स्थळ - डॉ गायकवाड यांचा दवाखाना
तालुक्याच्या गावी डॉ गायकवाड यांचा दवाखाना नेहेमीप्रमाणे पेशन्टनी ओसंडून वहात होता. नारायण कंपाउंडर आपल्या जागेवर बसुन एक एक पेशन्ट आत सोडतं होता आणि डॉक्टरनी लिहून दिलेल्या औषधंच्या पुड्या बांधत होता.त्यान्च्या समोर एक मेडिकल होते, डॉक्टरनी काही बाहेरची औषधे लिहून दिली, तर पेशन्ट आणून नारायणला दाखवीत होता, नारायण पेशन्टला औषधचे डोस समजावून सांगत होता.
कोणी पैसे दिले तर ते पेटीत ठेवत होता, अर्थात या डॉक्टरांची उधारीच जास्त, त्यामुळे बहुतेकजण पैसे न देणारे, त्त्यांची उधारी चोपडीत लिहून ठेवत होता. उधारी लिहिता लिहिता पेशन्टला सुनावत होता "या डॉक्टरना पण संसार हाय, बायका पोर हाईत हे लक्षात असुद्या, नाहीतर डॉक्टर पडला देवमाणूस, त्याचा फायदा घेऊ नका, पैसे मिळाले की आणुन द्या '.
पेशन्ट ", देणार की, परत याच डाक्टराकडे यायला हवं न्हा, पैस कसा ठेऊ? असं म्हणून यातील बहुतेकजण उधारी देणार नाहीत, हे डॉ ना आणि नारायणला माहित झाले होते.
दुपारचे बारा वाजलेले, एव्हड्यात एक तरुण पण फाटका माणूस आपल्या गरोदर बायकोला घेऊन दवाखान्यात आला. नारायणने पाहिले, त्याच्या अनुभवी नजरेला लक्षात आले, बाईचे दिवस भरलेत. आज किंवा उद्या तिची डिलीव्हरी पक्की. त्या माणसाने नारायणला सांगितले
"दिवस भरलेत, डॉक्टरस्नी दावायचं होतं '.
नारायणणे तिला आत घेतले. डॉ नी इतर पेशन्टला मागे ठेऊन तिला तपासले. त्याच्या लक्षात आले दिवस भरलेत. त्यानी नारायणला हाक मारून तिच्या नवऱ्याला बोलाव, असे सांगितले. नारायण बाहेर येउंन तिच्या नवऱ्याला शोधू लागला. तिचा नवरा कुठेच नव्हता. त्याने इतर पेशंटना आता इथे बायकोला घेऊन आलेलं माणूस पाहिला काय असे विचारले. सर्व पेशन्टनी त्याला पाहिले होते पण तो कुठे गेला हे कुणालाच माहित नव्हते.
नारायणच्या मनात आले, तिचा नवरा कुठ तरी आजूबाजूला गेला असेल, पानतंबाखू खायला नाहीतर लघ्वी करायला.
त्या बाईला आत कॉटवर झोपायला सांगितले आणि नारायण तिच्या नवऱ्याची वाट पहात होता, एकीकडे त्याचे काम सुरूच होतं. ती बाई आत झोपली आहे हे पण तो विसरला. अचानक आतून क्णहण्याचा आवाज आला, तसे नारायणच्या लक्षात आले, आतमध्ये ती गरोदर बाई झोपली आहे. पण तिचा नवरा हिला टाकून कुठ गेला? नारायण आत डॉक्टरांकडे गेला आणि ती बाई आत ओरडते आहे, असे सांगितले.
डॉक्टर लगबगिने बाहेर आले, त्यानी अंदाज केला काही मिनिटात ही बाळंत होईल. या दवाखान्यात प्रसूतीच्या फारश्या सोयी नव्हत्या. त्यामुळे ते बाळंतनींना शहरात पाठवीत. पण आता तिच्या नवऱ्याने या बाईला आणुन सोडले होते आणि आपण नाहीसा झाला होता.
डॉक्टरना काय करावे सुचेना. त्यानी नारायणला गावातील सुईणीला आणायला पाठवले.
नारायण सायकल घेऊन गेला आणि सुईणीला बोलाऊन आला.
