बुधवार, ४ डिसेंबर, २०२४

1571. रंगदेवता आणि...

      वसंतराव रंगात येऊन जेवत होता. आज रविवार. आज मटण आणि पुरीचे जेवण. रात्रौ विष्णुदासच्या प्रयोगाचे उत्पन्न चांगले आले होते. आज सकाळी मॅनेजर सुनिलने व्हॉटस्अपवर सगळा हिशेब पाठविला होता. एकंदरित या नाटकाचे उत्पन्न बरे येत होते. पहिले दहा प्रयोग तोट्यात गेले. पण नंतर ‘‘हवा येऊ द्या’’मध्ये प्रमोशन झाले तसेच मुंबईतील पेपरमध्ये चांगली परिक्षणे छापून आली आणि गर्दी वाढू लागली. आज रविवारी फक्त एक प्रयोग, साहित्य संघामध्ये आणि तो कॉन्ट्रॅक्ट प्रयोग. तो गिरगांवातल्या कुडाळदेशकर गौड ब्राह्मण समाजाने त्यांच्या ज्ञातीबांधवांसाठी ठेवला होता. तसा वसंतरावांना सतत पाच वर्षे या समाजाकडून प्रयोग मिळत होता. त्यांची आणि आपली वेवलेंथ जुळली आहे आणि आपली नाटकेपण चांगली. तसेच या समाजाचे कार्यकर्तेपण चांगले. लोक चांगली. पैसे प्रयोगाआधी मिळत होते. आपल्या संस्थेच्या प्रत्येक प्रयोगाला आपण स्वतः जातो असे नाही. पण प्रयोग मुंबईत आहे आणि या कुडाळदेशकर परिवाराचा आहे त्यानिमित्ताने त्यांची माणसे भेटतात म्हणून जायचे.
वसंतराव चवीने मटणाची नळी चोखत होता एवढ्यात मॅनेजर सुनिलचा फोन मोबाईलवर दिसला. वसंतरावांना वाटले संध्याकाळच्या प्रयोगाची तयारी सांगत असेल. पण 
सुनिल - साहेब, प्रॉब्लेम झालायं, मनोहरला आज सकाळी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये आयसीयुमध्ये ठेवलाय. मोठ्ठा झटका आलाय त्याला. त्याची कंडिशन सिरीयस आहे म्हणे
वसंतराव - अरे बापरे ! मनोहर हॉस्पिटलमध्ये ? म्हणजे संध्याकाळच्या प्रयोगाला येऊच शकत नाही की काय ?
सुनिल - नाही हो, मी आत्ता हॉस्पिटलमध्ये फोन करुन चौकशी केली, किमान चार दिवसतरी त्याला आयसीयुमधून बाहेर काढणार नाहीत. कदाचित बायपास करावी लागेल. 
वसंतराव - अरे, आजच्या संध्याकाळच्या प्रयोगाचे काय? आपण आधीच पैसे घेतलेत.
सुनिल - त्याकरिताच तुम्हाला फोन केला. तुम्ही ताबडतोब ऑफिसमध्ये या. 
वसंतराव ताटावरुन उठले. बायकोनेपण आग्रह केला नाही कारण ती फोनवरचे बोलणे ऐकत होती. वसंतरावांनी कपडे चढवले आणि बिल्डींगखाली येऊन गाडी चालू केली. डोक्यात विचार सुरु. मनोहरची बदली घेऊन काम करणे अशक्य कारण त्याचे यात साठ टक्के काम. आयत्यावेळी दुसरा कोण मिळणार ? आणि आज रविवार, सर्वच थिएटर्समध्ये नाटके सुरु. कॉन्ट्रॅक्ट शो म्हणजे ती संस्था आपल्या मेंबर्सना तिकिटे देऊन मोकळी झाली असणार. लोकांना केवढा उत्साह असतो. 
विचार करता करता वसंतराव परेलमधील आपल्या ऑफिसमध्ये पोहोचले. सुनिल डोक्याला हात लावून बसला होता. 
वसंतराव - आता काय करता येईल ? प्रयोग रद्द करता येणार नाही. कॉन्ट्रॅक्ट शो आहे. हौशी लोक असतात. एक दिवस हौस करुन सहकुटुंब नाटक बघायला येतात. सगळे एका जातीचे म्हणून त्यांना जास्त हौस. 
सुनिल - ‘जाऊबाई’ करता येणे अशक्य. कारण मनोहर शिवाय एवढे नाटक कुणाला जमणार नाही. आता दुपारचे दिड वाजतायत आणि सहाचा प्रयोग ठरलाय.
वसंतराव - अस केलं तर आपल्याच प्रोडक्टशनच ‘‘खरा जावई’’ केलं तर ? पण त्यातली माणसं इथं आहेत का बाहेर गावी गेले कळायच नाही. 
सुनिल - त्यात मोठी भूमिका निलिमाताईची आहे. ती परदेशी गेलेली. कुठे हाँगकाँग की सिंगापूरला. आली की नाही कोण जाणे? 
वसंतराव - तिला फोन लागतो का बघ, आणि लागला तर म्हणावं सहाला ‘‘खरा जावई’’चा प्रयोग साहित्यला करायचा आहे.
सुनिलने त्वरीत निलिमाला फोन लावला. ती आज सकाळीच सिंगापूरहून मुंबईला आली होती. ती सहाचा प्रयोग करायला तयार झाली. 
वसंतराव - आता बाकीचे किती राहिले? पाचजण, आणि लाईटवाला, म्युझिक, मेकअपमन सर्वांना फोन लाव. 
सुनिलने व्हॉटस् अप ग्रुप कॉल लावला. समीर खारघरला मित्राकडे होता. विश्वासचे कालच लग्न झालेले, त्याच्याकडे सत्यनारायण होता. संगीता आणि विद्या दोघी गडकरीमध्ये एकांकिका स्पर्धेत होत्या आणि प्रविणचा संपर्क होत नव्हता. मेकअपमन निवृत्ती सिरीयलच्या शुटिंगमध्ये होता. त्यामुळे तो येऊ शकणार नव्हता. त्याच्या ऐवजी कोणीतरी दुसरा पहायला हवा होता. लाईट करणारा सुंदर गावी गेला होता. असा एकंदर रिपोर्ट सुनिल ने वसंतरावांना दिला. मग वसंतरावांनी संगीताला फोन लावला. 
वसंतराव - ‘‘कोण संगीता काय ? मी वसंतराव बोलतोय, अगं आज साहित्य संघात जाऊबाईचा प्रयोग होता. पण मनोहरला अ‍ॅटॅक आलाय, बरं तो कॉन्ट्रॅक्ट प्रयोग आहे त्यामुळे तो केलाच पाहिजे. म्हणून आपलंच नाटक ‘‘खरा जावई’’ तिथ करुया असं मी म्हणतो, निलिमा आजच सिंगापूरहून आलीय आणि ती सहाचा प्रयोग करते म्हणाली. तेव्हा तू आणि विद्या गडकरीमध्ये आहात म्हणे, कसही करुन पाच पर्यंत संघात पोहोचा. काय ? वाट बघतोय.
संगीता - ‘‘विद्याची एकांकिका तीन वाजता आहे, माझी सहाला आहे आम्ही कसे येणार ?’’
वसंतराव - ‘गोखलेंच्या संस्थेची स्पर्धा आहे न्हवं? मी गोखलेला फोन लावतो आणि तुमची एकांकिका तीन वाजता घ्यायला लावतो. पण विद्याला विचार जरा.’’
संगीताने त्याच नाट्यगृहात मेकअप रुममध्ये असलेल्या विद्याच्या कानी ही बातमी घातली. विद्या म्हणाली, ‘‘मी नाही येणार. मागच्या सातारच्या प्रयोगाला या वसंतरावाच्या बायकोने माझा सर्वांसमोर अपमान केला. वसंतरावांना सांग विद्या येत नाही म्हणून.’’ संगीताने ताबडतोब वसंतरावांना फोन लावून विद्याचे म्हणणे कळविले. वसंतरावांनी विद्याला फोन लावला. 
वसंतराव - हॅलो विद्या, संगीताने तुला सांगितलं असेल, संध्याकाळी सहाला साहित्य संघात अचानक खरा जावईचा प्रयोग करायला लागतोय. तुम्हाला आधी कळविले नाही हे खरे पण नाईलाज आहे. मनोहर फार आजारी पडलाय, त्यामुळे हे नाटक करावं म्हणतोय. तेव्हा तू आणि संगीता साडेपाच पर्यंत संघात पोहोचा.
विद्या - मी येत नाही, मी नाटक सोडलयं तुमचं. मागच्या सातारच्या प्रयोगात तुमच्या बायकोने सर्वांदेखत माझा अपमान केला तेव्हाच मी सोडलं, आता दुसरी बघा. 
वसंतराव - अगं आयत्यावेळी कुठ बघणार ? आजचा एक प्रयोग कर. मग पुढच्या प्रयोगाला दुसरी बघु. 
विद्या - ते नाही जमायचं. तुमची बायको असेल तुमच्या घरची राणी म्हणून तिने काय माझा अपमान करावा? मी काय रस्त्यावर पडले नाही अजून.
वसंतराव - अगं विद्या, माझी बायको तुला का बोलली माहिती आहे ना? त्या परक्या गावात तुझी आणि संस्थेची बेअब्रु झाली असती. तुला मी किती वेळा सांगत होतो बाहेरगावी पिण कमी करायचं मग आपल्याला शुध्द राहत नाही. 
विद्या - दारु कोण पित नाही वसंतराव ? तुम्ही पित नाही की ती निलिमा मोठी नटी, ती पित नाही?
वसंतराव - सर्वजण पितात मला माहिती आहे, अग पण मला सवय आहे खूपवर्षापासून तू तरुण आहेस आणि तुला दारु झेपत नाही हे लक्षात ठेव. 
विद्या - तुमचं कायपण ऐकणार नाही मी, जर मी प्रयोगाला यायला हवी असेल तर, तुमच्या महाराणीला माझी माफी मागायला सांगा नाही तर दुसरी बघा. 
वसंतरावांचा नाईलाज झाला, आता बायकोला सांगितलं तर ती आपल्यावर डाफरेल पण करणार काय ? प्रयोग तर व्हायला हवा. वसंतरावांनी बायकोला फोन करुन सर्व परिस्थिती सांगितली आणि विद्या आपली क्षमा मागायला सांगते आहे असं कळविले. 
वसंतरावांची पत्नी - तुम्हाला कशाच काहीच वाटत नाही ? त्या दिडदमडीच्या नटीची मी माफी मागू? सातारच्या प्रयोगानंतर ती पिऊन टाईट झाली. तिला आपल्या कपड्याची शुध्द नव्हती. आपल्या संस्थेमध्ये एवढी बाप्ये माणसं कोण कसा गैरफायदा घेईल सांगता येईल? म्हणून मी बोलले. 
वसंतराव - अगं ते मला माहिती आहे, पण अडवून दाखवते ना ! माझे हात आता बांधले गेलेत. एक प्रयोग होऊ दे, नाही तिच्या....वर लाथ मारतो की नाही बघ. एकदा तिला फोन कर आणि मिटवून टाक भांडण. 
वसंतरावांच्या बायकोने विद्याला फोन लावला
वसंतरावांची बायको - अगं विद्या, मी सरस्वती बोलते, वसंतरावांची बायको. त्यांचा फोन होता संध्याकाळी साहित्यमध्ये जावईचा प्रयोग करावा लागतोय, तो मनोहर सिरीयस झालाय म्हणे, अगं विद्या परवा ना सातारच्या प्रयोगानंतर माझं चुकलचं गं, मी तुला सर्वांसमोर बोलायला नको होतं, मला आपली तुझी काळजी वाटली म्हणून बोलली. तुला राग आला असेल तर मला माफ कर पण आजचा प्रयोग होऊ दे. 
विद्या - ठिक आहे, पण यापुढे माझ्यासमोर दात दाखवताना विचार करा आणि आजच्या प्रयोगाचे डबल पाकिट पाहिजे तरच मी साहित्यला येते नाहीतर बघा दुसरी. 
सरस्वती - बरं बाई मी सांगते यांना डबल नाईट द्यायला, पण तू साडेपाचपर्यंत साहित्यला पोहोच.
विद्या - मी आणि संगीता गडकरीत आहोत. आम्ही ओला करुन गिरगांवात येणार म्हणून सांग तुझ्या नवर्‍याला. ओलाचं भाडं द्या म्हणावं.
सरस्वतीबाईंनी विद्याचा निरोप वसंतरावांन सांगितला. आता प्रश्न होता तो संगीताची एकांकिका सहाला होती. ती वेळ बदलून घ्यायला लागणार होती. विद्याची तीनची होती. म्हणजे विद्याची चारला एकांकिका संपली की दोघीही ओला करुन गिरगावांत आल्या असत्या. वसंतरावांनी एकांकिका स्पर्धेचे आयोजक गोखले यांना फोन लावला आणि अडचण सांगितली आणि संगीताची एकांकिका चारला घ्या अशी विनंती केली. गोखले ऐकायला तयार नव्हते. ‘‘इतर स्पर्धक ओरडतील, त्यांना प्रॉब्लेम होईल त्यामुळे आपण तसे करु शकत नाही.’’ असे ते स्पष्टपणे वसंतरावांना म्हणाले. वसंतरावा म्हणाले चारची एकांकिका कोणाची आहे ती मी पाहतो. चारची एकांकिका कल्याणच्या ग्रुपची होती. कल्याणच्या ग्रुपचा दिग्दर्शक अनिकेत त्यांच्या ओळखीचा होता. त्याला फोन करुन तुझी चारची एकांकिका सहाला कर आणि सहाची एकांकिका चारला होऊदे अशी विनंती केली. अनिकेत तयार झाला, पण तो म्हणाला परिक्षकांना सांगायला पाहिजे. कारण शेवटी सकाळी त्यांच्या हातात टाईमटेबल दिलयं. वसंतरावांनी स्पर्धेचे परिक्षक जयंत सामंत यांना फोन करुन अडचण सांगितली. सामंत म्हणाले, जर एकांकिका करणारे संघ अदलाबदल करायला तयार असतील तर माझी काही हरकत नाही. वसंतरावांनी पुन्हा संगीताला फोन लावला. फोन करुन तुमची एकांकिका चारला आणि विद्याची तीनला करा. संगीता म्हणाली, अडचण अशी आहे आमच्या एकांकिकेत काम करणारा मिलिंद रानडे डोंबिवलीत लग्नाला गेलाय. सहाची एकांकिका म्हणून तो पाचपर्यंत पोहोचणार. तो एका तासात इथे कसा येईल ? वसंतरावांनी डोक्याला हात लावला आणि संगीताकडून मिलिंदचा फोन घेतला आणि त्याला अडचण सांगितली. मिलिंद ऐकेना. तो म्हणाला त्याच्या जवळच्या मित्राचे लग्न आहे तेव्हा तो वरातीत नाचून मगच ठाण्याला जाणार. वसंतरावांनी फारच विनंती केली तेव्हा जर तुम्ही माझ्या गुगल-पेवर पाच हजार भरले तरच मी ठाण्याला जायला निघतो नाही तर नाही. वसंतरावांनी मिलिंद रानडेला गुगल-पे वरुन पाच हजार पाठविले. तसा मिलिंद म्हणाला, माझ्यापाशी मोटरबाईक आहे मी तीन पर्यंत ठाण्याला पोहोचतो. वसंतरावांनी परत संगीताला फोन लावला आणि पाचला एकांकिका संपली की दोघीही ओला करुन गिरगांवात या. ओलाचे पैसे मी देतो. संगीता आणि विद्या या दोन कलाकारांची सोय झाली आणि इतर कलाकार कोण राहिले हे सुनिल ने वसंतरावांना सांगितले. शिवाय लाईटवाला, म्युझिकवाला, मेकअपमन. वसंतराव सुनिलला म्हणाले, तू समीरच्या संपर्कात रहा. तो खारघरहून येऊ शकेल आणि प्रविणचा कॉन्टॅक्ट होतो का बघ. विश्वासचे काल लग्न झाले आहे त्याच्या लग्नाला मी जाऊ शकलो नाही आता त्याच्याकडे पूजेला जातो आणि येताना त्याला घेऊन येतो. तोपर्यंत या दोघांना कोणत्याही परिस्थितीत साडेपाचपर्यंत गिरगावात बोलव. आणि वर्दम मेकअप सर्व्हिसमध्ये फोन करुन आजच्या पुरता कोण मेकअपमन मिळतो का बघ, म्युझिक आणि लाईटवाला कोण नाही मिळाला तर आजच्या दिवस तू आणि मी जमेल तस करु. आणि शिवाय धोंडूला फोन कर. त्याला सांग आज ‘जाऊबाई’ होत नाहीय, गोडावूनमधून ‘खरा जावई’ भर. नाहीतर तो येडा ‘जाऊबाई’ घेऊन यायचा. सुनिलने धोंडूला फोन करुन गोडावूनमधून जाऊबाई घेऊ नकोस, ‘जावई’ टेम्पोत भर आणि पाचपर्यंत संघात पोहोच असा निरोप दिला. धोंडू सुनिलला शिव्या देऊ लागला. 
‘‘सकाळी सांगायचं नाही का? बारापासून टेम्पोत ‘जाऊबाई’ भरणं सुरु आहे, अर्धी भरुन झाली आणि आता सांगतो ‘जावई’ भर म्हणून.’’ सुनिलने त्याला शांत करत काय अडचण झाली ते सांगितले. 
इकडे वसंतरावांची गाडी वांद्र्याला खेरवाडीच्या दिशेने धावू लागली. आता विश्वासला आणि त्याच्या नवीन पत्नीला कसे पटवायचे याचा विचार ते करु लागले. आपल्या नाटकात असून आपण काल त्याच्या लग्नाला गेलो नाही ही मोठी चुक झाल्याचे वसंतरावांना वाटले. आता त्याच्या घरचे काय बोलतील ते गुपचूप ऐकावं लागेल. इकडे प्रविणचा पण संपर्क होत नाहीय. तो ²²² चा कुठे गेला? लयं बाराचा हाय. बाई दिसली की लाळ घोटत मागं फिरल, आता कुठल्या बाईच्या मागून गेला कोण जाणे. पण साल्याच एक आहे, स्टेजवर गेला म्हणजे सर्वांना खाऊन टाकतो. वसंतरावांना मनात येत होतं - ‘‘हा नाटकाचा धंदा लई वाईट, कुणा कुणाचे पाय धरावे लागतील नेम नाही, रोज म्हणतो हा धंदा सोडून दुसरं काहीतरी करु, पण दारुड्यासारखं व्यसन आहे हे. नवीन नाटक केल्याशिवाय चैन पडत नाही. 
एव्हाना वसंतरावांची गाडी खेरवाडीत शिरली. एकदोन वेळा ते विश्वासच्या घरी आले होते. त्यामुळे बरोबर त्याच्या बिल्डींगखाली पोहोचले. बिल्डींगखाली भरपूर गाड्या, स्कूटर्स उभ्या होत्या. त्याच्या गॅलरीत रोषणाई दिसत होती. वसंतराव दोन जिने चढून तिसर्‍या मजल्यावरील विश्वासच्या ब्लॉकजवळ आले. दरवाजा सताड उघडा होता आणि माणसे बाहेर पॅसेजमध्ये उभी होती. वसंतराव पॅसेजमध्ये उभे राहिले. एवढ्या गर्दीत विश्वास कुठे काय दिसतो ते पाहत होते. विश्वास सोवळे नेसून प्रसाद वाटत होता आणि त्याची बायको बायकांना हळदीकुंकू आणि तिर्थ वाटत होती. आता विश्वासला हाक कसा मारायचा असा विचार वसंतराव करत होते तेव्हा त्यांच्या लक्षात आले आपण सत्यनारायणासाठी आलो आहे, लोकांना बाजूला सारत वसंतराव आत गेले आणि सत्यनारायणासमोर उभे राहिले. सत्यनारायणाला नमस्कार करुन वसंतराव उठले एवढ्यात विश्वासच्या आईने त्यांना पाहिले. 
‘‘कोण वसंतराव ? काल लग्नाला आला नाहीत, आज वेळ मिळाला की काय?’’
अहो आई, काल येणार होतो, पण बायकोला डॉक्टरकडे न्यायला लागलं, पाचवा महिना आहे ना.’’
असं होय ! मी म्हटलं खरा जावई बंद आहे म्हणून विश्वासला विसरला की काय?
‘‘नाही हो, विसरणार कसा ? आणि आज यायचचं होत ना. गेला कुठं विश्वास ?’’
‘‘आहे, बायकोसोबत बोलतोय आत, कालच नवीन लग्न झालयं ना!’’
आईने विश्वास, विश्वास अशा हाका मारल्यावर विश्वास बाहेर आला. वसंतरावांना पाहताच -
‘‘अरे वसंतराव, आज आलात ? काल वाट पाहत होतो तुमची.’’
होय रे बाबा, काल बायकोला डॉक्टरकडे न्यायचं होतं, आणि आज यायचच होत ना !’’
‘‘बर, बर मग आज काय जाऊबाईचा प्रयोग आहे ना? सकाळी जाहिरात पाहिली.’’
‘‘तेच सांगायला आलोय, जरा बाहेर येतोस.’’
येतो - अस म्हणत विश्वास गॅलरीत आला.
वसंतरावांनी विश्वासला मनोहरचे अचानक आजारपण आणि त्यामुळे जाऊबाईचा रद्द करावा लागलेला प्रयोग आणि त्यामुळे खरा जावई संध्याकाळी करावा लागतोय हे सर्व सांगितलं आणि विश्वासला कोणत्याही परिस्थितीत साडेपाचपर्यंत संघात पोहोचायला सांगितलं. हे ऐकून विश्वास उडालाच.
‘‘अहो माझं काल लग्न झालयं, आणि आज घरी सत्यनारायण आहे, मी कसा येऊ ? स्वप्ना चिडेल. तिचे माहेरचे येणार आहेत संध्याकाळी प्रसादाला.’’
‘‘कसही कर विश्वास. पण आजचा प्रयोग करणे महत्त्वाचे आहे. नाहीतर माझी सगळी अब्रु गेली. एवढ्या एक हजार माणसांना काय उत्तर देणार. त्यांचा किती हिरमोड होईल ? पाहिजे तर मी तुझ्या बायकोशी बोलतो.’’ असे म्हणता म्हणता विश्वासची पत्नी स्वप्ना तिथेच आली. विश्वासने तिची वसंतरावांशी ओळख करुन दिली. विश्वासने वसंतरावांची अडचण सांगितली आणि सायंकाळी खरा जावईचा प्रयोग करणे आवश्यक आहे, असे वसंतरावांचे म्हणणे आहे हे ऐकून स्वप्ना उखडलीच. 
‘‘अरे काल आपलं लग्न झालय, आज सत्यनारायण, माझी माहेरची लोकं सत्यनारायणाला येणार, आणि तू प्रयोगाला जाणार? जमणार नाही. काही वाटतं का मनाला ?’’ अस एवढं बोलून स्वप्ना तणतणत आत गेली. विश्वासचा पण नाईलाज झाला. काल लग्न केलेल्या स्वप्नाला दुखवणार कसा?
वसंतरावांना पाहून विश्वासचे बाबा पुढे आले. ते पण जुन्या काळाता रंगभूमीवरील नट होते. चिंताग्रस्त् वसंतरावांना पाहून त्यांनी ‘‘काय झालं?’’ म्हणून विचारलं. वसंतरावांनी त्यांना पुन्हा सगळी हकिगत सांगितली. विश्वासच्या बाबांच्या अडचण लक्षात आली. ते म्हणाले, मी सांगतो स्वप्नाला. असे म्हणून ते स्वप्नाला आतून घेऊन आले. तणतणत स्वप्ना बाहेर आली. 
‘‘हे बघ स्वप्ना, कोणत्याही परिस्थितीत नाटक व्हायला पाहिजे. एक हजार प्रेक्षकांना परत पाठवताकामा नये. समजा आपण नाटकाचे अ‍ॅडव्हान्स तिकिट काढले आणि थिएटरवर गेल्यावर नाटक रद्द झाले असे कळले तर काय होईल ? लोक ऐकणार नाहीत, दगडफेक करतील, थिएटर जाळतील. शेवटी एक हजार प्रेक्षकांचे दोन हजार हात असतात. आधी नाट्यसृष्टीला लोक नाक मुरडतात. त्यात हा प्रयोग रद्द झाला म्हणजे उद्या सगळ्या पेपरमध्ये तिखटमीठ लावून बातमी येईल. वाईटच ते. तेव्हा विश्वासला जाऊदे प्रयोगाला. तुझ्या आईबाबांना मी सांगेन. आणि कोणी विचारलं तर माझ्याकडे बोट दाखवं. पण नाटक व्हायला पाहिजे.’’ वसंतरावांना वाटलं. विश्वासच्या बाबांचे पाय धरावेत. स्वप्ना आतल्या आत धुमसत होती. पण सासरेबुवा सांगतात तर नाही कस म्हणणार, तशी ती धुश्यात आत निघून गेली. बाबा वसंतरावांना म्हणाले, ‘‘तुम्ही निघा, अजून बरीच कामे असणार, मी विश्वासला साडेपाचपर्यंत संघात पाठवतो.’’ वसंतरावांनी बाबांचे हात हातात घेतले आणि आपल्या डोळ्याला लावले आणि ते चप्पल घालून बाहेर पडले. 
बिल्डींगखाली येताच वसंतरावांनी सुनिलला फोन लावला. सुनिल म्हणाला, ‘‘समीर खारघरहून निघालाय, पण मुंबईत आज मेगाब्लॉक आहे, रेल्वेने मोठ्ठं काम काढलय, त्यामुळे तो खारघर स्टेशनवर अडकून पडलाय. दिडतासभर तो तिथेच आहे आणि स्टेशनवर खूपच गर्दी आहे. काय करायचं ?’’ वसंतरावांनी डोक्याला हात लावला. वसंतरावांच्या लक्षात आलं आपल्या पुतण्या विनोद ठाण्याला राहतो. आज त्याची सुट्टी आहे. त्याला सांगूया गाडी घेऊन खारघरला जा आणि स्टेशनवरुन समीरला उचल. त्यांनी विनोदला फोन लावला. तो गाढ झोपला होता. तीनचार वेळा बेल वाजल्यानंतर तो जागा झाला. वसंतरावांनी त्याला खारघरला जाऊन समीरला गाडीत घालून कुर्ल्यापर्यंत सोडायला सांगितले. कुरकुरत तो उठला. तो पर्यंत वसंतरावांनी त्याच्या फोनवर समीरचा फोन पाठविला. आणि समीरला विनोद तुला घ्यायला येतोय तू तिथेच रहा असा मेसेज दिला. 
वसंतराव गाडीतून निघाले, वाटेत दादरला जाऊन गोडावूनपाशी धोंडू काय करतोय ते पहावे म्हणून त्यांनी गाडी गोडावूनपाशी नेली. त्यांनी घड्याळ्यात पाहिले साडेतीन वाजले होते. अजून प्रविणचा संपर्क नाही. त्याच्या बायकोचा फोन आपल्यापाशी नाही. त्याची बायको त्याच्याजवळ आहे की सोडून गेली हे पण आपल्याला माहिती नाही. दोन तासात प्रविणचा संर्पक झाला नाही तर काय करावे अशा विचारात असताना त्यांची गाडी गोडावूनपाशी आली. धोंडू आणि मंडळीचे ‘खरा जावई’चे सामान टेम्पोत भरणे सुरु होते. त्यांना पाहताच धोंडू नाटक बदलल्याने त्याचे कसे हाल झाले ते सांगू लागला आणि दोन माणसे आली नाहीत म्हणून चौघांवर काम पडले आणि आता चौघानांच स्टेज लावावे लागणार अशी त्याची कुरकूर सुरु झाली. वसंतरावांनी खिशातून पाचशेच्या दोन नोटा काढल्या आणि त्याच्या खिश्यात कोंबलया आणि लवकर संघात पोहचा असं सांगितलं. वसंतराव गाडी स्टार्ट करणार एवढ्यात धोंडूनं विचारलं - ‘‘प्रविण घावला काय ?’’
नाही रे, असे म्हणत वसंतराव एक सेकंद थांबले, 
‘‘मला आत्ता दुपारी माहिमच्या टोपाझ बारमध्ये शिरताना दिसला होता.’’
असे म्हणताच वसंतराव थबकले. ‘‘किती वाजता ?’’
‘‘साडेबारा वाजता’’
‘‘बरोबर कोण होत?’’
‘‘एक बाई व्हती’’
वसंतरावांनी ऑफिसमध्ये फोन करुन सुनिलला प्रविण टोपाझ बारमध्ये असल्याचे सांगितले. आणि त्याला जावून बघतो असे म्हणून ते टोपाझ बारच्या दिशेने निघाले. माहिम कोळीवाड्याजवळ येताच त्यांनी टोपाझ बारची चौकशी केली. तिसर्‍या गल्लीत टोकाला टोपाझ बार असल्याचे कळताच त्यांनी टोपाझ बार शोधून काढला. बारच्या बाहेर उभे असलेल्या गुरख्याला मोबाईलमधील प्रविणचा फोटो दाखवला आणि हा माणूस आतमध्ये आहे का पाहून ये असे म्हणताच तो गुरखा म्हणाला, ‘‘ये आदमी अंदर है, ये बहुत शराब पिता है और दंगामस्ती करता है, अंदर जाओ’’ असं म्हणताच वसंतराव आत गेले. त्या काळोखात त्यांना काही दिसेना. काऊंटरवर त्यांना एक माणूस दिसला. त्या माणसाला त्यांनी प्रविणचा फोटो दाखवला ‘‘ये आदमी अंदर है क्या?’’ म्हणून विचारलं. तो फोटो पाहताच बारचा मॅनेजर चिडून बोलू लागला. ‘‘सुबहसे पी रहा है, अभी उसको होश नहीं है, कितनी बार बोला, अरे कम पिओ, कम पिओ मगर सुनता नहीं, हमारा रेग्युलर कस्टमर है इसलिए चुप बैठा हूँ, नहीं तो कभीका बाहर फेंक देता.’’ 
मैं उसे ले के जाता हूँ - वसंतराव म्हणाले. 
‘‘अरे ऐसे वैâसे लेके जा सकते हो तुम ? इसके साथ एक औरत थी वो एक घंटा पहले निकल गयी, दोनोने बहोत बिल किया है, वो देना पडेगा, नहींतो उसको बाहर जाने नहीं देंगे’’
वसंतरावांनी विचारले - कितना बिल है ?
मॅनेजर वहीवरुन हिशेब करुन म्हणाला - ‘‘दो हजार सात सौ रुपया है, ये बिल पुरा करो बाद में उसको लेके जाओ’’
वसंतरावांनी चुपचाप स्कॅनरवरुन दोन हजार सातशे रुपये भरले आणि ते आणि मॅनेजर आत गेले. तिथे एका टेबलावर डोके टेकलेल्या प्रविणला उठविले. त्याला काही जाग येईना. शेवटी दोन वेटरनी त्याला उचलले आणि वसंतरावांच्या गाडीत नेऊन ठेवले. वसंतरावांच्या लक्षात आले. आत्ता याचे काय करावे ? याला गार पाण्याची आंघोळ घातल्याशिवाय याची दारु उतरायची नाही. एवढ्यात त्यांच्या लक्षात आले आपल्या गोडावूनच्या बाजूला लहानसे लॉज आहे. त्याठिकाणी आपण काहीवेळा विश्रांतीसाठी जातो. तिथली पोर आपल्या ओळखीची आहेत. तिथेच याला नेऊन भरपूर आंघोळ घालायला सांगूया आणि दिडतास झोपवून ठेवायला सांगूया. वसंतरावांनी आपली गाडी गोडावून जवळ घेतली आणि लॉजच्या पोर्‍यांना बाहेर बोलावले. त्या दोघांच्या हातात दोनशे दोनशे टेकवले आणि - ‘‘याला भरपूर आंघोळ घाला आणि झोपवून ठेवा. मी साडेपाचला माणूस पाठवतो त्याच्याबरोबर याला पाठवा’’ असं म्हणून वसंतराव गिरगावच्या दिशेला निघाले.
आज सकाळी सकाळी कोणाचे तोंड बघितलं कोण जाणे? एक काम निट होईल तर शप्पथ. आता सहाही कलाकार मिळाले होते. स्टेज लागणार होत पण मेकअपमन, कपडेपट सांभाळणारा, लाईट, म्युझिक ऑपरेटर शोधायचे होते. आता चार वाजत आले. अजून दोन तास आहेत नाटकाला दुपारपासून वणवण करुन थकले होते. एक बार बघुन त्यांनी गाडी थांबवली. आणि उभ्या उभ्या व्हिस्कीचा ड्राय पेग घश्याखाली रचवला. आता त्यांना थोडी तरतरी आली. साडेचार वाजले आणि वसंतराव साहित्य संघाच्या आवारात पोहोचले. मागच्या दाराने रंगमंचाकडे वळले तेव्हा त्यांना दिसले धोंडूची माणसे नाटकाची प्रॉपर्टी आत घेत होती. स्टेजवर सुनिल संघाच्या लाईटवाल्याकडून स्पॉट अ‍ॅडजस्ट करुन घेत होता. वसंतरावांना पाहताच सुनिल म्हणाला, ‘‘वर्दम मेकअप चा माणूस येतोय. त्याला सर्व फोटो पाठविले. त्या निलिमाला केस लावायचे आहेत ना?’’
‘‘होय बाबा, तिचा व्यवस्थित मेकअप झाला नाही तर थयथयाट करील. या बायकांचे नखरे सांभाळता सांभाळता मी लवकर म्हातारा होणार. आता हे शेवटचं नाटक, आता काय शेवटचे प्रयोग लागले ते करायचे आणि इगतपूरी गाठायची. जमिनीत द्राक्ष लागवड केली तरी उपाशी नाही मरायचा. पुरे झालं आता.’’
सुनिल गालातल्या गालात हसला, त्याला माहित होतं. मालकांनी आजपर्यंत कितीवेळा नाटकधंदा सोडण्याचा पण केला आणि सोडला. वसंतरावांनी सुनिलला विचारले, ‘‘कपडेवाला येतोय ना? नाहीतर आपले बाजीराव आणि मस्तानी स्टेजवर जायचे नाहीत.’’
तो येतोय, स्टेशनवर उतरला असेल, आल्याआल्या इस्त्री करायला घेईल.
‘‘आता सर्वांना फोन लाव. कोण कोण कुठं कुठं आलेत बघ.’’
सुनिलने फोन लावायला सुरुवात केली. निलिमा घरातून बाहेर पडून गाडीत बसत होती. संगीता आणि विद्या ओला पकडून भांडुपपर्यंत आल्या होत्या. समीर कुर्ल्याला येऊन ट्रेनमध्ये बसला होता. विश्वास आपल्या मोटरसायकलची किक मारत होता. आता प्रविणला जाग करुन गिरगावांत आणायला पाहिजे होतं. वसंतरावांनी त्या लॉजमधला पोरगा तुकारामला फोन लावला त्या प्रविणला उठवून त्याला कोरी कॉफी देऊन दहा मिनिटात टॅक्सीत बसवून तू स्वतः ये. तू इथ आलास की टॅक्सीच भाड आणि तुला मी एक हजार रुपये तयार ठेवलेत.’’ हे ऐकताच तुकाराम खुश होऊन प्रविणला उठवायला गेला. 
इकडे सहाच्या नाटकासाठी कुडाळदेशकर बांधव आणि भगिनी नटूनथटून, नवीन कपडे घालून, बायका फुलांची वेणी माळून आणि छोट्या मुलांना हाताशी धरुन आल्या होत्या. कित्येक पुरुष आणि स्त्रीया वर्षातून एकदा हे नाटक बघणार होत्या. त्यात या नाटकात सर्वाचा लाडका मनोहर याची देही याची डोळा दिसणार होता. पण बाहेर मोठ्ठा बोर्ड लागला होता. 
‘‘मनोहर अचानक आजारी पडल्याने जाऊबाई नाटका ऐवजी खरा जावई हे नाटक होईल.’’
लोक कुजबुजू लागले. पण एव्हाना फेसबुक व्हॉटअपवर नट मनोहर याला बॉम्बे हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट केल्याची बातमी पसरली होती. त्यामुळे ती बातमी लोक एकमेकांना दाखवत होते. आणि आता सिनेतारका निलिमा ला याची देही याची डोळा पाहणार याची मनाशी तयार करत होते. 
गिरगावात राहणारा दुसर्‍या कंपनीचा लाईटवाला हजर झाला. पुस्तकातील खुणावरुन तो आज लाईट करील अशी आत त्याने जबाबदारी घेतली. एव्हाना कपडेपट सांभाळणारा हजर झाला आणि तो कपड्यांना इस्त्री मारु लागला. वर्दम मेकअप चा माणूस पोहचला आणि त्याने मेकअप रुममध्ये मेकअपचे रंग उघडून ठेवले. तो पर्यंत निलिमा पोहोचली आणि मेकअपला बसली. पाठोपाठ रेल्वेने निघालेला समीर आला. मोटरसायकलवरुन निघालेला विश्वासपण हजर झाला. दोन मिनिटात ओलाने संगीता आणि विद्या आल्या. पाच कलाकार हजर. फक्त प्रविण आला नव्हता. वसंतरावांनी तुकारामला फोन लावला. तुकाराम प्रविणला घेऊन बॉम्बे सेंट्रलपर्यंत पोहचला होता. म्हणजे आणखी पंधरा मिनिटात नाटकातील सर्व कलाकार हजर होणार होते. मेकअपमन, कपडेपट सांभाळणारा हजर होता. आजच्या दिवशी सुनिल म्युझिक वाजवेल म्हणा, असे म्हणत वसंतरावांनी खिश्यातून सिगरेट काढली आणि मोठ्ठे चार झुरके घेतले. 
कुडाळदेशकर समाजाचे नेते, कार्यकर्ते वसंतरावांना भेटायला आले तेव्हा मनोहर आजारी पडल्याने तुमच्यासाठी धडपड करुन खरा जावई नाटक उभे केले अशी प्रौढी मारु लागले. एवढ्यात प्रविणला घेऊन तुकाराम आला. प्रविण पोहचला तशी स्टेजवर पहिली घंटा वाजली. वसंतराव मेकअप रुममध्ये गेले तेव्हा निलिमा मेकअप करुन कपडे बदलायला गेली होती. संगीता मेकअपला बसली होती. बाजूलाच विद्या कुणाशीतरी मोबाईलवर बोलत होती. समीर आणि विश्वास इस्त्रीवाल्याकडे जाऊन आपले कपडे घेत होते. तुकाराम सोबत आलेल्या प्रविणच्या चेहर्‍यावर दुपारच्या दारुचा हँगओव्हर दिसत होता. पण स्टेजवर गेल्यानंतर तो नेहमीसारखा चौकार षटकार मारणार हे वसंतरावांना माहित होते. वसंतराव स्टेजवर आले. धोंडूच्या माणसांनी नेपथ्य व्यवस्थित मांडले होते. सुनिलने स्पॉट जोडले होते आणि डिजिटल डिमरवर ते अ‍ॅडजस्ट करुन तो लाईटवाल्याला दाखवत होता. सर्व तयारी होत आली तशी वसंतरावांनी साहित्य संघाच्या डोअर किपरला सूचना केली तसा प्रेक्षकांचा लोंढा आत घुसला. एका कोपर्‍यात उभे राहून वसंतराव या लोकांच्या लोंढ्याला पाहत होते. वसंतराव पुन्हा स्टेजवर आले. सर्व कलाकार तयार आहेत हे पाहून तिसरी घंटा देण्यात आली. 
पात्र परिचयाचा कागद हातात घेतलेला विश्वास माईक जवळ येऊन पात्र परिचय करु लागला. 
‘‘रंगदेवता आणि नाट्य रसिकांना अभिवादन करुन.....’’
पडदा उघडला, नाटक सुरु झाले, दोन तासापूर्वी दारु पिऊन टाईट झालेला प्रविण रंगमंचावर येऊन जोरदार फटकेबाजी करीत होता आणि ‘‘तुमचं नाटक सोडलं मी’’ म्हणून ठणकवणारी विद्या त्याच्या चेष्टेला जोरदार उत्तरं देत स्टेज गाजवत होती. वसंतरावांनी मनात म्हटले - यालाच नाटक म्हणतात राव, इथे ज्याच्या खिशात पैसा नाही तो करोडपतीची भूमिका करतो आणि कारमधून आलेला कलाकार भिकार्‍याची भूमिका करतो. 
नाटक रंगत होते. त्या नाट्यगृहामधील एक हजार प्रेक्षक रोजच्या कटकटी विसरुन नाटकाच्या कथानकात तल्लीन झाले होते. हसत होते, रडत होते, टाळ्या वाजवत होते. या तिन तासानंतर त्यांना पुन्हा रोजच्या चिंता, कटकटींना सामोरं जायचं होतं.
इकडे वसंतराव नाट्यगृहाच्या बाहेर आले तेव्हा एक नवीन लेखक त्याच्या नवीन नाटकाची गोष्ट वसंतरावांना सांगत होता.
‘‘हा नाटक धंदा कायमचा सोडतो’’ अशी प्रतिज्ञा करणारे वसंतराव ‘‘या नाटका साठी कुठले कलाकार लागतील आणि बजेट किती असेल याचा मनातल्या मनात विचार करत होते.’’

- प्रदिप केळूसकर
मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...