पार वठलेलं झाड अकस्मातपणे फुलावं, बहरावं, त्याच्या फांद्यांना पुन्हा एकदा पालवी फुटावी अशी गत त्याची झाली. वयाच्या बहात्तराव्या वर्षी त्याला अकस्मातपणे नवी बायको गवसली. विशेष म्हणजे, ही नवविवाहिता सुद्धा तब्बल बावन्न वर्षांची !
मुख्याध्यापक पदावरून नवृत्त झालेला तो म्हणजे अवघ्या जिल्ह्याला ठाऊक असलेलं अत्यंत कलंदर व्यक्तिमत्त्व. पहावं तेव्हा त्याच्या वाणीतून कोणती ना कोणती तरी आगळी-वेगळी स्टोरी समोरच्याला ऐकायला मिळायची. 'सुख पहावं वाटून.. पण दु:ख ठेवावं झाकून' या तत्त्वाला आजपर्यंत तो जगलेला. दोन वर्षांपूर्वी त्याची पत्नी आकस्मितपणे काळाच्या पडद्याआड निघून गेली. मुलगा नोकरीनिमित्त परदेशात तर मुलगी लग्न होऊन सासरी गेलेली. घरात तो एकटाच. त्यामुळं पत्नी विरहाचं दु:ख एकांतात दाबून ठेवून समाजात तो नेहमीप्रमाणं हसत-खेळतच राहिला. त्याच्या पत्नीच्या वर्षश्राद्धाला सारे नातेवाईक जमलेले. घरात एकटं राहणार्या त्याची असहाय्य अवस्था अनेकांना पाहवली नाही. त्यांनी दुसर्या लग्नाचा प्रस्ताव त्याच्यासमोर ठेवला. तो अगोदर दचकलाच. 'बहात्तराव्या वर्षी लग्न? शक्यच नाही !' असं त्याने ठामपणे सांगितलं; परंतु मुलांनीच त्याला नीट समजावून सांगितलं. 'हौस' म्हणून नव्हे तर 'गरज' म्हणून हा विवाह किती योग्य आहे, हे पटवून दिलं.
अखेर तो लग्नाला तयार झाला. काही दिवसांपूर्वी वधू-वर सूचक मंडळात त्याचं नाव नोंदविलं गेलं. 'त्याच्या काळातली' अन् त्याला अनुरूप अशी वधू मिळणं अत्यंत अवघड होतं, जवळपास अशक्यच होतं; परंतु त्याच्या ललाटावरची विवाहरेषा कदाचित अत्यंत मजबूत असावी. सोलापूरच्या एका बावन्न वर्षाच्या मुलीचं स्थळ त्याच्यासाठी चालून आलं. लहानपणीच वडील वारल्यामुळं तिने विधवा आईसाठी आयुष्यभर लग्न केलं नाही. एका आर्किटेक्टच्या कार्यालयात नकाशे बनविण्याची नोकरी तिने केलेली. अलीकडेच तिची आई सुद्धा वारली. तिचंही शरीर थकलेलं. नोकरी सोडल्यानंतर नव्वद वर्षीय मामांनी तिला सांभाळून घेतलेलं. अशी ही निराधार अविवाहिता त्याच्या सानिध्यात आली.
आपल्याकडं परंपरेनुसार 'मुलगी पाहण्यासाठी' तिच्या घरी वराकडचे जातात; परंतु इथं खुद्द तीच त्याच्या घरी आली. दोन दिवस त्याच्या घरात राहून तिने सारी माहिती जाणून घेतली. नंतर पुन्हा दोन-चार वेळा या दोघांच्या गाठीभेटी झाल्या. एकमेकांना समजावून घेतलं गेलं. मगच लग्नाचा निर्णय पक्का झाला.
लग्नानंतर आता ही जोडी शहराच्या रस्त्यांवरून आपल्याच नादात फिरते, तेव्हा ओळखीचे त्यांच्याकडं वळून-वळून पाहतात. 'आजोबांबरोबर फिरणार्या या नवीन आज्जी कोण?' असा प्रश्न एकमेकांना विचारतात, परंतु खूप कमी लोकांना माहितेय या दोघांचा हा योगायोग.
रुढी-परंपरा झुगारून देऊन आयुष्यातला प्रत्येक क्षण टिपणार्या या अनोख्या दाम्पत्याची ही गोष्ट विलक्षणच म्हणावी ना?
© ® हिरा कातोरे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा