बुधवार, ४ डिसेंबर, २०२४

1567. सहजीवन

      तुम्हांला आज एक अविश्वनीय गोष्ट सांगते. एका गोड जोडप्याची. सहजीवन काय असतं नि कसं असतं त्याची. नशिबाची फिरकी ज्यांनी ज्यांनी अनुभवलेली आहे आणि ज्यांनी आपल्या जोडीदारासोबत एकरूपता अनुभवली आहे, त्यांना ही गोष्ट फार भावणार आहे. माझ्या परिचयातील हे आज्जीआज्जोबा. जे सध्या नव्वदच्या घरात पोहोचूनही सगळी कामे स्वतःची स्वतः करतात. स्वतःच एकमेकांना जपतात. मी अगदी लहानपणापासून ह्यांना बघत आलीये. तर आत्ताही अधूनमधून कधीतरी त्यांच्या भेटीला जात राहते. नेहमी जाणं जमत नाही आम्हाला, मग निदान फोनवर तरी बोलत असतोच. तेही आठवण येईल तेव्हा आम्हाला फोन करत असतात. त्यांच्याने आता जास्त बोलणं होत नसलं तरीही आपल्या दोन शब्दांनी त्यांना आनंद आणि समाधान दोन्ही लाभतं, हे त्यांच्या बोलण्यातून जाणवत राहतं. आम्हालाही या दोघांशी बोलून, दोघांना बघून खूप ऊर्जा मिळते. 
     दोघेही वयाने नव्वदीच्या घरात आहेत. अगदी भरलं कुटुंब जगलेले, कुणास ठाऊक पण दृष्ट लागावी असं काहीसं यांच्या उत्तरार्धात घडत गेलं. त्यामुळे या कठीण वयात दोघे एकटेच असतात. वाईट असतं फार, या वयात कुटुंबापासून एकटं पडणं, कुणीही काळजी घेणारं जवळ नसणं. पण ते शोकांतिका गात नाहीत. एकमेकांना सोबत करतात. सोबत करणे म्हणजे काय? प्रत्येकाची व्याख्या थोडीफार वेगळी असू शकते. पण 'सोबत' कशी असावी आणि सहजीवन कसं असावं...ह्याचं हे जोडपं अगदी खास उदाहरण आहे. आता आपणच आहोत एकमेकांसाठी हे जाणून असलेले आज्जोबा आतापर्यंत अगदी अविश्वसनीय पद्धतीने तब्बल सहाव्यांदा यमराजाला हुलकावणी देऊन आलेले आहेत. व्हेंटिलेटर, डायलीसिस अन काय काय झिडकारून हा माणूस जेव्हा जेव्हा परत आलाय, तेव्हा तेव्हा पहिल्यांदा डोळे उघडताच आजीला म्हणाले आहेत, "आलो गं परत ".
आज्जी आधीच विश्वास असल्यासारख्या, जेव्हा फक्त हसतात, पदराने हळूच आपले डोळे पुसतात अन त्याच ओलसर पदराने, एवढी मोठ्ठी लढाई जिंकून आलेल्या आपल्या प्रिय नवऱ्याचा अगदी कौतुकाने चेहरा पुसतात, तेव्हा आपल्याही डोळयांत आपसूक पाणी तराळतं. 
किती ही परतण्याची जिद्द, किती ही जबाबदारीची जाणीव, किती हा आत्मविश्वास, किती हे प्रेम... अद्भुत ❤️
"आज्जी, खूप कम्माल आहे ह्यांची"... असं कित्येकदा डॉक्टरही बोलून चुकलेले आहेत. 
आम्ही जेव्हाही भेटतो, तेव्हा त्या म्हणतात, 'त्यांना माझी काळजीये गं...कुठेच जात नाहीत ते मला टाकून. त्यांच्याशिवाय माझं कोणी करणारं नाही ना, माहित्येय त्यांना... येतात गुपचूप परत.' 
एकवेळ अशी होती, की घरात हे जोडपं, ह्यांचे आईवडील, मुलं-सुना, मुली-जावई, नातवंड एवढं भरलं कुटुंब होतं. कधीच, कुठलीच कुरबूर न करता आजीआजोबांनी नेटाने आपल्या संपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडल्यात. पण नियती कुणाला चुकलीये. नशिबाचे पासे उलट पडलेत. आज सगळे सगेसोयरे फक्त नावालाच आहेत. ह्यांची जबाबदारी कुणीही घेणारं नाही. सगळे आपापल्या पद्धतीने कारणं देऊन मोकळी झालीत. अगदी सिनेमास्टाईल. मित्रपरिवार मात्र येतजाऊन असतो. आता वयोमानानुसार ही दोघं कुठेच जाऊ शकत नाहीत. जोवर जाऊ शकत होतें, तोवर सगळा मानापमान गिळून स्वतःच नातवंड पतवंडांना भेटून यायचे. भेटी द्यायचे, हातावर भरगच्च खाऊ ठेवायचे. आजीला झालं त्याचं फार दुःख आहे. आजोबा मात्र कुटुंबाविषयीं कुठलंही भाष्य टाळतात. त्यामुळे मीपण त्यांचं खाजगी आयुष्य इथे मांडायला नकोय. सगळं ऐकलं तर, का असं वागू शकतं कुणी? प्रश्नच पडतो. नियतीचं विशेषच आहे हे, 'दात आहे तर चणे नाही... चणे आहेत तर दात नाहीत.'
     आजीचं कमरेचं ऑपरेशन झालं तेव्हा डॉक्टरांनी सांगितलेलं, हया आता जास्त चालू शकणार नाहीत. पण आज्जोबा एकटेच सगळी कामे कशी करणार म्हणून आज्जी आपोआप चालायला लागल्या. हळूहळू चालतात. कधीकधी आम्ही जायचो तेव्हा आमच्यासाठी काहीतरी खाऊ आणायला त्या उठायच्या. किचन लागूनच असलं तरीही पंधरा मिनिटं हळूहळू जायला नि पंधरा मिनिटं परत यायला लागायचे. बरेचदा आम्ही फार घाईत असायचो पण एकमेकांकडे बघून आम्ही ठिक आहे म्हणून इशारा करायचो. त्यांचं मन मोडणं आम्हां दोघांनाही पटायचं नाही. आता मी त्यांना जवळच खाऊचा डब्बा घेऊन बसायला सुचवलंय. तर आता त्या हळदीकुंकवाचा करंडा आणण्यासाठी जातात. आज्जोबा आत्ताही धावपळ आहेत. ते म्हणतात, अगं मी आणून देतो, तर आज्जी म्हणतात...मग लावूनही तुम्हीच द्या की...हे असंय. आपापल्या वाट्याला आलेली कामं आपणच करायची असं दोघांनी जणू ठरवलेलंच आहे. आजोबांचा हातभार मात्र प्रत्येक कामात असतोच. "सतत चालत राहणे " हेच त्यांच्या आरोग्याचं गमक आहे हे आम्ही ओळखलंय. यांना बघून एकाचवेळी खूप नवल आणि काळजी अशी संमिश्र भावना आपल्या मनात उमटल्याशिवाय रहात नाही. 🌿 आज्जोबा पेशाने कृष्ठरोगाचे सरकारी डॉक्टर राहिलेले आहेत. नोकरीत अत्यंत प्रामाणिक सेवा देऊनही शांत बसले नाहीत, तर वयाच्या नव्वदीत असतांनादेखील अजूनही ते स्वतःच्या घरी, गेल्या बत्तीस वर्षांपासून अविरत सुरु असलेला होमिओपॅथी धर्मार्थ दवाखाना चालवतात हे विशेष. संपूर्ण आयुष्य त्यांनी समाजसेवेत खर्ची घातलंय. म्हणूनच ह्या माणसाच्या चेहऱ्यावर नितांत समाधान जाणवतं. प्रत्येक कार्यात हिरीरीने आजोबांना साथ देणारी आज्जी मात्र अस्सल गृहिणी. आत्ताही आजोबांना चांगलं पेंशन आहे त्यावर त्या दोघांचं छान भागतं. त्यांच्या आयुष्यातील हीच जमेची बाजू आहे की त्यांना आजवर कुणाहीसमोर मदतीसाठी हात पसरावे लागले नाहीत. दोघंही खमकी आहेत, स्वावलंबी आहेत. तरीदेखील काळजी वाटतेच. दाखवत जरी नसले तरी त्यांचं त्यांनाच माहित ते कसे निभावून नेतात. असं असूनही आम्ही गेलो की त्यांचं त्यांना करू देतो, फक्त लक्ष ठेवतो. त्यांना दुखवावसं किंवा कमजोर भासवण्याची ईच्छा होत नाही.
     आज्जोबा एकदम मस्तमौला माणूस. त्यांच्याकडून मी तिखटमीठ लावून गोष्टी सांगणे, डिंगा मारणे, वेळ मारून नेणे, फुशारक्या हाणणे, कुणालाही चिडवत राहणे, कितीही विपरीत घडलं तरीही हसत राहणे ह्या गोष्टी खूप आधीच शिकून घेतल्या होत्या. पण जसजशी मी समंजस झाले तसंतसं कुणालाही चटकन मदत करणे, प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घेणे, कठीणप्रसंगीही चेहऱ्यावरचं हसू मावळू न देता शांत राहणे. आणि महत्वाचं म्हणजे आयुष्य जिद्दीने जगणे. हेही त्यांच्याकडून शिकता आलंय. आतातर यमराजाला कसं चाट मारून यायचं हेही नव्यानेच शिकवलंय. आता बघू जमतंय का आपल्यालाही. काय असतं 'सहजीवन' वा 'साथ देणं', नुसतं सोबत राहणं नसतं तर वेळ आली की, आपले श्वास सुद्धा कसे एकमेकांना पुरवायचे असतात. दहशत अशी असावी, की एकाला सोडून दुसऱ्याने एकटं निघून जाण्याची हिंमतच करायला नको. प्रेम असं असावं, की साक्षात मृत्यूशी झगडता यावं. नियतीला परतवता यावं. आहोत तिथून परत फिरता यावं एकमेकांसाठी❤️❤️
बोलें तों जगण्याची जिद्द पाहिजेन बॉस 👍
             
- नमिता प्रशांत 🌿

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...