केशव काकांच्या तेराव्याचे जेवण जेवून शेजारी, नातेवाईक पांगले आणि घरात राहिले मोहन, वसंता हे केशवरावांचे दोन मुलगे, यशोदा ही लग्न झालेली मुलगी, मोहनची बायको आशा, वसंताची बायको नलिनी आणि केशवरावांची पत्नी सुमतीबाई. मोहन आणि मोहनची बायको आशा उद्याच मुंबईला जायची आणि बहिण यशोदापण उद्याच आपल्या घरी जायची. सकाळपासनू भटजींची गडबड. जेवण, येणारे नातेवाईक. गडबड नुसती. वसंताची बायको नलिनी सोडली तर बाकीचे जरा पडले होते. मोहन, वसंता लोट्यावर आणि मोहनची बायको आशा, बहिण यशोदा आत वाणशीमध्ये. त्यांची आई आत काळोखाच्या खोलीत. नलिनी येथेच राहणारी. त्यामुळे तिला घरची भांडीकुंडी, धुणी याची काळजी. त्यामुळे ती बिचारी भांडी धुत होती. गळून झाली की स्टॅण्डवर ठेवत होती. ती मनात म्हणत होती. उद्या मोहन भावोजी आणि आशा वहिनी मुंबईला जाणार म्हणून त्यांचे कपडे उन्हात सुकवायला हवेत. एकीकडे तिला तिचा मुलगा शंतनु याची बारावीचा अभ्यास चुकतो आहे याचे वाईट वाटत होते. पण उद्या सर्व मंडळी गेली की घर खायला येणार असेही वाटत होते. गेले पाच महिने सासरे आजारी त्यामुळे त्यांचे करताना तिला वेळ पुरत नव्हता. सासुबाई असतात पण त्यांचे गुढगे संधीवाताने सतत दुखत असतात. त्यामुळे सासर्यांचे सर्व तिनेच केले. त्यांना जाऊन आज तेरा दिवस झाले. आता उद्यापासून नेहमीचेच. नवरा उठून बागेत जाईल, शंतनुची शाळा त्यामुळे उरलो आपण आणि सासुबाई. सकाळपासून भाकरी, चहा मग पेज, दुपारी जेवण पुन्हा चहा, पुन्हा रात्रीचं जेवण यामध्ये विहिरीवरुन पाणी आणायचे, गोठ्यातल्या जनावरांना पाणी द्यायचे, शेण काढायचे, गवत काढायचे. दुपारी बाजारात जाऊन घर सामान आणायचे. दुपार उतरली की, बागेत जाऊन पतेरा गोळा करायचा. तो भातशेतीच्या जमिनीवर टाकायचा. तिन्हीसांज झाली की गाईचे दूध काढायचे. गुरांना गवतकाडी घालायचे. नवरा वसंता घरी असला तर मदत करायचा. पण तो गवंडीकाम करायला गेला तर सकाळी बाहेर पडायचा तो रात्रीच घरी यायचा. शंतनुचा आतल्या खोलीत अभ्यास. मध्येच उठून तो आजीची औषधे देतो. त्याचे आजोबा त्याच खोलीत बाकावर पडलेले असत. त्यांना स्वच्छ करायचा. तोंडात औषधे घालायचा. झाले ! उद्यापासनू रोजचेच काम... असे मनातल्या मनात म्हणत नलिनी चहा करायला गेली. गोबरगॅस तिने चालू केला पण लक्षात आले गॅस येत नाही. कारण घरच्या गडबडीत गोबरगॅसमध्ये शेण घालायचे राहिले. तिने माडाच्या चुडत्या पेटवल्या आणि चुलीवर आधण ठेवले. घरातल्या भांड्यांचा आवाज ऐकताच बाहेर वामकुक्षी करणारी मंडळी जागी झाली. तोंड वगैरे धुवून चहा प्यायला जमली. नलिनीने स्टीलच्या कपात प्रत्येकासाठी चहा ओतला आणि एक-एक कप प्रत्येकाच्या हातात दिला. एक कप नेऊन आत सासुबाईंना दिला. चहा पिता पिता वसंता मोठ्या भावास म्हणजेच मोहनला विचारु लागला.
‘‘दादा ! मग विवेक केव्हा चललो अमेरिकेक ?’’
‘‘बहुतेक पुढच्या महिन्यात. काय आसता अमेरिकेतल्या विद्यापीठाकडून निश्चित अॅडमिशनचा कळला की मग तिकिटासाठी धडपड करुक व्हयी.’’
‘‘मग विवेक आता मोठ्या कॉलेजमधून इंजिनिअर झालो, मग पुढचा शिक्षण आपल्या देशात मिळणा नाय काय ?’’
‘‘काय आसता, अमेरिकन विद्यापीठांका जगात मोठो मान आसता. तिकडे अॅडमिशन मिळणा कठीण आणि खर्च भरपूर. पण एकदा का तो एमएस झालो की मग खोर्यांनी पैसे कमवतलो.’’
‘‘पण खर्चपण खूप येता ना रे ?’’
मध्येच आशा बोलली - ‘‘हो येणारच, शिक्षण आहे ना स्टॅण्डर्ड, मग खर्च करायलाच हवा आणि आम्ही कर्ज घेतलयं बँकेकडून. त्यात इकडे तातडीने याव लागलं तो खर्च वाढला नाहीतर आम्हाला एवढ्यात गावी यायचं नव्हत. खर्च खूप होतो.’’ आशा बडबडत सुटली.
आत नलिनी नारळाच्या झावळ्या पेटवून काजू भाजताना हे सर्व ऐकत होती. मोहनरावांची बायको आशा आतमध्ये बॅग भरायला गेली. एवढ्यात दारात मारुती कार येऊन थांबली. गाडीतून कोण येतय म्हणून वसंता आणि त्याचा मुलगा शंतनु खळ्यात आले. गाडीतून कणकवलीचे वकिल नाडकर्णी आणि त्यांचा ड्रायव्हर हातात बॅग घेऊन उतरले. अचानक एवढे मोठे कणकवलीचे वकिल कसे काय ? अशा आश्चर्यात असताना मोहनरावांनी वकिलांना खुर्ची दाखवली. समोरच्या बाकावर मोहनराव बसले. बाजूला येऊन वसंता बसला. आत बॅग भरायला गेलेली आशा मोहन वसंताची लग्न झालेली बहिण यशोदा उंबर्यावर येऊन उभ्या राहिल्या. आत चहाची भांडी धुणारी वसंताची बायको नलिनी वाणशीतून वकिलांकडे पाहू लागली. वसंताचा बारावीतील मुलगा शंतनु तो पण आईच्या बाजूला येऊन उभा राहिला.
नाकडर्णी वकिलांनी सर्वांकडे एकदा नजर टाकली आणि ते बोलू लागले.
