तो बोलला, सॉरी !
सॉरी ! तुमचा काहीतरी गैरसमज होतो आहे. मी तुमच्या भावाच्या मुलीबद्दल नाही बोलत आहे .
मग कुणाबद्दल बोलतायत ?
अहो मामाजी, मी तुमच्या मुलीबद्दल बोलतो !
म्हणजे ?
अहो मामाजी तुमच्या धाकट्या मुलीबद्दल , अलका बद्दल बोलतोय .
काय ? हे कस शक्य आहे ? का गरिबांची चेष्टा करताय ?
नाही मामाजी, मी चेष्टा नाही करत. आणि का शक्य नाही ?
लग्न मला करायचे आहे. मी राजी आहे. मग तो सांगू लागला. मामाजी तुम्हाला आठवत असेलच. आम्ही माझ्या मोठ्या भावासाठी तुमची मुलगी पाहायला आलो. तेव्हा तुमची धाकटी मुलगी बाहेरच दिसली. आम्ही तिलाच तुमची लग्नाची मुलगी समजलो. भाऊ तिला पाहताक्षणी म्हणाला. हीच मुलगी असेल का रे? ही असेल तर आवडली मला! लगेच होकार देऊन टाकू ! पण घरात आलो , चहा पोहे झाले. जीने चहापोहे दिले. ती मात्र ही मुलगी नव्हती , जी आम्ही बाहेर पाहिली. भाऊ जरा नाराजच झाला. कारण त्याला बाहेर पाहिलेली मुलगी पसंत होती. विचारणा केल्यावर कळले की ती मुलीची धाकटी बहीण आहे. भाऊ म्हणाला सुद्धा तिचे लग्न करता का ? पण ती खूपच लहान होती. तुम्ही नकार दिला. शिवाय म्हणाले मोठीचे सोडून धाकटीचे लग्न नाही करू शकत. मी मात्र त्याच दिवशी मनाशी पक्के ठरवले. लग्न करेन तर फक्त वहिनीच्या लहान बहिणी सोबतच. तेव्हापासून प्रेम करतो तुमच्या लेकीवर. एक तर्फी ! बोला आता ! मी मीटिंग चे निमित्य करून मुद्दाम तुमच्याकडे मुक्काम करायचो. तुमच्या मुलांना नेहमी म्हणायचो , काय रे देतोस का तुझी बहीण मला ? ते सुद्धा तितक्याच मस्करीने म्हणायचे हटेन त्याचे नाक कटेन ! आणि सगळे हसायचो ! तुम्हा सगळ्यांना ती मस्करी वाटायची. पण मी खरंच खूप प्रेम करतो. तेव्हा तुमच्या मुलीचा हात माझ्या हातात द्याल. प्लीज मामाजी !
अलकाचे वडील म्हणाले, तुमचे सगळे खरे हो जावई ! पण मी खूप गरीब माणूस आहे. आत्ताच फंडातून पैसे काढून तिसऱ्या मुलीचे लग्न केले. लगेच वर्षात मला पैसे मिळणार नाहीत. कसं लग्न करू? शिवाय तिला खूप शिकायचे आहे. मी तसा शब्द दिला तिला.
शिक्षणाचे बोलाल तर तिला पुढे मी नक्की शिकवेन. नाहीतर मग लग्न जुळवून ठेऊ. तिचे शिक्षण झाले की करू अलकाचे बाबा म्हणाले, ते मला शक्य नाही. कारण कोंबडीच्या पायाला धागा बांधून ठेवणे मला जमणार नाही !
त्याला हे कळलेच नाही . मग अलकाचे बाबा म्हणाले, अहो असे लग्न जुळून ठेवणे नाही जमणार मला.
उद्या तुम्हाला एखादे चांगले स्थळ चालून आले आणि नंतर तुम्ही नकार दिला तर ? आम्ही गरीब जरूर आहोत. पण आमची इज्जत आम्हाला खूप प्रिय आहे. तेव्हा असे नाही होऊ शकत. आणि आता सध्या तरी मी एकदम कंगाल आहे. परत तुमच्या घरच्यांचे काय ? पहिल्या लग्नाच्या वेळी त्यांनी खूप हुंड्यासाठी त्रास दिला. त्यानां सुद्धा विचारावे लागेलच न?
