सोमवार, १६ डिसेंबर, २०२४

1618. तेजोमय

      आनंदीने देवघरातले लामणदिवे काढून रखमाला नेऊन दिले. रखमा परसात पितळीची भांडी घासत बसली होती, आनंदीला पाहून लगेच म्हणाली, " काय झालं वैनीसाहेब, चेहरा असा उतरलाय कशापायी, आवो दिवाळी दोन दिवसांवर आलीया, तुमचा पयला दिवाळसन, अन तुमी नाराज?? वाडा आवरताना कसं चैतन्य होतं तुमच्यामंदी, कोपरा न कोपरा स्वच्छ लखलखीत आवरू लागलाय तुमी जातीनं, म्हनलं यंदा वाड्यातली दिवाळी खास हुईल. पन घरची लक्षुमी अशी नाराज, माहेरची आठवन येती?"
    रखमाच्या बोलण्याने खरंतर भरूनच आलं आनंदीला पण तिने बोलणं टाळलं. घरातल्या बाईने गडी माणसाशी बोललेलं सासूबाईना फारसं आवडत नसे. तशी रखमा वाड्यातच लाहनाची मोठी झाली होती अन साधारण आनंदीच्याच वयाची होती. तिच्याशी बोलता वागताना जरा मोकळं वाटत असे आनंदीला. म्हणूनच अनंदीचा नाराज चेहरा लगेच ओळखला होता रखमाने. चारच महिन्यांपूर्वी लग्न होऊन वाड्यात आली होती आनंदी. माहेरी अठरा विश्वे दारिद्र्य, अंथरुणाला खिळलेले बाबा अन ज्याची विक्षिप्त बायको सोडून गेली आहे असा वडील भाऊ. या सगळ्यात आनंदीच्या लग्नाचे वय उलटून चालले होते. तशी जोडीदाराबद्दल फारशी स्वप्न कधीच बघितली नव्हती तिने पण तिच्या बाबांनी तिची वाटणारी काळजी अनेकदा बोलून दाखवली होती. आणि तशातच अनंतरावांसाठी लग्नाची मागणी आली होती तिला. अनंतराव म्हणजे शेजारच्या गावच्या गडगंज श्रीमंती असलेल्या पाटलांचा एकुलता एक मुलगा.
      आपल्या बालमित्राकडे दादासाहेबांनी स्वतःच्या मुलासाठी आनंदीला मागणी घातली होती. त्यासाठी अन्न पाणी त्यागून थोडक्यात धमकीच दिली होती त्यांनी तेंव्हा कुठे तयार झाले होते अनंतराव. त्याला कारणही तसेच होते म्हणा, हे त्यांचे दुसरे लग्न होते, त्यांच्या पहिल्या पत्नी सुमतीबाई मानसिक रुग्ण होत्या, वाड्याच्या तिसऱ्या ताळाहुन उडी मारून जीव दिला होता त्यांनी. प्रतिष्ठित कुटुंब असल्यामुळे व सुमतीबाईंची अवस्था सगळ्यांना माहिती असल्यामुळे मोठे बालंट आले नव्हते म्हणायला पण सगळ्याच कुटुंबाला प्रचंड त्रास सहन करावा लागला होता. अंतर्बाह्य बदलले होते अनंतराव अशा अनुभवानंतर अन म्हणूनच चार वर्षात पुन्हा लग्नाला तयार झालेच नव्हते. पण यावेळी त्यांचा नाईलाज झाला. या सगळ्या परिस्थितीची जाणीव असूनही लगेच तयार झाली होती आनंदी लग्नाला, निदान आपली काळजी मिटल्याने आपले बाबा शांततेत डोळे मिटू शकतील हा एकमेव विचार होता त्यामागे. आणि तिच्या लग्नानंतर महिन्याभरातच समाधानाने मार्गस्थ झाले होते ते वैकुंठाकडे.
      आनंदीच्या येण्याने चैतन्य आले होते वाड्यात खरंतर, पण अजूनही सगळ्यांच्या मागच्या अनुभवाच्या झळा काही मिटल्या नव्हत्या. त्यामुळे कोणी फारसं मोकळं वागत नसे अन कोणाचे स्वभाव फार कळले नव्हते अजून आनंदीला. दादासाहेब अन सासूबाई जरा कडक होते म्हणजे तसं वाटत होतं तिला. तशा सासूबाई बोलत तिच्याशी पण मोजकंच. अन अनंतराव तर तिच्याशी अंतर राखून वागत. त्यांचं असं वागणं समजून घेण्याइतकी समंजस नक्कीच होती आनंदी. आत्ता आत्ता कुठे जरा संवाद होऊ लागला होता दोघांचा.
      दिवाळी अगदी आठ दिवसांवर आली आणि आनंदी अतिउत्साहाने तयारीला लागली, सगळी साफसफाई, फराळाची सगळी तयारी अतिशय जोमाने केली. पण क्षणात माहेरच्या आठवणीने मन व्याकूळ झाले तिचे, माहेर म्हणायला आता होतंच कोण? फक्त भाऊ. आपण इथे एवढ्या सुखात आहोत, दुधा तुपाशी खातोय अन तिथे आपल्या भावाला दोनवेळच्या जेवणाची भ्रांत पडली असेल या विचाराने कासावीस झाली ती. त्याला बोलवावं का असा विचार हजारवेळा आला मनात तिच्या पण ती काहीही बोलली नाही, वाटलं म्हणेल घरातलं कोणीतरी आपणहून.
      दिवाळीच्या आदल्या दिवशी दादासाहेबांची गावात वास्तव्यास असलेली धाकटी बहीण व तिचे कुटुंब वाड्यात आले, आत्याच्या सुना, नातवंडं.. घर अगदी गोकुळ वाटू लागलं. एकाच गावात असल्यामुळे सगळ्यांची दिवाळी वाड्यातच साजरी होत असे दरवर्षी. घर पाहुण्यांनी भरून गेलं, वाडा पणत्यांच्या कंदिलाच्या रोषणाईने नटला. आनंदी मात्र मनातून अगदीच उदास झाली, एवढ्या सगळ्या गोतावळ्यात आपला भाऊ किती सहज सामावून गेला असता असे वाटत राहिले तिला सतत पण हे बोलून दाखविण्याइतके नवखेपण सरले नव्हते तिचे अजून. ना कोणी तिच्या चेहऱ्यावरचे उदास भाव टिपले ना गडबडीत अनंतरावांशी बोलायला वेळ मिळाला तिला. पहाटे सगळ्यांनी तेला उटण्याने न्हाऊन अभ्यंगस्नान केले, गरम गरम खारा गोडा असा फराळ केला. आनंदीचे फारसे लक्ष नव्हते कशातच, मात्र तिने तसे जाणवू दिले नाही. अनंतरावांशी बोलून निदान भाऊबीजेला माहेरी जावं असं तिने ठरवलं. पण तिला ते कुठेच दिसले नाहीत, सासूबाईंना त्याबद्दल विचारलं तर, बाहेर गेलाय कुठेतरी एवढंच फक्त कळलं. आनंदीने साग्रसंगीत स्वयंपाक केला, आनंदी सुगरण होती, पंचपक्वान्नाचा गोड दरवळ, भाज्यांचा खमंग वास घरभर पसरला होता.
सासूबाईंनी अन आतेसासूबाईंनी कौतुक केले. एक गडद वांगी रंगाची चंद्रकळा आनंदीच्या हातात देत सासूबाई म्हणाल्या,
" सुनबाई, छान तयार होऊन या, आज लक्ष्मीपूजन. घरच्या लक्ष्मी आहात तुम्ही. आधी जोडीने पूजा करायची असते आज आणि मग जेवणं. मी पुजेची सगळी तयारी केली आहे, राहिलेलं बाकीचं आता रखमा बघेल, तुम्ही व्हा तयार. आनंदी तयार व्हायला म्हणून खोलीत गेली, तीचं आवरून झालंच होतं तितक्यात अनंतराव आत आले, तिच्या हातात एक डबा देत म्हणाले,
" तुमच्यासाठी आणलंय, दिवाळीची भेट म्हणून.. बघा आवडतंय का? " ती काही बोलायच्या आत ते निघूनही गेले होते बाहेर.
एक सुंदर सातपदारी बकुळहार होता तो. एवढ्या दिवसात पहिल्यांदाच अनंतरावांनी तिला काहीतरी दिलं होतं, त्याचा अर्थात आनंदच झाला होता तिला पण ह्या सगळ्याचा साक्षीदार आपला भाऊ देखील असता तर असा विचार पुन्हा एकदा मनात आला तिच्या..असो.. असं काहीतरी मनाशीच पुटपुटत ती पूजेसाठी म्हणून गेली. आज ती अधिकच सुंदर दिसत होती.
षोडशोपचारे पूजा झाल्यावर बैठकीत बसलेल्या पुरुष मंडळींचा जोडीने आशीर्वाद घ्यायला म्हणून आनंदी बैठकीत गेली अन क्षणभर जागीच स्तब्ध झाली, दादासाहेबांच्या बाजूला आपल्या भावाला बसलेले पाहून तिला वाटले आपल्याला भास होतोय की काय,
"सुनबाई, सकाळी जाताना अनंतराव आम्हाला सांगून गेले होते. अहो दिवळीसारखा सण, तुमच्या माहेरचं माणूस तर हवंच ना? " दादासाहेब आनंदीला आशिर्वाद देत म्हणाले.
अंगोपांगी दिसणारे सुख आता आनंदीच्या चेहऱ्यावरूनही ओसंडून वाहत होते, बहिणीच्या आनंदात कृतकृत्य झालेल्या भावालाही आपला आनंद लपवता आला नाही. आपण न सांगताही अनंतरावांनी आपल्या मनातल्या भावना ओळखल्या म्हणून डोळे भरून आले अनंदीचे, तिने पाहिले त्यांच्याकडे फक्त. मंदसे स्मित करत त्यांनी तिचे आभार पोचल्याची ग्वाही दिली.
पंचपक्वान्नावर ताव मारताना सगळ्यांनी आनंदीच्या पाककौशल्याचे भरभरून कौतुक केले. आज वाड्यातील वातावरण अधिक प्रसन्न झाले होते. आज खऱ्यार्थाने वाड्यात दिवाळी साजरी होत होती. पाडव्याच्या आधीच नवऱ्याकडून मिळालेल्या भेटीचं भारीच तेज चेहऱ्यावर पसरलंय म्हणून घरातील स्त्रीया आनंदीची थट्टामस्करी करत होत्या.
तेज तर पसरलंच होतं, तेज प्रेमाचं...तेज आपुलकीचं..तेज जाणिवेचं..तेज नव्या स्वप्नांचं..आता दिवाळी खरंच तेजोमय होणार होती आनंदीची..

#Repost
प्राजक्ता राजदेरकर.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...