‘‘मंडळी, मला तुम्ही ओळखत असालच. मी अॅड. ज्ञानेश नाडकर्णी, कणकवलीत गेली पंचवीस वर्षे वकिली करतो. आता आज अचानक मी तुमच्याकडे का आलो याचा आश्चर्य वाटले असेल. पण त्याचे कारण वैâ. केशवराव मुंज म्हणजेच या घरचे कर्तेपुरुष हे चार वर्षापूर्वी कणकवलीत माझ्या ऑफिसमध्ये आले होते. त्यांना त्यांची या गावात असलेल्या मालमत्तेचे मृत्युपत्र करायचे होते. त्यांच्या इच्छेन्ाुसार मी रजिस्ट्रारकडे जाऊन त्यांचे मृत्युपत्र रजिस्टर्ड केले. केशवराव मुंज यांचे निधन होऊन आज तेरा दिवस झाले. त्यामुळे त्यांचे हे मृत्युपत्र मी तुमच्या समोर ठेवतो. सर्व मंडळी आश्चर्यचकित झाली. मोहनला किंवा वसंताला आपल्या वडिलांनी मृत्युपत्र केल्याचे माहित नव्हते. असे मृत्युपत्र का केले असेल याचा प्रत्येकजन विचार करत होता.
तेवढ्यात वकिल साहेब पुढे म्हणाले - ‘‘केशवराव मुंज यांच्या इच्छेनुसार हे त्यांचे राहते घर त्यांचे दोन मुलगे मोहन आणि वसंत यांच्या नावावर केले आहे. आणि केशवराव मुंज यांच्या नावावर असलेली या गावातील ३२ गुंठे जमिन त्यावरील २६ आंब्याची कलमे, २० काजूची झाडे आणि १० गुंठे भातशेती जमिन फक्त वसंत केशव मुंज याच्याकरिता ठेवली आहे. तसेच या दोघांनी आपली लग्न केलेली बहिण सौ. यशोदा हिचे माहेरपण करावे अशी सूचना केली आहे. बाकी केशवरावांकडे सोने किंवा बँकेत पैसे वगैरे काहीच नाही. एवढेच मला सांगायचे होते.
आता हे मृत्युपत्र महसूल विभागाकडे देऊन त्याप्रमाणे नावे लावून घेणे. नाडकर्णी वकिल निघण्याच्या तयारीत असताना संतापलेला मोहनराव वकिलांना म्हणाला - ‘‘नाडकर्णी साहेब मृत्युपत्रासाठी माझे वडील एकटे आले होते की हा वसंता आला होता ? कारण वडीलांनी माझ्यासाठी काहीच जमिन ठेवली नाही याचे मला आश्चर्य वाटते.’’
‘‘मोहनराव माझ्या आठवणीनुसार मृत्युपत्र करण्यासाठी एकटे तुमचे वडीलच आले होते.’’
‘‘वकिल साहेब निश्चित आठवा हा वसंता त्यांना घेऊन आला असणार. नाहीतर माझ्यावर असा अन्याय करणार नाहीत ते.’’ मोहनराव चिडून बोलत होता.
‘‘नाही मोहनराव, ते एकटेच आले होते आणि आपल्या हयातीत आपण केलेले मृत्युपत्र तिनही मुलांना कळता कामा नये अशी त्यांनी विनंती केली होती. त्यानुसार आजच आपणासमोर मी हे उघड करतो आहे.’’
मोहनराव आणि त्याची पत्नी आशा भयंकर संतापली होती. आशा आपल्या नवर्याला एकाबाजूला बोलावून काही सांगत होती. वसंता मान खाली घालून ऐकत होता. आत वसंताची बायको नलिनी आणि शंतनु काकांचा चढलेला आवाज ऐकून कावरेबावरे झाले होते. नाडकर्णी वकिल गाडीत बसून निघून गेले.
मोहनराव वसंताकडे पाहून कडाडले.
‘‘तू जाणूनबुजून हे केलस. मी बाबांचा मोठा मुलगा असताना मला जमिनीतील एक इंच जमिन दिली नाही. सगळी जमिन तुझ्या नावावर. एवढा कारस्थानी असशील असे वाटले नव्हते.’’ आशा आता चिडून बोलू लागली.
‘‘खाली मुंडी पाताळ धुंडी, आम्ही आलो की दादा दादा म्हणत मागे येतो. मग दादाला साफ फसवलं कसं? वसंता घाबरुन म्हणाला,
‘‘दादा, खराच माका काय म्हायती नाय रे ! बाबांनी माका कायएक सांगूक नाय, नायतर मी असा करुक दिलय नसतयं, व्हया तर आईक विचार.’’
मोठ्या मोठ्याने बोलणे ऐकून त्यांची आई एव्हाना आपल्या खोलीतून बाहेर आली. थोरल्याचे आणि सूनेचे बोलणे तिने ऐकले होते. ती बोलायला लागली.
‘‘मोहना, या वसंताक खराच काय म्हायती नव्हता. तुझ्या वडिलांनी फक्त माका सगळा सांगितलेल्यानी, नायतर ह्यो वसंतापण तयार झालो नसतो.’’
‘‘मग असं का केल? मी त्यांचाच मुलगा आहे ना ? थोरला मुलगा. मग माझा हक्क का डावलला ?’’
आई बोलू लागली - ‘‘मोहना, चिडा नको, तुझ्या बाबांचा म्हणणा होता पाच-सहा वर्षापूर्वी ते सतत विचार करत रवत तेव्हा मी त्यांका विचारलय इतकी कसली विवंचना आसा ?’’
पाच वर्षापूर्वी.....
केशवराव सतत विवंचनेत असत. आपल्या दोन नंबरचा मुलगा वसंता याचे आपल्यामागे कसे होईल याची त्यांना काळजी वाटे. या दोन मुलातील मोठा मोहन अभ्यासात हुशार. पहिल्यापासून एक दोन नंबराने पास होत गेला. आपणास त्याचे कौतुक वाटे. आपल्या या परिस्थितीत पाचवीपासूनच त्याला कणकवलीतील एस.एम. हायस्कूलमध्ये घातले. त्याच्या वर्गात कणकवलीतील डॉक्टर्स, प्रोफेसर्सची मुले होती. सातवी स्कॉलरशीपमध्ये तो जिल्ह्यात पाचवा आला. त्याचे फोटो सर्व पेपरमध्ये छापून आले. त्याच्या शिक्षकांनीपण त्याच्या अभ्यासात लक्ष घातले. दहावीत तो जिल्ह्यात तिसरा आला. त्याची आवड म्हणून तो कॉमर्सकडे गेला. बारावीत पुन्हा चांगले मार्क्स मिळाले. त्याच्या मुंबईच्या मामाने त्याला मुंबईस नेले. तेथे तो बी.कॉम. झाला सी.ए. झाला आणि मोठा सरकारी ऑफिसर बनला. त्याची प्रगती होतच राहिली. मामांच्या मुलीशी आशाशी त्याने लग्न केले. सासर्याने त्याला अंधेरी भागात मोठा ब्लॉक दिला. त्याचा एकच मुलगा त्यांच्यासारखाच हुशार, शिवाय चांगली शाळा, क्लास यामुळे तो शिकत गेला. मोहनच्या घरात सुबत्ता. मोहनने पुण्यातपण घर घेतल्याचे ऐकले. हल्ली मोहन काही सांगत नाही. पण त्याच्या मित्रांकडून कळले. त्याच्या बायकोने आशाने आपल्यापासून तोडलच त्याला. दोन वर्षातून केव्हातरी गणपतीत येतो. येतो पण तो तिसर्या दिवशी. तिसर्या दिवशी येऊन गणपतीच्या पुजेला बसतो आणि दोघजन जातात कणकवलीत लॉजवर. परत पाचव्या दिवशी गणपती पोहोचवायला येतो आणि गाडीत बसून मग कणकवली आणि मग मुंबई. वर्षातून चुकून कधी फोन केला तर. तो आपल्यापासून लांब गेला पण धाकटा वसंता तसा हुशार होता पण बारावीनंतर आपण त्याला पुढे पाठवल नाही. त्यालाही तशी अभ्यासाची आवड नव्हतीच. म्हटले, आपल्या सोबत म्हातारपणी कोणीतरी हव. तो पण प्रामाणिकपणे शेतीत, बागायतीत लक्ष घालतो. कष्टाची कामं करतो. शिवाय घरचे देव, सण वगैरे त्याच्या बायकोलाच करावे लागतात. त्याची बायकोपण आहे गुणी. आम्हा दोघांचे तीच मान खाली घालून करते. तिच्या माहेरीपण तशी गरीबीच. वसंताचा मुलगापण आहे लाघवी. आम्हाला दोघांना त्याने लळाच लावला. गेली दहा-पंधरा वर्षे आंब्याचे पिक व्यवस्थित येत नाही शिवाय माकडे फार वाढली आहेत. खूप नासधुस करतात. गाईच्या दूधांना आता मागणी नाही. शहरात दूध पिशव्या येतात. एकंदरीत वसंताला यापुढे घरखर्च भागविणे कठीण. आपली थोडीशी बागाईत, थोडी शेती यात जर दोन मुलांचे दोन भाग केले तर वसंताला काय राहणार ? त्याने आयुष्यभर बागायतीत, शेतीत कष्ट केले त्याला काय मिळणार ? मोठ्या मोहनने कधीच मातीत हात घातले नाहीत. पण तो हक्क मागणार म्हणून वकिलांचा सल्ला घेतला. आपल्या मागे आपली थोडी जमिन वसंताकडे राहील हे पाहणे योग्य. तो जमिन विकायचा नाही पण या शहरातल्या मुलाचा काय भरवसा ? तो बायकोच्या नादाला लागून जमिन विकेल आणि शहरात बसेल. कणकवलीत जाऊन नाडकर्णी वकिलांचा सल्ला घ्यावा. असा विचार करुन केशवराव नाडकर्णी वकिलांच्या ऑफिसात पोहोचले. वकिलांना सांगून त्यांनी मृत्युपत्र करुन घेतले आणि गावातील जमिन वसंताच्या नावे केली.
सुमतीबाईंनी आपल्या नवर्याने असा का निर्णय घेतला हे सांगितले. आणि या निर्णयामागे वसंता किंवा त्याची बायको नलिनी यांचा काहीही संबंध नसून आपण त्यांना काहीच सांगितले नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर आशा खवळली.
‘‘काहीच सांगू नका, याला माहित नाही आणि त्याला माहित नाही. तुम्ही सर्वांनी आमच्या विरुध्द कट रचलाय कट. हा इथे भावासमोर बसून रडतोय आणि ती आतमध्ये चहा करणारी एक नंबरची लबाड बाई आहे. तरी बरं बाबा नुसता भिकारी म्हणून आवाज कमी नाहीतर कुणाला ऐकली नसती.’’ नलिनीच्या दिशेने तोंड करत आशा बडबडत होती.
गावचे लोक तुम्ही सगळे आळशी, काम करायला नको. मग तुमचं भागणार कसं ? बापाला मुलाची एवढी काळजी वाटते तर त्याला मजूरीच्या कामाला पाठवायचं. आंब्याच्या एवढे लाखो रुपये येतात त्याचे करता काय? आम्हाला फक्त दोन पेट्या पाठवतात. बाकी सर्व तुम्ही खाता ना ? मी एकेकाला सोडणार नाही. आई कसली ही तर वैâकयी. रामाला विसरली.
ही तणतण ऐकून वसंता रडू लागला. आणि आतमध्ये त्याची बायको नलिनी हुंदके देऊ लागली. शंतनु आई शेजारी बसून हे सर्व ऐकत होता. सुमतीबाई मोहनला समजावण्याचा प्रयत्न करत होत्या. पण मोहन आणि आशाने आरोपावर आरोप सुरु केले. हे ऐकून कंटाळलेली बहिण यशोदा बाहेर येऊन मोहनला बोलू लागली.
‘‘तुका फक्त हक्क व्हयो, जमिनीत वाटो व्हयो पण कसले जबाबदारे उचलतस ते सांग? एवढो मोठो ऑफिसर तू आणि श्रीमंताचो जावय कधी आईक यॅक लुगडा तरी पाठवलसं ? बापाशीक कधी लेंगो पाठवलस, या भावाशीक काय व्हया नको इचारलस ? आणि तुझी एकुलती एक बहिण मरे मी माझ्या लग्नानंतर कधी माका बघुक इलस ? बहिणीक साडी कधी धाडलसं ? नाय ना ? पण ह्यो वसंता दोन तीन महिन्यांनी बहिणीकडे येता. माझी चौकशी करता, सुट्टी पडली की माझ्या चेडवाक आजोळाक घेवन जाता. माका दरवर्षी दोन साडये घेवन येता. हेका भावस म्हणतत. तुका कसली जबाबदारी नको. फक्त प्रॉपर्टीवर नाव व्हया. ही तुझी बायल आशा सासर्याक कधी बघुक इल्ली ? तु एवढो बापूस शिक तर बघुक तरी इलस? आता बापूस मेलो तर हक्कासाठी भांडतस. बाबांनी केला ता बरा केल्यानी. ह्या वसंतान आणि नलिनीन तेंका बघल्यानी आणि म्हातार्या आईक पण तोच बघतलो.’’
तिचे हे बोलणे ऐकून मोहनराव चिडून बोलू लागला.
‘‘यशोदे, तुझा तोंड फोडीन पुढे बोल्लस तर. तु लग्न करुन दिलेली मुलगी, ह्या प्रॉपर्टी बद्दल बोलू नकोस.’’
‘‘वा रे ! एक लक्षात ठेव माझोपण ह्या प्रॉपर्टीत हक्क आसा. आता प्रॉपर्टीत मुलांसारखे मुलींचोपण हक्क असतत.’’
तेवढ्यात आशा नवर्याला म्हणाली - चला हो, इथे बोलण्यात काही अर्थ नाही. कायदेशीर हिसकाच दाखवला पाहिजे यांना.
आशा आत जाऊन कपड्याची बॅग घेऊन आली. वसंता रडत रडत म्हणाला - ‘‘दादा, जाऊ नको आज बाबांचा तेराव्या घातला, तेंका काय वाटात ? तू आणि मी उद्या तहसिलदारांकडे जाऊया. मी लिहून देतय ह्यो माझो मोठो भावस आसा ह्या प्रॉपर्टीत हेचो पण अर्धो हक्क आसा.
आशा कडाडली.
आम्हाला कोणाची भिक नको. आम्ही हक्काने येऊ या घरात. चला हो. आमचे मोठे मोठे वकिल ओळखीचे आहेत. आता येऊ तो हक्काने येऊ.
असे बडबडत मोहन आणि आशा बॅग घेऊन बाहेर पडली. रस्त्यापलिकडे त्यांची गाडी उभी होती. त्यात बॅग ठेवून गाडीने निघून गेली. आत बसलेली वसंताची बायको आणि मुलगा शंतनु आता बाहेर आले.
‘‘काय ह्या ? रागान चलते झाले. सकाळी बापाचा तेराव्या आणि दुपारी भांडण करुन गेले’’ नलिनी रडत रडत म्हणाली. यशोदा येऊन तिच्या शेजारी बसली. सासुबाईपण तिथेच खुर्चीवर बसलेली. त्यांच्याही डोळ्यात पाणी होते. वसंता स्फुंदून स्फुंदून रडत होता. यशोदा वसंताला म्हणाली, वसंता भिया नको ही बहीन तुझ्या पाठी आसा. आपण दोघांनी मिळून या मोहनाक आणि त्याच्या बायकोक धडो शिकवया.
मोहन आणि आशा कणकवलीला पोहोचली. लॉजवर गेल्यानंतर आशाने मामांना फोन लावला. तिचे मामा पुण्यातील मोठे वकिल. त्यांना सर्व हकिगत सांगितली आणि आमचा हिस्सा कसा मिळेल याची विचारणा केली. आशाच्या मामांनी कणकवलीत त्यांचे मित्र भोसले वकिल यांची भेट घ्यायला सांगितले. आपण भोसलेंशी बोलतो असे सांगितले. दुसर्या दिवशी मोहन आणि आशा भोसले वकिलांच्या ऑफिसमध्ये पोहोचले.
‘‘नमस्ते, वकिल साहेब ! मी मोहन मुंज आणि ही माझी पत्नी’’
‘‘या या मोहनराव. पुण्याहून साळुंखे साहेबांचा फोन आला होता. ते म्हणाले मला आपले जावई तुम्हाला भेटणार म्हणून. बोला, काय झालं ?’’
‘‘माझ्या वडिलांनी वडिलोपार्जित जमिनीत मृत्युपत्र करुन सगळी प्रॉपर्टी माझा दोन नंबरचा भाऊ वसंता याचे नावे केली. मी त्याचा मोठा भाऊ असताना सुध्दा त्यांनी मला पूर्णपणे डावललं. माझ्यावर पूर्णपणे अन्याय झाला. मला त्या प्रॉपर्टीत माझा हिस्सा हवा, तो मला मिळवून द्या.’’
‘‘ठिक आहे, तुम्ही बाहेरच्या मुलीकडे तुमचे नाव, पत्ता, मोबाईल वगैरे द्या. आणि मला सांगा तुम्ही किती भावंडे?’’
‘‘तीन. एक लग्न झालेली बहिण आहे आणि आईपण आहे.’’
‘‘म्हणजे या प्रॉपर्टीत चार वारस आहेत बरोबर ? म्हणजे तुम्हाला या तिघांना नोटीस पाठवावी लागणार. त्यांची नावे, पत्ते द्या. बाकी प्रॉपर्टीचे सातबार, आठ-अ ही कागदपत्रं लागतील.’’
‘‘पण या मृत्युपत्राला चॅलेंज देऊ शकतो का आपण ?’’
‘‘हो, का नाही ? पैसे खर्च करण्याची तयारी ठेवा.’’
मध्येच आशा म्हणाली - ‘‘खर्च होऊंदे पण या वसंताला, यशोदेला आणि त्यांच्या आईला धडा शिकवायचा आहे मला.’’
‘‘मग ठिक आहे, सुरुवातीला पन्नास हजार जमा करा.’’
‘‘पण मिळेल का मला हिस्सा?’’ मोहनराव उद्गारला.
‘‘हो मिळणारच, कारण ही इस्टेट आहे ती वडिलांनी मिळवलेली नाही की विकत घेतलेली नाही. ती तुमच्या आजोबांकडून वारसाने वडिलांकडे आली आहे. म्हणजेच वंशपरंपरेने आलेली आहे. त्यामुळे त्यांना मृत्युपत्र करुन कुणाला देताच येणार नाही असा युक्तिवाद करु आपण. तुम्ही आपल्या आजोबांचे वारस म्हणून त्या इस्टेटीत हक्क सांगताय असा युक्तिवाद करायचा.’’
‘‘पण यात यश मिळेल ना ?’’ मोहनरावांचा प्रश्न.
‘‘प्रयत्न करायचाच. ही अशीच एक केस मी लढतो आहे. कसालचे एक गृहस्थ आहेत. तुम्हाला नाव सांगतो - प्रमोद नाईक. हे कोल्हापूरला राहतात. त्यांच्या वडिलांनी वंशपंरपरेने आलेली इस्टेट आपल्या मुलीच्या नावावर केली. कारण म्हातारपणी त्या मुलीनेच त्या दोघांना सांभाळलं. प्रमोदरावांच्या वतीने मी चॅलेंज केलय. तुम्हाला या प्रमोद नाईकांचा नंबर देतो. त्यांना विचारा.’’ वकिलांच्या सेक्रेटरीने त्यांना प्रमोद नाईक यांचा कोल्हापूरचा पत्ता आणि फोन नंबर दिला.
‘‘बर मी करतो फोन यांना. मग आम्ही निघू ?’’
‘‘हो. सर्व भावंडांचे पत्ते द्या, बहिणीचा पण द्या.’’
पण हा, गावातील सातबारा वगैरे कागदपत्रे मिळवायला मला वेळ नाही. मला मुंबईला तातडीने जायचंय.’’
‘‘ठिक आहे. मग अजून पाच हजार द्या. म्हणजे एकूण पंचावन्न हजार. मग माझा माणूस सर्व कागदपत्रे गोळा करेल.’’
मोहनरावाने पंचावन्न हजाराचा चेक वकिलांच्या सेक्रेटरीकडे दिला. सेक्रेटरीने आवश्यक त्या सह्या घेतल्या. सेक्रेटरी म्हणाली - ‘‘ठिक आहे साहेब, सर्व कागदपत्रे तयार झाली की, तुम्हाला स्वतः एकदा येऊन कोर्टात दावा दाखल करायला लागेल. तेव्हा एकदा या.’’
वकिलांच्या ऑफिसमधून बाहेर पडून लॉजवर आल्यानंतर मोहनरावाने प्रमोद नाईकांना फोन लावला.
‘‘हॅलो, प्रमोद नाईक बोलतात का ?’’
‘‘होय, मी प्रमोद नाईक, तुम्ही कोण ?’’
‘‘मी मोहन मुंज. मुळ गांव आंबेरी सध्या मुंबईत राहतो.’’
‘‘बोला काय काम होतं, आणि माझा नंबर कोणी दिला ?’’
‘‘तुमचा नंबर कणकवली भोसले वकिलांनी दिला. तुम्ही तुमच्या वडिलांच्या मृत्युपत्राला चॅलेंज केलंय ना कोर्टात त्या संबंधी बोलायचं होतं.’’
‘‘तुमचा काय संबंध?’’
‘‘माझ्या वडिलांनीपण असचं केलयं. वडिलोपार्जित जमिन मृत्युपत्राने माझ्या एकट्या भावाच्या नावाने केली. मला एक गुंठापण ठेवला नाही. मी भोसले वकिलांमार्फत कोर्टात दावा ठोकायचा विचार करतोय. भोसले वकिल म्हणाले, असाच एक दावा सध्या त्यांचेकडे आहे. त्यांनी तुमचे नाव आणि पत्ता दिला.’’
‘‘होय, होय. मी त्या मृत्युपत्राला चॅलेंज केलयं. आता दावा कोर्टात आहे. भोसले वकिल म्हणाले कोणत्याही परिस्थितीत तुमच्या बाजूने निकाल येईल. फक्त पैसे सोडायला लागतील.’’
‘‘मला पण तसेच सांगितले. पण खरोखर तसे होईल काय ?’’
‘‘निश्चित होईल. भोसले वकिल सर्व फिक्स करण्यात हुशार आहे. तो कशी मांडवली करतो बघा. तुम्ही निश्चिंत रहा. माझी केस चालू आहे त्याच्या निकालाने तुम्हाला अंदाज येईलच.’’
‘‘मग आपण संपर्कात राहू. केस कशी चालते आहे हे मला कळवत रहा.’’
‘‘निश्चित कसलीच काळजी करु नका.’’
मोहनरावांनी फोन ठेवला आणि विजयी मुद्रेने पत्नीकडे पाहिले. आशापण खुश झाली. तिला सासुबाईला, दिराला, जावेला, नणंदेला धडा शिकवायचा होता.
दुसर्या दिवशी मोहनराव आणि आशा मुंबईस निघाली. मोहनरावांच्या सुचनेनुसार भोसले वकिलांनी सर्व कागदपत्रे तयार केले आणि त्यांच्या नोटीसा मोहनरावांची आई, भाऊ वसंता, बहिण यशोदा यांना पाठवल्या. आपल्या मुलाकडून कोर्टातर्पेâ अशी नोटीस आल्याने सुमतीबाईंना फार वाईट वाटले. त्यांच्या डोळ्यात राहून राहून अश्रू जमा होऊ लागले. आपल्या नवर्याने कोणत्या हेतूने मृत्युपत्र केले आणि त्याचा परिणाम कुटुंब फुटण्यात होईल याची त्यांना कल्पना नव्हती. उलट मोहन सर्व समजून घेईल असे त्यांना वाटत होते. या गावच्या थोड्याशा जमिनीसाठी त्याला स्वार्थ नसणार असे त्यांना वाटत होते. पण झाले उलटेच. वसंताला नोटीस मिळताक्षणी तो खिन्न झाला. काही झालं तरी आपण कोर्टात जाणार नाही किंवा वकिलपत्र देणार नाही असा त्याने निर्णय घेतला. पण त्यांची बहिण यशोदा तिला आपल्या मोठ्या भावाचा राग आला. वडिलांच्या इच्छेविरुध्द त्यांच्या मृत्युपत्राला तो आव्हान देतो आहे हे पाहून या केसमध्ये आपल्या भावाविरुध्द उभे रहायचे एवढेच नव्हे तर कुणालातरी वकिलपत्र देण्याचा तिने निर्णय घेतला. त्याप्रमाणे तिने आणि तिच्या नवर्याने कणकवलीतील एक तरुण पण हुशार वकिल पाहिला आणि कोर्टात उभा केला. मृत्युपत्राला आव्हान देणारी केस कोर्टात उभी राहिली पण कागदपत्र अपुरं, पत्ता अपुरा या कारणाने पुढच्या तारखा मिळत गेल्या. भोसले वकिल प्रत्येक तारखेचे मोहनरावांकडून पैसे उकळत होता. मोहनराव आणि आशा यांना वाटले होते दोन-तीन महिन्यात केसचा निकाला लागेल. पण केस लांबत गेली.
आणि अचानक कोल्हापूरच्या प्रमोद नाईकांचा मोहनरावांना फोन आला. नाईक कणकवलीत होते आणि कोर्टाने त्यांच्या बाजूने निकाल दिला होता. वडिलांच्या प्रॉपर्टीत त्यांचा हिस्सा मान्य केला होता. प्रमोदरावांच्या या फोनने मोहनराव खुश झाले. मोहनरावांना खात्री झाली की आपल्यालापण असाच निर्णय मिळणार कारण दोघांचे वकिल एकच होते. मोहनरावांनी मोठ्या आनंदाने ही बातमी आशाला सांगितली. दोघेही आनंदात मग्न झाले. आता सासुचे, नणंदेचे आणि दिराचे नाक कापायला उशिर होणार नाही याची तिला खात्री वाटू लागली. तिने तातडीने ही बातमी वडिलांना कळविली आणि लवकरच आपणास कोकणातली प्रॉपर्टी मिळेल याची खात्री तिने वडिलांना दिली. या आनंदाच्या बातमी निमित्त मोहनराव, आशा तिचा भाऊ उमेश आणि त्याची पत्नी सर्वजण मोठ्या हॉटेलात जेवायला गेले. सर्वजण खुशीत होते. हॉटेलमधून मोहनराव आणि आशा रात्रौ ११ च्या सुमारास घरी पोहोचले. मोहनराव कपडे बदलत असताना अचानक त्यांचा फोन वाजला. कणकवलीहून भोसले वकिलांचा फोन होता. भोसले वकिलांनी एक भयानक बातमी मोहनरावांना कळविली- ‘‘संध्याकाळी सातवाजता कणकवलीहून कोल्हापूरला निघालेले प्रमोदराव नाईक यांच्या गाडीला बावडा घाटात समोरुन येणार्या खाजगी बसने धडक दिली आणि त्यात दोघही नवरा बायको ठार झाली.’’
ही बातमी ऐकताच मोहनराव किंचाळले, थरथरले. त्यांच्या घशाला कोरड पडली. संध्याकाळी चारच्या सुमारास प्रमोदरावांनी फोन करुन केस जिंकल्याची बातमी सांगितली आणि आपण त्यांचे अभिनंदन केले आणि आता सहा तासात दुसरी बातमी अपघातात नाईक नवरा बायको ठार झाल्याची. मोहनराव सुन्न झाले. त्यांनी आशाला कशीबशी ही बातमी सांगितली. आशाही घाबरली. मोहनरावांनी कपडे बदलले आणि ते कॉटवर पडले. त्यांना एकसारखे भोसले वकिलांनी फोनवर सांगितलेले कानात ऐकू येत होते. प्रमोद नाईकांनीपण आपल्या सारखेच वडिलांच्या मृत्युपत्रातील इच्छेला कोर्टात आव्हान दिले आणि केस जिंकून प्रमोदराव कोल्हापूरला जात होते आणि.... मोहनराव मनात म्हणत होते - आपण पण तेच करतोय. आपण पण वडिलांच्या मृत्युपत्राला कोर्टात आव्हान दिले आहे. केस सुरु आहे. आपण आपली जन्मदाती आई, पाठचा भाऊ आणि एकुलती एक बहिण यांना नोटीस पाठविली. आपली सख्खी माणसे त्यांना नोटीस पाठविली..... एक सारखे हे विचार मोहनरावांच्या डोक्यात घोंगावू लागले. मोहनरावांना दरदरून घाम सुटला. डाव्या पाठीत ठणके बसू लागले. छाती ठणकू लागली आणि मोहनराव बेशुध्द झाले.
बाथरुममधून बाहेर आलेल्या आशाने नवर्याकडे पाहिले, तिच्या लक्षात आले - नवर्याची तब्बेत बरोबर नाही. तिने एसी चालू केला. धावत जाऊन पाणी आणून तोंडात घातले. पण शुध्द येईना. तिने भाऊ उमेशला फोन केला आणि येताना अॅम्ब्युलन्स आणायला सांगितली. उमेशने तिला घरात सॉर्बिट्रेटची गोळी असेल तर जिभेखाली ठेवायला सांगितली. आशाने कपाटात शोधून सॉर्बिट्रेटची गोळी काढली आणि मोहनरावांच्या जिभेखाली ठेवली. दोन मिनिटानंतर मोहनराव श्वास घेऊ लागले. पंधरा मिनिटात उमेश अॅम्ब्युलन्स घेऊन आला आणि मोहनरावांना हिंदूजा हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केले.
हिंदूजा हॉस्पिटलमध्ये सर्व तातडीच्या तपासण्या झाल्या. भराभर छातीत इंजेक्शने दिली गेली. दोन दिवसांनी मोहनरावांची एन्जीओग्राफी केली गेली आणि त्यांना बायपास करण्याची शिफारस केली. दोन दिवसांनी मोहनरावांची बायपास झाली. आशा विचार करत होती. गेल्या दहा दिवसात किती धावपळ झाली. कणकवलीतील त्या भोसले वकिलांनी कोल्हापूरच्या नाईकच्या अपघाताची बातमी सांगितली आणि आपला नवरा हादरला. केवळ नशिब म्हणून आपला नवरा वाचला.
ब्ाायपास नंतर मोहनरावांना आयसीयु मधून जनरलमध्ये आणले. पण मोहनराव खिन्न होते. आपण किरकोळ जमिनीसाठी आईवर, भावंडांवर केस केली. त्यांना नोटीसा पाठविल्या ही आयुष्यातली फार मोठी चुक केली असे त्यांना वाटत होते. त्यांच्या डोळ्यासमोर वडिल येत होते. गावातील महाजनांच्या बागेत अळी काढणे, कोळम्याने पाणी काढणे, झाडावर चढून आंबे, रतांबे काढणे अशी कामे करुन त्या मजूरीतून घरात साखर पावडर मीठ आणायचे. रोज कष्टाची कामे, बागेतली नारळ सुपारी घेऊन दहा मैलावरील कणकवलीच्या बाजारात चालत जायचे आणि येताना मुलांना खाऊ, शाळेची पुस्तके-वह्या आणायचे. आपण हुशार म्हणून आपल्याला कणकवलीला अभ्यासाला ठेवले. तेव्हा त्यांची आणि आईच्या जीवाची किती घालमेल झालेली. आईफक्त रडत होती पण बापाने आपल्याला गावात अडकवले नाही. उलट शिक्षण घेऊ दिले. मुंबईहून आपले पत्र आले नाही तर दोघांचा जीव वर खाली व्हायचा. भाऊ वसंता आपण कणकवलीला शिकत होतो तेव्हा एवढासा होता. मी गावी गेलो की मागून मागून असायचा. अजूनही आपण गावी गेलो की माझ्यासाठी काय चांगले मिळेल ते आणायचा. कधी शहाळी, चांगले मासे, आंबे. बहिण यशोदा तर सर्वांची लाडकी. नेहमी दादा दादा करत मागे मागे. सर्व माझीच माणसे. रक्ताची माणसे. एका आईच्या पोटातून सर्वांनी जन्म घेतला. पण गावच्या किरकोळ गुंठ्यातील जमिनीसाठी आपण कोर्टात गेलो. वडिलांचे पण काही चुकले नाहीच. एवढ्याशा जमिनीत दोन भाग पाडले तर प्रत्येकाला काय येणार ? वसंताला काय राहणार ? त्याची तिन माणसे आणि आई जगणार कसे ? आपण आई-वडिलांना कधी पैसे धाडले नाहीत की बहिणीला काही पाठविले नाही. आपण पत्नी आशा, मुलगा आणि सासुरवाडीच्या माणसांचा विचार करत राहिलो. आपली बुध्दी भ्रष्ट झाली होती. छे छे... आपले चुकलेच. आता बरे वाटले की गावी जायचे. आईच्या पायावर डोके ठेवायचे. वसंताच्या पाठीवर थाप द्यायची. बहिणीच्या घरी जाऊन तिची खुशाली घ्यायची आणि कोर्टातली केस मागे घ्यायची. त्याशिवाय आपल्याला चैन नाही की सुख नाही. आशा समोर येऊन बसली. म्हणाली - ‘‘कसाला विचार करताय?’’
‘‘मी फार मोठी चुक केली. तुझ्या आणि तुझ्या माहेरच्या माणसांच्या बुध्दीवर चाललो. माझ्या सख्ख्या रक्ताच्या माणसांना विसरलो. वडिलांना त्यांच्या आजारपणात हाक मारली नाही, मदत केली नाही. खरतर त्यांच्या शेवटच्या आजारपणात त्यांना मुंबईत आणून मोठ्या हॉस्पिटलमध्ये उपचार केले असते तर ते अजून जगले असते. पण मला तशी बुध्दी झाली नाही. त्यांचे सर्व वसंता आणि नलिनीने केले. तोंड मिटून केले. माझ्या वडिलांचे आजारपण त्या दोघांनी काढले म्हणून खरतर मी त्यांचे आभार मानायला हवे होते. त्या ऐवजी मी वाट्टेल तसे बोललो. मी ही केस मागे घेणार आहे. मला नको जमिन. नको हिस्सा. मला माझी माणसे हवीत. आता मला कोणी अडवायचे नाही. नाईकांचा अपघातात मृत्यु झाला पण त्यामुळे माझे डोळे उघडले. आता जर मी तुम्हाला जिवंत हवा असेन तर माझ्या मनाप्रमाणे वागायचं. वडिलांच्या अखेरच्या इच्छेचा मान ठेवायचा.’’
आशा गप्प होती. आपला नवरा या आजारपणात पुरता खचला आहे. त्याला परत चालता फिरता करायचा असेल तर त्याच्या मनाविरुध्द वागायचे नाही हे तिने ओळखले. मोहनरावांनी भोसले वकिलांना सांगून केस मागे घेण्याची तयारी दाखवली.
वसंता नलिनीचा मुलगा शंतनु बारावी पास करुन कणकवलीत लॉ कॉलेजला जाऊ लागला होता. लॉ च्या दोन्ही वर्षात तो कॉलेजमध्ये पहिला आला. सुरुवातीला तो गावाहून जाऊन येऊन करत होता. पण आता अभ्यास वाढला म्हणून आणि नाडकर्णी वकिलांकडे अनुभवासाठी काम करत होता म्हणून तो कणकवलीतच हॉस्टेलमध्ये राहू लागला. मोहन-वसंताची आई सुमतीबाई अधून मधून आजारी असायची. तिलापण कणकवलीत अधून मधून डॉक्टरांकडे न्यायला लागत होते. शंतनु आता बाईबाबांना म्हणत होता. आपण सर्व कणकवलीत भाड्याची जागा घेऊन राहूया.
मोहनरावांना आईला, वसंताला, बहिणीला भेटायचं होतं. कोर्टात जाऊन केस मागे घ्यायची होती. जवळ जवळ तीन वर्षांनी मोहनराव आणि आशा घरी आली. काका घरी येणार आहेत हे कळताच शंतनुपण गावी आला. बहिण यशोदापण माहेरी आली. मोहनराव घरी आले ते आईच्या खोलीत गेले. आईच्या पाया पडले. वसंतापण तेथेच त्यांच्या मागोमाग आला. वसंताच्या पाठीवरुन हात फिरवला. आशाने बॅगेतून सासुबाईंसाठी साडी बाहेर काढली. वसंतासाठी पॅन्टशर्ट बाहेर काढले, नलिनीसाठी साडी बाहेर काढली. शंतनुसाठी मोबाईल बाहेर काढला. बहिणीसाठी साडी, बहिणीच्या मुलीला मोबाईल हे सर्व टेबलावर ठेवून मोहनराव बोलू लागला.
‘‘आई, वसंता, यशोदे माझा चुकलाच. मी तुमका नको नकोता बोल्लयं, यशोदा मागच्यावेळी बोलली ता खरा आसा. खरंतर मी घरातलो मोठो मुलगो. मी घरातली जबाबदारी घेवक होई होती. आईबाबांनी माका मोठो केलो, शिकवलो. पण तेची जाण ठेवलयं नाय मी. मी मुंबईक गेलय आणि सगळ्यांका विसारलयं. लग्नानंतर माका सासुरवाडीची लोका मोठी वाटाक लागली आणि गावची बावळट. मी सासुरवाडच्यासाठी खुप केलय पण माझ्या आईवडिलांका, भावाक, बहिणीक विसारलयं. माझी चुक माका कळली. माझ्या वडिलांनी मृत्युपत्र करुन माका जमिन देवक नाय म्हणून मी रागान बेभान झालयं. त्यामागचो वडिलांचो हेतू माझ्या लक्षात ईलो नाय. वडिलांका या जमिनीचो तुकडो पाडूचो नाय व्हतो. माझी एकुलती एक बहिण यशोदा - तिच्या घराकडे कधी गेलयं नाय. तिची कधी विचारपुस केली नाय. तिच्या चेडवाक कधी जवळ घेतलय नाय. माझी चुक माका कळली. मी पैशाच्या धुंदीत होतय. पण एक फटको बसलो. आजारपणात मरणातून वाचलयं. कारण आईबाबांचे आशिर्वाद पाठीशी होते. हॉस्पिटलमध्ये एक महिनो बिछान्यावर पडलयं आणि सगळा डोळ्यासमोर इला. मी खूप चुक केलयं. आई, वसंता, यशोदे माझा चुकला. मोठ्या मनान सगळा इसरा.’’ मोहनराव गदगदून रडत रडत बोलत होता. बाजूला आशापण गप्प राहून ऐकत होती. त्यांच्या आईचेपण डोळे ओले झाले होते. वसंता, नलिनी, यशोदापण भावूक झाली होती. एवढ्यात वीस-एकवीस वर्षाचा वसंताचा मुलगा शंतनु बोलू लागला.
‘‘मोहनकाका तुम्ही म्हणालात सगळा विसरा, पण आम्ही कसे विसरतलवं, आजोबा वारले तेव्हा मी बारावीत होतय. सतरा वर्षाचो. मृत्युपत्रात तुमच्या नावावर जमिन ठेवक नाय म्हणून तुम्ही आजी, बाबा, यशोदे आते हेंका काय काय बोल्लात. माझ्या आईबाबांनी मुद्दाम तसा मृत्युपत्र आजोबांका करुक सांगल्यानी असो आरोप केलात. यशोदा आतेन जाब विचारल्यान तेव्हा तिचा थोबाड फोडूक निघालात. मी लहान होतय म्हणून गप्प रवलंय आणि माझी आई माका काही बोलूक देईना. ही आशा काकी म्हणाली आंब्याच्या बागेचे लाखो रुपये घेतास - सव्वीस कलमांचे लाखो रुपये येतत ? कलमा आधी एक वर्षाआड येतत. तेंका मोठा करुन काय करुचा लागता त्या शेतकर्याक माहित. बागेची साफसफाई, खत, किटकनाशका किती महाग झाली याची तुमका कल्पना नसतली. आणि हल्ली माकडांचो त्रास किती सुरु आसा. माकडा लहान लहान फळा अर्धी खाऊन नासधुस करतत. बागवाल्याक कसला उत्पन्न मिळतला ? माझे आजोबा आणि बाबा वर्षभर तेच्या मागे रवत म्हणून थोडे आंबे. ही आशा काकी मागे म्हणाली, तुम्ही सगळे आयत्या घरात रवतात. ह्या जुन्या घरांका सांभाळना म्हणजे काय दुसर्याक कळाचा नाय. किती कौला फुटतत, माकडा उडी मारुन फोडतत, लाकूड खराब होता, वाळवी लागता, पावसात कौला फुटून गळता. गावात रवल्याशिवाय ह्या कळाचा नाय. ह्या असल्या घराक कंटाळून लोकांनी स्लॅबची घरा बांधल्यानी. आमच्याकडे पैशे नाय म्हणून - आणि तुम्ही जर पैशाची मदत केला असतास तर आम्ही स्लॅबचा घर बांधला असता पण तुमका तशी बुध्दी होना नाय. गणपतीक दुसर्या दिवशी येतास आणि पुजेक बसतास. गणपतीची तयारी आधी पंधरा दिवस असता. गणपतीक येवक होया तर त्या तयारीक येवक होया. गावात आळशी माणसा रवतत अशी ही काकी म्हणाली, असू दे आम्ही आळशी. आता या पुढे या घरातलो मोठो मुलगो म्हणून ह्या घर, आंब्याची झाडा, शेती, सण, देवपूजा सगळा तुम्ही सांभाळा. मी, आईबाबांका आणि आजीक घेवन कणकवलीक जातय. ती तिकडे भाड्याची जागा बघलय. माझे बाबा गवंडी आसत तेंका थय काम मिळतला. आम्ही बिर्हाड केला तर माझ्या आईक थोडी विश्रांती गावात. या घरात लग्न होऊन इल्यापासून तिका विश्रांती कसली ती माहिती नाही. आजीकपण मी घेवन जातय. कारण तिका वारंवार कणकवलीचो डॉक्टर लागता. आमची गुरा आसत तेंका मी माझ्या मामाकडे पाठवलयं. कारण तुमच्याकडून तेंची देखभाल होवची नाय. माझे बाबाही अशी कामा करत करत पन्नासाव्या वर्षी म्हातारे झाले, आई पंचेचाळीसाव्या वर्षी म्हातारी झाली. तेनी आयुष्यात कधी विश्रांती घेवक नाय. या दोघांचा आयुष्य वाढवचा आसात तर या घर सोडूक व्हया आणि आम्ही कणकवलीक बिर्हाड करुक व्हया. तेवा तुम्ही आणि काकी ह्या घर सांभाळा. तसे तुमी आता रिटायर्ड आसात, तुमचो मुलगो अमेरिकेत गेलो हा. तुम्ही मुंबईक रवलास काय आणि हय रवलास काय फरक पडना नाय. आजच संध्याकाळी मी आई बाबा आणि आजीक घेवन जातय. आता एकदम गणपतीक येव. तुम्ही कसे तिसर्या दिवशी गणपतीक येवास. तुम्ही मोठे भाऊ वडिलानंतर या घरची जबाबदारी तुमची. या घरातले देव, त्यांची पूजा, सण सगळे मोठ्या भावानच करुचे आसतत. आजपासून ह्या घर तुमचाच, शेती फक्त तुमचीच, आंब्याची झाडा, काजूची झाडा फक्त तुमचीच.’’ एवढे भडाभडा बोलून शंतनु थांबला. मोहनराव आणि आशा आ वासुन ऐकत राहिली. एवढासा शंतनु मोठा केव्हा झाला हे कळलेच नाही. वसंता आणि नलिनी सुध्दा आपल्या मुलाकडे पाहत राहिली. या शंतनुला आपण अजून लहान लहान म्हणत होतो, पण खरंच जे आम्ही बोलू शकणार नव्हतो ते हा मुलगा बोलला. वसंताला वाटले आयुष्यभर मी या घरासाठी झटलो, एक दिवस विश्रांती नाही. शहरातल्या लोकांसारखे ना नाटक, ना सिनेमा. पण किंमत कोणाला आहे ? ही आशा वहिनी गावातले सगळे लोक आळशी असे म्हणून मोकळी झाली. खरचं शंतनु म्हणतोय तर जाऊया कणकवलीला. मी गवंडी काम करेन. नलिनीला विश्रांती मिळेल. नलिनी मनात विचार करत होती. कमाल आहे या मुलाची. मोठ्या काकांना मनातले बोलला. मला असे कधी बोलायला जमले नसते. घर सोडून कणकवलीला ब्िार्हाड करायचं म्हणतोय सोप आहे का ते ? एवढी वर्षे या घरात राहिले. चला आता बिर्हाड करुया. तो म्हणतोय तर जाऊ कणकवलीला. शंतनुचे बोलणे मोहनराव आणि आशा ऐकत होती. शंतनु एवढा मोठा झाला हे त्यांना माहितच नव्हते. तो खरच घर सोडून आईवडिलांना, आजीला घेऊन कणकवलीला जाईल असे त्यांना वाटत नव्हते. मोहनरावांना वाटत होते. आपल्याला आणि आशाला हे घर सांभाळणे जमायचे नाही. नलिनी दिवसभर राबराब राबत असते. आशाला थोडेच जमणार ? आशाला आता शहरात राहून सुखाची सवय झाली आहे. पण करणार काय ? मागच्या वेळी आपण आणि आपली बायको काय काय बोलून गेलो. आता आपणाला हे सर्व ऐकून घ्यावेच लागेल.
मोहनराव आणि आशा पाहत होती. खरेच नलिनी कपड्यांच्या पिशव्या भरत होती. वसंता तिला मदत करत होता. मध्येच नलिनीने दोघांचे जेवण आणून ठेवले आणि रात्रीसाठी तुम्हा दोघांसाठी जेवण ठेवले आहे असे सांगून गेली. नलिनी वसंताने भरलेल्या पिशव्या पाहून आशा बोलू लागली.
‘‘वसंत भावोजी, आमचं चुकलंच, आम्ही रागाच्या भरात बोलून गेलो. मी तुम्हाला आळशी म्हणाले, ऐतखाऊ म्हणाले, आंब्याचे एवढे पैसे खाता म्हणाली, चुकच झाली. आम्ही तुमच्या सगळ्यांवर दावा दाखल केला. त्याची शिक्षा आम्हाला मिळाली. माझा नवरा मरणाच्या दारातून परत आला. पण आता तुम्ही हे घर सोडून जाऊ नका. मी शहरात राहिलेली. मला हे गावातील घर सांभाळता येणार नाही. गावातले सण, रितीरीवाज मला जमणार नाहीत. मी सासुबाईंना उलट-सुलट बोलले. सासुबाई मला क्षमा करा.’’ असे काहीबाही आशा मोहन बोलत होते. हात जोडत होते. डोळे पुसत होते. पण वसंता, नलिनी, यशोदेने तिकडे लक्ष दिले नाही. थोड्या वेळाने त्यांनी बाहेर जायचे कपडे घातले एवढ्यात शंतनु टेम्पो घेऊन आला. त्यात शंतनुने आणि वसंताने मिळून सर्व सामान भरले. एक रिक्षा आली त्यात शंतनुची आजी, आईबाबा आणि आते बसली. टेम्पोबरोबर शंतनु बसला. सर्वांनी देवाला नमस्कार केला. घराकडे एकदा डोळेभरुन पाहिले. रिक्षा आणि टेम्पो कणकवलीच्या दिशेने निघाली.
बाहेर लोट्यावर बसून मोहनराव आणि आशा डोक्याला हात लावून हे सर्व पाहत होते आणि त्यांच्या समोरील टेबलावर त्यांनी मुंबईहून आणलेल्या साड्या, शर्टपॅन्टपीस, मोबाईल्स त्यांचेकडे पाहत होते.
प्रदीप केळुसकर
मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा