लोकलमध्ये जागा मिळाली नाही कशीबशी लटकत दाराच्या तोंडाशी ती उभी होती. सकाळच्या धावपळीत काहीही खाणं झालं नव्हतं. त्यामुळे पोटात आधीच कावळ्यांनी धुडगूस घातला होता. ऑफिसमध्ये फायलींनी अशी रांग लावली की पोटातले कावळेच काय, जिभवरच्या तहानेचे पण भान हरवले होते.
मैत्रिणी "डबा खायला ये लवकर. नाहीतर बस एकटी." असं धमकावून गेल्या म्हणून घाईत आपण फाईल बंद केली, आणि हात धावून डबा उघडणार. तितक्यात चिंगीच्या शाळेतून आलेला फोन. चिंगी पडली उंचावरून. भूक, तहान सगळं बाजूला ठेवून आता आपण असं लटकत निघालोय खरं माहीत नाही तोपर्यंत आपल्या लेकराच काय होणार. ह्या सगळ्या विचारात फोन वाजला. जया वन्सं. ह्यांना काय अश्यावेळी आठवण आली असेल? म्हणत तिने कसाबसा फोन घेतला. "हम्म बोलाना ताई, काय म्हणताय?"
तिकडून आवाज, "तू घाबरू नकोस. चिंगीजवळ मी पोहचले. आता ती मजेत आहे. तू गडबडीत असशील तर थोडं उशिरा निघ, कारण चिंगी आता ओके आहे. माझं ऑफिस जवळ असल्याने त्या शाळेत शिक्षिका असलेल्या मैत्रिणीने कळवलं मला लगेच."
सगळं बोलण ऐकून ही म्हणाली, "ताई निघालेच आहे मी. तुम्ही आता चिंगीसोबत कुठे आहे ते सांगा.
"पलीकडून आवाज आला, "घरी.."
हिने ओके. आलेच वीस मिनिटात म्हणत फोन ठेवला..
धडधड करत लोकल स्टेशनात शिरली आणि थांबली, तसं गर्दीचा समुद्र आतही शिरत होता आणि बाहेरही. ती गर्दीमुळे तरंगतच स्टेशनवर उतरली. भराभरा स्टेशनबाहेर पडली. पाचमीनटाचं अंतर तिच्या पावलांनी तीन मिनिटात कापलं. घराच्या पायऱ्या ती भराभर चढत वर गेली. बेल दाबली, दार उघडेपर्यंत तिला दम निघेना. चिंगे म्हणत घरात शिरताच ओरडली. चिंगीच्या कपाळी पट्टी बांधली होती. बाकी चिंगी एकदम ठिक होती आणि आत्याच्या मायेने स्थिर देखील झाली होती. तिने उलट आईलाच समजावलं. आय एम ओके मम्मा. हिने तिचे भराभर पापे घेतले. एकदम जया ताई गरमागरम थालपीठाची प्लेट घेऊन आल्या. आधी हातपाय धुवून घे, आणि फराळाला बस. नक्कीच तू काही खाल्लं नसशील. म्हणून खास तुझ्या आवडीचं तुझ्या सासूबाई करायच्या तसं थालपीठ केलंय चल,..
ती रडता रडता हसत होती. हातपाय धुताना तिला तो थालपीठचा वास तीव्र भुकेची जाणीव करून देऊ लागला. तिने पोटभर फराळ केला. जया ताईंनी अगदी गरमगरम थालपीठ तिला वाढले. मध्येच ती म्हणाली,
"ताई तुमचं ऑफिस..?"
जया ताई हसून म्हणाल्या, "खरंतर चिंगीच्या मॅडम मला म्हणाल्या होत्या, "तुम्ही जा आम्ही तिला शाळेत ठेवू आमच्यापैकी कोणी थांबेल. पण तिच्या पेक्षा मला तुझीच चिंता होती. हिची पडण्याची आणि तुझी जेवणाची वेळ जवळपास सारखी. म्हंटल नक्की तशीच येशील धावत पळत आणि मग दिवसभर राहशील उपाशी. माझ्या डिलिव्हरीला राहिली होती तशी. तेंव्हाही असेच नवरात्रीचे उपवास होते तुझे. आणि माझ्या सेवेत तू देवी बनून आली होतीस. म्हंटल चला. चिंगी जरी ओके असली, तरी आई नक्कीच धडपडत घाबरत येणार कारण आधीच माझा भाऊ परदेशात गेलेला तेंव्हा तुझी धावपळ तर अटळ ना. म्हणून मी राजाच घेतली आज तुमच्यासाठी. संध्याकाळची आरती करूनच जाईल."
संध्याकाळी धूप दिपाने गाभारा उजळून गेला. आई अंबाबाई प्रसन्न चेहऱ्याने विराजमान होती. चिंगी आपली जखम कधीच विसरून गेली होती. नणंद भावजयी मात्र आनंदाने देवीची आरती म्हणत होत्या.
"चतुर्थीचे दिवशी विश्व व्यापक जननी हो."
हिला वाटलं, खरीतर आहे ही ओळ. वेगवेगळी रूप घेऊन हिने आपलं आयुष्य व्यापून टाकलंय. आज आपल्या मानसिक आधार देण्यासाठी जणु काही ताईंच्या रूपाने देवीच आली आहे असं तिच्या मनात आलं आणि देवीने फुल पडून कौल दिला. रात्री नणंदबाई गेल्या आणि हिने स्टेट्सवर चारोळी लिहिलीच.
"स्त्री रूपे ही अवतीभवती
स्त्रीशक्तीला जागवण्यासाठी,
नाते कुठले असो तरीही
स्त्रीचीच स्त्रीला आधारकाठी."
©स्वप्ना मुळे (मायी) औरंगाबाद.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा