बुधवार, ४ डिसेंबर, २०२४

1576. फुलराणी

 सकाळी सहाची वेळ. माई अंगणात रांगोळी काढत बसली होती, तेवढ्यात कोवळा आवाज तिच्या कानावर पडला.
“भाकर दे वो माय… शिळं काय आसल तर दे ग बाय…रातभर उपाशी हाओ !”
माईनं आश्चर्यमिश्रित नजरेनं तिला वरपासून खालपर्यंत न्याहळली. काळीसावळीच पण चापून चोपून दोन वेण्या घातलेल्या, कमरेवर एक लेकरू सुती कपड्यात घट्ट गुंडाळलेलं, वय असावं १०- १२ वर्षं, डोळे मात्र टपोरे पाणीदार.
“अगं एवढ्या पहाटेस कुठून आलीस? आणि ह्यापूर्वी पाहिलं नाही तुला !”
“माय, आता न्हाई का नदीला पाणी सोडलं व्हतं. सारं खोपटात शिरलं आन सगळंच वाहून ग्येलं. मंग आसरा शोधत शोधत हिथवर आलो. तिकडं टेकड्यावर दुमार झोपडं बांधलंय. बापाचा काय पत्त्या न्हाय. माही माय. मी आन ह्यो भाऊ राहतोय तिकडं.”
“बापाचा पत्ता नाही म्हणजे?”
“म्हंजी लोकं म्हणत्यात पुराच्या पाण्यात वाहून ग्येलं असन, माय म्हणती त्येला आमच्या संग रहायचंच नव्हतं.”
“बरं बरं, थांब आलेच मी.”
माई आत गेली, अन्न तर शिल्लक नव्हतं पण ब्रेडचा पुडा होता, त्याच्यासोबत थोडं दूध घेऊन माई बाहेर आली. आणि ही प्राजक्ताचा अंगणभर पडलेला सडा वेचत होती. एक एक फूल. अलगद.
माईला बघून उठली, “मी तुम्हाला काय मदत करू का?”
“अगं भूक लागलीये ना, खाऊन घे आधी !”
तशी ती भावाला घेऊन बसली खाली. आधी त्याला दोन ब्रेड भरवले. भुकेला जीव तो, बहिणीच्या हातानं भराभरा जेवला. आणि मग खेळत बसला. तिनंही दोन ब्रेड खाल्ले आणि दोन बांधून ठेवले. कदाचित आईसाठी असेल. मग खाली सांडलेले कण उचलून बाजूला टाकले. हात धुवून भावाचं तोंडही स्वच्छ पुसलं. आणि परत माईला, ‘काहीतरी काम सांगा,’ म्हणून मागे लागली. 
मग माई म्हणाली, “बरं, एवढे देवपूजेसाठी फुलं तोडून दे.”  
तिनं माईच्या हातातली परडी घेतली, त्यात लाल जास्वंद , सफेद कण्हेर, मोगरा, अशी सगळी थोडी थोडी फुलं भरली आणि आधी गोळा केलेली परिजातकाची फुलं त्यावर टाकली.
“हे घ्या. तुमी लई छान झाडं लावलीत, समद्या रंगाची हायेत.”
“हो. मला खूप आवड आहे !”
माईनं परडी हातात घेतली आणि जास्वंदीला एक फूल राहिलं होतं ते तोडलं. माईला वाटलं की तिचा हात पोहोचला नसेल. मोगऱ्याला देखील २-३ फुलं होती. माई तिकडे वळाली तशी ती म्हणाली,
“तसं न्हवं, पण राहू द्या की तेवढी फुलं…”
“का गं, तुला हवीत का?”
“न्हाय, पर माही माय म्हणती की समदी फुलं तोडू न्हाय. फुलं म्हंजी लेकरं अस्त्यात न झाडाची. समदीच तोडली की झाडं कसतरीच दिसतंय. एखादं दुसरं फूल आसल तर लेकुरवाळ दिसतं.”
माईला तिची ही कल्पना आवडली आणि हात मागे घेतला.
“नाव काय गं तुझं?”
“रानी.”
“हम्मम, फुलराणीचं जशी !”
“आन् ह्यो क्रिस्ना…”
वा, छान !”
“माय, जातो म्या.आन माह्या मायसाठी बी काय काम आसन, धुणं भांडी तर सांगा.”
“बरं.”
ती वळली तशी माई तिच्याकडे बघतच राहिली. केवढीशी पोर, पण समज किती. टापटीपपणा. मदतीची तयारी !’
दुसर्‍या दिवशी परत तेच ! सकाळी सहा वाजता ती माईच्या आधीच हजर. तिनं बळेच माईच्या हातातला फडा घेऊन अंगण झाडलं. आज मनानंच तिनं फुलं तोडून ठेवली. माईनं सडा टाकल्यावर तिनं रांगोळी काढली. मग माईला, ‘शिळं काही असेल तर द्या’, म्हणाली. 
काल काहीच अन्न शिल्लक न राहिल्यानं माईला वाईट वाटलं होतं म्हणून तिनं आज मुद्दामच दोन भाकऱ्या ठेवल्या होत्या. का कोण जाणे, पण माईला ठेवाव्याश्या वाटल्या तिच्या नावाच्या आणि ती आलीच!
“माह्या मायला चार कामं मिळालीत. मी बी रोज सकाळी यु का तुमाले मदतीला. फकस्त यक भाकरी द्येत जा.”
“ये ना. पण कामाला नको. लहान आहेस अजून तू. जे उरलं असेल ते देईन. नाहीतर रात्रीच येत जा उशीरा. म्हणजे जे उरलं ते तुला ताजंच देता येईल.”
“नगं. माय म्हणती. फुकटची चाकरी बी करायची नाय अन फुकटची भाकरी बी खायची नाय.”
आता मात्र माईला अजूनच कौतुक वाटलं.
“शाळेत जातेस?”
“न्हाय, पण थोडं थोडं वाचता लिवता येतं.”
“ते कसं काय?”
“माय अदुगर शेतावर जायाची ना, तिकडं यक माई मैत्रीण व्हती, ती जायची शाळंत. तिनंच शिकीवल व्हतं. अजूक शिकायचं व्हतं, पर राह्यलंच.”
माई लहान मुलांच्या शिकवण्या घ्यायची. 
“संध्याकाळी चार वाजता येत जा, मी शिकवेन तुला.”
तिचे डोळे आनंदाने चमकले, “खरंच!”
“हो गं, खरंच ये. मी तुला वही पेन पण देईन.”
“लई बेष्ट, आज येतेच म्या.”
ती आनंदानं उड्याच मारत मारत गेली. तिच्या त्या चोपून घातलेल्या दोन वेण्या अधिकच मजेशीर उडत होत्या. सकाळच्या लगबगीनं घरट्यातले पक्षी पण आकाशात झेप घेत होते. जणू त्यांना आत्ताच मोकळं आकाश मिळालंय. पंखांमध्ये नवी ऊर्जा मिळालीय, आता ही सकाळ आणिकच प्रसन्न वाटत होती. जणू पूर्ण दिवसाची ऊर्जा आत्ताच साठवून घ्यावी आणि दिवसभर ती सत्कारणी उधळत रहावी. 
आणि माईचा दिवस असायचाही असाच. शिकवणीतली निम्मी अधिक मुलं कामगारांचीच होती. घर संसार बघून ती अडेल त्याला मदत करीत रहायची. मी हे आतून सगळं बघत होते. 
“काय मग. आजपासून नवीन विद्यार्थी?”
“हो गं, फारच चुणचुणीत पोर आहे ती !”
“असू देत, उगाच जीव लावतेस. काही दिवसांनी पळून जातात हीच मुलं. त्यांना शिकण्यापेक्षा पोटापाण्याचं पडलेलं असतं. मजुरी मिळायला लागली की पळतात कामाला !”
“पण मी त्यांच्या आई वडिलांना पटवून आणतेच की परत !”
“पण किती दिवस? परत परत तेच घडतं!”
“मग आपणही परत परत तेच करायचं. सोन्यासारखी मुलं गं ती. त्यांना कळेल हळू हळू शिक्षणाचं महत्त्व !”
“काय करायचं ते कर. तुला बरं वाटतंय तर करत जा.”
तशी मी मनातून चिडलेच होते, पण माईला मला दुखवायचं नव्हतं, म्हणून गप्प बसले. 
    त्यादिवशी पासून ती रोज यायची. रोज माई तिच्याबद्दल काहीतरी सांगत असे. रोज नवीन कौतुक. माईच्या एकूण सांगण्यावरून तिची अभ्यासातली प्रगती फारच चांगली होती. शिकवणी झाली की ती घर नीटनेटकं करायला मदत करायची. तिला मुळातच ते आवडायचं. बरेचदा माझी अस्ताव्यस्त पुस्तकं पण तिनं आवरून ठेवली होती. मी लहानपणी जपून ठेवलेले ‘चांदोबा’चे अंक तिच्या हाती लागले. माईला विचारून तिनं ते वाचून काढले. 
एकदा ती माईला म्हणाली, “माई मी यवढी काळी का हाय वं?”
“का गं, असं अचानक विचारलंस?”
“न्हाई, बघते म्या. गोरी माणसंच छान दिसतात. त्यांना कोणते बी कपडे छान दिसत्यात. लोकं बी त्येंच्याशी प्रेमानं बोलत्यात. कुटं बी तेच उठून दिसत्यात…!”
“अगं बाहेरच्या दिसण्यावर जाऊ नये माणसानं!”
“पण लोकं दिसण्यावरच आधी जातेत न वं!”
“हे बघ, प्रथमदर्शनी असं असलं, तरी एकदा का त्या माणसाचे सद्गुण, कौशल्य, स्वभाव कळलं की दिसणं वगैरे ह्या गोष्टी दुय्यम ठरतात. अगं पुरुषोत्तम राम ही सावळाच आहे आणि श्रीकृष्ण सुद्धा ! काळ्याकभिन्न पाषाणातूनच गोड पाण्याचा निर्झर वाहत असतो. तू इतकी हुशार आहेस, इतका गोड तुझा स्वभाव आहे, कितीतरी गुण आहेत तुझ्या अंगी. तू कायम हसरी असतेस, तू सतत इतरांना आनंद वाटत असतेस. अगदी बागेतल्या ताज्या फुलांसारखा…!! म्हणून तर मी तुला ‘फुलराणी’ म्हणते…! तू जशी आहेस तशीच रहा.”
आईनं बरेच प्रयत्न करून तिचं नाव शाळेत घातलं होतं. ती आता बराच वेळ आमच्याच घरी असायची. पुस्तकामध्ये फारच रमायची. एक दिवस ती माझी पुस्तकं आवरत असतांना माझी मोठ्ठी डिक्शनरी तिच्या हातून पडली आणि तेवढ्यात मी तिथे पोहोचले…
“काय करतीयेस तू? कळत नाही तर कशाला हात लावतेस माझ्या वस्तुंना?”
“सॉरी दीदी, चुकून पडलं. पर काय हाय ते? एवढं मोठ्ठं पुस्तक?”
“कशाला हव्यात तुला नसत्या चौकश्या? अडाणी कुठली, नाव देखील उच्चारता येणार नाही तुला त्याचं. डिक्शनरी म्हणतात त्याला!”
“डी… श…… डी… श…” तिचे शब्द तिथंच अडखळत राहिले.
      माझी १०वी झाली आणि मी पुढच्या शिक्षणासाठी पुण्यात गेले. अधून मधून माईच्या तोंडी तिचं नाव असायचं. गाव सोडून ८ वर्षं झाली. माझं इंजिनिअरिंग संपून आता जॉब करत होते. 
एक दिवस बाईक बिघडल्यामुळं मी सिटीबसनं जात होते. जवळ बरचसं समान होतं. तिकीट काढण्यासाठी कशीबशी पर्स उघडली तर पैसे खाली पडले. हातातल्या सामानामुळं धड वाकताही येईना. मग कंडक्टरनंच ते उचलून दिले. 
लेडीज कंडक्टर…! दोन्ही हातात काचेच्या बांगड्या, मध्यम आकाराची टिकली. त्याखाली कुंकू, जाड जाड मण्यांचं मंगळसूत्र. सडपातळ, काळी पण चमकदार डोळे. चेहरा जरा ओळखीचा वाटला. डोक्याला ताण देण्याआधीच ती म्हणाली, 
“दीदी… तुम्ही…!! ओळखलं का मला?”
“तू… राणी??”
खरंतर एवढ्या लोकांमध्ये तिला ओळख द्यायचंही माझ्या जीवावर आलं होतं पण अचानक तोंडातून निघालं. आणि ओळख दिल्यावाचून सुटकाही नव्हती. तसंच तिच्या ह्या वेशाबद्दल आश्चर्य वाटत होतं, ते पण जाणून घ्यायचं होतं.
“हो, राणीच मी…”
“इथं कशी…??”
“अहो दीदी, माईंनी १०वी पर्यंत शिकवली. नंतर माईंकडे एका आश्रमतल्या मावशी आल्या होत्या. त्यांच्या इथल्या अनाथ मुलांविषयी सांगत होत्या. म्हणाल्या, ‘मुलगा ड्रायव्हर म्हणून सरकारी खात्यात लागलाय, खूप सद्गुणी आहे, तशीच मुलगी हवीये.’ 
“माईंनी माझं नाव सुचवलं. आधी माझी माय तयार नव्हती पण माईंनी खूप समजावलं. मग तयार झाली. लग्नाला एक वर्ष झालं आणि ह्यांचा ॲक्सिडेंट झाला. एक पाय गमावला, त्यांच्या जागेवर अनुकंपा तत्वावर मला नोकरी मिळाली. 
“त्यांनीही जिद्द नाही सोडली. मला म्हणाले, ‘मी घर सांभाळीन, घर बसल्या शिकवण्या घेईन. तू बाहेर पड.’ खरं सांगू, माईंनी शिकवलं म्हणून आज घर सावरू शकले, ह्यांना आधार देऊ शकले. त्यांचे ऋण आहेत माझ्यावर, त्याची परतफेड नाही करू शकत. पण त्यांचं व्रत पुढं चालू ठेवलंय. माझा नवरा घरी शिकवण्या घेतो आणि एक वेळ आश्रमातल्या मुलांना शिकवायला जातो.”
तिचे डोळे पाणावले. कृतज्ञतेनं, आनंदानं, अभिमानानं.
आणि मी…?  स्तब्ध ! 
    खरंच कोण सुशिक्षित? आज माईच्या छोट्याश्या उपकाराची जाणीव ठेवून तिनं घेतलेला निर्णय कौतुकास्पद होता. कुठून आणली होती ही जिद्द, हिम्मत? स्वतः एवढ्या चिखलात रुतलेलं असताना कमळाप्रमाणं इतरांना आनंद वाटायचं कुठून शिकली असेल…??? 
 
माई खरंच म्हणायची… 
ती खरंच ‘फुलराणी' होती…
‘फुलराणी…!!!’

 अनामिक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...