यमुना काकूचे यजमान हरीकाका अलिकडे फार आजारी असतं. अर्धांग झाल्याने डावी बाजू निकामी झाली होती. वय पण सत्तरीच्या घरात होतं. यमुनाकाकू त्यांच्या डाव्या बाजूला रोज मालिश करत असे. उत्तम लिखाण वाचून दाखवत असे.
काकू रोज त्यांना हाताला धरून चार पावलं चालवत असे. काका म्हणत, “अग सात पावलं बरोबर चाललो ना आयुष्य भर. नाही जमत मला आता चालायला” पण डॅाक्टरनी रोज चालायला सांगितले होते. मग काका चिडचिड करत असतं. कधी नैराश्यामुळे निपचित पडून रहात तर कधी पैलतीर दिसून निर्वाणीचे बोलत रहात. काका असे आजारी झाल्यापासून यमुना काकू त्यांच्या देवघरातील निरांजन वाऱ्यानं शांत होऊ नये याची अत्यंत काळजी घ्यायची. मुलं, नातवंड देवघरात गेली की “जपून हो. तुमच्या येरझाऱ्यानं वारं लागून निरांजन शांत होईल हं.” म्हणायची. हरीकाकांच्या तब्बयेतीचं निरांजनाशी नातं काकूनं बहुधा स्वत:साठी बनवलं असावं. तिच्या आवाक्यात ज्या गोष्टी होत्या त्यापैकी तेवणारं निरांजन ही अशी गोष्ट होती जी तिला दिलासा देत असे. रोज यमुना काकू पुजेपुर्वी चांदीची निरांजनं चकचकीत घासून त्यात तिनं घरी केलेली सुंदर वात लावत असे. तुपात भिजलेल्या वाती पेटवून ती लांबट बदामाकृती ज्योती कडे बघत बसत असे. त्या ज्योतीच्या सौम्य व शांत प्रकाशाचा काकूला आधार वाटे. ज्योत वाऱ्याने थरथरली की ती हाताची ओंजळ करून ती झाकत असे. न जाणो ते निरांजन वाऱ्यानं शांत झालं तर?
अत्यंत हुशार व कर्तबगार हरीकाका शाळेत गणित शिकवून रिटायर झाले होते आणि यमुना काकू आहे त्यात उत्तम संसार करत होती. पण काकांना अर्धांगाचा झटका आला आणि त्या दोघांचं जीवन बदललं. अर्धांग त्या अर्धांगीनीची परीक्षा घेत होता. सतत कार्यरत असणारे काका खचले होते. ३१ डिसेंबरचा दिवस आला होता. यमुना काकूनं काकांना आवडणारं जेवण बनवलं. बिरड्याची उसळ, चिंच गुळाची आमटी, तलम पोळ्या, खमंग काकडी व खीर बनवली आणि काकांना भरवले. हरीकाका म्हणाले,” यमुना तुझ्याबरोबर संसार करताना सारं कठीण सोपं झालं बघ. आयुष्याचे गणितही छान जमलं पण तुला फार काम पडतं हल्ली. मी सुटलो तर…
काकूंनी हातांनी काकांची तोंड झाकलं. “तुमच्या गणितात पूरक कोन का काय असतात ना ते कधी तक्रार करतात का हो? हा कोन १२० अंशाचा व मी का ६० अंशाचा असं कधी विचारतात? दोन्ही मिळून १८० अंश झाल्याशी कारण ना? आपण पूरक आहोत एकमेकाला.. काका चमकले. त्यांच्या डोळ्यात पूरक कोन हे शब्द ऐकताच जिवंतपणा आला होता तो काकूला जाणवला.
यमुना काकू म्हणाली, “एवढं गणित आवडतं तुम्हाला. तुम्ही का नाही इतरांना शिकवत ? करायचं का एखादं “गणित शिकुया” असं पान कॅाम्पुटरवर. आपली नातवंड भराभर सांगितलं हे सगळं कॅाम्पुटरवर किंवा फोनवर कसं करतात ते. ” काका काही बोलले नाहीत.
काकूंनी निरांजनं लावली. दोघांनी परमेश्वराची मनोभावे आरती केली. व रामनामाच्या गजरात नवीन वर्षात प्रवेश केला. काकांना यमुना काकू म्हणाली,”आता २०२४ आलंय बरं आपल्या आयुष्यात. यावर्षी तुमची पंचाहत्तरी अगदी धुमधडाक्यात साजरी करायची आहे बरका.” काका पटकन म्हणाले,” अग, दहा महिने जायला हवेत त्यासाठी.“ आणि त्यांचा चेहरा पडला.
एक जानेवारीच्या सकाळी काकूंनी त्यांच्या २० वर्षाच्या नातवाला बोलावलं. त्याला काहीतरी सांगितलं. नातवानं “चला गणित शिकू या ” नावाचा काकांच्या नावाचा युट्यूब चॅनेल बनवून तो काकांना दाखवला. काकांनी साधे व्याज व चक्रवाढव्याज यावर एक धडा केला. काही तासातच युट्यूब वर ७०-८० कॅामेंटस व अनेक प्रश्न आले. नातवाबरोबर बसून काका त्याची भराभर उत्तरे देत होते. व तो काकांना कसं लिहायचं शिकवत सर्व उत्तरे लिहीत होता.
यमुना काकू म्हणाली, “पुरे झालं हो आजच्यापुरतं. दमला असाल. झोपा आता.”
“मला काय झालय? अहो मुलांना उद्या पायथागोरस शिकवायचा आहे. तेवढा धडा तयार करतो व नंतर झोपतो.” ते उत्साहाने म्हणाले.
यमुना काकूंनी बघितलं. चार पावलं टाकायला कंटाळा करणारे काका वॅाकरच्या आधाराने त्यांच्या टेबल खुर्चीकडे गेले होते व धडा करण्याच्या तयारीला लागले होते. आज हातही दुखत नव्हता. चालण्याचा त्रास होत नव्हता. चेहऱ्यावर अनेक महिन्यांनी तेज दिसत होतं. काकू शांतपणे देवघरात आली. तिनं निरांजनं लावली. आरती केली. त्या निरांजनाच्या पवित्र प्रकाशाने आजवर संसारातले कित्येक अंधारलेले क्षण दूर केले होते. आता हरीकाकांची पंचाहत्तरी साजरी होईल अशी भावना निर्माण झाली होती.
देवघरात निरांजन शांत तेवत होते. सर्व अनिश्चिततेतील निश्चितता काकू्ंना त्या ज्योतीत दिसत होती.
©® ज्योती रानडे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा