बुधवार, ४ डिसेंबर, २०२४

1566. या चिमण्यांनो....!

       नेहमीप्रमाणे वसंतराव सकाळचा चहा घेऊन टेबलाकडे आले आणि पत्नीला हाका मारु लागले. नाईकबाई, उठा आता. चहा तयार आहे. वसंतरावांची ही सकाळची रोजची पध्दत. चहा करायचा आणि पत्नीला चहासाठी बोलवायचे. मग सुमित्राबाई तोंड धुवायच्या आणि खुर्चीवर चहासाठी बसायच्या. वसंतरावांनी दुसर्‍यांदा हाक मारली तरी सुमित्राबाईंकडून उत्तर नाही. म्हणून वसंतराव उठले आणि बेडरुममध्ये गेले. त्यांनी झोपलेल्या सुमित्राबाईंकडे पाहिले मात्र त्यांच्या लक्षात आले काही तरी गडबड आहे. सुमित्राबाईंचा चेहरा वाकडा झाला होता आणि एक हात कॉटखाली लोंबत होता. त्यांनी अंगाला हात लावला. शरीर गरम होते परंतु हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट करण्याची गरज होती. ते धावत बाहेर गेले आणि शेजारच्या बाळ्याला हाक मारु लागले. 
‘‘बाळ्या, बाळ्या लवकर ये ! बाईंची तब्ब्येत बरी दिसना नाय, धाव.’’
झोपेत असलेला बाळ्या आणि त्याची बायको अरुणा धावत त्यांच्या घरात आली. बाईंचा चेहरा वाकडा झालेला दिसला. अरुणाने गार पाणी घेतले आणि चेहर्‍यावर मारले. तसेच कांदा फोडून नाकावर लावला. पण बाईंकडून कसलाच रिस्पॉन्स नाही हे पाहून बाळ्या म्हणाला, ‘‘मास्तर, बाईंका हॉस्पिटलात न्हेवकं होया. मी माझी रिक्षा हाडतयं.’’ असं म्हणून बाळ्या धावत कपडे बदलायला गेला. पाठोपाठ त्याची बायको अरुणापण गेली. वसंत मास्तर सुन्न होऊन सुमित्राबाईंच्या बाजूला बसले. काय होते आहे त्यांच्या लक्षात येईना. काल रात्रौ अकरा वाजेपर्यंत दोघे टिव्हीवर कार्यक्रम पाहत होतो. तेव्हा सुमित्रा बरी होती. तिने कसलीच तब्येतीची तक्रार केली नाही. मी तिला नेहमी म्हणायचो, डॉक्टरांकडे जाऊन एकदा सर्व तपासून घेऊ. पण तिचे नेहमीचे म्हणणे, ‘‘एकदा डॉक्टरकडे गेला की, डॉक्टर मागे लागता. माका काय होवचा नाय. माझ्या माहेरची सर्व मंडळी निरोगी. माझ्या बाबांनी शेवटपर्यंत एक गोळी घेवकं नाय.’’
एवढ्यात बाळ्या आणि अरुणा हजर झाली. दोघांनी बाईंचे डोके आणि पाय पकडून त्यांना रिक्षात घेतले आणि अरुणा आणि वसंतराव मागे बसले. रिक्षा चालवायला बाळ्या. तालुक्याच्या गावाकडे निघाले. रिक्षा चालवता चालवता बाळ्या मनात विचार करु लागला - ‘‘बहुतेक पॅरालिसीस आसा. अशा पेशंटांका राण्यांच्या हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट करतत. वसंत मास्तरांका मात्र मोठा टेन्शन आसा. झिल अमेरिकेक आणि ही दोघा हयसर.’’ सकाळचे आठ वाजत होते. डॉक्टर राणे साडेनऊवाजता केबिनमध्ये येतले. तोपर्यंत हॉस्पिटलात जाऊन बाईंका अ‍ॅडमिट करुया. बाळ्याची रिक्षा राणे हॉस्पिटलमध्ये शिरली. बाळ्या आणि अरुणाने बाईंना उचलून आत घेतले आणि नर्सला बोलावले. नर्सने ब्लडपे्रशर तपासले आणि अ‍ॅडमिट करुन घेतले. सिरियस पेशंट अ‍ॅडमिट झाल्याचे कळताच डॉ. राणे लगबगीने आले. त्यांनी झटपट उपचार सुरु केले. इंजेक्शन दिले आणि सी.टी.स्कॅन करायला पाठविले. रिपोर्ट येताच डॉक्टरनी वसंतरावांना सांगितले, ‘‘मेंदूला थोडासा धक्का बसलाय परंतु त्या वाचल्या. ब्लडप्रेशर फार वाढले होते. आता यापुढे कसा काय रिस्पॉन्स देतात ते पाहू.’’ असे म्हणून डॉक्टरनी औषधांची चिठ्ठी वसंतरावांच्या हातात दिली. 
वसंतराव सुन्न बसून होते. त्यांच्या डोळ्यासमोर घरचे चित्र आले. आपण दोघेच राहणारे. मुलगा उदय अमेरिकेत. तशात चार महिन्यापूर्वी त्याने मुळ पंजाबी पण अमेरिकेत लहानाची मोठी झालेल्या मुलीबरोबर लग्न केलेले. या लग्नाला त्याच्या आईचा कडवा विरोध. सुनेला म्हणजेच रसिकाचा फोटो पण पाहिला नाही. उदयने लग्नासाठी येण्याचा खूप आग्रह केला. विमानाची तिकिटे पाठविली. पण त्याच्या आईने ठाम नकार कळविला. वसंतरावांच्या मनात आलं, आपला मधल्यामध्ये नाईलाज. आपले पत्नीसमोर काही चालत नाही. तिचा स्वभाव कोपिष्ट, रागाने घर डोक्यावर घेईन म्हणून आपणांस गप्प बसावे लागते. तो राग मनात ठेवून ती असावी. त्यामुळे एवढे प्रेशर वाढले आणि हॉस्पिटलमध्ये आणावे लागले. आता डॉक्टर काय सांगतात ते पहायचे.
 एवढ्यात अरुणा म्हणाली, गुरुजी उदय भावजींका कळवा तरी. बाळ्यापण म्हणाला, नाईक गुरुजी मी उदयाक फोन करु ? विचारमग्न नाईक गुरुजी बाळ्याच्या प्रश्नाने दचकले. ‘‘नको इतक्यात. दोन दिवसांनी किती प्रगती होता बघुया. आणि तेका कळवून तरी काय उपयोग? तो सातासमुद्रापलिकेडे तेका येवक गावतला की काय कोण जाणे? आणि तेच्या बायकोचा नाव घेतला तर नाईकबाई घर डोक्यावर घेतले. त्यापेक्षा बघुया वाट.’’ बाळ्या गप्प बसला. अरुणा नाईकबाईंच्या शेजारी बसून होती. नर्स अधुनमधून येऊन सलाईन चेक करत होती. नवीन नवीन इंजेक्शन टोचत होती. 
रात्रौ वसंतरावांना घरी पोहोचवून बाळ्या परत आला. रात्रौ पेशंट शेजारी अरुणा आणि बाहेर पॅसेजमध्ये बाळ्या. दुसर्‍या दिवशी दुपारी नाईकबाई हात हलवू लागल्या. डॉक्टर तपासून जात होते. औषधे बदलून देत होते. तिसर्‍या दिवशी नाईकबाईंच्या तब्येत थोडी सुधारणा दिसू लागली.  रात्रौ राऊंडला आल्यावर डॉक्टर म्हणाले, ‘‘औषधांनी त्यांना एवढ्यावर आणले. आता पुढे फिजिओथेरेपी करायला हवी. आपल्या भागात चांगले फिजिओथेरेपीस्ट नाहीत. तेव्हा मोठ्या शहरात नेऊन निदान तीन चार महिने फिजिओथेरेपी करावी लागेल. त्यानंतर माझ्या अंदाजाने त्या हिंडू फिरु लागतील. तो पर्यंत आपल्या हॉस्पिटलमधील नर्स थोडेफार फिजिओथेरेपी उपचार करेल. 
डॉक्टरांचे म्हणणे वसंतराव, बाळ्या, अरुणा ऐकत होते. वसंतराव चिंताग्रस्त झाले. आता काय करायचे? मोठ्या शहरात कशी व्यवस्था करायची? बाळ्या म्हणाला, ‘‘मी उदयाक फोन करतयं, तेचा मत घेतय.’’ ताबडतोब बाळ्याने उदयला फोन लावला. त्याच्या आईच्या आजाराबद्दल सर्व सांगितले. उदयला धक्का बसला. त्याने वसंतरावांकडे फोन द्यायला सांगितला. ‘‘बाबा, काय हे? दोन दिवसांपासून आई हॉस्पिटलमध्ये आणि तुम्ही आत्ता कळवतायं? 
‘‘नाही रे बाबा ! तुला कळवून तरी काय करायचे? तू एवढ्या लांब, आणि एवढ्या लांबून तुला बोलावून काय उपयोग? आता तिची प्रगती आहे. पण फिजिओथेरेपी करायला हवी. आपल्या भागात चांगला फिजिओथेरेपी करणारा कोणी नाही असे डॉक्टरांचे मत. पुण्या-मुंबईत न्यायला सांगत आहेत. बघु काय तरी. तुझ्या मामांना कळवितो. बघुया ते काय सोय करतात काय? उदय उत्तरला - ‘‘बाबा, मी तुम्हाला एका तासात फोन करतो.’’ अस म्हणून उदयने फोन ठेवला. एका तासानंतर उदयचा बाळ्याला फोन आला. ‘‘बाळ्या, माझी पत्नी रसिका उत्तम फिजिओ आहे. अमेरिकेतील मेडिकल कॉलेजमधली डिग्री होल्डर आहे. ती येथील मोठ्या हॉस्पिटलमध्ये फिजिओथेरेपीस्ट म्हणून काम करते. त्याच्यातील आधुनिक तंत्र तिला माहिती आहेत. त्यामुळे माझ्यापेक्षा तिचाच तेथे जास्त उपयोग आहे. म्हणून ती उद्या भारतात यायला निघते आहे. परवा दुपारपर्यंत ती गोव्याला पोहोचेल आणि संध्याकाळी राणे हॉस्पिटलमध्ये. सध्या माझे एका प्रोजेक्टवर काम सुरु आहे. त्याचा हेड मी आहे. त्यामुळे कमीत कमी दोन महिने मला रजा मिळणार नाही. पण रसिकाला मिळू शकेल. तेव्हा बाबांना सांग काळजी करु नका. रसिका परवा सायंकाळ पर्यंत तिथे पोहोचेल.’’ बाळ्याने उदयचे सर्व बोलणे वसंत मास्तरांच्या कानावर घातले. वसंत मास्तरांनी डोक्याला हात लावला. या सुमित्राक मी सांगितलेलय एकदा झिल परदेशाक गेलो म्हणजे परको झालो. तो आईवडिलांका विसारलो. आता हो आमचो झिल उदय आपण येवचा सोडून बायलेक धाडता. तिची भाषा पंजाबी आणि लहानपणापासून अमेरिकेक रवलेली तेका हयला काय कर्म कळतलां? त्यापेक्षा मी उदयच्या मामाक फोन करतय. त्याच्याकडे मुंबईक काय व्यवस्था होता काय बघुया.
वसंतरावांनी आपल्या मेव्हण्याला मुंबईस फोन लावला आणि सुमित्राची सर्व परिस्थिती सांगितली. मेहुण्यांनी आपली जागा खूप लहान आहे आणि सुनेचे बाळंतपण जवळ आल्याने काही सोय करता येत नाही असे सांगितले. वसंत मास्तर काळजीत पडले. त्यांनी आपला पुतण्या मोहन जो पुण्यात असतो. त्याला विनंती केली. त्यानेपण नन्नाचा पाढा लावला. डॉ. राणेंच्या हॉस्पिटलमधील नर्स तिला जमेल तशी ट्रिटमेंट देत होती पण त्यामुळे फार फरक पडत नव्हता. 
बुधवारी सायंकाळी पाच वाजता डॉ. राणेंच्या हॉस्पिटलमध्ये एक २७-२८ वर्षांची उंच, देखणी स्त्री प्रवेश करती झाली. आल्या आल्या तिने सुमित्रा नाईक यांच्या रुमची चौकशी केली. नर्सने रुम दाखवताच ती त्या रुममध्ये आली. पेशंटबरोबर अरुणा बसली होती. समोरच्या कॉटवर बाळ्या आणि वसंतराव बसले होते. तिने आत येताच वसंतरावांच्या पायाला हात लावून नमस्कार केला. ‘‘बाबा, मै रसिका, आपकी बहु, उदयकी पत्नी’’ वसंतराव बघतच राहिले. ही आपली सून एवढ्या लांबून आली. त्यांच्या मनात आले. उदयच्या मानाने ही मुलगी खूपच उजवी आहे. उंच, गोरी, स्मार्ट. बाळ्याकडे पाहत ती म्हणाली, ‘‘आप बाळाजी है शायद, और ये अरुणा? बराबर है?’’ बाळ्या धडपडत उठला. ‘‘हो, हो मी बाळ्या आणि ही माझी बायको अरुणा.’’ ‘‘ठिक है, मैं अभी पेशंटको देखती हूँ।’’ तिने सुमित्राबाईंच्या दंडाला हात लावला. मग डोळे उघडून पाहिले. हात उचलून पाहिला, पाय उचलून पाहिला. मग बेड शेजारील चार्ट पाहिला. मग ती वसंतरावांकडे वळून म्हणाली, ‘‘मैं डॉक्टरसाब से मिल के आती हूँ।’’ अस म्हणून ती रिसेप्शनीस्टकडे गेली आणि डॉक्टरसाहेबांना भेटण्याची तिने विनंती केली. रिसेप्शनीस्ट मंदा या स्त्रीच्या व्यक्तिमत्वामुळे बुजून गेली आणि तिने तातडीने तिला आत पाठविले. ‘‘नमस्ते डॉक्टर, मैं रसिका नाईक। सुमित्रा नाम की औरत आपके हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट है। मैं उनकी बहु। अमेरिकासे आयी हूँ।’’ 
डॉक्टर गडबडीने म्हणाले, ‘‘बैठिये, कब आयी है आप?’’
‘‘मैं पाच मिनट पहले आयी हूँ। उनके तबियतके बारे में पुछना चाहती हूँ।’’
‘‘सुमित्रा नाईक अब खतरेसे बाहर है। मगर, उनकी लेफ्टसाईडपर लकवा आया है। दवा के साथ उनको फिजिओ की जरुरत है। इसलिए मैने उनको किसी अच्छे फिजिओथेरेपिस्टसे इलाज करने को कहा है।’’
‘‘डॉक्टर, मैं तो अमेरिकामध्ये एक बडे हॉस्पिटलमें फिजिओ करती हूँ। और सब अ‍ॅडव्हान्स ट्रिटमेंट मैं जानती हूँ। मेरे साथ मैने नए इक्वीपमेंटस् और दवा लायी हूँ।’’
‘‘ तो अच्छा हूआ। आप घर लेके उपचार कर सकती है। मैं उनको कल डिस्चार्ज देता हूँ।’’
थँक्यू डॉक्टर म्हणून रसिका बाहेर आली. वसंतरावांना म्हणाली, ‘‘बाबा, मैंने डॉक्टरसाब से बात कि है। माँजी को कल डिस्चार्ज मिलेगा और कलसे मैं घरपर इलाज करुंगी। अभी कोई डरने की बात नहीं है। आज की रात मैं हॉस्पिटलमें रहूँगी और आप सबजन घर जाएँगे। ये अरुणा भी बहुत थक गयी होंगी। चार दिनसे उसे ठिक निंद नहीं मिली इसिलिए बालाजी आप सबको लेकर घर जाएँ। और खाली आप कल सुबह आए तो हम माँजी को लेकर घर जाएँगे।’’ 
अरुणा म्हणाली- ‘‘अगं पण तुला कसं जमेल? इथे ओळखपण नाही तुझी.’’
‘‘कौन कहता है, मेरी पहचान नहीं हैं? अब ये मंदा और हॉस्पिटल स्टाफ मेरे पहचान का है। चलो मंदासे पुछते है। 
रसिका अरुणाचा हात पकडून नर्स मंदाकडे गेली. तेव्हा मंदाच काय पण सर्व नर्सेस तिच्याशी अनेक वर्षाची ओळख असल्यासारखे बोलू लागली. अरुणाला कळेना की जेमतेम एका तासापूर्वी ती येथे आली आणि तीने सर्वांची ओळख केली केव्हा ? 
रसिका मंदाला म्हणाली, ‘‘मंदा, मैं रात को यहाँ ठहरती हूँ और बाकी सबजन काफी थके है, उन्हे घर भेजती हूँ। ठिक है ना ?’’
मंदा रसिकाकडे पाहून म्हणाली - ‘‘हा, हा, रहा ना. आमची बाजूला खोली आहे. तेथे रात्रौ रहा तुम्ही. बाकी आम्ही आहोतच रात्रभर. कसलीच काळजी करु नका. बाबांना पण घरी न्या आणि उद्या डिस्चार्ज घेण्यासाठी या.’’
अरुणा समाधानाने रुममध्ये गेली आणि तिने घरी जायची तयारी केली. वसंतराव काळजीच्या स्वरात म्हणाले, ‘‘काळजी घे गं रसिका..तुझ्यावर विश्वास ठेवून आम्ही जातोय. सकाळी बाळ्या रिक्षा घेऊन येईल.’’ सर्व मंडळी घरी गेली. रसिकाने सुमित्राबाईंचं अंग पुसून घेतलं. अंगावरचे कपडे बदलले. हॉस्पिटलमधील सर्व स्टाफ कौतुकाने बघत होता. आपआपसात कुजबुजत होता. इथे एका घरात अनेक वर्ष राहणारी सून सासूची काय काळजी घेते ते आम्ही पाहतो. पण एवढ्या पन्नास तासांचा प्रवास करुन आलेली ही मुलगी अनोळखी सासूची किती काळजी घेते बघा आणि ती अरुणा सांगत होती ही सुमित्राबाई म्हणे, तिचे तोंड पाहणार नव्हते. 
ती पूर्ण रात्र रसिका हॉस्पिटलमध्ये राहिली. मधले तीन तास बाजूच्या नर्सच्या खोलीत विश्रांती घेतली. आणि बाकी हॉस्पिटलचा स्टाफ सोबत होताच. सकाळी बाळ्या रिक्षा घेऊन आला. तो पर्यंत रसिकाने डिस्चार्ज घेऊन हॉस्पिटलचे बिल भागवून घरी जाण्याची तयारी केली होती. दोन्ही बाजूला उचलून हॉस्पिटल स्टाफने त्यांना रिक्षात झोपवलं. रसिका बाजूला बसली. आणि सर्व हॉस्पिटल स्टाफने रसिकाला बाहेर येऊन निरोप दिला. 
रिक्षा घरी पोहोचली आणि रसिका आणि अरुणाने पुन्हा सुमित्राबाईंना उचलून घरात आणले आणि बेडवर झोपवले. रसिका आपले घर पाहत होती. भारतात ती चार-पाच वेळा येऊन गेली होती. पण थेट विमानतळ आणि टॅक्सीने पंजाबमधील नातेवाईकांची हवेली. कोकणातील उतरत्या छप्परांची जांभा दगडांची घरे ती प्रथमच पाहत होती. रसिका पुर्ण घर फिरली. मागील दारची पाण्याने तुडुंब भरलेली विहिर तिने पाहिली. विहिरीपलिकडील नारळी फोपळीची झाडे तिला आवडून गेली. घराच्या दारातली तुळशी वृंदावन ती प्रथमच पाहत होती. देवासाठी स्वतंत्र खोली, स्वयंपाकघरात गॅससोबतच मातीची चूल तिला नवीन होती. अमेरिकेत भारताचा भूगोल शिकवताना तिने हे सर्व वाचले होते. आता प्रत्यक्षात पाहत होती. तिने आपली बॅग सासूबाईंच्या खोलीतच ठेवली. कारण रात्रंदिवस त्यांच्यावर व्यवस्थित लक्ष ठेवायला मिळेल म्हणून. तो पर्यंत अरुणाने सर्वांसाठी चपाती भाजी आणली. रसिकाने बाबांना चपाती भाजी दिली आणि आपण खायला बसली. भाजीबरोबर चपातीचा एक तुकडा तोंडात टाकला मात्र तिला हे खाणे फार आवडले. माहेरी पंजाबी जेवण जेवून जेवून त्याची सवय झाली होती. पण हे महाराष्ट्रीयन जेवणपण तिला आपलेसे वाटले. तिने ठरविले. अरुणाकडून हे जेवण शिकून घ्यायचे. शेवटी माझ्या नवर्‍याला, सासूसार्‍यांना हे जेवण आवडते. त्यांच्या आवडीचे जेवण मला यायलाचं हवे. 
मग तिने बेडवरील सुमित्राबाईंकडे मोर्चा वळविला. तिने अरुणाला बोलावले आणि फिजिओच्या नियमाप्रमाणे बेडची दिशा बदलून घेतली. पहिल्यांदा तिने पेशंटचा हात हातात घेतला आणि हाताचे व्यायाम सुरु केले. हे पंधरा मिनिटे केल्यावर डाव्या पायाचे व्यायाम सुरु झाले. मग हात आणि पायावर अमेरिकेहून आणलेल्या रोलरने शेक दिले. मग चेहर्‍याचे व्यायाम. मग डोळ्यांचा व्यायाम. असे अनेक व्यायाम सटासट सुरु झाले. दोन तास असे व्यायाम सुरु होते आणि वसंतराव, बाळ्या आणि अरुणा आश्चर्याने बघत होती. या एवढ्याशा मुलीच्या अंगात किती ताकद आहे असे वसंतराव मनातल्या मनात म्हणत होते. दोन तास व्यायामानंतर अमेरिकेतून आणलेले जेल अंगावर पसरविले आणि अरुणाच्या मदतीने गरम पाण्याची आंघोळ. सुमित्राबाईंना गाढ झोप लागली. शेक सुरु असताना सुमित्राबाईंनी ‘हाय’ म्हटले असे वसंतरावांना वाटले. त्यांना खात्री वाटू लागली की या उपचाराने सुमित्रा खडखडीत बरी होणार. त्यांना या मुलीबद्दल ममत्व वाटू लागले. कुठे ही अमेरिकेत जन्म घेतलेली मुलगी उदयला मित्रांच्या घरी भेटते काय, दोघे प्रेमात पडतात काय, लग्न करतात काय आणि लग्नानंतर फक्त चार महिन्यानंतर उदयची आई अर्धांगाने आजारी पडली म्हणून अमेरिकेहून तातडीने येते काय, सारेच आश्चर्यकारक. 
दुसर्‍या दिवशी रसिकाने सासुबाईंकडून व्यायाम करुन घेतलेच पण अरुणाला बोलावून ती मालवणी जेवण शिकू लागली. शिवाय युट्युबवर बरीच माहिती होतीच. दुसर्‍या दिवशी तिने कुळथाची पिठी केली. वसंतरावांना ती फार आवडली. मग ती भाकरी थापायला शिकली. माशांचे कालवण करायला शिकली. वसंतराव पण सुनेला मदत करत होते. नारळ किसून देत होते. कांदे लसूण सोलून देत होते. 
उदयचा रोज फोन येत होता. आईची तब्येत सुधारते आहे या बातमीने त्याला आनंद होत होता. आपण स्वतः न जाता रसिकाला पाठवायचे ठरविले आणि रसिका एका मिनिटात तयार झाली याचे त्याला खूप बरे वाटत होते. आता दोन महिन्यात प्रोजेक्ट संपला की आपण भारतात जाऊ आणि चांगले महिनाभर राहून आईची सेवा करु आणि येताना रसिकाला घेऊन अमेरिकेत येऊ अशी स्वप्ने तो पाहत होता. रसिकाच्या उपचाराने सुमित्राबाई डोळे उघडून पाहत होत्या. हाताची, पायाची हालचाल करत होत्या. त्यांच्या डोक्यात सतत प्रश्न येत होता, आपल्या घरात वावरणारी ही स्त्री कोण? हे त्यांना विचारायचे होते पण बोलता येत नव्हते. रसिकाने आता त्यांच्या जिभेचे व्यायाम सुरु केले. त्यासाठी अमेरिकेतून एक कंपन पावणारे मशिन तिने आणले होते. त्यामुळे जिभ कंप पावत होती आणि तोंडात व्यवस्थित फिरत होती. रसिकाचा अंदाज होता साधारण दिड महिन्यात सासूबाई व्यवस्थित बोलू लागतील. चालू लागतील. तोपर्यंत न थकता हे व्यायाम व्हायला हवेत. 
       दरम्याने, चीनमध्ये एका व्हायरसने धुमाकूळ घालायला सुरवात केली होती. लाखो लोक या व्हायरसने आजारी पडले. अनेकजन मेले. हळूहळू हा विषाणू जगभर पोहचला. अमेरिकेमध्ये सुध्दा अनेक लोकांना बाधा झाली. हा विषाणू भारतातपण आला. त्यामुळे बाजारपेठा बंद करण्यात आल्या. भारत सरकारनेपण देश बंद करण्याची घोषणा केली. विमानसेवा, रेल्वेसेवा बंद झाल्या. उदय अमेरिकेत आणि रसिका भारतात अशी परिस्थिती झाली. विमानसेवा बंद होण्याच्या मार्गावर असताना उदय रसिकाला सांगत होता भारतातून लवकर निघ नाहीतर तू तिथे अडकशील. रसिकाने उत्तर दिले सासूबाईंना पूर्ण बरे व्हायला किमान दोन महिने लागतील तो पर्यंत मी भारत सोडू शकत नाही. 
       भारतातही मोठ्या पासून छोट्यापर्यंत कारखाने, व्यवसाय बंद झाले. जिकडे तिकडे शुकशुकाट पसरला. हातावर पोट असलेल्या माणसांचे खूप हाल झाले. रसिकाच्या लक्षात आले. आपल्या गावातील तरुण-तरुणी सध्या घरीच असतात. बारीक सारीक काम करणारे, मोलमजूरी करणारे, गवंडी काम करणारे, काम नसल्याने घरी आहेत. सरकारने थोडेफार धान्य दिले. तरी इतर व्यवहारासाठी पैसे कोण देणार? रसिकाला वाटले. आपण या मंडळींसाठी काही तरी करायला हवे. तिने वसंतरावांना विचारले - ‘‘अपने घरकी कुछ जमीन वगैरा है क्या? जहा कुछ पेड लगा सकते है।’’ वसंतराव म्हणाले - आमची पंधरा एकर जमीन आहे. पण ती डोंगराळ आहे. त्या भागात पाणी फारसे मिळणार नाही. तो भाग सपाट करुन घेतला पाहिजे. खूप खर्च येईल आणि खूप मेहनत करायला लागेल. सायंकाळी रसिका उदयशी फोनवर बोलली. आपण ती जमीन लागवडीखाली आणूया. खूप खर्च येईल. तुझे काय मत आहे? उदय म्हणाला - तू बघून तर ये. आईबाबांची इच्छा पण आहे. त्या जमिनीवर काही लागवड व्हावी. पण त्यांना ते शक्य झाले नाही. नाही तरी या लॉकडाऊनमुळे तू तिथे आहेस. पैशांची काळजी नाही. पण कितपत जमेल ते पहा. दुसर्‍या दिवशी रसिकाने बाळ्या आणि अरुणाला बोलावले. तिने तिची कल्पना सांगितली. पंधरा एकर जमिनीची पाहणी करुया. सायंकाळी सर्वांनी जागा पाहिली. त्यावर खूप रानटी झाडे होती. जमीन डोंगर उतरणीवर होती. मोठ मोठे खडक होते. जवळपास पाणी कुठे नव्हते. प्लॉटवर जायला व्यवस्थित जागा नव्हती. बाळ्या रसिकाला म्हणाला - ‘‘भाभी, इथे आंबे लावणे कठिण आहे कारण पाणी जवळपास नाही. पण डोंगरउताराला काजू कलमे लावता येईल. त्याला फारसे पाणी लागत नाही. तसेच साग आणि बांबूची लागवड करता येईल. अर्थात खर्च खूप येणार. सायंकाळी रसिकाने उदयच्या कानावर हे घातले. आपल्याला एकट्याला एवढी मेहनत आणि लक्ष देणे जमणार नाही. पण यातील पाच एकर जमीन बाळ्या आणि अरुणाला देऊ. नाहीतरी तुला ते भावासारखेच आहेत. सर्व खर्च आपण करु. पण बाळ्या सर्व काम करुन घेईल. हे उदयला आवडले. तसेच वसंतरावांना पण खूप आवडले. बाळ्या आणि अरुणाला मग उत्साह आला. नाहीतरी त्यांचेकडे काहीच जमीन नव्हती. लॉकडाऊनमुळे बरेच कामगार घरीच होते. त्यांनापण रोजगार मिळावा आणि आपले काम व्हावे हा हेतू. बाळ्याने दोन जेसीबी मागविले आणि पंधरा दिवस प्लॉटभर फिरवून जमीन साफ करुन घेतली. तो पर्यंत पाऊस जवळ आला होता. रसिका आणि बाळ्या वेंगुर्ल्यांत फळ संशोधन केंद्रात जाऊन नवीन जातीची काजू कलमे पाहून आले. बाळ्या रसिकाला म्हणाला, ‘‘भाभी, या वर्षी बांधकामे बंद आहेत. त्यामुळे दगड खाणीवरील दगड पडून आहेत. आपल्याला निम्मे दराने मिळतील. ते घेतले तर कंपाऊंड करुन टाकू म्हणजे गुरांपासून बचाव.’’ रसिकाने मान्यता दिली. दुसर्‍या दिवशीपासून जवळच्या दगड खाणीतून दगड येऊन पडू लागले. गावातील कामाशिवाय बसलेल्या गवंड्यांना बोलावून कंपाऊंड करणे सुरु झाले. सहा गवंडी आणि दहा मदतनीस राबू लागले. कंपाऊंड झाले तोपर्यंत पाऊस सुरु झाला. पहिल्या पावसातच वेंगुर्ल्यांतून काजू कलमे आणली आणि डोंगर उतारावर लावली. गावातील दहा माणसांना काम मिळाले. मग आंबेगावाहून साग रोपे आणि बांबू रोपे आणली. सुमारे वीस दिवसात पूर्ण बाग तयार झाली. वसंतराव रोज बाळ्याच्या रिक्षेतून प्लॉटवर जात होते. दिड महिन्यात ओबडधोबड जमिनीवर एवढी बाग तयार झाली हे सत्य की स्वप्न हे त्यांना कळेना. आपली पत्नी बरी झाली की तिला ही बाग दाखवायची हे त्यांनी ठरविले. या जमिनीवर बाग करण्याची तिची इच्छा होती. पण ती तिच्या सूनेने पूर्ण केली. सुमित्राबाईंची पण तब्येत पूर्णपदावर येत होती. रसिकाच्या ट्रिटमेंटने त्यांचे सर्व अवयव काम करु लागले होते. आता त्या अडखळत बोलू लागल्या होत्या. थोडंफार चालू लागल्या होत्या. त्या हात हलवून ही मुलगी कोण असे वसंतरावांना विचारत होती पण वसंतराव गालातल्या गालात हसत पण काही सांगत नव्हते. सुमित्राबाई बाळ्या तसेच अरुणाला खूणाकरुन विचारत होत्या. घरात वावरणारी आणि माझी एवढी सेवा करणारी ही मुलगी कोण? पण ती दोघपण काही सांगत नव्हती. 
सारं जग स्तब्ध झालं होतं. अमेरिकेत कोरोना पेशंट वाढत होते. रसिकाला उदयची काळजी वाटत होती. त्याचे तिकडे वर्क प्रâॉम होम सुरु होतं. इकडे घरात तिचे सासूसासरे होते. शेजारी बाळ्या आणि अरुणा होती. या सर्वांची काळजी ती घेत होती. सर्वांना गरम पाणी, लिंबू सरबत, गरम पाण्याचा वाफारा सुरु होतं. 
सुमित्राबाईंना आजारी पडून आता तीन महिने झाले होते. डॉक्टर राणेंनी दर महिन्याला तपासायला आणा असे सांगितले होते. पण कोरोनामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये नेता आले नव्हते. आता सुमित्राबाई थोडेफार चालतात, थोडेफार बोलतात तेव्हा आता डॉक्टरांना दाखवावे असे रसिकाने ठरविले. तिने डॉ. राणे यांना फोन केला आणि पेशंटला केव्हा त्यांच्या हॉस्पिटलमध्ये आणू असे विचारले. डॉ. राणे म्हणाले, कोरोनामुळे त्यांना इथे आणणे धोक्याचे आहे, त्या ऐवजी मी स्वतः तुमच्या घरी येत्या रविवारी येतो आणि पेशंटला पाहतो आणि तुमच्या हातचा चहापण पितो. अशा रितीने डॉ. राणे रविवारी वसंतरावांच्या घरी आले. पेशंटची तब्येत पाहून खूश झाले. त्यांना चालताना थोडे थोडे बोलताना पाहून त्यांना आनंद झाला. डॉक्टर सुमित्राबाईंना म्हणाले - ‘‘सुमित्राबाई, तुम्ही बर्‍या झाल्यात कोणामुळे माहिती आहे? माझ्यामुळे नाही या तुमच्या सूनेमुळे, ही तुमची सून अमेरिकेहून धावून आली आणि ती स्वतः फिजिओ असल्यामुळे तिने तुमच्यावर उपचार केले. नाहीतर तुम्हाला मुंबईस किंवा पुण्याला न्यावे लागले असते.’’ सुमित्राबाई तोंड उघडे ठेवून ऐकत राहिल्या. ही घरात वावरणारी, आपल्यावर उपचार करणारी, प्रेमाने वागणारी ही आपली सून? उदयची बायको, मग उदय कुठे आहे? या सूनेचे मी तोंड पाहणार नाही असे बोलले होते. म्हणून देवाने मला शिक्षा दिली होती कि काय? पण या शिक्षेतून या मुलीनेच मला बाहेर काढले. तरीच मी नवर्‍याला, बाळ्याल, अरुणाला विचारत होते की, ही मुलगी कोण? सगळे गालातल्या गालात हसत होते आणि काही सांगत नव्हते. सुमित्राबाईंनी खूणेने रसिकाला जवळ बोलावले. तिच्या केसावरुन हात फिरवताना त्यांना रडू आले. किती गोड माझी पोर. अशी मुलगी लाखात एक. शोधूनपण सापडणार नाही. असेल पंजाबी की आणखी कोण, पण मालवणी जेवण पण सर्व करते आणि केवढी मोठी बाग तिने तयार केली. सुमित्राबाईंच्या डोळ्यातून अश्रूधारा वाहत होत्या आणि अमेरिकेतून आलेली त्यांची सूनबाई ती पुसत होती. हे दुर्मिळ दृश्य डॉ. राणे, वसंतराव आणि बाळ्या अरुणा पाहत होती. या सर्वांनापण गहिवरुन आले. डॉक्टरपण गहिवरले होते. पण आपला घसा खाकरुन ते म्हणाले, ‘‘रसिकाजी, आप..’’ डॉक्टरनी हिंदीत बोलायला सुरुवात करताच, रसिका म्हणाली, - ‘‘डॉक्टर मराठीत बोला. मला आता मराठी येते.’’ डॉक्टर म्हणाले, ‘‘रसिकाजी तुम्ही मराठी शिकला नसता तर मला आश्चर्य वाटले असते. तीन महिन्यापूर्वी तुम्ही अमेरिकेतून दोन दिवसात इथे पोहोचलात आणि ज्या तडफेने सासुबाईंवर उपचार सुरु केलेत ते माझ्या स्टाफने मला सांगितले. तेव्हाच मी ओळखले होते, हे पाणी काही वेगळे आहे. एकदा परदेशी गेलेले तरुण आपल्या आईवडिलांना विसरतात. त्यांना वृध्दाश्रमात ठेवतात हे कॉमन झाले आहे. या विषयावर अनेक कथा, कविता, नाटके आली. काही ठिकाणी परदेशी गेलेल्या मुला-मुलींच्या पालकांची मंडळे स्थापन झाली आहेत. परंतु यातील काही मुलं आपल्या आईवडिलांची व्यवस्थित काळजी घेतात एवढेच नव्हे तर शिक्षण किंवा पुरेसे पैसे जमले की परत आपल्या देशात येतात आणि आपल्या आईवडिलांना जपतात यावर कोणी कथा, कविता किंवा नाटके किंवा आताचे व्हॉटसअ‍ॅप, फेसबुक ब्लॉक करत नाहीत. रसिका तुझे उदाहरण म्हणजे अशा परदेशी गेलेल्या पण भारतात येऊन स्थायीक झालेल्या आणि म्हातार्‍या आईवडिलांची काळजी घेणार्‍या मुला-मुलींसाठी आदर्श आहे. मी आजच सुमित्रा बाईंचे आजारपण आणि त्यांच्या सूनेने अमेरिकेहून येऊन केलेले उपचार यावर लेख लिहीणार आहे. मुंबईतील इंग्रजी, मराठी तसेच आम्हा डॉक्टर्स असोसिएशनच्या सोयोनिअर मध्ये पाठविणार आहे. 
रसिकासह सर्वजन सद्गतीत झाले होते. रसिका आपले कौतुक ऐकून संकोचून गेली होती. सुमित्राबाई वारंवार रसिकाच्या केसावर हात फिरवत होत्या. वसंतराव, बाळ्या, अरुणा सर्वजन डोळे पुसत होते. 
डॉक्टर्स पुढे म्हणाले, ‘‘रस्िाका सध्या जगात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे तुझा नवरा तिकडे आणि तू इकडे अशी परिस्थिती आहे. पण हा कोरोना लवकरच संपेल आणि विमान सेवा सुरु होईल त्यावेळी तू तुझ्या नवर्‍याकडे परदेशी जाशील. मग मला प्रश्न पडतो आमच्या सारख्या छोट्या शहरात कितीतरी सुमित्राबाईंसारखे पेशंट येतात आणि त्यावर मनासारखे उपचार करणारी रसिका नसते. त्यामुळे पेशंटमध्ये किती सुधारणा होणार यावर मर्यादा येते. असो. मी निघतो. या पेशंटची मला काळजी नाही. दोन महिन्यात हा पेशंट चालत माझ्या हॉस्पिटलमध्ये येणार.’’ डॉक्टर गेले.
रसिका विचार करता होती. डॉक्टर म्हणाले ते खरे आहे. माझ्या सासुबाईला मिळाला तशी ट्रिटमेंट इथल्या पेशंटना मिळायला हवी. या छोट्या शहरात कुशल फिजिओ यायला तयार नसतात. आणि इथल्या लोकांना मोठ्या शहरात जाणे जमत नाही. मला वाटते माझी इथे गरज आहे. शिवाय माझ्या सासू-सासर्‍यांना माझी आणि उदयची गरज आहे. आम्ही मोठ्या कष्टाने मोठी बाग उभी केली आहे. त्यावर लक्ष देणे गरजेचे आहे. मी इथे राहू शकेन. तसे माझ्या आईबाबांना पण मी भारतात राहिले तर आनंद होईल. पण उदयचे काय? त्याची नोकरी, त्याचे करिअर ? काहीतरी विचार करायला हवा. 
त्या रात्री फोनवर रसिका उदयशी या बद्दल भरभरून बोलली. उदयला पण पटत होते. पण नेमके काय आणि कसे करायचे याचा विचार सुरु झाला. 
पुढिल काही महिन्यात कोरोना कमी झाला. तशी रसिकाने डॉक्टर राणेंच्या मदतीने त्यांच्या हॉस्पिटलमध्ये जागा मिळविली आणि ‘‘सुमित्रा फिजिओथेरेपी सेंटर’’ सुरु केले. आपल्या मदतीस अरुणाला घेतले. इतर घरची आणि बागेची काम पाहणारा बाळ्या होताच. दोन वर्षात बागेतील झाडांना जोर धरला. दुसर्‍याच वर्षी काजू कलमांना भरघोस काजू लागले. वसंतरावांनी सुमित्राबाईंना नेऊन बाग दाखविली. तेव्हा या ओसाड जमीनीवर आपल्या सुनेने जे नंदनवन उभे केले ते पाहून त्यांना सुनेचा अभिमान वाटला. 
आंतरराष्ट्रीय विमान सुरु होताच उदय घरी आला. वर्क प्रâॉम होम सुरु असल्याने त्याची नोकरी व्यवस्थित सुरु झाली. परंतु कंपनीने पुन्हा कंपनीत बोलावल्यास कंपनी सोडायची आणि भारतात दुसरी कंपनी स्विकारायची व पुणे किंवा मुंबईत जॉब घ्यायचा हे त्याने ठरविले. 
‘‘सुमित्रा फिजिओ सेंटर’’ ने थोड्याच दिवसात नाव मिळविले. संपूर्ण जिल्ह्यातून डॉक्टर्स पेशंट पाठवू लागले. रसिका मनापासून उपचार करु लागली. उदय आपले काम संपले की बागेत जाऊ लागला. झाडांची मशागत करता करता त्याला भलताच आनंद होऊ लागला. वसंतराव नाईक गुरुजी आणि सुमित्राबाई लवकरच आजी-आजोबा होणार असल्याची बातमी आली आणि नाईक कुटुंब आनंदात बुडाले. डॉ. राणे यांनी सुमित्राबाईंच्या आजाराबद्दल लिहिलेला लेख महाराष्ट्रातील सर्व अग्रणी वर्तमानपत्रात प्रसिध्द झाला. डॉक्टर्स सोयोनिअर मध्ये प्रसिध्द झाल्यामुळे भारतभर गाजला. हा लेख वाचून आणि त्यावरील चर्चा ऐकून परदेशी नोकरी निमित्त गेलेल्या मुलांच्या आईबाबांच्या आशा पल्लवीत झाल्या. आपल्याला पण रसिकासारखी सून मिळावी आणि तिने नवर्‍याला परत आपल्या देशात आणावे म्हणून ते प्रार्थना करु लागले.

प्रदीप केळुसकर
मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...