बुधवार, ४ डिसेंबर, २०२४

1573. तो गेला

       तो गेला. अचानक, न सांगता सवरता अगदी तडकाफडकी. मॅसिव्ह कार्डिएक ॲरेस्ट. काही क्षणातच सगळं संपलं. ती अक्षरशः कोलमडून गेली. सासु सासरे, पदरी तीन वर्षाची मुलगी. बाकी सगळं ठीक होतं पण अनपेक्षित धक्क्यातून सावरुन सगळी सुत्रं हातात घेऊन उभं रहाणं म्हणावं तितके सोपं नव्हतं. मनात अफाट आणि प्रचंड दाटून आलेलं दुःखं, तिच्यावर आलेल्या जबाबदारीच्या ओझ्याखाली आपसूकच दबलं गेलं. अश्रू जणू सुकून गेले. त्याची बॉडी घरी आली तेव्हा आता ती टाहो फोडून रडेल, कोसळेल, तिला भोवळ येईल या सगळ्या अपेक्षित शक्यतांना धक्का देत ती फक्त शांतपणे रडत होती. काहीच बोलली नाही. फक्त मूकपणे अश्रू ढाळत होती. आणि इथेच लोकांना अनपेक्षित धक्का बसला. ती तशी लवकर सावरली.
      तिचं तसं लवकरच सावरणं चारपाच लोकांसाठी कौतुकाचा विषय असला तरी अनेकांना ते रुचलं नाही. हे काय? नवरा गेल्याचं दुःखं नाही म्हणजे? मनाची नाही तर निदान जनाची तरी? वरवर तिचं कौतुक करणारेही पाठ वळली की कुजबुजू लागले. तिचं दुःख हाच जणू कौतुकाचा विषय होता, तिचं बाहेर पडणं खटकलं. पाच महिन्यांत बाई नॉर्मल होते म्हणजे? श्शी..बायका आपापसात फणकारु लागल्या. कित्येकींनी नवऱ्यांना तिच्याशी बोलणंही बंद करायला सांगितले. मग तिच्या स्लीवलेस ब्लाऊज पासून मैत्रीणींच्या ग्रुपमधल्या सेल्फींपासून सगळेच विषय गुऱ्हाळात रंगू लागले. तिच्या शांत पण मनमोकळ्या स्वभावाचा बादरायण संबंध तिच्या पुरावा नसलेल्या लफड्यांपासून कुठेही जोडला गेला. तिला हे समजत नव्हते असं नाही. 
मला एकदा एका नाटकाच्या शो ला भेटली. मी एकटाच होतो. नाटक संपल्यावर आम्ही शेजारच्या कॉफी शॉपमधे बसलो. तिने सगळे सांगून टाकलं मला. कुठेतरी मन मोकळं करावसं वाटलं असावं तिला. बराच वेळ एकटीच बोलत होती. मी शांतपणे ऐकत होतो. 
“सचिन, तुला सांगू? लोकांना आजही बाईचं दुःखंच कौतुकाचं वाटतं का रे? वर्षभर मी घरात कोंडून घेतलं असतं. सणासमारंभाला कुठे गेले नसते तर लोकांना कौतुक वाटलं असतं का रे? दुःख ग्लोरिफाय करणं हेच सगळ्यांना हवंय. पण एखादी स्त्री खंबीरपणे उभी राहिली. ठामपणे घराबाहेर पडली. दुःख विसरुन पदर खोचून परिस्थितीचा स्विकार करते हे आजही पचनी पडत नाही. तुला सांगू? मी जितकी भावनाप्रधान आहे तितकीच प्रॅक्टिकलही आहे. तरुणपणात नवरा गेल्याचं दुःख माझं मलाच माहीत. ते माझं प्राक्तन आहे. पण आता मी कितीही रडले भाकले तरी तो परत येणार नाही हे कटू सत्य स्विकारुन मी माझ्या मुलीसाठी आणि माझ्या म्हाताऱ्या सासू सासऱ्यांसाठी ते दुःख विसरुन बाहेर पडले. बँकेपासून इन्शुरन्स पर्यंत सगळ्या गोष्टी मी एकटीने पूर्ण केल्या, कोणाचीही मदत न घेता एकटीने. जॉब सोडून दिला होता तो पुन्हा सुरु केला. चार महिन्यात गाडी रुळावर आणली. लोकांची अपेक्षा होती मी त्यांची मदत घ्यावी. डोळ्यात अश्रू आणून रिक्षातून फिरत कामं करावी. मी विसाव्या दिवशी स्कूटी काढून बाहेर पडले. सगळी सोसायटी थक्कं होऊन बघत बसली. माझ्यातला स्त्रीसुलभ ऑकवर्डनेस मी संपवून टाकला. माझ्या मुलीसमोर माझी प्रतिमा मला खंबीर ठेवायची होती. तो परत येणार नाही हे माझ्या मनाने पक्कं घेतलं आणि मी घराबाहेर पडले. तेच खटकलं सगळ्यांना.”
“नवरा गेल्याचं दुःख आहेच रे सचिन. ते माझं मलाच लखलाभ. ती माझी कधीच न भरुन निघणारी अश्वत्थामाच्या जखमेसारखी भळभळणारी जखम आहे. ती शेवटपर्यंत रहाणार. पण म्हणून मी माझे छोटे छोटे आनंद, हसण्याचे क्षण, मनोरंजन सगळं गुंडाळून ती जखमच कुरवाळत बसणं हे सगळ्यांना अपेक्षित होतं...त्यांचा मी सणसणीत अपेक्षाभंग केलाय. मला माझ्याविषयी चाललेल्या अनाठायी आणि बिनबुडाच्या चर्चा आणि गॉसीप समजतात रे. आता अमर समोरुन आला तर नजर चुकवून जातो. नेहाने त्याला माझ्याशी कॉन्टॅक्ट तोडायला सांगितलंय. तो ॲक्चुअली माझ्या धाकट्या भावासारखा. पण नाही. अभिराम गेल्यावर त्याने माझ्यासाठी आठवडाभर सुट्टी घेऊन खूप मदत केली आणि अचानक येणं चौकशी करणं बंद केले. मला हे समजतं रे. पण आता मी इग्नोर करते. आता आजचंच बघ. मला हे नाटक एनीहाऊ बघायचं होतं. कोण सोबत येईल का म्हणून विचारले. एकही मैत्रीण फ्री नव्हती. हा पुण्यातला शेवटचा शो. मग ठरवलं आपण एकटीने जायचं. लोकांचा किती आणि कुठपर्यंत विचार करत बसू रे?”
मला तिचा प्रत्येक शब्द पटला. मनापासून पटला. नवरा गेल्याचं दुःख करत निदान वर्षभर तरी घरात रहावं. दुःख ग्लोरिफाय करत बसावं. चार लोकांची मदत घ्यावी. सणासमारंभाला कुठे जाऊ नये. की अटळ आणि अपरिहार्य दुःख बाजूला सारुन, खंबीरपणे घराबाहेर पडावं, जबाबदारी स्वीकारून कामाला लागावं. तुम्हाला काय वाटते?

-सचिन मधुकर परांजपे (पालघर)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...