बुधवार, ४ डिसेंबर, २०२४

1590. मोकळा श्वास

तिची माझी भेट अधूनमधून कधीतरी व्हायची. नुसतीच ती सशासारखी धावत असायची. 
कशी आहेस गं? 
हल्ली फारशी दिसत नाहीस?
नक्की काय चाललय तुझं?
असं विचारलं तरी ती एक मोठा उसासा टाकायची आणि म्हणायची.
"आपल्या नोकरी करणाऱ्या स्त्रियांना आहे का उसंत? सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत नुसती तारेवरची कसरत करावी लागते. तिला स्वतःला वेळच देता येत नाही. ना कुठे बाहेर फारशे जाता येत, ना पाहुण्या रांवळ्याच्या भेटी घेता येत."
मी म्हणाले खरंय गं. पण स्वतःसाठी ही थोडा वेळ काढायला हवाच की ! परवा आम्ही सगळ्या मैत्रिणी सुमाच्या वाढदिवसानिमित्त एकत्र जमलो होतो. तुलाही तिने कॉल केला होता पण, तू का नाही आलीस?"
त्यावर लगेच ती म्हणाली,
"नाही गं घरातील सगळी कामे मलाच करावी लागतात. कोणत्याच कामाला कामवाली लावली नाही बघ .मग मला कसा वेळ भेटेल तुमच्यात मिसळायला,गप्पा मारायला."
मी तिला म्हणाले,
"अगं लावायची ना कामवाल्या ताईना. त्यानाही थोडं आणखी काम मिळेल आणि तुलाही उसंत मिळेल रोजच्या धावपळीतून ."
तिचं उत्तर तयारच होतं.
"चिकाटीने प्रपंचा करत आजपर्यंत  इथं पोहोचलो आहे. नाही बाई ,तिला कुठे आणि दर महिन्याला पैसे देऊ. मी सगळ्या गोष्टींची बचत करते म्हणून ही दौलत उभी राहिली गं. मी माझी कधीच हौस मौज केली नाही बघ, ना कधी आवडीची साडी घेतली. कधीच कुठे बाहेर फिरायला गेलो नाही आम्ही. माझी छोटी जाऊबाई फारच उधळी आहे बघ. सण आला की, चालली दुकानात साडी घ्यायला.वरून मलाच चिडवत असते.  तुम्ही वर जाताना धनाचं गाठोडे सोबत न्या म्हणून. आज आमच्याकडे सगळे आहे बंगला, गाडी,जमीन, मुलं उच्च शिक्षण घेत आहेत." 
असं म्हणत तिची निघायची गडबड सुरू झाली. 
भेटू परत म्हणून ती निघूनही गेली.अधूनमधून ती दिसायची पण, लांबुनच हसायची. आणि निघूनही जायची. कधी भाजी तर, कधी सुट्टीच्या दिवसात शेतात  जाताना ती दिसायची. तिच्याकडे पाहिले की, सगळं कामाचं ओझं तिच्याच डोकीवर ठेवल्यागत वाटायचं.पण एक दिवस सगळं विपरीत घडलं.
      ती अजून अंधारलेली पहाट होती. मलाही लवकर आवरून शाळेत जायचे होते. तितक्यात फोनची रिंग वाजली. एवढया पहाटे फोन कसा? म्हणून मी थोडी घाबरलेच. पलीकडून अनिता नावाची मैत्रीण आतल्या आवाजात बोलत होती.
"उठलीस की नाही अजून. तुला काही कळाले का"?
 मी म्हणाले ,
"हो उठले गं,काय कळाले का?"
तशी ती म्हणाली
 "अगं आपली मैत्रीण उमा गेली की".
मी परत म्हणाले काय?
तसे तिचे तेच बोलणे कानी पडले.  ते ऐकताच  एकदम पोटात गोळा आल्यासारखे झाले आणि मी पटकन खाली बसले. काय बोलावे हे सुचतच नव्हते. उमा अशी कशी अचानक सोडून गेली. लेकरांची आई काळाने का हिरावून नेली? तेच कळत नव्हते. तीच पुढे म्हणाली,  तिला हार्ट अटॅक आला होता. मला सगळंच फिरल्यासारखे वाटू लागले. अवघ्या पंचेचाळीसीतली ती' एवढया लवकर जगाचा निरोप कसा घेतला. तिची मुलं तशी फारशी मोठीही नव्हती. पण शेवटी मृत्यू हा; तर ठरलेलाच असतो. तो कोणाचाही हातात नसतो .फक्त कोण लवकर ,कोण उशिरा इथला प्रवास संपवत असते.
   मी जेंव्हा अंत्यदर्शनासाठी तिच्या घरी गेले तेंव्हा, भल्या मोठया बंगल्याच्या बाहेर तिचे शव एका चटईवर ठेवण्यात आले होते. मुले,पती नातेवाईक तिच्या अचानक जाण्यामुळे आक्रोश करत होती. पांढऱ्या कपड्यात ती थोडी वेगळीच भासत होती. मी बाजूला उभ्या असलेल्या एका नातेवाईकाला विचारले,
असे कसे झाले हे अचानक.
ते म्हणाले,
" अहो ताई मृत्यू कोणाच्याही हातात नाही. पण वाईट एकाच गोष्टीचे वाटते ते म्हणजे उपाशीपोटी आत्मा गेला."
मी म्हणाले का बरं उपाशी गेली ती?
"अहो फारच हट्टी आणि चिकाटीची. सारखा एक एक रुपयाचा  विचार करणारी. श्रावण महिना असल्याने सलग दोन दिवस उपवास आले. तिचाही उपवास होता. तिने घरातील लोकांना स्वयंपाक करून घातला. पण स्वतः साठी काहीच केले नाही. नुसता चहा पिऊन दिवस काढला. काल कामावरून उशिराच घरी आली होती. तिथेही थोडा वर्क लोड होताच. घरी येताच तिला थोडी गरगर जाणवत होती. पण दोन दिवस काही पोटात नाही म्हणून तसे होत असेल अशी ती तिच्या पतीला म्हणत होती. तिने संध्याकाळी स्वयंपाक बनवण्यास सुरुवात केली. तिची मुलगी तिला मदत करत होती. स्वयंपाक करता करताच ती एकदम खाली कोसळली. ती परत उठलीच नाही. तिला वाचवण्यासाठी सगळे प्रयत्न केले गेले पण, काहीच उपयोग झाला नाही. आईला बिलगलेल्या मुलाला पाहून मन आतून भरून येत होते. रोजच धावणारी ती आज मात्र शांत झोपली होती. तिला आता संसाराची कसलीच चिंता दिसत नव्हती. हिरवी साडी घालून तिची ओठी भरली. नाकातली नथ तर तिला फारच शोभून दिसत होती. अर्धे मिटलेले डोळे काहीतरी सांगत असावेत असा भास होत होता. थोड्या वेळात अंतविधीसाठी लोक तिला घेऊन गेले.
अजून तिचे शव स्मशानभूमीत पोहचले नसेल तोपर्यंत मागे कुजबुज सुरू झाली.
आता मुलांचं,नवऱ्याचं कसं होणार बाई? कुटुंब सांभाळणारं कोणी तरी हवंच ना "
 लगेच दुसरी म्हणाली,
"किती मोठा बंगला, एवढी नवीन गाडी नवऱ्यानं घेतली पण बिचारी कधीच फिरायला गेली नाही. सारखी कामात. गाडीला पेट्रोल लागेल, बाहेर गेल्यावर पैसे फारच खर्च होतात. त्यापेक्षा न गेलेलं बरं असा तिचाच विचार होता.
लगेच तिसरी चर्चेत सहभागी झाली,
"एवढं करून सारं इथंच सोडून गेली. ती स्वतःसाठी काय जगली?
तिच्यामुळे कोणाचे काही थांबेल असे होणार नाही.  मागचे काहीतरी मार्ग काढून पुढे जातीलच."
हाच प्रश्न मलाही पडला. कारण तिच्यावर सगळं कुटुंब अवलंबून होतं, ती गेल्यानं मोठी त्यांच्यात पोकळी निर्माण झाली. स्वार्थीची नाती तर आमचा कसा तोटा झाला ? हाच विचार करत होती पण तिच्या जीवासाठी तिनं काय केलं? हा विचारही कोणाच्या मनात आला नाही. नुसती हळहळ करत जी ती आपआपल्या घरी निघून गेली. माझं मन खूप अस्वस्थ झालं होतं. मी शाळेला जाण्याचा मार्गावरच स्मशानभूमी होती. माझी नजर किती टाळावी म्हटलं तरी तिकडे गेलीच. स्मशानभूमीत कोणीच नव्हते. आजूबाजूला एकदम शांतता होती. तिची चिता अजूनही जळत होती. मी गाडी उभी करून तिथे थोडावेळ थांबले. एकटक त्या चितेकडे पाहत राहिले. काल परवा भेटलेली उमा आज अग्नीत विलीन झाली होती. मी तिला आतून हाक देत होते.
उमा आज तू एकटीच, फक्त एकटीच ,आहे का गं आजूबाजूला तुझ्या कोणी ! कोणीच नाही ना? कुठे गेली गं मायेची नाती सारी? ज्याच्यासाठी तू रात्रंदिन राबलीस. अग्नी शांत होईपर्यंत तरी कोणी तुझ्यासाठी थांबले का गं? नाही ना .नुसती धावणारी तू जगलीस का स्वतःसाठी कधी? दिलास स्वतःला वेळ सुंदर सजण्यासाठी, गेलीच कधी तुझ्या जवळच्या मैत्रिणीजवळ, बोललीस का तिच्याजवळ मनातलं सारं. हसलीस का खळखळून कधी? हरवून गेलीस का निसर्गाचे रूप पाहण्यात? घेतलंस तुझ्या आवडीचं काही असं जे फक्त तुलाच आवडायचं, कधीच नाही ना. तुझी गडबडीत गुंडाळलेली साडी आणि भुरभुरणारे केस बरंच काही सांगून जायचे गं. सर्वांसाठी तू केलं असशील गं पण स्वतःसाठी कधीच नाही जगलीस.
      खरं सांगू उमा तुझ्यामुळे मागे काहीच थांबणार नाही बघ. तू ज्याला सर्वस्व ओवाळून टाकत होतीस ना तो काही दिवसातच दुसरी साथीदार शोधेल. कारण त्याची ती गरज असेल. तू हळूहळू जागा सोडशील त्याच्या ह्रदयावरची, अन नवीन संसारात रमून जाईल तो. तुझ्या आठवणी जाग्या होतील अशा वस्तू तो जाणीवपूर्वक बाजूला ठेवेल. आता नको त्यातच गुंतायला असे म्हणून तो पुढची वाट चालेल. तुझी लेकरं आठवतील तुझा तो मायेचा पदर. ज्या पदरांची ऊब त्यांना मिळाली असेल. त्याच पदरानं तू चेहराही पुसला असशील. ती शांत झोपली असतील त्या पदराखाली कित्येकदा. उभी राहशील तू पदोपदी त्याच्या पुढे. "आई" म्हणत आसवे येतील त्यांच्या डोळ्यात पण परिस्थितीने हळूहळू ती ही तयार होतील. शिकतील,मोठी होतील आणि पंख फुटतील नवविचारांचे. घेतील उंच भरारी गगनी, पण तेंव्हा त्यांना तू आठवशील की नाही हे मात्र सांगता येणार नाही बघ. कारण आईनं आमच्यासाठी खूप केलं की, आई गेल्यावर आम्ही कसे राहिलो ते काय सांगत राहतील हे येणारा काळच उत्तर देईल बघ. मृत्यूनंतर काय आहे कोणालाच माहीत नाही. तरी पण मनातलं बोलते,
      तूझा भूलोकावरचा प्रवास संपल्यावरही उगाच मागची चिंता करू नकोस गं सखे. आतातरी परतीच्या मार्गावर तरी फक्त तुझ्यासाठी जिथे असशील तेथे फक्त तुझ्यासाठी एक मोकळा श्वास घे. मोकळा श्वास घे.

लेखिका-© ® रंजना सानप
मायणी (सातारा)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...