शुक्रवार, २० डिसेंबर, २०२४

1635. सरप्राईज !

      समय शिक्षणासाठी अमेरिकेला जाणार आहे, ही बातमी सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली. आप्तेष्ट, मित्र-मैत्रिणी समयला प्रचंड शिष्यवृत्ती मिळाल्याबद्दल त्याचं कौतुक करत होते. सुचेता मात्र उदास होऊन बसली होती. चार वर्षं प्रेमाच्या आणि लग्नाच्या आणाभाका घेतल्या होत्या. तिकडे जाण्यापूर्वी लग्न का करायचं नाही, हे तिला कळत नव्हतं. समयचा विचार होता, एकदा शिक्षण हातावेगळं करून पैसा मिळवायला लागल्याशिवाय लग्न करता येणार नाही. सुचेतानं जड अंतःकरणाने त्याला निरोप दिला. त्याचं मास्टर्स आणि पीएचडी होण्यास कमीत कमी पाच-सात वर्षं लागणार होती. आताच आपलं वय २७ वर्षे आहे. त्याचं शिक्षण होईपर्यंत आपण ३२ होणार किंवा ३४-३५ सुद्धा ! नंतर लग्न, मुलं आणि आपलं बायालॅाजिकल क्लॉक हे सगळं कसं जमणार या विचारानं ती निराश झाली होती. समय रोज एखादा फोन करत होता. ई-मेल व टेक्स्ट सुरू होतेच! ‘Miss you so much’ आणि ‘love you’ हे शब्द तिला हल्ली फार बुळबुळीत वाटत. तिचे आजी आजोबा कधी असं काही बोलत नसत पण त्यांचं प्रेम त्यांच्या डोळ्यातून ओसंडत असे. त्या भावना एकमेकाला सांगण्याची त्यांना कधी जरूर वाटली नव्हती. तिचे आई बाबा थोडे मॉडर्न पण तरीही कधी ‘I love you’ वगैरे चारचौघात म्हणाले नाहीत पण त्यांचं प्रेम प्रत्येक कृतीत दिसून येत असे. आपलं प्रेम मात्र अगदी उथळ! ‘तू माझं जीवन आहेस,’ म्हणणारा समय सातासमुद्रा पलिकडे केव्हाच निघून गेला होता आणि उरले होते हे रिते टेक्स्ट आणि फेस टाईम!
      त्यातच हल्ली ‘इंस्टा’वर एक गोरी मुलगी प्रत्येक फोटोमध्ये त्याच्या सोबत असते, हे तिला जाणवत होतं. तिनं आडून आडून एक दोन वेळा विचारलं पण त्यानं काही उत्तर दिले नाही. गोरीपान, निळ्या डोळ्याची, अन् सोनेरी केसांची एक मुलगी समयला पळवून नेतेय, अशी स्वप्नं तिला पडत आणि ती दरदरून घाम येऊन जागी होत असे. एकदा तिकडे जाऊन डोळ्यांनी सगळं पहायला हवं, त्याशिवाय कळणार नाही असं वाटू लागलं पण एवढा खर्च करण्याची तिची परिस्थिती नव्हती. तिची तगमग आई बाबांच्या लक्षात येत होती. समय चांगला मुलगा आहे आणि दोन-तीन वर्षांनी शिक्षण अर्धं संपलं की त्यानं लग्न करावं, असं त्यांना पण वाटत होतं. त्या दृष्टीनं त्यांनी पैशाची जोडणीही केली होती. पण सुचेतानं परदेश प्रवासासाठी जेव्हा पैसे मागितले, तेव्हा बाबा गडबडले.
“सुचेता, अग… आत्ता एवढा खर्च आणि नंतर लग्न करून देणं कठीण आहे ग मला!” बाबा तिची नजर चुकवत होते.
“बाबा, मुलगाच धड नसेल तर कुठलं लग्न?” ती तडकून म्हणाली.
“विश्वास नाही का तुझा त्याच्यावर? असं काही करणारा मुलगा नाही समय!” बाबांना तो चुकीचं वागेल, असं अजिबात वाटत नव्हतं.
“बाबा, तो तसा नाही… पण हे वय वेडं असतं. मला त्याला न सांगता तिथं जाऊन त्याचं काय चाललंय, बघायचंय.” ती निकरानं बोलली.
हो नाही करत बाबा तयार झाले.
     तिनं समयच्या वाढदिवसाच्या दिवशी तिथं पोहोचून त्याला सरप्राईझ द्यायचं ठरवलं. पासपोर्ट, व्हिसा, तिकीट तयार झाल्यावर समयचं त्या महिन्याचं टाइमटेबल तिनं माहिती करून घेतलं. तिची जवळची मैत्रीण, सीमा युनिव्हर्सिटी जवळच राहत होती. तिनं बाकी सर्व व्यवस्था केली होती. धडधडत्या अंतकरणानं ती अमेरिकेत येऊन पोहोचली. सीमानं तिला उतरवून घेतलं आणि ती तिला युनिव्हर्सिटीकडे घेऊन आली. समय लॅबमध्ये कोणत्या वेळी जातो, हे तिला माहित होतं. ती लॅबच्या दारात त्याची वाट बघत उभी राहिली. त्याच्या वाढदिवसासाठी आईनं दिलेल्या बेसनाच्या लाडूचा डबा तिच्या हातात होता. ती थंडीत कुडकुडत तिथं बराच वेळ  थांबली पण तो दिसला नाही. त्याला टेक्स्ट करून ‘कुठं आहेस?’ विचारण्यात काही पॉईंट नव्हता. कारण मग सरप्राईझ कसलं? कदाचित आज लॅबला तो येणार नसेल? आजारी असेल का? तेवढ्यात एक गोरी मुलगी तिला लॅबकडे जाताना दिसली. तीच… नेहमी फोटोत दिसणारी… गोरी, निळ्या डोळ्याची आणि सोनेरी केसांची!
“Excuse me, Miss! Do you know where Samay is?”  तिनं शब्दांची जुळवाजुळव करत विचारलं.
“Ohhh! Sucheta… Right? I know a lot about you!” ती म्हणाली.
‘या टवळीला नक्कीच माहिती असणार माझ्याबद्दल…!’ तिनं ‘हो’ अशी मान हलवली.
“What are you doing here?” तिनं विचारलं.
‘तुझ्या झिंज्या उपटायला आलेय...’ असं म्हणावंसं वाटत होते पण ती काही बोलली नाही. ‘पटकन सांगायला काय होतं की समय कुठाय! कुठे लपवून ठेवलायस त्याला,’ असं विचारावसं वाटलं तिला.
तेवढ्यात तिचा फोन वाजला. समय Face-Time करत होता. समयच्या मागे दिसणारा तिच्या आजोबांचा फोटो पाहून ती किंचाळली, 
“अरे, तू आमच्या घरी कसा?”
समय म्हणाला, “माझ्या वाढदिवसाच्या दिवशी तुला सरप्राईज देण्यासाठी मी तुझ्या घरी आलो आणि तू अमेरिकेला गेलेलं कळलं आणि मीच सरप्राईज झालो ! काय ग हे? मला का नाही सांगितलंस काही? 
“ओह्, लिसा भेटली का तुला? ती तुला हवी ती मदत करेल. मी दोन आठवड्यासाठी आलो होतो पण आता दोन दिवस तुझ्या आई बाबांबरोबर व दोन माझ्या आई बाबांबरोबर  घालवतो आणि शुक्रवारी रात्रीचं फ्लाईट घेऊन परत येतो!
“सुच, माझ्या मनात रजिस्टर लग्न करावं, असा विचार आहे ! ते तुला प्रत्यक्ष सांगण्यासाठी आलो होतो. कॅम्पस वर दोन नोकऱ्या मिळाल्यात. लायब्ररीमधे आणि कॅफेटेरियात कॅश रजिस्टरवर. त्यात आपलं सुरूवातीला भागेल.”
सुचेताच्या डोळ्यातून ओघळणाऱ्या पाण्यात समय दिसेनासा झाला होता. लिसानं तिच्या खांद्यावर हात ठेवला.
“सुचेता, आज माझ्या घरी चल. समय या ट्रिपसाठी इकडे आल्यापासून पैसे जमवत होता. माझे म्हातारे वडील घरात एकटे आहेत. त्यांना शॉवर देणं, डॉक्टरकडे नेणं अशी अनेक कामं तो करतो. मी आणि डॅडनी त्याचं इंडियाचं तिकीट काढलं कारण या कामासाठी तो पैसे घेत नाही.
“डॅड त्याच्याच डिपार्टमेंटचे हेड होते पण आता तब्येतीनं त्यांना तिथं जाणं जमत नाही. पण स्टुन्डटन्स घरी येऊन भेटत असतात. असाच समय आम्हाला भेटला आणि आमच्या कुटुंबाचा भाग बनला ! तो कायम आम्हाला तुझ्याबद्दल सांगत असतो.”
सुचेताला स्वतःची लाज वाटली. का दाखवला आपण समय वर एवढा अविश्वास? लग्नाचा पाया असतो प्रेम, विश्वास व प्रामाणिकपणा ! संशयाचं भूत मानेवर बसलं की बुद्धी भ्रष्ट होते म्हणतात ! इतके इन्सिक्युअर कसे झालो आपण?
तिनं समयला फोन करून सांगितलं, “मी आज रात्रीच्या फ्लाईटनं परत येतेय. तुझी दोन आठवड्याची सुट्टी आहे ती बदलू नकोस.”
दुसर्‍या दिवशी सकाळी ती घरी पोचली होती. समय खळखळून हसत तिच्याकडे बघून म्हणाला, 
“हे surprise आपल्याला फार महागात पडलं गं!”
‘माझ्या मुर्खपणामुळे!’ ती मनात म्हणाली.  दुसरे दिवशी सकाळी आईनं आणून ठेवलेली अष्टपुत्री नेसून ऑफिसमधे जाऊन दोन सह्या करून लग्न झालं. तिनं बाबांची आणि समयची माफी मागितली. संशयाची किंमत लाखाच्या घरात गेल्यानं आता साग्रसंगीत लग्न नको, हे बाबाना सांगताच बाबा मान हलवत पूजेला गेले.
आज बाबांच्या तोंडून म्हटला गेलेला श्लोक जरा जास्तच मोठ्या आवाजात होता, असं तिला वाटतं होतं. समय मिष्कीलपणे हसत ऐकत होता.
‘अज्ञश्चाश्रद्दधानश्च संशयात्मा विनश्यति।
नायं लोकोऽस्ति न परो न सुखं संशयात्मन:॥’
- श्रीमद् भगवद्गीता, अध्याय ४/श्लोक ४०
(अर्थ : विवेक व श्रध्दा नसलेल्या संशयी व्यक्तीचा नेहमीच विनाश होतो. अशा व्यक्तीला या लोकात सुख मिळत नाही आणि परलोकातही सुख मिळत नाही.)

 ज्योती रानडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...