शुक्रवार, २७ डिसेंबर, २०२४

1643. मात

     आपल्या गाडीचा वेग कमी करत  यशोधनने अगदी सफाईने गाडी फुलांच्या स्टॉल पाशी थांबवली.  फुलवाल्याने न बोलता निशिगंधाचा गुच्छ त्याच्या हातात दिला. अतिशय हळुवारपणे तो बाजूच्या सीटवर ठेवून त्याने पुन्हा  गाडीला वेग दिला. रस्त्यात मिहिका ला घेऊन मग पुढे जायचं होतं. किती वर्ष झाली, आपण मिहिका च्या ह्या भावनेचा आदर करत आहोत. एकदा शब्द दिला होता, तो अजूनही निष्ठेने पाळतोय. तक्रार न करता. किती विचित्र असतं नाही माणसाचं मन? काही बाबतीत अतिशय तरल तर काही बाबतीत वज्रासारखं . यामिनीच्या हट्टी पणा पुढे न झुकणारा मी,  तिच्या वाढदिवसाला मात्र आठवणीने फुलं  घेऊन भेटायला जातो, तेही मिहिका सोबत . ह्या विचारातच तो मिहिकाच्या घरासमोर आला. त्याच्याही नकळत त्याची नजर तिच्या घरावरून फिरलीच. खूप सुरेख फुलवलेली बाग आणि लक्ष वेधून घेणारं घराचं नाव...निशिगंध ! 
फाटक उघडून मिहिका आली, तशी चट्कन घरावरून नजर वळवून त्याने कारचा दरवाजा उघडला.
"छान फुलं मिळाली रे."  गाडीत बसत मिहिका म्हणाली. तिने फिक्या निळ्या रंगाची साधी पण नीटनेटकी साडी नेसली होती. अगदी हलकासा मेकअप आणि साधे मोत्याचे दागिने. त्याला वाटलं तिची तारीफ करावी, पण त्याने शब्द गिळले. उलट म्हणाला , 
"निशिगंधाची ताजी फुलं प्रत्येक वेळी अशीच दिसणार न मिहिका? की दर वेळी ते रंग बदलतील  माणसासारखे?"
"इतक्या दिवसांनी भेटतोय पण तुझ्या जिभेवरील काटे जराही बोथट नाही झाले रे ! रोज धार लावत असतोस का त्यांना?" ह्यावर  मात्र तो काहीच बोलला नाही. त्याची नजर सारखी तिच्याकडे जात होती. तिच्या दाट केसांमधून काही रुपेरी केसही दिसायला लागले होते. तरीही सुंदर दिसत होती ती. साधेपणातील शालीन सौन्दर्य  आणि बुद्धधीमत्ते चं तेज कसं असावं ह्याचं उदाहरण होती मिहिका.
" खूप सुंदर दिसतेय. केस मोकळे नाही सोडलेस  आज?"
" त्या दिवसानंतर कधीच नाही सोडले आणि आता तर बांधायची सवय झाली."
"अजूनही विसरली नाहीस तू मिहिका ?"
" पुरुष फार पटकन सगळं विसरतात यश. आम्ही बायका प्रेमही जीव तोडून करतो आणि तिरस्कार ही तितकाच!"  
ह्यानंतर दोघेही विचारात गढले. काय काय घडून गेलं होतं गेल्या आठ वर्षात.
 "तुमचा टिफिन विसरलाय प्रोफेसर मॅडम ! " मागून धावत येत यशोधन ने टिफिन बॅग मिहिकाच्या हातात दिली. तिने अत्यंतीक प्रेमाने त्याला जवळ घेऊन हलकेच गालावर ओठ टेकवले.
"उम्म्म ! रोज असाच टिफिन विसरत जा , मी रोज मागून पळत येईन , आणि रोज तू ..."
" पुरे आता !! बा s य !!" म्हणत मिहीकाने गाडी सुरू केली. 
       एकदा का मिहिका कॉलेज ला गेली की उरलेला दिवस यशला खायला उठे. अचानक त्याचा हाय प्रोफाइल जॉब गेल्यावर पुन्हा त्याला मनासारखी नोकरी मिळालीच नव्हती. काहीतरी बिझनेस करावा म्हणून तो बऱ्याच जणांना भेटत होता, हातपाय मारत होता. पण हाती ठोस काही लागत नव्हतं. त्यात त्याची भेट झाली यामिनी सरनोबत शी ! अत्यंत महत्त्वाकांक्षी, स्टायलिश आणि  घायाळ करणारे सौन्दर्य असलेली, दोन कंपन्यांची मालकीण.  तिच्या नवीन प्रोजेक्ट सांभाळण्यासाठी साठी तिने यश ला ऑफर दिली आणि यश ला आकाश ठेंगणं झालं. त्याने आपला अनुभव, आपली बुद्धिमत्ता आणि आपला प्रचंड वेळ गुंतवून त्या प्रोजेक्ट ला खूप यशस्वी केलं आणि त्याच्या ह्या अफाट वेगाने यामिनी त्याच्या प्रेमात पडली. सुरुवातीला मिहिका यश बरोबर फलटण ला प्रोजेक्टचं काम बघायला जात असे. ती स्ट्रकचरल इंजिनिअरिंग ची प्रोफेसर असल्याने तिला ह्याचे चांगलेच ज्ञान होते. तिनंही बरंच लक्ष घातलं होतं  प्रोजेक्ट मध्ये . यशला तिच्या ह्या गुणांचं भारी कौतुक वाटे.
"कालची तुझी कॅन्टीलिव्हर ची आयडिया आमच्या डिझायनर ला पण आवडली. मीही, तू प्रोजेक्ट डिझायनर कम ऍडव्हायझर का नाही होत?  तुझ्या ज्ञानाचा खरा उपयोग होईल त्यात ."
" मी माझ्या कामात अत्यंत समाधानी आहे यश. आणि एक पैसा न घेता फ्री ऍडव्हायझर मिळतोय की तुम्हाला ! " हातातलं पुस्तक बाजूला सारत ती म्हणाली.
"पण मास्तरकीत कितीक मिळणार ग ? इथे लाखोंनी कमावशील महिन्यात !"  
     तिने चमकून त्याच्याकडे बघितलं. पण तिच्या नजरेतला भाव वाचायला त्याचं लक्ष कुठे होतं तिच्याकडे? तीने बराच वाद घातला त्याच्या सोबत पण कॉलेज सोडून तिने असे प्रोजेक्ट सांभाळावेत ह्यावर अडुन बसला होता यश. त्यानंतर हळू हळू त्याचं घरी येणं कमी झालं. बऱ्याचदा रात्री तो प्रोजेक्टच्या गेस्ट हाऊस वरच राहू लागला. दोघांतील वाद वाढत होते. तो यामिनी कडे आकर्षित होतोय हे लक्षात आलं होतं मिहिकाच्या. तिने बरंच समजावण्याचा प्रयत्न पण केला पण यश ला यशाची धुंदी चढली होती. मिहीकाने तेही समजावून घेण्याचा प्रयत्न केला.  त्याला सावध केले पण त्याने जुमानले नाही. मिहिका खूप दुखावल्या गेली होती.  अशात एक दिवस मिहिका कॉलेजच्या टूर वर उदयपूर ला असतांना यश आणि यामिनी एकत्र दिसले तिला. तिची शंका खरी ठरली होती. उदयपूर च्या आलिशान हॉटेल मध्ये हातात हात घालून फिरणाऱ्या  यश आणि यामिनी ला बघून  मिहिकाला काही क्षण वाईट वाटलं पण धक्का बसला नाही. कारण गेल्या काही महिन्यांपासून ह्या नात्याबद्दल तिच्या मनाची तयारी झाली होती.  शक्य तितका शांत चेहरा ठेवत ती सरळ दोघासमोर गेली .
" हाय यश !"  तिने सहजपणाचा आव आणत म्हटलं .
" ओ s , हाय ! तू इकडे मिहिका?"
" घाबरू नकोस. तुमचा पाठलाग करत नाहीये . कॉलेज ची स्टडी टूर आहे."....तिच्याकडे गोंधळलेल्या नजरेने बघणाऱ्या यामीनीस ती म्हणाली ,
" हाय यामिनी ! हे बघ , माझा तुझ्यावर अजिबात रोष नाही. खरं तर यश वर पण नाही.  काळ्या मातीवर सरळ सरळ इमारत उभी केली तर टिकत नाही. मजबूत खोल पाया बांधावा लागतो. त्या पायाला मोठाल्या भेगा पडल्या तर इमारत कोसळणारच. दोष ना काळ्या मातीचा ना इमारतीचा." 
" मीही , सॉरी .... मी ....यश बोलत असतांनाच तिने मध्येच तोडले 
" आता त्या सॉरीची काहीच गरज नाही  यश. काही महिन्यांपूर्वी म्हणाला असतास तर कदाचित जरासा ओलावा वाटलं असता मला . बाय ."    लगेच पाठमोरी होऊन ती चालू लागली . 
" यशो , तिला डिव्होर्स पेपर वर सह्या करायला सांग न ! नुसताच बघत काय बसलाय?"  यामिनी ने संधी साधून म्हटलं पण यश जागेवर खिळल्या सारखा उभा होता.
" काय तुझ्या मनात कळत नाही मला. तिला घटस्फोट देणार नाहीयेस का तू ? " 
" मी काय, तीच घटस्फोट देणार नाहीये मला. आपल्याला शिक्षा देतेय असं समज." 
यामिनी च्या तीव्र स्वराला तितकंच थंड उत्तर देत तो म्हणाला. 
***  गाडीत बसल्या बसल्या मिहिकाला  हे सगळं आठवत होतं .
यशोधन ने गाडी शंकर च्या टपरी जवळ उभी केली. तिथला चहा फार आवडायचा मिहिकाला . 
" मिहिका, तुला यामिनी बद्दल नेमकं काय वाटतं आता ? का तुला दर वर्षी मला घेऊन लोणावळ्याला जायचं असतं? "
"आधी मला तिचा प्रचंड राग यायचा . तू मला सोडून तिच्या नदी लागलास म्हणून कधी हेवा पण वाटला होता. नंतर  नंतर मी स्थितप्रज्ञ झाले आणि मग तिच्या अपघातात नंतर कणव वाटली. पण आता सांगू ? आता मी गुरू मानते तिला माझा."
" गुरू? मला समजलं नाही ."
" तुला आठवतं? तुमच्या फॅक्टरी च्या उद्घाटनाच्या दिवशी तिने निशिगंधाच्या फुलांचा गुच्छ दिला होता मला. म्हणाली , ह्या फुलांचा सुगंध मंद असतो, ही फुलं  सुरेख असतात , चांगलं तीन --चार दिवस टिकतात. पण त्यानंतर मात्र फेकावीच लागतात . तू ह्या निशिगंधा सारखी आहेस. म्हणून हे खास तुला." 
" ह्यात गुरू मानण्यासारख काय ?"
" नात्यांच्या मर्यादांची मला  जाणीव करून दिली तिने. त्या दिवशी समजलं की तिचं आणि तुझं नातंही शिळं होणार एक दिवस. गुच्छ फेकायची वेळ येणार कधीतरी आणि त्या दिवसापासून जग बदललं माझं. मी मनमोकळं जगायला शिकले. माझ्या जगण्याचा फुलोरा कायम टवटवीत राखू शकले.  तुझ्या नजरेतल्या  ' मास्तरीण '  ला पॅरिस , रोम इथे बोलावणं आलं.  अनेक प्रबंध लिहिले मी.  जगभर फिरले. खूप नाव कमावलं. कुढणं बंद केलं. म्हणून गुरू म्हटलं तिला  .." 
यश चा चेहरा पडला.  "चहा झालाय घेऊन निघुया  आता? "      
      दोघं पोहोचले तेव्हा यामिनी कॉटेज च्या व्हरांड्यात येऊन बसली होती . एक पाय गुढग्यापासून खाली कृत्रिम पद्धतीने जोडला होता. रहाण्याचा थाट मात्र आजही तसाच होता. आजूबाजूला नोकर माणसं होती. 
" हॅपी बर्थ डे यामिनी !! " म्हणत तिने निशिगंधाची फुलं तिच्या हातात दिली . 
" कशी आहेस मिहिका ? आणि तू यश ? तू कसा आहेस ? "
" मी मस्तं . तुम्ही दोघी बोला , मी फिरून येतो ." तिला टाळत यश म्हणाला.
" हा इथे काय फक्त तुझा ड्रायव्हर म्हणून येतो का ग? जराही थांबत नाही." यामिनी त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत म्हणाली .
" त्याचा  गिल्ट त्याला इथे थांबू देत नाही यामिनी."
" पण मग येतो कशासाठी ?"
" तो नाही आला तर त्याची ही  सध्याची नोकरी पण जाईल , म्हणून ! "
" आता कुठे आहे त्याचा जॉब ? "
" फार सुंदर जॉब आहे त्याचा आत्ताचा. ते सोड ग . जाऊदे. तुझा पाय काय म्हणतोय ? तू पाचवी क्लायंट आहेस आमच्या स्टुडंट्स ची बरं का. पॉली युरेथ्रीन पासून अत्यंत कमी वजनाचा, पण भार घेणारा कृत्रिम पाय बनवलाय  कॉलेजच्या मुलांनी . राष्ट्रपतींच्या हातून बेस्ट इनोव्हेशनचं अवॉर्ड मिळालय आम्हाला !" 
" तू ग्रेट आहेस मिहिका...खरंच . मी तुला ओळखण्यात चुकले . यश ने पण तुला मास्तरिण म्हणून हिणवलं.  आता तू आणि यशने एकत्र यावं अशी माझी इच्छा आहे. "
"शिक्षक हा समाजातील अत्यंत महत्वाचा घटक आहे यामिनी  मी शिक्षकवृंदाचा फार आदर करते आणि आता पुन्हा यश सोबत राहण्याचं म्हणशील तर...." आणि ती जोरात हसली . 
        यामिनी चा निरोप घेऊन दोघं निघाले. यश गप्प गप्प होता .
" यश, तुझं यामिनिशी नेमकं कधी बिनसलं ? "
" इतक्या वर्षांनी आज विचारतेय तू हे? किती वर्ष गेली मध्ये ." 
" हो, कारण....कारणही तसंच आहे ."
" आपण पुन्हा एकत्र राहूया का मिहिका ? "
" याचं उत्तर मी तुला देईन लवकरच ! पण तू माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलंस ."
" सुरुवातीचे दिवस फार मस्तीत गेले आमचे. पण नंतर लक्षात यायला लागलं. फारच हेकेखोर आणि हट्टी होती ती . आमचे टोकाचे वाद होऊ लागले. अजिबात पटेनासं झालं . मग माझं करिअर संपवण्याच्या मागेच लागली ती. माझा तो जॉब ही गेला पुढे  दोनच वर्षात. त्यानंतर अपघात झाला तिचा  आणि मी सुटलो ! "
" किती स्वार्थी झालास तू यश ! सुटलो काय म्हणतोस ? तुला तर इतकी छान हेमा भेटली न त्याच काळात ?"
     तिच्या ह्या वाक्यावर यशोधन चरकला . 'हेमा बद्दल मिहिका ला कसं माहिती ...'
"दचकू नकोस असा. काही वर्षांपूर्वी आमच्या कॉलेज च्या सिव्हीलच्या मुलांना सोशल अवेअरनेस आणि प्रॅक्टिस ह्या अंतर्गत  कोराडी ची शाळा बांधून देण्याचा प्रोजेक्ट दिला होता. पूर्ण इको फ्रेंडली शाळा ! तिथेच  हेमा भेटली होती मला. खूप छान मैत्री झाली आमची . "
" तू हेमाला इतकी जवळून ओळ्खतेस ? "
" हो . अगदीच साधी आणि प्रामाणिक आहे ती. शाळेत अतिशय मन लावून शिकवते. तेव्हा तू नोकरी च्या शोधात होतास. तुला पुन्हा हाय प्रोफाइल जॉबच हवा होता  आणि यामिनी तो तुला मिळू देत नव्हती."
" इतकं सगळं तुला माहितेय ?" 
"  हो , माहितेय . यश , गाडी ह्या नाक्यावरून आत कोराडी कडे वळव न...मला थोडं काम आहे . "
"तिथे आता तुझं काय काम ?" म्हणत , नाईलाजाने कुरकुरत यश ने गाडी तिकडे घेतली .
     कोरडीला छानशा जागेवर मस्तं टुमदार शाळा बांधून दिली होती मिहिका आणि तिच्या विदयार्थ्यांनी. विदयार्थ्यांना अनुभव मिळाला आणि कोरडीला शाळा. मिहिका गाडीतून उतरली , पण यश मागेच रेंगाळला होता. मिहिकाला बघून हेमा बाहेर आली .
"या मिहिका मॅडम . स्वागत आहे तुमच्या शाळेत ."
"आपल्या शाळेत म्हण ग  हेमा."  मंद हसत मिहिका म्हणाली. 
  गाडी पार्क करून तिकडेच झाडाखाली थांबलेल्या यश ला हेमाने बघितलं. म्हणाली ,
"  अरे ,  सर ss ,  याना इकडे प्लिज ! काय छान योग आहे आज. यशोधन सरही आले. हे बघा सर. ह्याच त्या मिहिका मॅडम. आम्हाला मुख्याध्यापक हवे होते तेव्हा  अतिशय आग्रहाने  तुमचं नाव  मिहिका मॅडमनीच सुचवलं होतं . ह्याच त्या ! "  साटकन तोंडात मारल्यासारखं वाटलं यश ला.  वाटलं , धरणी पोटात घेईल तर बरं.  
त्याने कसानुसा नमस्कार केला तिला. म्हणाला , " धन्यवाद मिहिका मॅडम "
मिहिका पुन्हा गूढ हसली . पाच सात मिनिटं शाळेत थांबून ती निघाली .
" येऊ मी हेमा ? मला मुंबईला वापस जायचं आहे ."
" आज गाडी नाही आणली मॅडम?"  हेमा ने भाबडेपणाने विचारलं . ही दोघं एकत्रच आली आहेत हे तिला माहितीच नव्हतं. लगेच सावरून घेत यशोधन  म्हणाला, " मी  सोडतो न मॅडम  तुम्हाला. मला तिकडेच जायचं आहे ."
           गाडी शाळेपासून दूर गेली की यश म्हणाला, 
"कमाल आहे मिहिका तुझी ! सगळ्यांशी संबंध ठेवून आहेस. यामिनीला कृत्रिम पाय पुरवलास.  माझं नाव शाळेच्या प्रिन्सिपॉल पदासाठी तू सुचवलंस ?  आणि हेमाला पण ओळ्खतेस."
" तू हेमाला लग्नाबद्दल विचारलंय हे देखील माहितेय मला यश !!! तुला लाज नाही वाटत का रे? हेमाशी लग्न करणार आहेस. तरीही तोंड वर करून  आत्ता थोड्या वेळापूर्वी  तू मला विचारत होतास आपण पुन्हा एकत्र येऊया का  म्हणून? आपला संसार यामिनी मूळे नाही तर तुझ्यामुळे मोडलाय यश ! तू जबाबदार आहेस ह्याला !  मला मास्तरीण  म्हणून हिणवलस न? आता हेच नोबेल काम आयुष्यभर पूर्ण मन लावून करणार आहेस तू ! तू नक्की कर लग्न हेमाशी. खूपच स्वच्छ मनाची आणि चांगली आहे ती. तिला आवडतोस तू. आता मी देईन तुला घटस्फोट आणि खरं खरं सगळं सांग तिला !  फसवू नकोस . आयुष्यभर  प्रामाणिकपणे साथ कर तिची !..नाहीतर .."
" नाहीतर? तर काय मिहिका ?"
" तूच सूड उगवण्यासाठी यामिनीचा अपघात घडवून आणला होतास हे मी यामिनी आणि हेमाला सांगेन !" ती एकदम जोरात ओरडली .
यश ने कच्चकन ब्रेक दाबून गाडी थांबवली होती. तिलाही जोरात ओरडून थकल्या सारखं झालं होतं.  आपले बांधलेले केस तिने मोकळे सोडले आणि लांब श्वास घेतला. यश घामाघूम झाला होता. आपल्या बुद्धी च्या जोरावर त्याच्या सगळ्या खेळीवर चांगलीच मात केली होती मिहीकाने. आज तिचं मन मोकळं झालं होतं. तिच्या निशिगंधाचा दरवळ आता असाच कायम रहाणार होता.

© अपर्णा देशपांडे 
( कथाश्री दिवाळी , २०२२ मध्ये पूर्व प्रसिद्धी )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...