थोडया वेळाने गावातील सुईण आली. तिने त्या बाईच्या ओटीपोटाचा अंदाज घेतला आणि मुलं आडवं असल्याच सांगितलं. डॉक्टरना मघा अंदाज आलाच होता पण हल्ली बरेच वर्षे डिलीव्हरी करायची सवय नव्हती. शेवटी डॉक्टरनी त्या सुईणीच्या मदतीने त्या बाईची डिलीव्हरी केली, मुलगा झाला.पण ही आनंदाची बातमी सांगणार कुणाला?
मुलाचा बाप बायकोला या दवाखान्यात सोडून नाहीसा झाला होता. आता पुढे काय? पुढची व्यवस्था.
नारायणनें बाजूच्या छोटया हॉटेलमधून तिला चहा आणुन दिला. ती जरा शुद्धीत आली, तसा नारायण तिला विचारू लागला
"बाई, तुजा नवरा कुठ गेला?
ती बाई रडत रडत कुठल्यातरी अगम्य भाषेत बोलत होती, हे कुणालाच कळेना.
"बाई, तुझं गाव कोणतं?
पुन्हा ती काय सांगत होती की तिला बोललेलं कळत नव्हतं कोण जाणे?
मग नारायणणे आणि त्या सुइणीनें खाणाखुणा करून तिला तिच्या नवऱ्याबद्दल विचारले तर ती मोठ्याने रडू लागली.
नारायणने आत डॉक्टरना जाऊन सर्व सांगितले.
डॉक्टर आत गेले, त्यानी विचारून पाहिले, तिची भाषा तेलगू नाहीतर मळ्यालाम असावी असा त्यानां अंदाज आला. या गावामध्ये ही भाषा समजणारा कोणी नव्हता.
म्हणे म्हणे पर्यत रात्र व्हायला आली, तिचा नवरा फिरकला नाही. आता डॉक्टरना आणि नारायणला टेन्शन आले. ह्या ओल्या बाळंतीनिची देखभाल कशी व्हायची? डॉक्टरनी त्या सुईणीला रात्री थांबायला सांगितले. त्या काळी त्या छोट्या गावात खाणावळी नव्हत्या. डॉक्टरनी आपल्या घराकडून बायकोला सांगून दोघींचे डबे पाठवले.
डॉक्टरना आणि त्यान्च्या पत्नीला दोघांना पण मधुमेह, त्यामुळे ती दोघ पहाटे चालायला बाहेर पडत. बायकोची बडबड नको म्हणून डॉक्टर स्वतः लवकर उठून चार कप चहा करून आणि थर्मासमध्ये भरून तो दवाखान्यात पोचोवला.
दुसरा दिवस... तिसरा दिवस.
चौथा दिवस, तिच्या नवऱ्याचा पत्ता नव्हता. सकाळ संध्याकाळ डॉक्टरांच्या घरून जेवणाचे डबे जात होते, डॉक्टर सकाळी फिरायला जाताना चहा भरून थर्मास देत होते.
तिला आणि तिच्या बाळाला डॉक्टर औषधं पण देत होते.
या पेशन्टवर डॉक्टरांचे खर्च होतं होते ते नारायण चोपडीत लिहून ठेवत होता. तिचा नवरा आला की त्यांचेकडून पैसे घेणार होता.
आठव्या दिवशी डॉक्टर पेशन्ट तपासण्यात मग्न होते, बाहेर नारायण औषधे कुटून बाटलीत भरून देत होता एव्हड्यात त्या बाईचा नवरा हजर झाला. तो नारायण समोर गेला आणि म्हणाला
"माज्या बायको पोराला न्हयला आलोया '.
नारायणने चमकून त्याच्याकडे पाहिले आणि त्याला ओळखले.
", आर व्हतास कुठ बाबा?, पोटोशी बायकोला सोडून गेलास तो गेलास... तिची काय चिंता.. काळजी?
"काळजी कशापायी.. एव्हडे गायकवाड डागदार आसनाना... डागदार म्हणजे देवच की... आनी मी काय करनार इथं.. मी पाटलांच्या मळ्याला कामाला.. भाजी पिकवायला.. आता मी न्हेतो माज्या बायलीला '.
"आर पन तुला पोर झालंय, तो तरी बघशील का न्हाई '.
"काय बी होऊ दे.. मी दोघासनी नेतोय.. गाडी आणलीय मालकाची '.
नारायणने बाहेर रस्त्यावर पाहिले, खिल्लारी बैलांचीगाडी उभी होती.
"बरं, तुज्यपारी लई तरास झालंय साहेबाना, रोजच जेवन खावन हाय की.. औषध पानी हाय '.
"देवमानुस हाईत डागदार.. म्हणून तर गेल्लो ना गुमान '.
"काय बोलू बाबा तुझ्याशी.. रोजचा खर्च लिवून ठेवलाय मी चोपडीत, तो दे आनी तुज्या बायली पोराला ने '
"पैक कुनाकडे हायेत भाऊ?माज्याकडे एक पैसा बी नाय '.
त्याने आपल्या विजारीचे आणि शर्टाचे खिसे उलटे करून दाखवले.
"पैका न्हाई, अर डागदार कडे यायचं म्हणजे पैका नको '.
"आता न्हाई पैका तर काय करू, पाटील दोन टायमाला जेवन देतो बस्स '.
नारायण ने डोक्याला हात लावला आणि त्याचा हात पकडून आत डॉक्टराकडे घेऊन गेला.
"साहेब, हा त्या आतल्या बाईचा न्हवरा, त्या दिशी तिला सोडून गेला तो आज दोघंसानी न्यायला आलाय,आनी खर्चाचे पैक न्हाई म्हणतोय '.
डॉक्टर गायकवाड यांनी त्यांचेकडे हसून पाहिले.
"होतास कुठ बाबा? असं गरोदर बायकोला सोडून कोण जात काय?
"तुमचा ईश्वास होता म्हणून गेल्लो डागदार सायेब, हित सोडून गेलो म्हणजे देवा घरी सोडून जान न्हवं, कसाला काळ्जी करू मी '.
मध्येच नारायण म्हणाला "मी याचा हिशेब चोपडीत लिहून ठेवलाय, सहाशे वीस रुपये बिल झालंय '.
डॉक्टरनी त्या माणसाकडे पाहिलं
"माज्याकडे काय बी नाय दयायला, योक पैका भी नाय '.
एव्हड्यात त्याला काय तरी आठवलं, त्याने काखेतील पिशवी काढली आणि त्यातून एक मेथीची जुडी बाहेर काढली.
"डागदार सायेब, माज्याजवळ ही एक मेथीची जुडी हाय, ती मी ठेवतो इथं.
त्याने ती मेथीची जुडी डॉक्टरांच्या टेबलावर ठेवली.
"माज्या पाशी एवढच हाय.. ते तुमास्नी दिलंय.. आता माज्या बायको पोराला सोडा '.
डॉक्टरनी मान हलवली. नारायण त्याला आत त्याच्या बायकोपाशी घेऊन गेला.
थोडया वेळाने तो, त्याची बायको आणि बाळ त्याच्या बैलगाडीत बसुन निघून गेली.
नारायणने त्याचे नावपण विचारले नव्हते, म्हणून त्याने उधारीच्या वहीत लक्षात यावे म्हणून लिहून ठेवले.
"मेथीची जुडी.. येणे सहाशे वीस मात्र.
---=--------तीस वर्षानंतर ------=
तीस वर्षात या गावात बराच फरक पडला, नवीन नवीन डॉक्टर गावात आले. दुकानें वाढली, मोठया शाळा उघडल्या, नवीन स्टॅन्ड झाला, रिक्षा आल्या, टॅक्सी आल्या, हॉटेल्स, लॉजिंग्स नवीन झाली, अनेक औषधं दुकानें झाली.
डॉक्टर गायकवाड यांनी आध्यत्मिक ओढ वाढवली. हळूहळू त्यानी प्रॅक्टिस बंद करत आणली पण त्यांचे जुने पेशन्ट त्यान्च्या घरी जात होते. डॉक्टरना एकच मुलगी.ती मराठीची प्रोफेसर झाली आणि लग्न करून मुंबईत स्थायिक झाली.
नारायण म्हातारा झाला होता पण अजून रोज डॉक्टरांकडे येत होता. दुपारी घरी जात होता. डॉक्टरनी त्याच्या दोन्ही मुलांना ओळखीतून नोकरीला लावले.
डॉक्टरना मधुमेह होता पण त्यापेक्षा जास्त त्यान्च्या पत्नीला होता. हा रोग त्यान्च्या मुलीच्या पण शरीरात घुसला होता.
डॉक्टरांच्या पत्नीला आठवड्यातून तीन वेळा डायलीसिस करावे लागत होते. त्याने ती कंटाळली होती. दर महिन्याला यूरोलॉजिस्ट कडे खेपा सुरु होत्या.
डॉक्टरपत्नीचे पाय सुजू लागले, थकवा जानऊ लागला, डायलीसिस करून करून थकायला झाले,.
एकदा नेफरोलॉजिस्ट साळुंके यांची डॉक्टरनी पत्नी सह भेट घेतली, डॉ साळुंके यांनी किडनीचे सर्व रिपोर्ट काढले. त्त्यांचे म्हणणे पडले "क्रोनिक किडनी फेल्युअर 'आहे. अशा परिस्थितीत "किडनी ट्रान्सप्लांट 'हा उत्तम इलाज आहे, डायलीसिस जास्त दिवस करणे शक्य नाही.
डॉक्टर गायकवाड काळजीत पडले."किडनी ट्रान्सप्लांट 'मध्ये कोणीतरी किडनी देणारा हवा.
डॉ साळुंके म्हणाले, शक्यतो तुमच्या जवळच्या नात्यातील डोनर पहा. कारण किडनी कुणाची घ्यावी यासंबधी काही नियम आहेत. डॉ गायकवाड हे स्वतः डायबिटीक, त्त्यांची मुलगी पण डायबिटीक.. म्हणजे जवळची ही दोन माणसे उपयोगाची नाहीत.
डॉ साळुंके यांचे म्हणणे पडले जर कोणा मृत व्यक्तीची किडनी मिळतं असेल आणि त्यान्च्या कुटूंबाची संमती असेल तर सुद्धा किडनी ट्रा्सप्लांट होऊ शकत आणि आपण गेल्या पंधरा वर्षात अशी अनेक ऑपरेशन यशस्वी केली आहेत. जर किडनी व्यवस्था होतं असेल तर माझ्या हॉस्पिटलमध्ये होऊ शकत, तशी एक्स्पर्ट टीम आपल्यकडे आहे.
डॉ गायकवाड काळजीत पडले, आपण जवळची मंडळी किडनी देऊ शकत नाही मग दुसऱ्या एखाद्या मृत व्यक्तीची किडनी कशी मिळणार? नारायण डॉक्टरना म्हणाला "साहेब तुमी एव्हडे पुण्य केलंय, इतक्या लोकांना फुकट तपासलंय, आपण एक पेपरमधी जाहिरात देऊ, कुणीनाकुणी तुमचा नाव वाचून धावून येल '. डॉक्टर जाहिरात दयायला तयार नसताना सुद्धा नारायणने मुलाला सांगून जाहिरात दिलीच, तसेच आजूबाजूच्या हॉस्पिटलमध्ये कोणी पेशन्ट किडनी देऊ शकत असेल तर डॉ साळुंके यांच्या हॉस्पिटलमध्ये कळवायला सांगितले.
त्या शहराच्या लागतच्या शहरात एका अंदाजे तीस बत्तीस वर्षाच्या युवकांने आपल्या वडिलांना डॉ. भागवत यांच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले होते, त्या तरुणाच्या वडिलांना ब्रेनस्ट्रोक आला होता.गेले वीस दिवस त्याचे वडील आयसीयू मध्ये होते, पेशन्टकडून कसलाच प्रतिसाद नव्हता. डॉ भागवत उपचार करत होते.तो तरुण पण निराश झाला होता. हळूहळूपरिस्थिती त्याच्या लक्षात येत होती, त्याच्या मनाची तयारी झाली होती, काहीतरी निर्णय घ्यायला हवा होता.
आज सकाळी त्या तरुणाने पेपर मध्ये जाहिरात पाहिली, डॉ गायकवाड यांनी केलेले किडनीसाठी आवाहन. त्याचे डोळे चमकले. त्याने डॉ भागवत यांची भेट घेतली.
तरुण -डॉ, माज्या वडिलांची तब्येत बरी हुईल असं वाटतं न्हाई. किती दिवस असं ठेवायचं मशीनलाऊन?
डॉ. भागवत -खरे आहे, ब्रेनस्ट्रोकने मेदूला मोठा आघात केला आहे, असे पेशन्ट रिकव्हर होणे कठीण असते पण डॉ नी काहीच उपाय केले नाहीत, असे पेशन्टच्या नातेवाईकांना वाटते, म्हणून त्याना सपोर्ट देऊन त्त्यांचे आयुष्य वाढवतो आम्ही... सपोर्ट काढताच काही तासात पेशन्ट जातो.
तरुण -पण डॉक्टर, माज्या बाबाची किडनी कुनला चढवू शकतो का आपन?
डॉ -निश्चित, त्या साठी योग्य डॉक्टर हवा, हॉस्पिटल हवे, मला ते शक्य नाही.
त्या तरुणाने पेपर बाहेर काढला आणि डॉना दाखवला.
डॉ -हे डॉ गायकवाड, सिनियर डॉक्टर, देव माणूस.. त्याच्या पत्नीला किडनी हवी आहे, मला पण डॉ साळुंके यांनी फोन केला होता.
तुमची जर इच्छा असेल तर तुमच्या वडिलांची किडनी डॉ गायकवाड यांच्या पत्नीला देऊ शकता, मी डॉ साळुंकेना फोन करू का?
तरुण -होय डॉक्टर, करा तुम्ही फोन...
डॉ भागवत यांनी डॉ साळुंके यांना फोन करून एक तरुण ज्याचे वडील आपल्या हॉस्पिटलमध्ये आयसीयू मध्ये ब्रेनस्ट्रोक झालेले आहेत, त्त्यांची किडनी देऊ इच्छितो, असा फोनवरून निरोप दिला.
डॉ साळुंके यांनी डॉ गायकवाड यांना फोन करून तुमच्या पत्नीला आपल्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याची सूचना केली. डॉ गायकवाड आश्रयचकित झाले. कोण हा अनोळखी तरुण? जो आपली जाहिरात पाहून वडिलांची किडनी दयायला तयार झाला?
दुसऱ्या दिवशी डॉ गायकवाड, त्त्यांची कन्या, जावई आणि नारायणसह पत्नीला घेऊन आले आणि ऍडमिट केले.
.डॉ साळुंके यांच्या हॉस्पिटलमध्ये मिसेस गायकवाड यांचे सर्व रिपोर्ट काढले,किडनी ट्रान्सप्लांटच्या दृष्टीने सर्व रिपोर्ट होते, मग डॉ भागवत हॉस्पिटल मधून त्या तरुणाच्या वडिलांना आयसीयू मधून बाहेर काढून ऍम्ब्युलन्स मधून डॉ साळुंके मध्ये ऍडमिट केले.
त्या तरुणाचे वडील मृत झाले हे लक्षात आल्यावर एकचवेळी दोन्ही ऑपरेशन्स सुरु झाली. त्या मृत व्यक्तीच्या शरीरातील किडनी यशस्वीरित्या मिसेस गायकवाड यांच्या शरीरात बसवली गेली.
सहा तास चाललेले ऑपरेशन यशस्वी झाले.
डॉ गायकवाड आणि नारायण तसेच डॉ ची मुलगी जावई या सर्वाना आश्यर्य वाटतं होते, आपल्या वडिलांची किडनी देण्यास उत्सुक असणारा तरुण कोण?
चार दिवसानंतर डॉ गायकवाड यांनी डॉ, भागवत यांना फोन केला आणि त्या तरुणाचे नाव विचारले. त्याचे नाव अशोक वेल्लर असल्याचे आणि तो बिल्डर असल्याचे त्यानी सांगितले आणि त्याचा फोन नंबर दिला.
डॉ. गायकवाड यांनी अशोक वेल्लर याला फोन करून त्याला भेटण्याची इच्छा व्यक्त केली, अशोकने आपणच तुम्हाला भेटायला येतो, असा निरोप दिला.
अशोक वेल्लर आपल्या आईसह डॉक्टरांच्या घरी आला.नारायण तसेच डॉक्टरांची मुलगी पण त्याची वाट पहात होती.
त्याची इनोव्हा गाडी डॉक्टरांच्या गेटमधून आत आली, अशोकनें आणि त्याच्या आईने डॉक्टरच्या पायाला हात लाऊन नमस्कार केला डॉक्टर अवघडले.
, डॉ -, अरे अरे काय करतोस हे?, मी तुम्हाला नमस्कार करायला हवा.. केव्हडे उपकार तुमचे माझ्यावर.. तू तूझ्या वडिलांची किडनी माझ्या पत्नीला दिलीस म्हणून माझ्या पत्नीला जीवनदान मिळालं, नाहीतर ती थोडया दिवसात....
डॉक्टरना हुंदका आला.
अशोक -डॉक्टरसाब, तुमचे माज्यावर लई उपकार हाईत, माजा बाबा तुमची आठवण काढायचा.. मला म्हणायचं "डागदार गायकवाड यांचे उपकार हायेत माज्य्वार.. ते कवातरी फेडायला हवे.. नुसते पैस देऊन ते फिटायचं न्हाईत.
डॉ -कसले उपकार? तुजा बाबा कधी मला भेटला होता?
अशोक -तीस वरसापूर्वी एक फाटका माणूस आपल्या दिवस भरलेल्या बायकुला तुमच्याकडं सोडून गेल्ला, तुमच्या इस्वासावर तो आठ दिवसांनी तिला आनी पोराला न्यायला आला... आठवतंय काय... हे नारायणकाका व्हते.. त्यानीच औषधे त्या बायलीच्या तोंडात घातली.
डॉ -खरंच मला काही आठवत नाही..
किती पेशन्ट येत असत.. कोणी पैसे दिले कोणी नाही.. मी कधी फिकीर केली नाही.. आम्हाला तीन जणांना किती काय लागतंय? पण तू कोण त्या माणसाचा?
अशोक -डागदार, तुमच्यामूळ माजी मायच बाळंतपण झालं.. फुकट... तिचा तो बाळ म्हणजे मी.. अशोक..
नारायण -अरे, तवाच तुज्या मायला बघितलं, तवा मला वाटायला लागलं, या बाईला मी कुठंतरी पाहिलंय.
अशोक -माज्या बाने मला सांगितलं व्हतं "डागदरला देयाला तवा मजयकडे काय बी न्हवत, मी दिली फक्त एक मेथीची जुडी.. तेव्हडीच माज्या पिशवीत व्हती..
"मेथीची जुडी 'म्हणताच नारायणला काही तरी आठवले, तो आत गेला आणि उधारीच्या चोपड्या चाळू लागला.
डॉ -खरच माझ्या काही लक्षात नाही, पण तुझे माझ्यावर खुप उपकार झाले बाबा, नाहीतर कोण अशी किडनी देतो..
अशोक -माज्या बाबांनी सांगितलं, अश्या देवमाणसाचे उपकार फेडायचे... एक मेथीची जुडी देऊन मी तूझ्या मायला आणि तुला बाहेर नेल. माज्या बानें मग गवंडीकाम केल.. मग लहनमोठी काम घेऊ लागला.. मग शेहेरात आला.. बिल्डिंग ची कामे घेतलं.. पैस मिळवलं... घर
बांधलं.. गाडी घेतली.. माज लगीन केल, आता मी त्या धंद्यात हाये.. त्याच्या तोंडात तुमच नाव असायचा.
तुमचा उपकार फेडायचं संधी मिळाली. शेवटी बाबानेच तुमचे उपकार फेडले.. त्याचीच किडनी तुमच्या घरवालीच्या कामाला आली.
.. तवा डागदार, मी तुमच्यावर कसलभी उपकार केल्ले न्हाईत.. माज्या बाने तुमचे उपकार फेडले. डॉक्टर आणि त्त्यांची कन्या सदगदीत झाली होती.डोळे पुसत होती.
एव्हड्यात नारायण आतून जुनी उधारीची चोपडी घेऊन आला.
शहात्तरसालच्या चोपडीत नोंद होती
"मेथीचीजुडी -येणे सहाशे वीस रुपये.
नारायणने ती नोंद डॉक्टरना दाखवली.
डॉक्टर नारायणला म्हणाले ",, डॉक्टरीपेक्षा हा असा आहे ज्याला समाजासाठी काही तरी करण्याची मोठी संधी असते. जो पैसे हे सर्वस्व न मानता पेशन्टहा माझा देव आहे असा समजतो, त्याची लोक आठवण काढतात नाहीतर त्याला शिव्या पण देतांत. प्रत्येकाने आपल्याला किती पैसे लागतात याचा विचार करावा.
अशोक, तुजा बाबा अडाणी होता, त्याचेकडे पैसे नव्हते पण मन होतं, आठवण होती, उपकाराची जाणीव होती. इतक्या वर्षाच्या उधारीच्या वह्या नारायणने जपून ठेवल्यात.
नारायण, माझी सगळी उधारी या अशोकने जमा केली. आता सगळ्या वह्या जाळून टाक.
जाता जाता अशोक नारायणकाकाला म्हणाला "काका, माज्या वडिलांची उधारी.
नारायण हसून म्हणाला "ती मेथीची जुडी उधारी कवाच मिळाली.
प्रदीप केळुस्कर 9307521152 / 9422381299
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा