सोमवार, १६ डिसेंबर, २०२४

1612. अनिता

 आॕफीस संपवून निघालो तो अभयचा फोन
"बोल अभय."
"कुठे आहेस?"
"घरीच निघालो आता."
"शांतपणे ऐक. अनीताला तुला भेटायचे आहे."
"मला? का पण?"
"मला माहित नाही."
"पण अभय,तुला माहितच आहे की.."
"प्लीज, तू तटकतोडपणे नाही म्हणशील म्हणून तिने मला सांगायला सांगितले "
"पण अभय..."
"एकदा भेटायला काय हरकत आहे? तिला कदाचित तुझ्याकडून काही सल्ला हवा असेल."
" पण आम्ही भेटायचे नाही हे ठरवलेले होते अभय."
" सुजय, त्या गोष्टीला दोन वर्षे झालीत.प्लीज...माझ्यासाठी तरी."
"ओके."
"उद्या संध्याकाळी CCD त. तुझे आॕफीस सुटल्यावर. तू तिला कॉल कर फ्री झालास की."
"नंबर नाहीये तिचा. डिलीट केला."
"ठीक. मी SMS करतो आणि डोके शांत ठेव. ओके"
"ओके"
  फोन ठेवताच मी अस्वस्थ झालो. अनीताला मला का भेटायचयं आता?.एकेकाळी आम्ही एकमेकांवर वेड्यासारखे प्रेम केले होते.कॉलेजच्या शेवटच्या दोन वर्षात. पण हळूहळू आम्हाला जाणीव झाली की आमच्यात बरेच मतभेद आहेत.अनीताचे माझ्यावर प्रेम होते पण तिला माझ्या पर्सनल लाईफबद्दल खडानखडा माहित हवी असायची. मी खातो काय पीतो काय,कुठे जातो कुणाशी बोलतो. एका विशिष्ट मर्यादेपर्यंत ठीक होते.पण प्रत्येक गोष्टीची माहिती कशी देणार? मी कोणत्याही मुलीशी कॕज्युअली बोललो तरी तिला तिच्याशी बोललेले वाक्य न वाक्य तिला सांगावे अशी अपेक्षा असायची.तो वैताग होता.लग्नाअगोदरच एवढे बंधन असतील तर लग्नानंतर काय होईल हा विचार मला अस्वस्थ करायचा.मला नॉनव्हेज भयंकर आवडते.त्याचा तिला वासही सहन व्हायचा नाही.मी म्हणायचो तू व्हेज खा मी नॉनव्हेज.तेही तिला आवडायचे नाही. मी नॉनव्हेज सोडून द्यावे म्हणून ती दबाव टाकायची. मला ते शक्य नव्हते. अर्थात सर्व चूक तिचीच होती असेही नाही.माझ्याही काही चूका होत्याच.मी शिघ्रकोपी होतो.थोड्याही कारणाने संतापायचो आणि तिला अद्वातव्दा बोलायचो अगदी तिच्या डोळ्यात पाणी येईपर्यंत. कोणत्याही प्रेयसीची अपेक्षा असायची की प्रियकराने आपल्या सोबत दिवसातला काही वेळ घालवावा. मी तिला अजिबात वेळ द्यायचो नाही.मला जास्त अभ्यास करायचा असायचा.चांगले मार्क्स मिळवून चांगली नौकरी मिळावी अशी मला अपेक्षा होती.कदाचित घरची बेतासबात परिस्थितीही त्याला कारणीभूत असेल.आणखीही काही अपेक्षा होता तिच्या, अगदी महागड्या गिफ्ट नको पण एखादी छोटीशी सेंटची बाटली अगदीच नाही तर एखादे टप्पोरे गुलाबाचे फुल तरी तिला द्यावे. मी त्याबाबतीत अगदीच रुक्ष होतो. प्रेमाच्या गप्पांऐवजी ब-याचदा वादविवादातच आमची भेट संपायची.शेवटी आम्ही दोघांनी हे थांबवायचे ठरवले.ज्या रिलेशनशीपमध्ये कोणालाच सुख..आनंद मिळत नाही ती चालवण्यात अर्थही नव्हता. सुतोवाच मीच केले,तिलाही ते पटले.
    शेवटच्या भेटीत मी तसाच कोरडा होतो, तिने मात्र अश्रूंना वाट करून दिली.नंतर भेटायचेही नाही आणि बोलायचेही नाही हे आम्ही ठरवले.नकोच ते एकमेकात गुंतणे. 
  माझे अपेक्षे प्रमाणे कँपस् सिलेक्शन झाले.मी नौकरीवर रूजूही झालो.दरम्यानच्या काळात तिने एरेन्ज मॕरेज केले.मी अर्थातच लग्नाला गेलो नाही. तिची आठवण कुठेतरी होतीही.आपण जास्तच कठोर वागलो तिच्याशी अशीही एक टोचणी होती मनाला.पण ती पुढे पुसट होत गेली. आणि आता दोन वर्षानंतर ती पुन्हा भेटायला येत होती.कशाला? माझे डोके चालेनासे झाले. मी एका छोट्याश्या हॉटेलला थांबलो.चहा घेतला.वाटले आपण उगाचच विचार करतो आहे.कदाचित तिला सहजच भेटायचे असेल.नव-यालाही आणेल बरोबर. तरीही कुठेतरी शंकेची पाल चुकचुकत होतीच.जाऊ द्या ,उद्याचे उद्या बघू.घरी आलो.रात्री तशी शांत झोप लागली.
        दुसऱ्या दिवशी आॕफीसमध्ये अस्वस्थ होतो.तरीही काम करत राहिलो.कामात मन गुंतवण्याचा प्रयत्न करत राहिलो.एकदाचे काम संपले.वॉशरूममध्ये जाऊन फ्रेश झालो.बॕगमधून काढून थोडासा सेन्ट मारला.( हे मी का करतोय असेही वाटून गेले).बाहेर आल्यावर अनीताला कॉल केला.
"हो.मी वाटत पहाते आहे तुझी." ती म्हणाली.तिच्या आवाजात आनंद होता असे उगीचच वाटून गेले.सीसीडीच्या अगोदरच्या चौकातून एका फुलवाल्याकडून सुंदर गुलाब घेतला. तिचा नवरा सोबत असला तर बाहेर काढायचाच नाही.
      सीसीडीला पोहचलो.शांतपणे जाऊ असे वाटले पण अस्वस्थ होतो.अनामिक हुरहुर होती जीवाला, कोपऱ्यातल्या टेबलावर अनीता बसलेली होती. तिने हात हलवून मला मी इथे असल्याचे सांगितले.एकटीच होती.जवळ गेलो आणि धक्काच बसला. पुर्वीची अनीताचा मागमुस नव्हता या अनीतात.थकलेला,ओढलेला चेहरा.डोळ्यातले उदास भाव.वजनही बरेच कमी झाले होते.क्षणभर वाटले तिला मीठीत घ्यावे आणि विचारावे अशी अवस्था का झाली तुझी? पण सावरलो.ती आता परकी होती माझ्यासाठी.कुणाचीतरी पत्नी होती.शक्य तेवढे शांत भाव चेहऱ्यावर दाखवत तिच्याकडे गेलो आणि हातातला गुलाब तिला दिला.
"थँक्यू सो मच" फिकटसे हासत ती म्हणाली. ते हास्य ओढूनताणून आणलेले होते.
"कशी आहेस.?"
"तुझ्यासमोरच आहेस."
काही मिनीटे शांततेत गेली. काहीतरी बोलायला पाहिजे म्हणून मी म्हणालो
"तुझ्यासाठी कोल्डकाॕफी मागवतो"
"थैंक्स.माझी आवड लक्षात ठेवल्याबद्दल.तू काय घेतो."
"मीही तेच घेतो."
"पण तुला तर कोल्डकॉफी आवडत नाही ना?"
"एखाद्या वेळेस घेतो मी पण." मी थाप मारली. पण मी खोटे बोलतोय हे तिच्या लक्षात आले असावे.
"कशाला आवडत नसतांना घेतोय?"
"असू दे. काय म्हणतोय तुझा नवरा?" मी विषय बदलाला.
" मी घटस्फोट घेतला आहे." ती थरथरत्या आवाजात म्हणाली.
"काय?" मी ओरडलो. काही ग्राहक माझ्याकडे पाहू लागले.मी वरमलो.हळू आवाजात म्हणालो " एकदम घटस्फोट ?"
"हो,"
"एवढे काय  झाले?"
" फार चंचल स्वभाव रे यांचा.कोणाशीही पटायचे नाही.किरकोळ गोष्टीवरूनही जॉब सोडायचे. वर्षाच्या आत तीन नौक-या बदलल्या."
"पण नौक-या तर मिळत होत्या ना? झाला असता कुठेतरी स्टेबल."
"नाही रे. गंभीरपणे काही करायचेच.नाही.त्यात कोरोनामुळे अनेक ठिकाणी कामगारकपात झाली.चांगली नौकरी मिळेना.क्वालीफिकेशन चांगले असल्याने नौक-या मिळतही होत्या पण पगार कमी. हा माणूस लठ्ठ पगारासाठी हटून बसला. तूला तर माहितच आहे,आयटी क्षेत्र किती बेभरवशाचे आहे. तरी माझी नौकरी चालू असल्याने बरे चालले होते.मी पुष्कळ समजावले.पगार कमी तर कमी.घरी बसण्यापेक्षा बरं ना? पण ऐकेचना. मग माझ्या मागे लागला.तुला कसे कमी करत नाही म्हणून . मला तसा पगार कमीच होता.आणि आमच्या कंपनीने कामगारकपात केली नाही त्यात माझा काय दोष? मग माझ्या चरित्रावरच संशय घ्यायला लागला.तरीही सहन केले मी.मग त्यांच्या डोक्यात आले म्हणे आपण गावी स्थायीक होऊ."
"मग? गावी परिस्थिती वाईट आहे का?"
"नाही रे.गावी शेती वगैरे आहे.खाऊनपीऊन सुखीच राहिलो असतो.पण मला गावात राहण्याची सवय नाही.माझे जन्मापासून आयुष्य शहरात गेले.दोनचार दिवस गावी राहाणे ठीक,अख्खे आयुष्य कोण काढणार तिथे?.मला इथे नौकरी आहे, पगार बरा आहे. मी त्यांना सांगितले गावी जाण्यापेक्षा इथेच थांबा, कोव्हीडची लाट गेल्यावर परात चांगली नौकरी मिळू शकते.तोपर्यंत माझा पगार आहेच. काही फार मोठा इशू नव्हता.त्याच्यात पण त्यांचा इगो दुखावत होता.माझी नोकरी चांगली होती.प्रमोशन ड्यू होते.कंपनीची आर्थिक स्थिती भक्कम होती. अशी नोकरी सोडून काहीच सवय नसलेल्या गावी जाण्यात काही अर्थ नव्हता. शेवटी मी वेगळे होण्याचे ठरवले."
अनीताने डोळे पुसले.मी तिच्या हातावर थोपटले. एवढे सगळे होऊन मला काहीच कळाले नाही. 
"मम्मी पप्पांनी ठामपणे साथ दिली, अभय,त्याची पत्नी राणी यांनीही मानसिक आधार दिला.खूप वेळा वाटावे तुला फोन करावे पण मनाला समजावत राहिले."
"ठीक आहे.आता तू माझ्याकडे मन मोकळे केलेस ना? काहीही मदत लागली तर मला सांग."
" नाही सुजय,त्यासाठी नाही बोलवले इथे."
काही क्षण पॉज घेऊन ती म्हणाली.
"आपण आपले रिलेशनशीप परत सुरू करू शकतो का?"
हा प्रश्न अपेक्षित होता पण आणि नव्हता पण त्यावर काय प्रतिक्रिया द्यावी मला कळेना.
"कदाचित तू मला स्वार्थी म्हणशील.तुझ्याशी ब्रेकअप झाले लगेच लग्न केले ,त्याच्याशी पटले नाही परत तुझ्याकडे आले."
"तसे नाही अनु, दोन वर्षाच्या गॕपनंतर अवघ्या काही मिनीटाच्या भेटीनंतर मी लगेच काही सांगू शकणार नाही. दोन वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे."
"हो. मुख्य म्हणजे मी तेव्हा कुमारीका होती आता घटस्फोटीता आहे." अनीताचे डोळे पुन्हा भरून आले.मी चटकन समोरची खुर्ची सोडून तिच्या बाजूच्या खुर्चीवर बसलो.तिच्या पाठीवर थोपटले. तीने माझ्या खांद्यावर मान ठेवली.
"असा विचारही माझ्या मनात  आला नाही अनु. पण ज्या गोष्टींमुळे आपला ब्रेकअप झाला त्या बदलल्या आहेत का हे पहावे लागेल.नाहीतर पुन्हा तेच भांडण,मनस्ताप."
"मी बदलली आहे सुजय.कोणाच्याही खाजगी जीवनावार आपला अधिकार नाही हे मला समजले आहे. लग्नानंतर आयुष्य बदलावे लागते,बदलते पण इतके बदलते हे माहित नव्हते मला."
"अनीता, तुझा स्वभाव बदलला असेल पण माझा बदलला नाहीये. तुला लग्नाचा वाईट अनुभव आला. मला तसा आलेला नाही."
" तू तुझा स्वभाव बदलला आहे.तुझ्या संतापावर नियंत्रण मिळवले असे कळले आहे मला."
" हो पण त्यात माझा स्वार्थ होता. या स्वभावामुळे  आँफीसमध्ये सहका-यांबरोबर ,बाॕसबरोबर माझे सतत वाद व्हायचे. हे मला परवडणारे नव्हते.मला पुढे जायचे होते.मग मी प्रयत्न केला.ध्यानधारणा केली.इगतपुरीला जाऊन शिबीर एन्टेड केले.हळूहळू फरक पडला.पण हे फक्त माझ्या भविष्यकाळासाठी.रिलेशनशिपमध्ये तसे होईलच याची शाश्वती नाही."
"ओके.मी जरा फ्रेश होऊन येते." अनीता उठून गेली.
 ती आली तेव्हा बरीच सावरलेली वाटली. 
" बरे,मरू दे माझे रडगाणे.तुझे कसे चालू आहे? लग्नाचा विचार का केला नाही या दोन वर्षात?"
"आई मागे लागली होती. पण सध्या तरी मीच नाही म्हणालो.एकदाचा हा कोरोना जाऊ दे मग बघू." 
 मी घड्याळात पाहिले. आठ केव्हाच वाजून गेले होते.
"अनु, बराच उशीर झाला आहे.आपण कुठेतरी बाहेर जेवण करूया का?"
"पण मग जास्तच उशीर होईल घरी जायला."
"मी कार आणली आहे.तुला सोडतो थेट घरी."
"मला माहित आहे तुझा फ्लॅट .माझ्या घरापासून खूप दूर आहे.तुला पोहचायला मध्यरात्र होईल."
" होऊ दे.मला विचारणारे कोणी नाही." 
      मी एका रेस्टारंटपुढे गाडी थांबवली. अनीताने बाहेर ? बघितले "प्युअर व्हेज. म्हणजे तू माझ्यासाठी व्हेज खाणार आज."
"आजचं नाही.जेव्हा जेव्हा तू सोबत असेल तेव्हा मी व्हेजच खाईन."
"म्हणजे आपण फ्रिक्वेन्टली भेटणार आहोत?"
"हो.जोपर्यंत माझी अनु पूर्वीसारखी  होत नाही तोपर्यंत नक्कीच ."
"ओहं, थैंक्यु सुजय."
अनीताने माझा हात गच्च पकडला आणि माझ्या खांद्यावर मान ठेवली. माझ्याही मनात जुन्या आठवणी जाग्या झाल्या. मी तिच्या हातावर थोपटले आणि तिच्या कपाळावर हलकेच ओठ टेकवले.
आमच्या नात्याची नवीन सुरूवात झाली होती. शेवट आताच सांगू शकत नाही. तो चांगला असलाच पाहिजे असेही नाही. काही गोष्टी नियतीच्याच हातात सोपवलेल्या ब-या असतात.

©®विवेक चंद्रकांत वैद्य.नंदुरबार ✒️ (सर्व हक्क राखीव ).

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...