ते हो म्हणतील ही अपेक्षा तुम्ही करूच नका. त्याच्या इंजिनिअर मुलांसाठी त्यांना मस्त पैसेवाला व्याही हवा आहे. आणि मला हे बिलकुल मंजूर नाही. तेव्हा तुम्ही त्याचा विचार नका करू.
अरे पण असे कसे ?
तुमचे आईवडील, मोठे भाऊ यांना मला विचारावेच लागेलच.
अहो माझी एक मुलगी तुमच्या घरात दिली आहे. उद्या यावरून माझ्या लेकीला कोणी बोल लावायला नको.
ठीक आहे तुम्ही त्यांना नक्की विचारा, पण जर ते नाही म्हणाले आणि त्यांचा नकार एकूण तुम्ही तुमची मुलगी देण्याचा इरादा बदलला तर !
तर काय ?
तुमची मुलगी कॉलेज च्या रस्त्याने जातांना, तिचे अपहरण करायला सुद्धा मी मागे पुढे पाहणार नाही ! जर तुम्हाला हे खोटे वाटत असेल तर तुम्ही माझा मोठा भाऊ म्हणजे तुमच्या जावयाला विचारा माझ्यासाठी ही खूप छोटी गोष्ट आहे. नंतर म्हणू नका मला सांगितले नाही म्हणून ! राहिली गोष्ट लग्नाची. तर आपण कोर्ट मॅरेज करू. मला काहीही नको फक्त तुमची मुलगी आणि नारळ द्या. बोला मामाजी !
ठीक आहे विचार करून सांगतो. म्हणून अलकाच्या बाबांनी तो विषय तिथेच संपवला. दुसऱ्या दिवशी तो पुन्हा लवकरच येण्याचे आश्वासन देऊन निघून गेला.
अलकाचे आई , बाबा इतकेच काय , वाड्यातले शेजारी सुद्धा त्याचा ह्या निर्णयाने चकित झाले होते. आता पुढचा विचार सुरू झाला. अलकाच्या घरचे सगळे एकत्र बसून चर्चा करत होते. तो जिथे नोकरी करतो तिथे अलकाचे चुलत काका राहायचे.त्यानां मुलाची चौकशी करायला सांगितली. सगळेच खूप पेचात होते आणि मुळात अलकाला लग्न करायचे नव्हते. खूप शिकायचे होते. स्वतःच्या पायावर उभे राहायचे होते. लगेच दोन वर्षात तिचे बाबा निवृत्त होणार होते. त्यानां पेन्शन सुद्धा नव्हते. अलकाच्या पाठीवर दोन लहान भाऊ. त्याचे शिक्षण कसे होईल? कसे पोट भरेल हे लोक? हा प्रश्न अलकाला भेडसावत होता. अशातच दहा बारा दिवस गेले. हा पुन्हा येऊन हजर.
अरे देवा काय ही कटकट !
अलकाचे बाबा त्यादिवशी पण दौऱ्यावरच होते. सायंकाळी येणार होते. तो पूर्ण विचार करूनच आला होता.
बाबा आले , लगेच तो बोलला मामाजी आपण उद्या सकाळी माझ्या गावी जाऊ. ते सुद्धा तुम्ही म्हणता म्हणून. तशी मला काही आवश्यक्ता वाटत नाही. मी माझ्या घरच्यांना चांगले ओळखतो. ते ह्या लग्नाला कधीच तयार होणार नाहीत. तुम्हाला माहित असेलच मामाजी, आपल्या समाजात इंजिनीअर मुल नाहीत. आहेत त्यांचे भाव वाढलेले आहेत. आपल्या मुलाचा बाजार मांडला आहे ह्या इंजिनीअर पोरांच्या आईबाबांनी. त्यातीलच एक माझ्या घरचे आहेत . तरीही तुमच्या समाधानासाठी जाऊ.
पण जर त्यानीं नकार दिला तर ! पुंन्हा तर काय जावई ?
तर मी एकटा माझे लग्न करायला समर्थ आहे. फक्त तुमच्या मनाची तयारी ठेवा. आसावरीच्या सासरी तो आणि तिचे बाबा गेले. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. जेवण आटोपले, तो अलकाच्या बाबांना सारखा विषय काढायला खुणावत होता. अखेर आसावरीच्या बाबांनी मुद्द्याला हात घातला.
गणेशराव तुमचा धाकटा मुलगा लग्न करायचे बोलतो !
त्यांचे लगेच उत्तर. हो ! हो ! करायचे आहे तर. पाहूनच ठेवली आहे मुलगी आम्ही. खूप श्रीमंत घराणे आहे. आता त्याच्या सोबत तुम्ही आला आहात तर तुम्ही पण पाहूनच जा मुलगी.
अहो तुम्ही हे काय बोलता ? मला काहीच कळत नाही. मी तर माझी धाकटी मुलगी अलका साठी तुमच्या मुलाच्या इच्छे खातर त्यांच्या दोघांच्या लग्ना विषयी बोलायला आलो. तुमचा मुलगा मला घेऊन आला.
त्यांनी डायरेक्ट आवाज चढवत म्हणाले.
काय रे! डोकबीक फिरलं का तुय ?
एक पोरगी भिकार्याची करून पोट नाही भरलं का तुय ?
भावाले देली भिकार्याची करून ,आरे पण तू इंजिनीअर आहे. यासाठी का तुले इतका शिकवला? अर बाबा डोळे उघडे ठेव कि रे जरा.चांगल्या चांगल्या पोरींची लाइन लागून राह्यली! अन तुले ह्या ड्राइवर ची पोरगी करायची होय
रे ? माफ करा हे लग्न होणं शक्य नाही. आतापर्यंत गप्प असलेला तो आवेशातच उठला. म्हणाला,
लग्न कोणाला करायचे आहे? मला का तुम्हाला ?
सगळेच बोलले तुला.!
मग मुलगी कोणती मागायची हे कोण ठरवेल तुम्ही का मी ?
अरे बाबा तुझ्याच पसंतीने होईल लग्न, पण ह्या मुलीशी नाही. आम्ही दोनचार पोरी पाहून ठेवल्या. आता आलाच आहे तर पाहून घे. खूप श्रीमंत घराणे आहे. एक केली न तुह्या मनानं भावासाठी. एसटीचा खर्च द्यायला पण रडत होता हा भिकारचोट ! तुझ्या सारख्या इंजिनीअरला काय देणार ?
माफ करा आई, बाबा, दादा वाहिनी. पण मी माझ्या होणाऱ्या बायकोच्या वडिलांचा असा अपमान सहन करू शकत नाही.
हो रे भाड्या ! तुला होणाऱ्या बायकोच्या बापाची इज्जत प्यारी. आता आम्ही तुयासाठी कोणीच नाही. तू आगोदरच ठरवलं तर मंग कायले आला आमले इचाराले. तिकडेच करून मोकय व्हायच न. अन काय हो ? तुम्ही का आलात उगाच आमची परवानगी घ्यायला. तुम्ही तर पुरता त्याले आपल्या जाळ्यात ओढला. जादूगीदू करता का काय
तुमी ? आणि अलकाच्या बाबांना बरंच काही बोलले. मग त्याची चांगलीच सटकली.
घरच्यांसोबत थोडी बाचाबाची करून तो आणि अलकाचे बाबा निघाले. रस्त्यात दोघेही गप्प होते. काय करावे अलका च्या बाबांना काहीच सुचत नव्हते. दोघेही घरी आले. चहा घेतला आणि तो जायला निघाला. जातांना पुन्हा सांगून गेला .मला घरच्यांशी काही घेणे देणे नाही. माझ्या लग्नाला कोणीही आले नाही तरी चालतील . पण आता हे लग्न होणारच. तुमची मुलगी बारावीला आहे. तिला पुढे मी शिकवेन. पण !
पण काय ?
आता डिसेंबर चालू आहे. एक जानेवारीला मला साखरपुडा करून पाहिजे आणि मला फक्त होकार पाहिजे.
अहो पण माझ्याजवळ साखरपुडा करायला तरी पैसे हवेत न !
निदान एक अंगठी, तुमचे कपडे ! नातेवाईक तर बोलवावे लागतील, त्याचे आदरातिथ्य. कुठून आणू मी पैसे ?
त्याने खिस्यात हात घातला. तीन हजार रुपये काढले आणि अलकाच्या बाबांच्या हातावर ठेवले. अंगठी ,कपडे काही नको मला. यात जसे जमेल तसे करा. पण एक जानेवारी तारीख पक्की आणि तो निघूनही गेला. घरचे सगळे अलकाच्या बाबांच्या हातावरचे रुपये पाहत राहीले.
अलकाने मात्र मग रडून रडून खूप आकांत केला. म्हणाली, स्वतःला जास्त शहाणा समजतो. त्याने काय माझा होकार गृहीतच धरला का ? बाबा तुम्ही तर बोललात न, बाई..! तुला खूप शिकवीन माँ ! मग आता काय झाले ? का माझे माझ्या मनाविरुद्ध लग्न करताय ? मला नाही करायचे त्याच्या सोबत लग्न. बाबांनी आणि आईने अलका ला जवळ बसवले. मायेने डोक्यावरून हात फिरवत म्हणाले,
तुझं सगळ खर आहे बेटा. पण तू थोडा तुझाच विचार कर.
म्हणजे बाबा !
बाळा आपले घर, तुला तर माहित आहे कसे आहे. कधी भिंत आंगावर पडेल याची खात्री नाही. इतके गरीब आपण. शिवाय मी साधा ड्राइवर माणूस. कितीही शोध घेतला,चपला झिजतील, शिदोरीच्या भाकरी वाळतील. पण इंजिनीअर जावई तुझ्यासाठी शोधू नाही शकणार. तुझ्या सुखासाठी मी कुठेही गहाण राहीन ! पैसे जमवीन !
तू नाही म्हणू नको मां ! आम्ही तुझ्या पाया पडतो. पण सुखाला अशी ठोकर मारू नको आणि मग अलका लग्नाला तयार झाली.
ठरल्या प्रमाणे एक जानेवारीला साखरपुडा झाला. अवंतिका मुंबई वरून आली नाही. वेळेवर तिकीट मिळाले नाही म्हणाली. त्याच्या घरचे पण कोणीच आले नाही. एक मित्र घेऊन आला होता तो. ज्याने अलकाचे पाय धुतले. मुलाचा भाऊ म्हणून. त्या दिवशी त्याचा मित्र गेला . याने मात्र मुक्काम केला. रात्री सगळेच गप्पा मारत बसले होते. अलकाला म्हणाला इकडे ये !
अलका घाबरत घाबरत जवळ जाऊन उभी राहिली. सगळेच होते आजूबाजूला. हा काय म्हणतो ? काय करणार ? याचे अलकाला टेंशन होते. त्याने तिचा हात हातात घेतला आणि त्याच्या डोक्यावर ठेवला. म्हणाला फिरव हात !
अलका संकोचुन गेली . मग त्यानेच हात धरला आणि फिरवला.
बापरे ! त्याच्या डोक्यात मोठया मोठया जखमा होत्या. अलकाचां हात थरथरत होता. काय बोलावे शब्द सुचत नव्हते. मग त्याने अलकाच्या आईचा हात धरला आणि त्याच्या डोक्यावर फिरवला.
आई म्हणाली काय झाले ? इतक्या जखमा कशाच्या.? तो सांगू लागला ,एक जानेवारीला साखरपुडा आहे आणि तुम्ही सगळ्यानी यायचे आहे हे सांगायला मी घरी गेलो तर सगळ्यांनी मिळून मला खूप मार दिला. केस उपटले , कमरेला तर बोचकारूनच काढले होते. पॅन्ट पण कशीबशी घालत होता. हे एकूण त्यांचा त्याच्यावरील विश्वास अजूनच दृढ झाला. दुसऱ्या दिवशी लग्नाची तारीख काढूनच घरी गेला.
आता त्याला येण्यासाठी कोणताच बहाना लागत नव्हता. मनात येईल तेव्हा भेटायला यायचा. एकदा त्याने कमालच केली. आला अलकाच्या आईने जेवायला वाढले आणि भांडी घासायला गेली. अलकाला म्हणाली, तू वाढ आता. तोवर मी भांडी घासून घेते. हा पठ्ठा उठला आणि अलकाला घास भरवायला लागला. अलकाला हे सगळे खूप नवीनच होते. तिने कसाबसा एक घास खाल्ला. पुन्हा आला, दुसऱ्या वेळी तिने मात्र नकारच दिला. भीती पण वाटत होती.
बापरे ! आई आली तर ! पण हा काही मानायला तयार नाही. घास खाल्ला नाही म्हणून तो न जेवता ताटा वरून उठून गेला. खूप चुटपुट लागली अलकाच्या मनाला .तिचे संस्कार तसे करायला पुढे धजावत नव्हते. तसाच गेला तो....न जेवता. खूप खूप वाईट वाटले तिला , पण नाईलाज होता. तेव्हा काही फोन बीन नव्हते. एकमेकांना पत्र कधी पाठवलेच नाही. पुन्हा पंधरा दिवसाने आला. आता तर त्याने कहरच केला. स्वतः साठी एक शर्टचे कापड घेतले. तसेच सेम कापड अलकाला कुर्ती शिवायला आणले. खूप चिडवत होते सगळे तिला. पण तो हट्टालाच पेटला शिवलेच पाहिजे. शिवले शेवटी.
आता त्याने त्याची जाण्याची वेळ पण बदलली. अलका कॉलेजला जायला निघाले की हा तिच्या मागून किंवा थोडा आधी निघायचा. रस्त्यात भेटायचा पण बोलायचे धाडस नव्हते. पस्तीस वर्षांपूर्वी असे काही नव्हतेच मुळी. एकमेकांकडे पहायचे बस. त्याच्या बसचा मार्ग आणि अलकाच्या कॉलेजचा मार्ग एकच होता. चार किलोमीटर पायी जायची अलका कॉलेजला. हा पठ्ठा बस मधून हात हलवून टाटा करायचा. त्यामुळे मैत्रिणी खूप चिडवायच्या तिला, खूप राग यायचा त्याचा. घरी सांगायची सोयच नव्हती.
लग्नाची तारीख निघाली. त्याने पत्रिका छापल्या. लग्नाआधी पुन्हा घरी गेला, पत्रिका दाखवल्या. घरच्यांनी ठणकावून सांगितले. आमच्यापैकी कुणीही लग्नाला येणार नाही आणि आम्ही लग्नासाठी काहीही मदत करणार नाही. तुझा आणि आमचा समंध संपला. अलकाचे बाबा पण पत्रिका द्यायला गेले. त्यानाही सांगितले, आमच्या पैकी कुणीच लग्नाला येणार नाही. तुम्हाला काय करायचे ते करा ? लग्नाची तयारी झाली. उद्या लग्न तर हा आदल्या दिवशी अलकाच्या घरी. त्यांचा पाच, सहा कुटूंबाचा वाडा होता. खूप आपुलकी होती सगळ्यांमध्ये. याला मग शेजारी राहायला सांगितले. तिथेच त्याला शेजारच्या वहिनींनी हळद लावली. शेजारच्या वहिनी कडून याची वरात मंगल कार्यालयात गेली.
लग्नाच्या वेळी मात्र त्याचे आईबाबा आले. गावातील लोकांनी खूप जबरदस्ती केली म्हणे. म्हणून आलो असे सांगितले. फक्त मुलाला भेटून अक्षदा टाकून निघून गेले. अलकाची ताई एक महिन्याची बाळंतीण होती . त्यामुळे ती आईकडे होती. तिचे भाऊजी आले होते मुद्दाम लग्नाला. त्यांना सुद्धा त्याचे आईबाबा भेटले नाही. लग्न झाले , जेवण आटोपले पुढचा प्रसंग मोठा पेचाचा होता. वरात कुठे पाठवायची. पुन्हा शेजारच्या वहिनी धावून आल्या. म्हणाल्या वरात माझ्याघरी घेऊन जाते. पुन्हा वरात अलकाच्या माहेरी आली. दुसऱ्या दिवशी सत्यनारायण पूजा करून आईबाबांचा आशीर्वाद घेऊन अलका त्याच्या नोकरीच्या गावी निघाली. आपल्या नवीन संसाराची स्वप्ने पाहात.
अशा प्रकारे त्याच्या one way love चा two way love ने गोड शेवट झाला.
©️ सौ प्रभा कृष्णा निपाणे कल्याण.
३६ वर्षापूर्वी घडलेली माझीच सत्यघटना
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा