मानवी शरीर (युनिवर्सल लाईफ फोर्स एनर्जी) जीला प्राणशक्ती म्हणू शकतो अश्या ऊर्जेने बनलेले आहे. या शक्तीमुळे जिवंत राहण्यासाठी, त्यात वाढ आणि इतर अनेक क्रियांसाठी संपूर्ण शरीरात असंख्य घडामोडी आपोआप घडत असतात ज्याचा आपल्याला पत्ताही नसतो. या क्रियांमुळे आपल्या शरीरा भोवती एक ऊर्जा क्षेत्र (इलेक्ट्रो- मॅग्नेटिक फील्ड) सतत तयार होत असते. आपल्या शरीरालागत ऊर्जेचे असणारे हे वलय म्हणजेच ऑरा किंवा तेजोवलय. प्रत्येक सजीव जीवाला, मानव, प्राणी, वनसंपत्ती यांना तेजोवलय असते. क्वान्टम फीजीक्स नुसार शास्त्रज्ञानी सिद्ध केल्या प्रमाणे सगळं विश्व ऊर्जेने बनलेलं आहे, आणि त्या सिद्धांता नुसार निर्जीव वस्तूंना ही तेजोवलय असते.
माणसाचे हृदय हे सर्वात जास्त उर्जाक्षेत्र निर्माण करत असते...आणि त्या खालोखाल मेंदू. यामुळेच तुम्ही कधी बघितलं असेल, की एखाद्या अनोळखी व्यक्तीला प्रथमच भेटता तेव्हा काही बोलणं न होताही तुम्हाला वाटतं .. हा माणूस काही चांगला वाटत नाही. किंवा ह्या उलट सुद्धा.. एखाद्याबद्दल त्याच्याशी न बोलताही प्रथम दर्शनी आपले अतिशय चांगले मत तयार होते.. याचे कारण आपले आणि त्याचे हृदय चक्र (अनाहत चक्र) जी तेजोवलये बाहेर सोडत असतात ती एकमेकांना स्पर्शतात आणि सूक्ष्म पातळीवर माहितीची देवाणघेवाण करतात.. आणि आपण त्याप्रमाणे त्याच्याशी आपले वागणे बोलणे ठरवतो.
मानवाला मिळालेली सर्वात मोठी देणगी म्हणजे विचार करण्याची शक्ती. आपल्या मनात दिवसाला सरासरी 70000 विचार येतात. विचार सुद्धा ऊर्जा रुपातच उत्सर्जित होत असतात. त्यांचा ही प्रभाव आपल्या तेजोवलयावर पडत असतो. सकारात्मक विचारांमुळे आपले तेजोवलय नेहमी स्ट्रॉंग रहाते. जर आपण सतत निराशेच्या , द्वेषाच्या किंवा रागाच्या विचारात राहात असलो तर तेजोवलायवर त्यांचा विपरीत परिणाम होतो. आपले विचार आपल्या भावनांना जन्म देतात आणि त्यानुसार तेजोवलय बदलत राहाते. जर दोन्ही हात पसरून आपण उभे राहिलो तर जो अंडाकृती आकार आपल्या शरीरा सभोवती तयार होईल तेवढे सर्वसाधारण निरोगी माणसाचे तेजोवलय त्याच्या शरीराबाहेर सर्व दिशांनी पसरलेले असते. या हद्दीत आपली आवडती किंवा जवळची व्यक्ती आली तर आपल्याला आवडतं.. पण ज्यांच्या शी आपलं फारसं पटत नाही किंवा वर सांगितल्या प्रमाणे एखाद्या अनोळखी व्यक्तीबद्दल आपले प्रथमदर्शनी चांगले मत नाही अशी व्यक्ती आली , तर आपण नकळतच 2 पावलं मागे सरकतो.. कदाचित यावरूनच ,"keeping someone at arm' length" किंवा "2 पावलं दूर रहा " वगैरे वाकप्रचार निघाले असावेत.
तेजोवलय जर क्लिन आणि मजबूत असेल तर आपल्या आरोग्यावरच नव्हे तर सम्पूर्ण आयुष्यावरच त्याचा चांगला परिणाम होतो. तुमचं सगळं व्यक्तिमत्व दुसरयांवर प्रभाव पडणारं बनतं. आपसी संबंध चांगले रहातात. उच्च पदावरील व्यक्ती, अभिनेते, देशप्रमुख किंवा इतरही क्षेत्रातील अशा व्यक्ती ज्यांना नेतृत्वगुण आणि मास प्रभावा ची सवय असते त्यांचे तेजोवलय खूप स्ट्रॉंग असते. प्राचीन योग शास्त्रात देखील तेजोवलयाचं महत्व सांगितलं आहे. आपण जर देवदेवतांची चित्र पाहिली तर त्यांच्या मस्तका भोवती गोल तेजस्वि प्रकाश दाखवलेला असतो. ते तेजोवलय असते. उर्जा स्वरूपात असल्याने साध्या डोळ्यांना तेजोवलय बघता येत नाही. पण काही विशिष्ठ पद्धतीने नियमित अभ्यास आणि सराव केला तर ते शक्य आहे. तुम्ही शब्दांनी, वागण्याने आपल्या भावना किंवा हेतु लपवू शकता पण तुमचे तेजोवलय काहीही लपवून ठेवत नाही. तुमच्याबद्दलची सर्व माहिती तुमचं तेजोवलय देत असते. आपण पाहिले की तेजोवलय उर्जास्वरूपात असल्याने ज्यांचे आज्ञाचक्र किंवा तृतीय नेत्र विकसित झाला आहे, जसे थोर संत, योगी, किंवा अध्यात्मातील अधिकारी व्यक्ती, यांना ते सहज बघता येते.
1939 साली सायमंड कीर्लियन या एका रशियन शास्त्रज्ञाला इतर काही संशोधन करत असता अपघातानेच अशा एका तंत्राचा शोध लागला ज्यायोगे त्याला मशिनद्वारे तेजोवलय बघता आले. त्याने त्या तेजोवलयाचे छायाचित्र (photograph) घेतले. व तेजोवलयावर आणखी संशोधन करून Aura किंवा तेजोवलय खरोखर अस्तित्वात असते हे सिद्ध केले. ह्या तंत्राला कीर्लियन फोटोग्राफी असे नाव पडले. भारतात प्राचीन काळी ऋषीमुनींना त्यांच्या यौगिक सामर्थ्याने तेजोवलयाचे सर्व ज्ञान होते व ते त्यांना सहज पहाता येत असे. तेजोवलयाला सुद्धा विविध रंग असतात आणि त्या रंगांना अर्थ असतात, किंवा रंगांमधून आपल्याला तेजोवलयाबद्दल अधिक माहिती मिळते ह्याचे सखोल ज्ञान आपल्या अंत:चक्षु द्वारे त्यांना होते. यावर अनेक पौराणिक आणि इतर ग्रंथांमध्ये माहिती उपलब्ध आहे. कीर्लियन फोटोग्राफीने घेतलेल्या तेजोवलयाच्या छायाचित्रात सुद्धा असे विविध रंग आढळून आले. आणि अखेर आधुनिक विज्ञानाने तेजोवलयाचे अस्तित्व मान्य केले. गुगल वर कीर्लियन फोटोग्राफी या विषयावर सर्व माहिती उपलब्ध आहे.
तुमचे तेजोवलय ही तुमची पर्सनल सिग्नेचर म्हणता येईल. जो माणूस आंधळा आणि बहिरा आहे, तो सुद्धा त्याच्या जवळ येणाऱ्या इतर लोकांचे अस्तित्व बरोब्बर ओळखतो.. सांगू शकाल , कसे? कारण, देवाने दिलेल्या पंचेंद्रियां पैकी जेव्हा एखादे काम करत नाही तिथे बाकीची इंद्रिये अतिसंवेदनशील होतात. ही लोकं इतरांचे अस्तित्व त्यांच्या तेजोवलयावरून ओळखतात. प्रत्येक माणसाकडे तेजोवलय बघायची, ते ओळखायची, त्याचा अर्थ जाणून घ्यायची जन्मजात क्षमता आहे. फक्त ती विकसित करावी लागते.
तेजोवलय स्वच्छ आणि मजबूत का ठेवावं..? कारण याचे खूप फायदे आहेत.
1. आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम रहातं.
2. आपलं आपल्या भावनां वर नियंत्रण रहातं. व्यक्तिमत्व संतुलित रहातं.
3. व्यक्तिमत्व अतिशय प्रभावी होतं. नातेसंबंध.. जो आपल्या आयुष्याचा महत्वाचा भाग आहे.. ते छान रहातात. सर्व आघाड्यां वर यशप्राप्ती होते.
4. तुमची इन्टूशन पाॅवर वाढते.
5. तुम्ही तुमच्या स्वतः च्या प्रकाशात रहाता. शिकार होण्यापासून किंवा इतरांच्या प्रभावा पासून दूर राहता. अगदी दैनंदिन आयुष्यात बघायचं झालं तर आपण सकाळी उठून आवरून आपल्या ऑफिसला जायला निघतो. ( घरातल्या कटकटी असतील तर त्याही आल्या ) जाताना रस्त्यात ट्रॅफीक मधे इतर वाहन चालकांबरोबर वाद होतो किंवा ट्रेन मध्ये गर्दीत उभे असताना कोणी ओळखीचा भेटतो आणि तो आपल्या अडचणींचा पाढा वाचतो. ऑफीस मधे बॉस किंवा सहकार्यांबरोबर अनबन होते. असं बऱ्याच लोकांशी आपलं इंटरॅक्शन होत असतं. सकारात्मक संवाद असेल तर ठीक पण बऱ्याचदा नकारात्मक बोलणं होतं आणि लोकांच्या विचारां मधली, बोलण्यातली ऊर्जा आपल्या तेजोवलयामधे येते. आपली त्यांच्याकडे जाते. अशा प्रकारे तुम्ही जेव्हा रात्री घरी येता तेव्हा विचार करा की किती जणांची नकारात्मक ऊर्जा तुम्ही घेऊन येता.
खालील कारणां मूळे तेजोवलय संक्रमित किंवा दूषित होऊ शकतं..
1. नकारात्मक विचार, भावना, शब्द, कृती, आपली किंवा इतरांचीही.
2.भीती सोशल लाईफची
3.सेल्फ काॅनफीडन्स ची कमी, प्रेमाची कमी
4. कुसंगत
5. कोमा, ऑपरेशन, ऍक्सिडेंट, मानसिक धक्का
6. दुसऱ्याचे जाणीवपूर्वक केलेला वाईट विचार किंवा हेतु
7.वाईट जागा, अपवित्र स्थळे
8. नशा, इतर वाईट सवयी
9. सगळे आंतरीक व बाह्य घटक जे आपल्या नियंत्रणाच्या बाहेर असतात
तेजोवलय दूषित असेल तर पुढील लक्षणे आढळतात..
1. अकारण भीती, सतत चिडचिड, राग, चिंता, मत्सर, डीप्रेशन
2.रिलेशनशिपमध्ये तणाव
3. अपघात, अडचणी.
4. विचीत्र जीवनशैली व पर्सनालिटी
5. अनारोग्य
वरील लिस्ट वाचल्यावर आपल्या लक्षात येईल की जशी आपण दररोज शरीराची स्वच्छता ठेवतो तसेच तेजोवलय स्वच्छ ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. कारण हे केलं नाही तर उर्जारूपात जो नकारात्मक कचरा तिथे साठत जातो, त्याने हळूहळू आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. तेजोवलय स्वच्छ ठेवणं अतिशय सोपं आहे. आपल्या पूर्वजांनी यासाठी वागण्याचे खूप छान नियम, रीतीरिवाज घालून दिले आहेत. आपण आजही त्यातील बरेचसे नियम पाळतो. बदलत्या काळानुसार काही पाळणं शक्य नसतं. पण तरीही आधुनिक जीवनशैलीशी सांगड घालून, याविषयीचे आवश्यक ज्ञान घेऊन, आपण काही छोटे बदल केले, नियम केले, तर आपण आपले तेजोवलय रोजच्या रोज नक्की स्वच्छ आणि मजबूत ठेवू शकतो. तेजोवलय अंतर्गत आणि बाह्य अशा विविध गोष्टीनी प्रभावित होत असतं आणि त्यामुळे सतत बदलत असतं. दिवसभरात बऱ्याच घटना, गोष्टींचा सामना आपल्याला करावा लागतो ज्यांच्यावर आपले नियंत्रण नसते. आणि आपले तेजोवलय संक्रमित होत राहाते. आपण आपले तेजोवलय खालील उपायांनी रोजच्या रोज शुद्ध ठेऊ शकतो.
1. मिठाचा वापर
हा फार छान त्वरित परीणाम देणारा उपाय आहे. बाजारात खडा मीठ मिळतं. अतिशय स्वस्त असतं आणि सहज उपलब्ध आहे. नाहीच मिळालं तर साधं मीठ सुद्धा चालेल. मिठामधे नकारात्मक ऊर्जा खेचून घेण्याची मोठी शक्ती आहे. घरात खूप कलह, वादविवाद चाललेत, आजारपणं संपत नाहीयेत, नकारात्मकता जाणवतेय, अडचणी येतायत, किंवा यापैकी काहीही नसल्यास प्रतिबंधात्मक म्हणून रोज सुद्धा.. हे मीठ काचेच्या छोट्या छोट्या बाऊल्स मधे भरून घरात/ ऑफिसमधे प्रत्येक खोलीच्या कोपऱ्यात ठेवा. आजारी माणसाच्या उशाशी, पायाशी ठेवा. जर नकारात्मक ऊर्जा असेल तर मिठाला लगेच पाणी सुटेल, ते काळं पडेल, किंवा खराब होईल. आशा वेळेस ते इतरत्र कुठेही न सांडवता टॉयलेट मधे टाकून द्या. कमीतकमी 3 महिने हा उपाय सतत करीत राहावा. मिठाच्या पाण्याने रोज लादी ही पुसू शकता.
जेव्हा कधी खूप डीप्रेस किंवा अकारण उदास, दुःखी, एकटेपणा, भीती, किंवा कसलं वाईट वाटत असेल त्या वेळेस दोन्ही मुठीं मधे खडा मीठ घ्या, आणि दोन्ही पाय साधारण गुडघ्यांपर्यंत (खडा मीठ घातलेल्या) गरम पाण्यात बुडवून डोळे बंद करून 10 मिनिट बसा. मनातल्या मनात "माझं तेजोवलय पूर्णपणे शुद्ध झालं आहे आणि सर्व नकारात्मक ऊर्जा ह्या मिठात आणि पाण्यात उतरून निघून गेली आहे" असं म्हणत राहा.. आणि फरक बघा. वर सांगितल्या प्रमाणे, हे पाणी आणि मीठ त्वरित टॉयलेट मधे फेकून द्यावे.
खूपच नकारात्मक वाटत असेल, किंवा कधी अशा नकारात्मक वातावरणात जायची, किंवा अशा लोकांशी संवाद करायची वेळ आली, तर घरी आल्यावर स्नानाच्या अर्धी बादली पाण्यात मूठभर मीठ टाकून त्याने स्नान करावे. मनात वर सांगितलेले प्रमाणे म्हणावे आणि नंतर नेहेमीसारखे साबण लावून स्नान करावे. हा पण खूप परिणामकारक उपाय आहे.. फक्त ज्यांची त्वचा नाजूक आहे त्यांनी रोज करू नये. अशा लोकांनी मिठा ऐवजी पाण्यात सफरचंदाचा सिरकाचा वापर करावा.
2. ध्यान जरूर करावे
ध्यानाचे फायदे अपरिमित आहेत. याने तुमचे तेजोवलय तर नेहेमी शुद्ध आणि मजबूत राहतेच, पण तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर चांगला परिणाम होतो. ज्यांनी ध्यान आधी केलं नाहीये, किंवा ध्यानाबद्दल माहिती नाही, त्यांनी त्याची थोडी माहीती करून घ्यावी
3. सकारात्मक विचार
ईश्वराने माणसाला विचार करण्याची फार मोठी शक्ती दिली आहे ज्याने तो आपल्या जीवनाचं शिल्पं हवं तसं घडवू शकतो. पण बहुतेक वेळा आपण ही शक्ती नकारात्मकते मधे वाया घालवतो. घडणाऱ्या घटना, आजूबाजूची माणसं, किंवा बाह्यपरिस्थिती कशीही असली तरी आपण बाह्य जग बदलू शकत नाही. आपण फक्त स्वत:ला बदलू शकतो. सकारात्मक विचारांनी तुमचं तेजोवलाय नुसतं शुद्धच होत नाही तर ते अधिकाधिक मजबूत होत रहातं आणि त्याला नैसर्गिक सुरक्षा मिळत राहते. हा माझा स्वतःचा अनुभव आहे, की समोरची माणसं त्यांच्या विचारातून, बोलण्यातून कितीही नकारात्मकता तुमच्यावर फेकत असली, तरी तुमच्या सकारात्मक विचारां मुळे, तुम्ही त्याने प्रभावित होत नाही. सततच्या सकारात्मक विचारां मुळे बाह्य परिस्थिती सुद्धा हळूहळू बदलत जाते.
4. संगत
आपण नेहेमी नकारात्मक लोकांच्या संगतीत राहतो का. कोणाशी बोलुन ती व्यक्ती निघून गेल्यावर अचानक आपल्याला मरगळ, उदासी, दुःखी, एकटं, किंवा मरगळल्या सारख वाटतं का? तसं असेल तर आपली ऊर्जा त्या व्यक्तीने नकळत शोषून घेतलेली आहे. जवळच्या नात्यात अशी व्यक्ती असेल किंवा अशा व्यक्तींशी टाळता येत नाही असा रोजचा संबंध येत असेल तर त्यांच्याशी बोलताना त्यांच्या नकारात्मक भावनांना बढावा देऊ नका, त्यांच्या बरोबर त्यांचं दुःख हलकं करताना तुम्ही रडू नका किंवा दुःखाशी स्वतःला रीलेट करू नका. नाहीतर तुमची ऊर्जा ते नकळत शोषुन घेतील आणि तुमच्याशी बोलून गेल्यावर त्यांना खूप बरं वाटलं आणि तुम्ही मात्र डाऊन व्हाल. काहीवेळेस आपण काही समूहांशी विविध कारणांनी जोडलेले असतो. यात फेसबुक वरचे समूह सुद्धा आले बरं का. जर समूहात काही लोकं नकारात्मक विचार प्रसारित करत असतील, किंवा सतत बोलत असतील तरीही सावध. पण जन प्रभावा खाली येऊन लोकं अप्रत्यक्ष पणे ही नकारात्मकता स्वताच्या आयुष्यातही आमंत्रित करतात हे त्यांना समजतच नाही. आपल्या मनात विचार हे बाहेरील विचारविश्वामधून येत असतात. आपल्याला वाटलं की मी हा विचार केला तरी आपण ज्या लहरीवर आहोत त्यांच्याशी मिळतेजुळते विचार आपल्या पर्यंत बाहेरून येतात आणि आपण ते ग्रहण करत असतो. जर तुम्ही सतत नकारात्मक संगतीत राहिलात, तर कुठले विचार घ्याल हे तुम्हीच ठरवा. पूर्वीं लोकं यासाठीच म्हणत "सुसंगती सदा घडो".
5. नामस्मरण
आपल्या ऋषी मुनींनी तप साधनेच्या बळावर कुठले स्वर, शब्द रचना एकत्रित करून विशिष्ठ संख्येत म्हटल्या की त्याचा काय परिणाम आपल्या स्थूल आणि सूक्ष्म शरीरावर, वातावरणावर, विशिष्ठ कारणासाठी होतो हे शोधून मंत्र शास्त्र विकसित केले. नामस्मरण किंवा एखादा विशिष्ठ मंत्र जेव्हा आपण विशिष्ठ संख्येत रोज म्हणतो, तेव्हा तो तुमच्या तेजोवलयाला शुद्ध आणि मजबूत करत रहातो. नैसर्गिक सुरक्षा देत रहातो. आधुनिकतेच्या नावाखाली आपण नामस्मरणाकडे दुर्लक्ष करतो पण याचे प्रचंड फायदे आहेत.
6. पवित्र स्थळे/ तीर्थक्षेत्रे
काही जागांची स्पंदनं चांगली नसतात. स्मशान, मद्यालये, किंवा तत्सम इतर वाईट कृत्ये होत असणाऱ्या जागा. या ठिकाणी आपले तेजोवलय पटकन संक्रमित किंवा दुषित होऊ शकते. याउलट काही जागा अतिशय पवित्र आणि उच्च स्पंदने असलेल्या असतात. पृथ्वीच्या पाठीवर अशी 7 मुख्य ठिकाणे आहेत ज्याना पृथ्वीची सप्तचक्रे म्हणतात. भारतात हिमालयात कैलास पर्वत हे असे ठिकाण आहे की जिथे उच्चतम सकारात्मक स्पंदने आहेत आणि त्याला पृथ्वीचे सहस्त्रार चक्र म्हणतात. जागांची स्पंदने विचारात घेऊन पूर्वजांनी मंदिरांची स्थापना केली. प्राचीन काळी तीर्थयात्रेला जायची प्रथा याचसाठी होती की आपले तेजोवलय शुध्द व्हावे. तुमच्या घराजवळ असलेल्या मंदिरात जाण्याचा नेम ठेवा.
7. प्राणायाम/ योगासनं/ व्यायाम.
प्राणायाम हा तेजोवलय स्वच्छ आणि स्ट्रॉंग ठेवण्याचा अतिशय परिणामकारक उपाय आहे. पण तज्ञानकडून शिकून मगच करावा.योगासने आणि त्यातही सूर्य नमस्कार हा ही अतिशय प्रभावी आहे.
8. पौष्टीक आहार, आराम आणि पूर्ण झोप याबद्दल
वेगळे सांगायची गरज एव्हढ्याचसाठी की ह्या तीन अतिशय मूलभूत गोष्टी सुद्धा आपण आजकाल न पाळल्यामुळे तुमचे तेजोवलय कमजोर होऊ शकते.
9. निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवणे आपण सर्व निसर्गातील पंचतत्वातून जन्मलो आणि परत तिथेच जाणार आहोत. निसर्गातून, झाडं, हिरवळ, डोंगर, नद्या, यातून प्राणशक्तीचा खजिना आपल्याला मिळत असतो. आपले तेजोवलय नैसर्गिक रित्या स्वच्छ आणि मजबूत ठेवायला निसर्ग खूप मदत करतो.
वर दिलेले जास्तीत जास्त उपाय रोजच्या रोज आपल्या आचरणात ठेवले तर आपले तेजोवलय आपण रोजच्या रोज शुध्द ठेऊ शकतो. पण काही कारणाने जर तेजोवलय खूपच डॅमेज झाले असेल आणि मोठ्या प्रमाणात त्याची लक्षणं दिसत असतील तर खालील उपाय तज्ञ व्यक्तीकडून करून घेतल्यास खूप फायदा होतो.
10. आध्यात्मिक हीलिंग
1. रेकी किंवा इतर ऊर्जा उपचार
2. क्रीस्टल थेरपी
3. साऊन्ड थेरपी
4. अरोमा थेरपी
5. फ्लाॅवर थेरपी
पूर्वी आपली आजी किवा आई, आपल्याला काही झालं की ..किंवा शुभकार्यानंतर दृष्ट काढायची, आठवतं..? तेजोवलय स्वच्छ किंवा शुद्ध करण्याचाच तो प्रकार आहे. मीठ आणि मोहरी या दोन्हीमध्ये नकारात्मक ऊर्जा खेचून घेण्याची ताकद आहे. तसेच बाहेरून घरी आल्यावर चप्पल घराबाहेर काढून बाहेरच विहिरीवर डोक्यावरुन आंघोळ करून मग घरात यायचं अशी पद्धत होती.. त्यांचं कारण लक्षात आलं..?
बाहेरील नकारात्मक ऊर्जा निघून जाऊन आपल तेजोवलय शुद्ध रहावं. जेवायच्या आधी जेवणाच्या ताटाला नमस्कार करून एखादा श्लोक म्हणून जेवायची पद्धत. जेणेकरून जेवण बनवणाऱ्याची नकारात्मक विचारस्पंदन निघून जावीत. या खूप लहान गोष्टी आहेत पण तेजोवलय शुद्ध ठेवायला खूप मदत करतात.आता सुद्धा आपण यातलं जेवढं पाळता येईल तेवढं पाळायचं.
आशा आहे की ह्या ज्ञानाचा उपयोग सर्वाना होऊन आपले आयुष्य आनंदी, आणि यशस्वी होईल.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा