बुधवार, ४ डिसेंबर, २०२४

1562. समृद्धी

 "उठसुठ त्या कुलकर्ण्यांकडे काय असतं ग तुझं?" मीराने रागातच समृद्धीला विचारलं. समृद्धी काही न बोलता हातपाय धुवायला बाथरूम मधे गेली.
"रोज ऑफिसमधून आलं की मला हेच काम असतं. आधी जाऊन हिला शेजारून घेऊन यायचं. तूही क्लासमधून तिला डायरेक्ट घरी का नाही आणत रे? अभ्यासाकडे दुर्लक्ष होतं तिचं. पण बाप लेक दोघंही सारखेच. कितीही वेळा सांगा, पालथ्या घड्यावर पाणी.." 
"मीही तुला किती वेळा सांगू की तिला थोडा वेळ दे. तिचं सगळं जग बदललंय आपण तेव्हा.." शरद बोलता बोलता थांबला, कारण मीरा त्याचं काही ऐकून न घेताच आत निघून गेली.
समृद्धीने हातपाय धुवून कपडे बदलले आणि ती देवासमोर जाऊन बसली. मग शरदने देवापुढे निरांजन लावलं. रोजच्याप्रमाणे शुंभकरोती , रामरक्षा, मारूती स्तोत्र म्हणून झालं.
"बाबा, आज खूप धमाल आली. वरूणच्या दोन्ही आत्या आल्या आहेत. त्यांची मुलं पण आहेत. आम्ही सगळे मिळून खूप खेळलो. तिकडे मी, समीर, अमित, अल्पा खेळायचो ना अगदी तसंच. त्याच्या आजीने आपल्या आजीसारखेच मस्त लाडू केले आहेत रव्याचे. तेही खाल्ले आम्ही सगळ्यांनी. बाबा, मला ना त्यांच्याकडे खूप आवडतं आणि त्यांनाही मी आवडते. म्हणून मी जाते रोज त्यांच्याकडे. तुम्ही मला पाठवत जा हं, आईचं नका ऐकू.." डोळे मिचकावून समृद्धी म्हणाली आणि आत अभ्यासाला पळाली.
शांत, समाधानी, जे आहे त्यात आनंद मानणारा शरद आणि अतिशय महत्वाकांक्षी, मोठी मोठी स्वप्न बघणारी, आपली स्वप्नं सत्यात उतरवण्यासाठी झोकून देऊन मेहनत करणारी मीरा. विचारसरणीच्या दृष्टीने अगदी विजोड असलेलं आणि मीराला नुकत्याच  मिळालेल्या प्रमोशनमुळे गावातल्या एकत्र कुटुंबातून शहरातल्या विभक्त कुटुंबात आलेलं जोडपं.  
गावात आजी, आजोबा, काका, काकू, आत्या यांच्या प्रेमात वाढलेली समृद्धी,  त्याच प्रेमाची उब शेजारच्या कुलकर्ण्यांकडे शोधत होती. कुलकर्ण्यांचा वरूण समृद्धीपेक्षा दोन तीन वर्षांनीच मोठा होता. त्याला एक लहान भाऊही होता. घरात आजी आजोबा होते. शिवाय जवळच राहणाऱ्या त्याच्या आत्या सतत येऊन जाऊन असायच्या. वरूण सतत माणसांच्या गोतावळ्यात असायचा जो गोतावळा समृद्धी इथे आल्यापासून मिस करत होती. त्यामुळेच बहुतेक तिची वरूणशी घट्ट मैत्री झाली होती. पण नेमका हाच गोतावळा मीराला नको होता. माणसांच्या गराड्यात हरवलेला माणूस फक्त स्वतःसाठी असा कधी जगतच नाही, आपल्या स्वप्नांना सतत मुरड घालत राहातो आणि प्रगतीला रामराम ठोकतो असं तीचं ठाम मत होतं. शरदचा आहे त्यात समाधानी असण्याचा स्वभाव तिच्या दृष्टीने अल्पसंतुष्टपणा आणि कष्ट टाळण्याची पळवाट होती. पण शरदला मात्र बायकोच्या महत्वाकांक्षेची जाणीव आणि कदरही होती. त्यामुळेच मीराला प्रमोशन मिळाल्यावर त्याने विनातक्रार स्वतःची बदली करून घेतली होती. समृद्धी बरोबर तोही या नव्या जगाशी जुळवून घेत होता. 
मीराची समृद्धीने आपल्यासारखंच महत्वाकांक्षी व धडाडीचं जीवन जगावं अशी इच्छा होती. नव्हे तसा आग्रहच होता. पण समृद्धीने दोघांचेही सद्गुण उचलले होते. मीराची तल्लख बुद्धी, धडाडी आणि शरदचा माणसात रमणारा, त्यांना जपण्यासाठी धडपडणारा स्वभाव. त्यामुळे साहजिकच ती मीरापेक्षा ती शरदच्या जास्त जवळ होती. बघता बघता काळ सरकत गेला. मीरा करीअरच्या एकेक पायऱ्या चढत गेली. शरदने त्याची गावाशी जुळलेली नाळ टिकवून ठेवली. वरूण, समृद्धी दोघंही उत्तमरित्या शिक्षण पूर्ण करून नोकऱ्या करू लागले. त्यांची लहानपणापासूनची घट्ट मैत्री आयुष्यभरासाठीच्या सोबतीची स्वप्न विणू लागली. ज्याची अर्थातच शरदला खात्री होती आणि मीराला कुणकुण लागली होती. मीराने समृद्धीला समजवण्याचा प्रयत्न केला पण ती ऐकणार नाही हे जाणवल्यावर तिने नाखुशीने का होइना वरूणला जावई म्हणून स्वीकारून टाकलं आणि समृद्धीने मोठी सून म्हणून कुलकर्ण्यांच्या घराचं माप ओलांडलं. 
     समृद्धी लहानपणापासूनच तिच्या मोठ्या काकूच्या सगळ्यांना सांभाळून घेणाच्या स्वभावाच्या प्रेमात होती. जशी जशी मोठी होते गेली तसा तिला आईचा तुटक, स्वकेंद्रीत स्वभाव कळत गेला. करीअर पुढे  आईला सगळं गौण होतं तर काकू शिकलेली असूनही तिच्या चॉईसने घर सांभाळत होती. समृद्धीला या दोन्ही जगांतला सुर्वणमध्य गाठायचा होता. ज्यासाठी कुलकर्ण्यांच्या समजूतदार भावविश्वात भरपूर वाव होता. कधी घरच्या जबाबदाऱ्यांचं पारडं जड झालं ती करीअरला मागे सारत होती जे मीराला अजिबात पटत नव्हतं. त्यामुळे मायलेकींमधे एक प्रकारची अढी होती. नुकतंच सासऱ्यांच्या तब्येतीमुळे समृद्धीने प्रमोशन नाकारल्याने मीरा आणि समृद्धीमधे कमालीचा तणाव निर्माण झाला होता. मीराने तिच्याशी बोलणं सोडलं होतं.
आज समृद्धीकडे नवरात्रीचं हळदीकुंकू होतं. तिच्या सासूबाईंनी स्वतः फोन करून आमंत्रण दिल्याने मीराला जाणं भागच होतं. ठरलेल्या वेळेला मीरा थोडी घुश्शातच समृद्धीच्या नव्या घरी पोचली.  घरात गेल्या गेल्या मीराला एक वेगळीच सकारात्मक उर्जा जाणवली. घट बसले होते. सुरेख आरास केली होती. झेंडूची तोरणं, देवीला वाहिलेली गुलाबी कमळं, सतत तेवत ठेवलेला दिवा, हळदीकुंकवाचे भरलेले करंडे,  प्रसादाचा घमघमाट आणि मुख्य म्हणजे  हसत खेळत आनंदात समाधानाने वावरणाऱ्या गृहलक्ष्मी. हे सगळं पाहून स्वतःच्याही नकळत मीराच्या चेहऱ्यावर समाधानाचं चैतन्य पसरलं. इतक्यात समृद्धी बाहेर आली. लाल काठांची हिरवीगार मद्रास सिल्क, हातभर बांगड्या, नाकात नथ आणि गळ्यात ठसठशीत नेकलेस घालून तयार झालेल्या समृद्धीकडे मीरा पाहातच राहिली. खरोखरीच नावाप्रमाणे सगळ्या बाजूंनी समुद्ध जीवन जगते आहे आपली लेक आणि आपण उगीचच काहीतरी मनात धरून बसलो आहोत. करीअरच्या मागे धावताना कुठे थांबायचं हे जे मला कळलं नाही ते तिला इतक्या लहान वयात कळलंय. मीराचा उर अभिमानाने भरून आला. आईला पाहून समृद्धी जवळ आली तेव्हा मीराने तिचे दोन्ही हात घट्ट धरले. तिच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. काही न बोलताच या मनीचे त्या मनी पोचल्याने दोघींच्या नात्यात आजच्या हिरव्या रंगाचे नवचैतन्य पसरले. समृद्धी नमस्कारासाठी वाकली आणि मीराने तिच्या डोक्यावर हात ठेवत मनापासून 'सदैव अशीच समृद्ध राहा' असा आशिर्वाद दिला.
आज हिरव्या पानाफुलात सजलेली देवी 'तथास्तू' म्हणत समाधानाने हसली.

©® धनश्री दाबके.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...