बुधवार, ४ डिसेंबर, २०२४

1594. कंडक्टराचा गणित

  कोल्हापूर सावंतवाडी एस टी बावड्याहुन सुटली आणि घाटमार्गे कोकणात सावंतवाडी जायला मार्गस्थ झाली, वसंत कंडक्टरने नवीन एक दोन प्रवासी होते. त्याना तिकिटे दिली. पैसे बॅगेत ठेवले एव्हडयात त्याचा मोबाईल वाजला, त्याने पाहिले त्याची बायको वसुधा बोलत होती 
वसुधा -अहो, अजितचो मघाशी फोन इल्लो..
वसंतला आश्यर्य वाटले, गेल्या तीन वर्षात स्वतः हुन कधीही फोन न करणाऱ्या आपल्या मुलाने. अजितने फोन कसा काय केला?
वसंत -काय म्हणा होतो? आणि फोन करुची बुद्धी कशी झाली तेका?
वसुधा -अहो, आनंदाची बातमी सांगून फोन केल्यानं, तुमी आजोबां व्हतालात?
वसंत -काय?
वसुधा -होय हो,ताच सांगून फोन केल्यानं आणि माका अमेरिकेक बोलावता..
वसंतला खुप बरं वाटलं, कधी तरी आपल्या मुलाला आपली चूक कळेल आणि तो आई बाबाला फोन करेल याची त्याला आशा होतीच, तसेच झाले, मुलाने फोन करून आंनदाची बातमी सांगितली.
तो पुन्हा फोनवर बोलणार एव्हड्यात रेंज गेली आणि त्याचे बोलणे अर्धवट राहिले. त्याने मोबाईल खिशात ठेवला आणि तो बाहेर पाहू लागला. ऑगस्ट महिना होता, जुलै मध्ये भरपूर पाऊस पडून गेला होता आणि आत्ता पण पावसाची रिमझिम सुरूच होती.
    खरं तर गेली पसतीस वर्षे आठवड्यात निदान एक वेळ तरी तो या ट्रिप वर असायचा, त्याला नेहेमी हा घाट दिसायचा पण हा घाट जास्ती मस्त वाटू लागला. हिरवी गार झाडें. पाण्याचे लहान मोठे धबधबे, घाटात पसरलेले धुक. आज अजितचा अमेरिकेतून फोन. जवळ जवळ तीन वर्षांनी, कशी काय बुद्धी झाली याला? गाडी घाटातील वळनावळनाने धावत होती आणि त्याचवेळी वसंताचे विचार धावत होते, त्याला त्याचा दोन वर्षाचा मुलगा अजित डोळ्यसमोर आला. गोंडस मुलगा. कुणाकडेही जायचा, सर्वाकडून लाड करून घयायचा. सतत आईच्या पाठीमागे असायचा, आपली कंडक्टरची नोकरीं, कधी मालवण, कधी देवगड, कधी मुंबई ड्युटी. आपण जिथे जायचो तेथून त्याच्यासाठी काहीतरी खाऊ आणायचो. छोटया अजितला दशावतारी नाटकें दाखवायला सायकलवरुन न्यायचो. जत्रेत फुगे,खेळणी घेऊन दयायचो. पण आपली असली ड्युटी त्यामुळे त्याला शाळेत सोडायला आपण कवचितच असायचो पण आपले वडील अण्णा त्याला शाळेत सोडायचे आणायचे. कधी कधी त्याची आई वसुधा सोडायची. अजित पहिल्यापासून हुशार, कधीही पहिला दुसरा नंबर सोडला नाही. दहावी बारावीत चांगले मार्क्स मिळविले त्याने, मग बारावी नंतर त्याला रत्नागिरीच्या इंजिनीरिंग कॉलेज मध्ये घातले. चार वर्षे रत्नागिरी मध्ये, पहिल्या वर्गात पास झाला.
   किती आनंद झाला आपल्याला, मी दहावी नापास. त्याची आई पण आठवी पास झालेली. पण ही नोकरीं करून मुलाला शिकविले. आपल्या डेपोत सर्वाना आपले कौतुक.. "वसंतान झिलाक शिकवल्यानं, आपण वडी काढल्यानं. पण झिलाक काय कमी करूंक नाय.' हे ऐकल्या नंतर शरीरावर दोन मूठ मास चढायचे. अण्णाना खुप बरे वाटले. आपला नातू इंजिनीअर झाला म्हणून. वसुधा तर हवेत होती, त्यात तिच्या बहिणीची मुले फारशी शिकली नव्हती. म्हणून जास्त. सुदैवाने अजित कॅम्पस मधून सिलेक्ट झाला आणि दोन वर्षे पुणे आणि मग अमेरिकेत पोहोचला. मुंबई विमानतळावर आपण आणि त्याची आई गेलो होतो पहिल्यांदाच त्याला निरोप दयायला. आपण विमानतळ कुठे पाहिला होता? आपल्या नशिबात बॉम्बे सेंट्रल एसटी स्टॅन्ड नाहीतर परेलएसटी डेपो. पण आपल्या झिलाने विमानातून फिरणे, हे त्याला विशेष वाटतं होते.    कोल्हापूर सावंतवाडी st आता कणकवलीच्या जवळ आली होती. कणकवलीत काही प्रवासी उतरले काही चढले. त्याने बुकिंग संपवले आणि वसुधाला फोन करून सात पर्यत घरी पोहोचतो, अंघोळीला पाणी गरम करून ठेव, असा निरोप दिला. नवऱ्याचा फोन आला म्हणून वसुधा पाणी तापवायला गेली, दोरी घेऊन विहिरीवर गेली आणि दोन कळश्या पाणी काढून मडक्यात ओतले आणि परसातील माडाच्या झावळ्या गोळा केल्या आणि मडक्या खाली घालून आग पेटवली. त्याच मडक्यासमोर बसुन ती आठवू लागली. अजित अमेरिकेला गेला तेंव्हा आपल्याला वाईट वाटले, कारण आता वर्ष दोन वर्ष तो दिसणार नव्हता, पण आपल्या माहेरी आणि घरी कोण परदेशात गेला नव्हता, म्हणून त्याचा अभिमान पण वाटला.
    अजित अमेरिकेत गेला आणि त्याचा पगार वाढला. पण आपला नवरा त्याचे कडून एक रुपया पण मागत नव्हता, त्याचे म्हणणे मला पगार मिळतो, तो पुरेसा आहे. मग अजितला मुली सांगून यायला लागल्या. पण त्याने त्याच्या रत्नागिरी मधील वर्गमैत्रिणी बरोबर लग्न ठरविले.
      आम्ही दोघांनी संमती दिली पण सासरे अण्णा म्हणत होते, सांभाळून राहा. कारण ही शहरातील मुलगी आहे आणि पैसेवाल्याची आहे. तिचे आईवडील बँकेतील ऑफिसर, रत्नागिरीजवळ आंब्याच्या बागा आणि ही एकच मुलगी. पण अण्णाच्या विरोधात जाऊन त्त्यांचे लग्न झाले आणि सुवर्णा या घरची सून म्हणून आली. घरात सून म्हणून आली म्हणायचे कारण ती घरात कधी टिकलीच नाही.अमेरिकेत जायच्या आधी नोकरीं निमित्त पुण्याला आणि सुट्टी माहेरी. त्याच्या लग्नानंतर सहा महिन्यांनी अण्णा गेले तेंव्हा सुद्धा तिच्या आईवडीलासोबत अर्धा तास थांबून गेली.
मग तिचा पासपोर्ट, व्हिजाचे काम झाले आणि ती गेले पाच वर्षे अमेरिकेत.
एसटी ने कुडाळ सोडल तसं वसंताने बुकिंग केल आता गाडी सावंतवाडी पर्यत कुठे थांबणार नव्हती, म्हणून तो डोळे मिटून बसला.
सुवर्णा अमेरिकेत पोचली आणि अजितचे फोन येणे कमी कमी होते गेले आणि जवळजवळ बंदच झाले. मग आपल्याला राहवत नव्हते म्हणून मी व्हाट्सअप वर मेसेज पाठवायचो असे चार मेसेज गेले की त्याचा एक मेसेज तोपण "आम्ही खुशाल आहोत 'असा मेसेज यायचा. त्याची आई चिडायची पण आपण तिला गप्प बसवायचो.
मध्यन्तरी कोरोना महामारी आली. आमचे पगार थांबले, तेंव्हा वाटतं होत, आपला मुलगा आपली चौकशी करेल,"पैसे पाठवू का 'असे विचारेल कारण त्या दोघांचे घरून काम सुरु होते आणि पगार सुरु होता. पण त्यानी साधी चौकशी केली नाही.
वसुधा खुप खुप आनंदित होती कारण ती आजी होणार होती, तिच्या मनात आलं अण्णांनी सुवर्णाच्या पोटी जन्म घ्यावा. पण मुलगी झाली तर? मी माझ्या  सासूला पहिलेच नाही, पण लोक सांगतात, ती अत्यन्त मेहेनती आणि सुस्वभावी होती. मग तिने जन्म घेतला तरी चालेल. आपल्याला अजितने अमेरिकेला बोलावलंय, याचा पण आनंद आहे. कशी असेल अमेरिका? आपण फोटोत पहातो तेव्हढे माहित. तेथील मोठे मोठे रस्ते. मोठया गाड्या मोठया बिल्डिंग.. तिचे मनोराज्य सुरु झाले. एव्हड्यात तिच्या लक्षात आले, आपल्यकडे चांगले कपडे कुठे आहेत? तिने मनातल्या मनात लिस्ट बनवली. चार परकर, चार साडया. ब्लाउज शिवून घयायला हवेत. चांगले चप्पल की बूट. तिकडे थंडी फार असते. म्हणजे स्वेटर. शाली?
   सुवर्णा गरोदर आहे, म्हणजे डिंकाचे लाडू न्यायला हवेत. कुठे मिळतील डिंकाचे लाडू. सावंतवाडीच्या साधलेना सांगायला हवे. डिंकाचे लाडू बनावून द्या. पहिला विमानप्रवास. आपण st आणि हल्ली दोन वेळा मुंबईला गेलो तेंव्हा कोकणरेल्वे सोडून कधीच कसलाच प्रवास केला नाही. आपल्याला जमेल का विमानाने जाणे. नवरा सोबत नसणार. आपल्याला धड मराठी बोलता येत नाही, इंग्लिश पुढची गोष्ट. आणि ते पासपोर्ट असं काहीतर असत त्याच काय?
वसंता सावंतवाडीत पोहोचला, त्याने गाडीचा हिशेब डेपो मध्ये कॅशियरकडे जमा केला. आता त्याला उद्या सुट्टी. सकाळी बायकोने चांगली बातमी सांगितली, तो खुश झाला, शेवटी मुलाने बातमी सांगितली आणि आईला अमेरिकेला ये म्हणाला, तिकीट पाठवतो म्हणाला. हा दुसरा तिसरा महिना असणार सुनेला. म्हणजे तिला जायला वेळ आहे अजून किमान चार महिने. तोपर्यत तिचा पासपोर्ट काढून घयायचा. आता पणजी मध्ये पासपोर्ट मिळतो. आपला पण काढावा का पासपोर्ट? हो, काढावाच, त्याने आपल्याला पण बोलावलं तर. वसंताने डेपो मध्ये ठेवलेली मोटरसायकल सुरु केली. वाटेल तळ्याजवळ थांबून पेढे घेतले. पुढे जाऊन चंदू भुवन मधून सामोसे घेतले आणि तो मळगावच्या दिशेने निघाला.
     नवऱ्याची गाडी बघून वसुधा बाहेर आली. तिच्या हातात वसंताने पेढे आणि समोश्याची पिशवी आणि आपली रोजची बॅग दिली आणि तो खळ्यातील नळावर हातपाय धुवायला गेला.
वसुधा -पाणी गरम आसा, अंघोळच करून घयावा, तोपर्यत मासे भाजून घेतंय, म्हणजे जेवूक बसा.
वसंताने मान डोलावली आणि तो कपडे घेऊन आंघोळ करायला गेला. गरम गरम पाणी डोकयावर सोडताना त्याला छान वाटतं होते.
घरात वसुधाने सकाळी मीठ लाऊन ठेवलेले बांगडे तव्यावर  तळायला घेतले. त्या तळणाऱया बांगड्याचा वास आल्याने वसंतांची भूक चाळवली. केंव्हा एकदा ताटावर बसतो आणि भात माशाची आमटी आणि तळलेले बांगडे तोंडात घालतो असे त्याला झाले. आंघोळ करून आणि कपडे घालून वसंता पाटावर बसला. त्याच्यासमोर ताट आणि पाणी ठेवलेले होतेच. वसुधाने गरमगरम भात वाढला आणि त्याचवार बांगडयाची आमटी ओतली, ताटात तळलेले बांगडे ठेवले.
वसंताने दोन घास तोंडात घेतले आणि सहज विचारावे तसें विचारले 
"कितवो महिनो?
"सातवो.
"काय? सातवो महिनो? आणि आत्ता आमका कळवता?
"होय ना, आता माजी किती घाय होतली. माका कपडे. ब्लाउज. बूट. स्वेटर 
"एक मिनिट थांब म्हणजे आमच्या झिलान सातव्या महिन्यात कळविल्यानं की तेची बायको पोटूशी आसा. मग आधी म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या महिन्यात तेंका कळला आसात ना. मग तेवा कित्या नाय कळविल्यानं? एकदम सातव्या महिन्यात आणि आई तू ये इकडे म्हणान तो सांगता? आणि तू आणि मी खुश झालाव. पण तेका आई येऊक व्हयी की मोलकरीण?
"अहो, काय बोलतात? मोलकरीण काय म्हणतात?
"मी खोटा नाय बोलणय. हो ऑगस्ट म्हणजे मार्च एप्रिल महिन्यात आपल्या झिलाक आणि सुनेक कळला की ऑक्टोबर नोव्हेंबर दरम्यान बाळंतपण येतला. मग आई बाबाक कळवक ऑगस्ट कित्या उजाडलो? हेचा कारण म्हणजे सुवर्णाच्या आईक तेंका अमेरिकेक बोलावूचा होता पण गेल्या महिन्यात तिका म्हणजे सुवर्णाच्या आईक अटॅक इलो आणि तिचा पंधरा दिवसापूर्वी कोल्हापूरमध्ये ऑपरेशन झाला. म्हणजे सुवर्णाची आई जाऊ शकणा नाय तेव्हा सुवर्णाक तुझी आठवण इली.
"आसात, पण मोलकरीण काय म्हणतात?
"अगो बाये, अमेरिकेत कामवाली मोलकरीण कोणाक परवडत नाय. ती गाडी घेऊन येतली आणि डॉलर्स घेऊन जातली. बाळंतीण आसा म्हणजे बाळ बाळंतनिक तेल लावणं, आंघोळ घालणा आसा. तशी मोलकरीण ठेवली तर दोघांचो वर्षाचो पगार संपतलो म्हणून तेनी भारतातून कामवाली मागवली. म्हणजे तू. कमी खर्चात आणि कोणाही पेक्षा प्रेमानं करणारी.
"तुमचा काय तरी... कसलो हो तर्क?
"मी कंडक्टर आसय. जरी मी दहावी नापास असलाय तरी पस्तीस वर्षा नोकरीं करून गणित पक्क्या झाला माझा. गाडीत भरलेल्या लोकांका रोज तोंड देत असताव आमी. माजा गणित चुकाचा नाय. तुका वाटता तर सुवर्णाच्या आईक फोन करून खात्री कर. आमका जीं बातमी आज समजली ती तेंका मार्च मधी म्हाईत असतली.
"पण माका पण वाटता हो माझ्या नातवंडाक कुशीत घेवचा, तेका आंघोळ घालुचा.. तेका तेल लावचा.. तेची पापी घेवचा.. मग मी काय करू? जावं की नको जावं?
  वाचकहो कथेचा शेवट करण्याआधी मी इथे थांबतो. अजितची आई विचारते आहे की मी मुलाने बोलाविले तर सुनेच्या बाळंतपणाला जावे काय की अजितचे बाबा म्हणजे वसंत कंडक्टर म्हणतात तसे तो आईला नव्हे भारतातून मोलकरीणला बोलवत आहे म्हणून जाऊ नये.
वाचक हो, तुमचे मत कमेंट बॉक्स मध्ये लिहा, वाचक म्हणतील त्या प्रमाणे या कथेचा शेवट करूया.
       
प्रदीप केळुस्कर  9307521152 / 9422381299

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...