समीर भावोजींचा काल कॉल आल्यापासून निर्मला अस्वस्थच होती. त्या टेन्शनमध्ये सकाळी वासरू सोडायचं राहून गेलं. गोठ्यात पावसानं झालेली चिगचिग खराट्यानं आज साफ करायची राहून गेली. म्हंजे लक्षात आल्यावर केली ही कामं, पण त्यात उरक होता. म्हंजे काल समीरचा फोन आला तेव्हा तिचा नवरा, अर्थात समीरचा मोठा भाऊ संपतनंच घेतला. 'समीर आणि त्याची बायको आज यायचं म्हणताय' हे कळल्यावर संपत खूप खूष झाला होता. नऊ वर्ष झाली. मुंबईला गेला तो गेलाच. तिकडेच लग्न केलं. रजीस्टर. बायको ब्राम्हण आहे. सुधा. म्हंजे मध्ये दोन वेळा आले होते दोघे. लग्न झाल्यावर काही दिवसांनी, दोन तासासाठी. एक तास जेवण आणि उरलेला एक तास समीर तिला शेती आणि जुनं घर दाखवत फिरला.
निर्मलाच्या पाया पडली नाही म्हणायला. पण निर्मलानं हातात दिलेले शंभर रूपये घेऊन त्यात स्वत:चे पाचशे रूपये टाकत निर्मलाच्याच मुलाच्या हातात दिले तिनं. तिथंही निर्मलाचा खटका पडला. 'दीडशहाणी बायको केली समीरभाऊंनी. वर्षभर टिकली तरी खूप झालं. शहाणी खुर्चीत बसली हातात ताट घेऊन जेवायला. इथं आम्ही आयुष्यभर माती उपसायची. आणि हे मोटारीतून फिरणार. मजा मारणार. पैसे उडवणार.'
आई गेली तेव्हा दुसऱ्यांदा आले होते. दोघंही. ती दुसऱ्या दिवशी निघून गेली. तो तिसऱ्या दिवशी गेला. यावरूनही निर्मला संपतजवळ कटकट करे. पुढे तसा फार संपर्क राहिला नव्हताच. पण काल अचानक समीरचा फोन आला. "दादा, येतोय तिकडे दोनचार दिवस. सहज. शेतीही पाहणं होईल. भेटणं होईल." एवढंच तो बोलला.
संपतनं आनंदानं निर्मलाला सांगितलं. तिनं विचारलंही, "काय? सहज येताय ना?"
तो म्हणाला, "सहज तर काय ! त्याचंही घर आहे हे. हवं तेव्हा येवो बिचारा. बघ, एवढा मोठा झाला तो. मुंबईत राहतो. तरी शेतीची ओढ सुटत नाही. आणि सुधा आता अशीतशी नाही राहिली. आपल्या बहाद्दरानं कोंबडी, मटण दणक्यात खाऊ घालून पवित्र करून घेतलं म्हणे ! चल, निर्मला, ती बाजूच्या खोलीतलं सामान नीट लावून साफ करू !"
निर्मलाला फार उत्साह वाटेना. पण तरीही ती कामाला लागली. खोली साफ करताना एकदा म्हणालीही संपतला ती,
‘‘समीरभाऊ शेतीतला त्यांचा हिस्सा मागायला येताहेत. माझं मन सांगतंय मला.’’
‘‘चल, कायपण डोकं चालतं तुझं. अन् मागितलंच, तर काय चुकलं? आपलं पाच ठेवून त्याचं पाच देवून टाकू.’’
‘‘त्या सुधीनं फितवलं आसल. पण सांगून ठिवते, या सात एकरातले खालचे दोन तुकडे अन् तिकडची मुरमाड तीन एकर हेच द्या त्यांना. आयत्या पीठावर..’’
‘‘निर्मले, येडापणा करू नको. आजतागायत त्यानं काही मागितलं नाही माझ्याकडे. धाकटा भाऊ पोरासारखा असतो. नाव कमावतोय तो आणि सुधा. त्यानं जे मागितलं ते देऊन टाकायचंय मला.’’
‘द्या द्या. पण मी त्या दोघांना नीट जिरू द्यायची नाय. घाम गाळलाय नवऱ्यानं माझ्या, तेव्हा जमीन तयार झालीये. आता तिकडे बुडाखाली अंधार पडला आसल. म्हणून इकडे आवराआवर करून येताय. मरणाला तुम्ही, तोरणाला तुम्ही. नातंगोतं आपण सांभाळायचं. सुतकात भादरायला आपली डोकी रस्त्यावरच पडलेली. रातपहाट एक करून संसार उभा केलाय तुमचा. राबराब राबलीये. देताना माझा इचार करा.’’
निर्मला रडायला लागल्यावर संपत काहीच बोलला नाही. बाहेर येऊन बांधावर उभा राह्यला. मागे आपल्या वडीलांनी मळ्यात बांधलेल्या स्वत:च्या भव्य कौलारू घराकडे नजर टाकली. वडीलांनी लावलेली नारळाची सात झाडं खूप उंच होऊन आभाळात डोलत होती. झाडाच्या बुंध्याशी असलेला जुना परिचय कायम होता. पण शेंडा खूप वर निघून गेल्यानं वर पाहिल्यावर साती झाडं संपतला अनोळखी वाटायची. प्रशस्त अंगणात हातात खराटा आणि पाटी घेऊन फणकाऱ्यात साफसफाई करीत येरझाऱ्या घालणाऱ्या आपल्या बायकोकडे संपत बघत होता. पहाटेच्या पावसानंतरही आभाळ भरलेलंच असल्यानं घरावरची कौलं काळसर दिसत होती. जमिनीतून उडून कौलापर्यंत पोहोचलेल्या पंख फुटलेल्या नव्या किटकांना चोचीत पकडताना साळुंक्यांनी उच्छाद मांडला होता. गोठ्याच्या बाजूच्या शेडमध्ये जुनी हिरो होंडा मोडकळीस येऊन पडली होती. आता जागल्याच ती चालवू शकतो. वडीलांनी नवी घेतली तेव्हा समीरनंच आपल्याला शिकवली चालवायला. गावात क्रिकेटवरून होणाऱ्या त्याच्या मारामाऱ्या सोडवायला आपल्यालाच जावं लागे. पहिला आला होता दहावीत. तेव्हा जबरा भाषण ठोकलं होतं ग्रामपंचायतीच्या ओट्यावर त्यानं.
समीर आणि सुधा आले. एवढ्या लांबून हाच ड्रायव्हिंग करत आला. गाडीतून बॅगा काढल्या. समीरला चष्मा लागलेला. सुधा छान बारीक. चवळी. दोघंही तोंड भरून हसले. पटकन संपत आणि निर्मलाच्या पायाशी झुकले. निर्मलानं नाराजी बेमालूम लपवत सुधाला जवळ घेतलं. सुधाचे डोळे भरून आले. संपतनं समीरला पाठीवर थोपटलं. खूप पटकन संपले तीन दिवस. रोज रात्र रात्र गप्पा. निर्मलाकडून सुधानं हट्टानं कोंबडी करायचं शिकून घेतलं. सुधाचा गळाही गोड. केवढी गाणी गायली तिनं. तरीही तीनही दिवस ‘आता विषय निघेल, तेव्हा विषय निघेल’ या धास्तीत निर्मलानं घालवले. कॉलेजला जाणारा तिचा मुलगा आणि मुलगी सुधाकाकूमध्ये खूपच रमले होते. त्यांना तिनं घड्याळं, पुस्तकं आणली होती. निर्मलाला साडीही आणलेली. इरकल की काय ते ! निर्मलानं नीट पाहिलीही नाही. उद्या पहाटे उठून समीर आणि सुधा निघणार. आज रात्री नक्कीच विषय निघणार. नाही काढला तर तुम्ही काढा. सोक्षमोक्ष लावून टाकू, असं निर्मलानं संपतला बजावलं होतं. रात्री ११ ला गप्पा संपल्यावर निर्मलानं खुणावल्यावर संपतच चाचरत समीरला म्हणाला, "ते शेतीचं काय म्हणत होतास?"
त्यावर मग सुधाच म्हणाली, "भावोजी, आम्हाला एकच मुलगा. तोही विदेशात जातोय शिकायला. तीन फ्लॅट होते. एक आताच विकला. पैशांसाठी नाही. आमच्या परिस्थितीमुळे आमचा मुलगा सहज शिकला. विदेशात चालला. समीरनं फ्लॅटच्या पैशातून दहा दहा लाख तुमच्या या दोन्ही मुलांसाठी द्यायचं ठरवलंय. आणि वर पाच लाख शेतीचं कर्ज फेडायला ! समीर म्हणाला की तुम्ही नाहीच म्हणाल. पण शेतात तुम्ही कष्ट करून पिकवलेलं उद्या तुम्ही मला वानोळा म्हणून पिशवीत भरून द्यालच ना हक्कानं? मग आमच्याकडून हाही वानोळा समजा.
समीर तुम्हा दोघांना खूप मिस करतो. आईवडीलांच्या जागी बघतो. आणि हो, परतफेड कशी करायची तेही सांगते ! म्हातारपणी आम्हा दोघांना इथंच यायचंय शांत जगायला. ही एवढी खोली आणि तुम्ही दोघं...बस् एवढच हवंय...’’ सुधा खूपवेळ बोलत राहिली.
सकाळी समीर-सुधा निघाले तेव्हा निर्मलाचे रात्रभर रडून सुजलेले डोळे पाहून सुधानं निर्मलाला मोठी असतानाही जवळ घेऊन मायेनं थोपटलं आणि निर्मलाचा पुन्हा बांध फुटला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा