बाहेर मुसळधार पाऊस पडत होता. अनघाला जसा आवडायचा तसाच, अगदी लहानपणापासून. तिच्या पावसासोबत खूप सुंदर आठवणी होत्या. तिने घरात एक मोठीशी खिडकी करून घेतली होती आणि त्या खिडकीच्या कुशीत बसायला छोटीशी बैठक जिथे तिला बसायला खूप आवडे. तिने मानसी (तिची सात वर्षांची मुलगी ) ला तिथे बसायला सांगितले आणि गरमा गरम भजी तळायला घेतली तोच दाराची बेल वाजली .
मानसीने पळत जाऊन दरवाजा उघडला. अनघाचे कान दरवाज्याकडेच होते . मानसीने दरवाजा उघडताच विचारले "कोण तुम्ही ??" आणि समोरून आवाज आला - " मानव भोसले ". हे नाव ऐकून अनघा थोडी थबकली आणि गॅस बंद करून धावत दरवाज्यात गेली . त्या गृहस्थाला बघून काही सेकंद ती स्थब्दच उभी राहिली. आपल्या अगदी जवळची व्यक्ती मरण पावले असेल आणि जर अचानक वीस एक वर्षांनी आपल्या समोर उभे राहिले तर कसं वाटेल ,अगदी तसे तिला वाटले..
मानव भोसले हे अनघाचे वडील. नाही ते वारले नव्हते पण तिच्यासाठी त्यांचे अस्तित्व कधीच संपले होते. तिला स्वप्नात देखील कधी वाटले नव्हते कि ते तिला परत कधी भेटतील. खूप थकलेले दिसत होते. केस हि अगदी विरळ आणि पूर्ण पांढरे झाले होते आणि अगदी केविलवाण्या नजरेने तिच्याकडे बघत होते. कोणास ठाऊक ,त्यांच्याबद्दल मनात इतका राग असून सुद्धा ,तिच्या तोंडातून निघाले - "आत या ".
त्यांनी आत येताच तिच्या डोक्यावरून हात फिरवला. त्यांची १५ वर्षांची अल्लड कन्या आता ३५ वर्षाची स्त्री/ आई होती .
तिने त्यांच्या हातातली बॅग घेतली आणि त्यांना बसायला सांगितले. मानसी ने परत विचारले "मम्मा,कोण आहेत हे?" त्यावर ते लगेच म्हणाले - "तुझा आजोबा. इकडे ये ". मानसी ला हि प्रश्न पडला - "पण मम्मा ,तू तर म्हणाली होतीस कि....." ,अनघा ने तिला थांबवले आणि पाणी आणायला सांगितले.
अनघा : इथे.... कसे ?? इतक्या वर्षांनी ??
वडील : तुला भेटायला. तुझी माफी मागायला.
त्यांच्या अश्या अचानक येण्याने ती भांबावली होती . तिने त्यांना गेस्ट रूम दाखवली आणि फ्रेश व्हायला सांगितले - "फ्रेश होऊन या, मी भजी आणि चहा बनवते." ती किचन ओट्या समोर शांत उभी राहिली. एक मन म्हणत होते त्यांना जाब विचारावा अथवा आपण त्यांना आतच का घेतले. पण दुसरीकडे तिच्यातल्या १५ वर्षाच्या अनघा ला मनापासून आनंद होत होता- आपल्या प्रिय ,जगात सर्वात प्रिय बाबांना भेटण्याचा. एकेकाळी इतके रुबाबदार दिसणारे, आज इतके थकलेले बघून मनाला त्रास होतं होता. अनघा मानव आणि मालती ह्यांची एकुलती एक कन्या. ती लहानपणापासून तिच्या वडिलांच्या जास्ती जवळ होती . ते अगदी तिला तळहाताच्या फोडा सारखे जपत. अगदी तिचा प्रत्येक हट्ट पुरवायचे. रात्री झोपतांना हि, तिला आई नव्हे तर तिचे बाबा लागायचे. ते एका खाजगी कंपनीत अकाउंटंट म्हणून होते आणि आई एक गृहिणी. मानव ह्यांचे मोठे व्हायचे स्वप्न होते. त्यांना महागड्या गोष्टींचे खूप आकर्षण. मग ते कपडे असो वा बूट ,पर्फुमझ सगळेच. ते कधीच मागचा पुढचा विचार न करता पैसे उडवत असे. छोट्या अनघा ने काही मागितले कि लगेच तिच्या समोर हजर करत. म्हणजे ऋण काढून सण साजरी करणे म्हणतात ना तसे . अनघाच्या आई ला सगळ्या खर्चाचा मेळ बसवणे खूप अवघड जाई आणि दोघांमध्ये सतत भांडण.
अनघाला हि तिच्या बाबांना कोण्ही काही बोललेले आवडत नसे. तिच्यासाठी ते तिचे हिरोच होते. दिसायला हि अगदी रुबाबदार, मिश्किल, तिच्या सर्व मित्र मैत्रिणीनं सोबत हि चांगले मिक्स व्हायचे. तिला काही अडचण असेल तर तिला आई पेक्षा बाबांना सांगायला बरे वाटे. आजारपणात हि ती तिच्या बाबांनाच बिलगून बसे आणि तेही हमखास रजा टाकून तिच्या जवळ थांबायचे. पण जशी ती मोठी होत गेली - १३ - १४ वर्षांची तिला तिच्या आईचे दुःख समजू लागले. ते जरी एक उत्तम आणि प्रेमळ वडील होते पण एक नवरा म्हणून टोटल फेल होते. त्यांचे त्यांच्या बायकोवर काही खास प्रेम नव्हते. ते पटकन तिच्यासोबत कुठे जायचे हि नाहीत. बहुदा त्यांना ती त्यांच्या कॅलिबर ची वाटत नसावी. अनघा ची आई अगदीच सर्व सामान्य होती दिसायला शिवाय राहणीमानाकडे हि फारसे लक्ष देत नसे. दिवसभर घर कामात अडकलेली .
पुढे मानव ह्यांनी अधिक पैसे कमावण्यासाठी, काही साईड बिझनेस हि केले. पण कशातच यश नाही मिळाले. उधारी हि वाढली आणि घरात चिडचिड आणि ती सर्व नेहमी अनघाच्या आईवरच निघे. तिच्या आई कडच्या नातेवाईकांच्या तर ते अगदी ब्लॅक लिस्ट मधेच होते. ते कितीही रागात असले तरी अनघाला बोट सुद्धा लावत नसे अथवा ओरडून बोलत नसे. तिचे म्हणणे नेहमी ऐकायचे. अनघाला कळायचे कि आपले बाबा चुकत आहेत पण तिचे मन नेहमी त्यांच्याकडेच ओढ घ्येयचे. पण त्या दिवशी अनघा तेव्हा १० वीत होती. काही अघटितच घडले तिच्यासाठी. नेहमीप्रमाणे सकाळी तिला तिच्या बाबांनी शाळेत सोडले आणि दुपारी घरी आली तर काय बघते कि त्यांच्या घरी पोलीस आले होते आणि तिच्या वडिलांची चौकशी करत होते. त्यांच्या बोलण्यातून जाणवले कि त्यांनी कंपनीत काही फ्रॉड केला आहे आणि ते सध्या बेपत्ता आहेत. बस त्यानंतर तिला ते थेट आज भेटले होते !
भजी तळताना हे सर्व प्रसंग अगदी जिवंत हुन तिच्या समोर येत होते. तिला त्यांना जाब विचारायचा होता. भजी खाऊन झाल्यावर ती बोलणार तितक्यात तेच म्हणाले :
"बोल...हवे तेवढे ओरड मला ,अशी आत घुसमटू नकोस. मी तुझा अपराधी आहे मोठा."
अनघा : आई वारली मागच्या वर्षी तेंव्हा तरी येयचे. तेंव्हा पण यावेसे नाही वाटले तुम्हाला ??
बाबा : अगं मला आत्ता तुमचा पत्ता मिळतो आहे. ते पण तुमचे काय ते फेसबुक मुळे. खरे आहे तिची माफी मागायची राहूनच गेली. मी खूप मोठी चूक केली तेंव्हा. हो मी फ्रॉड केला होता आणि त्या दिवशी पोलिसांना ऑफिस मधे बघून तिथून पळ काढला. नंतर कळले कि ते घरी पण गेले होते आणि माझा शोध सुरु आहे. थेट रेल्वे स्टेशन गाठले तर दिल्लीची गाडी लागली होती ती पकडली. दिल्लीत एका छोट्या कंपनीत काम पकडले. इमानदारीत केले. नंतरचे सहा महिने तुमच्याशी काही कॉन्टॅक्ट करायची हिम्मतच नाही झाली. नंतर फोन लावला तर नंबर बंद असल्याचे कळले. तुझ्या आईच्या माहेरचा नंबर माझ्या तोंडपाठ नव्हता. कोणत्याच नातेवाईकांशी संबंध न ठेवण्याचा तोटा मला तेंव्हा प्रकर्षाने जाणवला. सहा महिन्यांनी मी परत मुंबई ला आलो तेंव्हा कळले कि तिथे आता दुसरे भाडेकरू आहेत आणि कोणाला तुमचा पत्ता माहित नव्हता. तुझ्या आईच्या माहेरी साताऱ्याला गेलो तर ते घर हि तुम्ही सोडून कुठल्यातरी दुसऱ्या शहरात गेले आहात असे कळले. अधून मधून मुंबईत चक्कर मारायचो, रस्त्यावर फिरत, तुम्हाला शोधत, कदाचित दिसल्यातर .
अनघा त्यांचे बोलणे अगदी लक्ष पूर्वक ऐकत होती. तिच्या मनाला ह्या स्पष्टीकरणाची कित्तेक वर्षांपासून गरज होती. ती त्यांच्याकडे रोख नजरेने बघत म्हणाली- "पळपुटे निघाले तुम्ही. आईचा संघर्ष बघायचे तेंव्हा नेहमी अपराधी वाटायचे. आपल्या अगदी जवळच्या व्यक्ती मुळे तिच्यावर हि वेळ आली आहे ह्याची जाणीव व्हायची. तुमचा खूप राग येयचा पण मी मनाला समजवायचे कि तुम्ही कोणत्या तरी अडचणीत असाल म्हणून जमले नसेल येयला. अथवा तुमचे काही तरी बरे वाईट झाले असेल. पण तुम्ही सहा महिने लपून राहिलात? आमची काळजी नाही वाटली? कि कश्या ह्या सर्व गोष्टींना सामोरे जात असतील? तिची डोळे रागाने लाल झाले होते. ते मान खाली घालून बसले होते. हो गं, खरंच पळपुटा निघालो. प्रचंड घाबरलो होतो पण तुझ्या आईचे धैर्य जाणून होतो. कुठेतरी ठाम विश्वास होता कि ती तुझी आणि स्व्ह्ताची काळजी घेऊ शकेल म्हणून कदाचित. खूप पाश्च्याताप होतो माझ्या सगळ्याच वागण्याचा, काय मिळवले मी आयुष्यात, फक्त एकटेपणा. गेल्या वीस वर्षांपासून.
अनघा आता थोडी शांत झाली होती आणि पुढे सांगू लागली : आम्ही तुमची तीन महिने वाट बघितली. पण शेजारच्यांच्या नजरा असह्य होऊ लागल्या होत्या. घरात पोलीस येऊन गेल्यामुळे घरमालकाने हि घर रिकामे करायला सांगितले. अज्जीकडे साताऱ्याला आई आणि तिला नातेवाईकांच्या बोचक प्रश्नांना उत्तर देणे अवघड होऊ लागले होते. तेंव्हा आईच्या एका शाळेतल्या मैत्रिणीने सुचवल्याप्रमाणे आम्ही पुण्याला गेलो. त्यांच्या मदतीने एक जुने बसके घर भाड्याने मिळाले. जिथे आई आणि अज्जीने खानावळ, पाळणाघर चालवून घर चालवले. माझे शिक्षण पूर्ण केले. पुढे चांगले स्थळ बघून शिरीषशी माझे लग्न लावून दिले.खूप खुश आहे मी त्यांच्यासोबत. अज्जी सात वर्षांपूर्वी वारली आजाराने आणि आई मागच्याच वर्षी हार्ट अटॅकने . नशिबाने मी तेंव्हा तिथेच होते. अनघाने एक लांब मोकळा श्वास घेतला आणि खिडकीतल्या त्या कुशीत जाऊन बसली. मुसळधार पावसाकडे बघत जणू तिच्या वाटेचे तोच मन मोकळे रडत होता. काही वेळ दोघेही अगदी शांत बसले होते. नंतर...
वडील : घर छान सजवले आहेस ,अगदी टीप टॉप !! मला आमच्या शेजारच्या मुलाने मदत केली तुला फेसबुक वर शोधण्यासाठी. मला कुठे जमतंय. तिथे ह्या छकुलीचा फोटो बघितला आणि ठरवले कि तुला भेटायला येयचेच. राहवेना गं. मनात म्हंटल काय होईल- चिडशील, ओरडशील, कदाचित घरात सुद्धा घेणार नाहीस पण तुला डोळेभरून एकदा बघेन तरी. त्यांनी त्यांच्या बॅग मधून ५ -६ फ्रॉक्स बाहेर काढले आणि मानसी च्या हातात ठेवले. उद्या सकाळीच जाईन मी इथून. तुझ्या यजमानांना चालेल ना?
तिच्या आतले वादळ आता पूर्ण शांत झाले होते. तिला खूप मोकळे वाटत होते. परत तिचे जुने बाबा समोर बसल्यासारखे वाटले. पाऊस हि आता तसा थोडा शांत झाला होता आणि सुंदर हवा वाहत होती. सोबत मातीचा सुगंध उधळत. तिने त्यांच्याकडे अगदी सहजतेने बघत विचारले "अजून भजी अनु? तुम्हाला आवडतात न पावसात खायला आठवतं तुम्ही नेहमी आपल्यादोघांसाठी बनवायचात पाऊस पडल्यावर आणि खिडकीत बसून ती खायचात ?"
त्यांच्या डोळ्यातून टचकन पाणी बाहेर आले. तुझ्या लक्षात आहे ? माझी आठवण येयची का ग तुला ?अनघाचे हि डोळे पाणावलेले होते. तिने ते पुसले. आत जाऊन भजी आणि चहा घेऊन आली. त्यांनी प्रेमाने तिच्या गालाला हात लावले. तशी ती त्यांना बिलगली. त्यांना हि राहवेना अगदी लहान मुलासारखे रडले.
"अनु ...माफ कर ग तुझ्या बाबा ला " म्हणत हात जोडले .
अनघा : शिरीष ऑफिसला गेले आहेत.येतील थोड्यावेळात. त्यांचा बिल्कुल पण आक्षेप नसणार तुम्ही इथे राहण्याबद्दल. त्यांना ठाऊक आहे कि तुम्ही मला किती महत्वाचे होतात. लहानपणीच्या आपल्यातल्या सर्व गोष्टी त्यांना हजार वेळा सांगितल्या आहेत आणि उद्या सकाळी काही जायचे नाही, तुम्ही आता इथेच माझ्यासोबत रहायचे आहे . मी आता तुम्हाला जाऊ देणार नाही. त्यांनी तिला खूप समजवायचा प्रयत्न केला ,पण अनघा ने त्यांचे एक नाही ऐकले. छोट्या मानसीने हि आग्रह केला "आजोबा ,नका ना जाउत" आणि तिला नाही म्हणणे त्यांना शक्य झाले नाही !!!
**समाप्त **
© सायली गवारे
काही नात्यानं मधले प्रेम इतके निरागस असते कि चुकी करणारा माफी मागण्यास जेवढा आतुर असतो तेवढाच माफ करणारा हि असतो ती चूक पोटात घेण्यासाठी,नाही का?
तुम्हाला माझे लिखाण कसे वाटले नक्की कळवा. सर्वात जास्ती काय भावले तेही कळवा. मला तुमचे कमेंट्स वाचायला आवडतील. नावासकट share करावेसे वाटले तर माझी हरकत नाही
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा