लहानपणी शाळेत शिकवले जायचे की "साधी राहणी... उच्च विचारसरणी".....तेव्हा त्या काळात ते बरोबर असेलही पण आता हे तितकस लागू पडत नाही. हे आठवलं कशावरून ते आधी सांगतो.
साताऱ्याजवळच्या एका गावात माझं व्याख्यान होतं. गेल्यावर स्वागताला आयोजक हजर होतेच. मात्र त्यातल्या एकदोन जणांच्या नजरा जरा वेगळ्याच वाटल्या. (लोकांचे बारकाईने निरीक्षण करण्याची सवय आधीपासूनची) जाऊ द्या म्हटलं.... नंतर पाहू....कार्यक्रम उत्तम झाला. आणि सगळेजण जवळच्या एका माननीयाच्या घरी जेवायला गेलो. तिथं मात्र मंडळी एकदम खुलली. छान गप्पा सुरु असताना, त्या वेगळ्या नजरावाल्याना मी थेट विचारलं की, "मला पाहून तुम्हाला काहीतरी वेगळं वाटल्याचे जाणवले. मोकळेपणी सांगा...काय वाटलं? काय झालं?"
त्यावर बिचकत बिचकत ते म्हणाले, "तुम्ही सामाजिक क्षेत्रात काम करता हे माहित आहे. पण तुमच्या ड्रेसवरून तसे वाटले नाही. एकदम वेगळ्याच लूकमध्ये तुम्हाला पाहिले. सामाजिक क्षेत्रातील लोकांचे कपडे टिपिकल असतात तसे तुमचे नाहीत. त्यामुळे थोडं वेगळं वाटलं."
मला क्षणार्धात उलगडा झाला.
मी त्यांना सांगितलं, "अहो, मी त्या एकाच फिल्डमध्ये आहे असं नाही. मॉडेलिंग, ब्रँड अँबेसेडर, टीव्ही, स्टेज शो अशा इतरही फिल्डमध्ये आहे. आणि तिथं हि रिक्वार्यमेंट असते. आणि शिस्तीत पण चांगले कपडे घालण्याची सवय शालेय जीवनातच एनसीसीमुळे लागली. आणि विशेष म्हणजे मला स्वतःला छान राहायला आवडत."
आणि त्यानंतर त्यांना जे सांगितलं तेच इथं सर्वाना सांगावे म्हणून हा पोस्ट प्रपंच !
तर मंडळी, विना इस्त्रीचे खादीचे कपडे आणि खांद्याला शबनम बॅग असली म्हणजेच सामाजिक कार्यकर्ता होत नाही आणि ब्रँडेड लेटेस्ट घातले म्हणजे तो काही हाय फाय होत नाही. म्हणून "डोन्ट जज अ बुक... बाय इट'स कव्हर" असं जे म्हटलं जात, तेच मुळात अनेकदा फसवं ठरत. अजून एक म्हणजे सो कॉल्ड जो "साधेपणा" लोकांना अपेक्षित असतो न तो साधेपणा खरेतर मोठ्या लोकांनाच शोभून दिसतो. तुमच्या माझ्यासारख्याना नाही. बिल गेट्स, झुकेरबर्ग, अंबानी या मंडळींचे काही फोटो व्हायरल झालेले तुम्हीही पाहिले असतील. आणि मनात म्हणत असाल की, इतकी अफाट श्रीमंती असून किती साधे राहतात. कसलं भारी न? पण मंडळी तुम्हाला ते साधेपणात फिरतानाचे लोक भारी का वाटतात कारण तुम्हाला माहित आहे की त्यांच्याकडे अब्जावधी रुपये आहेत. तुम्ही - मी - साध्या कपड्यात फिरलो तर लोक आपल्याला भिकारीच समजणार. तोंडावर सुद्धा जवळचे काही लोक तसे बोलायला कमी करणार नाहीत. एम एफ हुसेन अनवाणी पायाने सगळीकडे जायचे पण फिरायचे ते मर्सिडीजमधूनच. म्हणून त्यांच्या अनवाणी हिंडण्याचे कौतुक होते. आपल्याकडे सामान्य लोकांमध्ये अनवाणी फिरणाऱ्याचे आपण कौतुक करत नाही. मी जेव्हा सायकलवर कॉलेजला जायचो तेव्हा माझे सासरे एकदा मला म्हणाले होते, "सायकलवर जाणाऱ्यांचे कौतुक तेव्हाच होते जेव्हा त्याने घरी कार ठेवून तो सायकलवर निघालेला असेल. ती जिद्द ठेव" किती सुंदर उदाहरण न !
माझ्या माहितीत एक समाजसेविका आहेत. कायम शुभ्र पांढरी कॉटनची एक बारीक पट्टी असलेल्या किनारीची साडी परिधान करायच्या ! आंधी सिनेमातील सुचित्रा सेन सारख्या !! भाषणात पण त्या महिलांना सांगायच्या की, "हि साडी फक्त दीडशे रुपयांची आहे. कशाला भारी साड्या लागतात तुम्हाला, तो पैसा वाचवून कुटुंबाला हातभार लावा" लोकांना भारी वाटायचं ते. मात्र नंतर मला कळलं की त्याच्या दीडशे रुपयाच्या ड्रायक्लिनींगचा खर्चच महिन्याला दोन अडीच हजार आहे. असला हा साधेपणा !!
त्यामुळे "साधी राहणी" हा विचार थोडा बाजूला ठेवून तुमच्या प्रोफेशनला जे शोभेल आणि तुमची ऐपत असेल त्याप्रमाणे चांगलेच कपडे घाला. चांगले शूज वापरा. ऍडव्हर्टायजिंग आणि मार्केटिंगच्या फिल्डमध्ये आहे म्हणून सांगतो, आजकाल प्रेझेन्टेशनला जास्त महत्व आहे. ज्याचे प्रेझेन्टेशन चांगले त्यालाच सगळे अटेन्शन देतात. ब्रँडेड ऍक्सेसरीजमुळे तुम्हीही हळूहळू इतरांपेक्षा हटके दिसू लागता ज्याचा फायदा तुम्हालाच करियरला होतो. ज्यासाठी तुम्ही धडपडत असता.
डॉ. डीडी क्लास : अजून एक उदाहरण आठवलं. तुम्ही नीट पाहिले असेल तर कोणत्याही बिल्डरचे ऑफिस साधे कधीच नसते. उलट जास्तीत जास्त आलिशान असते. का ? त्याने बांधलेले फ्लॅट आलिशान असतील की ! मग ऑफिस कशाला आलिशान ठेवलं असेल ? तर त्यामागे हेच सूत्र आहे. प्रेझेन्टेशनचा जमाना आहे. तुम्ही कसे आहात हे कळण्यासाठी आधी तुमची कसे राहता, कसे दिसता याची पारख लोक करतात. आणि मग मैत्री झाल्यावर त्याला तुमची बुद्धी, तुमचं कौशल्य दिसत. आधी नाही दिसत.
गायकाला कधी बर्मुडा टीशर्टवर स्टेजवर बसून गाताना पाहिलंय का? नाही न? व्यवस्थित वेशात ते असतात. तिथेही हेच आहे. आधी लोक तुम्हाला पाहाणार आहेत आणि नंतर गाणे ऐकणार आहेत. म्हणजे तोच मुद्दा येतो... प्रेझेन्टेशन चा ! इतका तो महत्वाचा असतो. आणि एकदा का तुम्हाला हे जमलं की हळूहळू तुम्ही ब्रँड होण्याकडे वाटचाल करू लागता. आणि मग एखाद्या कार्यक्रमाला गेला तर तिथली गर्दी बाजूला सरकत आपोआप तुम्हाला वाट करून देते. त्यामुळे वाट देणारे व्हायचं की वाट द्यायला लावणारे ? हे तुम्ही ठरवा. धन्यवाद
ⓒ डॉ. धनंजय देशपांडे (dd)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा