बुधवार, ४ डिसेंबर, २०२४

1569. बाबू

      लोटस टेक्नॅालॅाजीची भव्य चकचकीत शोरूम उघडून नवीन शेठ आत आले. आत येताच ते गणेशाच्या उंच प्रतिमेसमोर नतमस्तक झाले. उदबत्तीचा गंध ती शोरूम पवित्र करत होता. अनेक लॅपटॅाप,डेस्कटॅाप, फोनची अद्ययावत मॅाडेल्स मांडून ठेवलेल्या शोरूम समोरून जाताना अनेक पाऊले थबकत असत. दार उघडताच गिऱ्हाईक आत यायला सुरूवात झाली. नवीन शेठ गिऱ्हाईकाशी बोलत असतानाच शोरूमचे मॅनेजर सामंत धावत आले. 
“शेटजी, काल आलेला नवा लॅपटॅाप दिसत नाही मागील ॲाफिस मध्ये !  दार फोडून कोणी आत आलं की काय कुणास ठाऊक ! पोलिसांना फोन करा लगेच.”
नवीन शेठचा फोन जाताच पोलिस हजर झाले. ते CCTV चं फुटेज बघत असताना त्यांना एक पंधरा सोळा वर्षाचा मुलगा ॲाफिस मधील लॅपटॅाप घेताना दिसला.
त्यांनी नवीनशेठना विचारलं, “नवीन भाई, याला ओळखता का?”
नवीन शेठनी नीट निरखून बघितलं व ते म्हणाले,”अरे, हा बाबू आहे वाटतं..”.
सामंत म्हणाले,”हो हो.. बाबू च आहे, शेटजी.”
नवीन शेठ विचारात पडले. सोळा- सतरा वर्षाच्या बाबूची चहाची गाडी अगदी शेठजींच्या दुकानासमोरच होती. त्याच्या कडून कित्येक वेळा नवीन शेठ व सामंत गिऱ्हाईकासाठी चहा मागवत असतं. बाबूच चहा घेऊन येत असे. दुकानात आलेला नवा माल अगदी कौतुकाने बघत असे. नवे लॅपटॅाप, नवे फोन याची त्याला उत्तम माहिती होती. बाबू अनेकदा सामंतांना प्रश्न विचारत असे. नवीन मॅाडेल आलं की मला दाखवा म्हणत चहाचे कप गोळा करून बाहेर जात असे.
दहावी पर्यंत शिकलेला बाबू तरतरीत होता. बुद्धी उत्तम होती. पण वडीलांना दम्याचा त्रास, आई धुणं भांडी करणारी व पाठची तीन भावंडं अशी सहा खाणारी तोंडं घरात होती त्यामुळे काहीतरी करून पैसा मिळवावा म्हणून त्याने चहाची गाडी टाकली होती.
“शेटजी, चहा देऊ का?” अगदी प्रेमानं विचारणाऱ्या बाबूने आपल्याच दुकानात का चोरी केली असेल या विचारात शेटजी होते.
त्यांनी बाहेर बघितले.  बाबू व त्याची चहाची गाडी त्यांना दिसली नाही.
दुसरे दिवशी सकाळी नवीन शेठ ना पोलिस चौकीमधून फोन आला. “चोर पकडला आहे. या चौकीवर.” इन्स्पेक्टर शिंदे म्हणाले.
बाबूला पोलिसांनी शेटजींपुढे आणले. बाबू रडत शेठजींना म्हणाला, “माफ करा, शेटजी. नवा लॅपटॉप व माउस मी घेतला. चुकलो मी. जी शिक्षा मिळेल ती भोगायला मी तयार आहे.”
शेटजी पोलिसांना म्हणाले, “मी बोलतो बाबूशी. तुम्ही बाहेर जा.”
पोलीस बाहेर जाताच शेटजी म्हणाले, “ बाबू, चोरी का केलीस? तुला काही हवं होतं तर मागून तरी बघायचं.”
बाबू रडत म्हणाला,” शेटजी, मला काम्पुटर चं फार वेड हाय. मला एकदा नवा काम्पुटर हातात घेऊन बघावा असं वाटत होतं. तो कसं काम करतो, कुटली शिश्टीम हाय..विंडो ची, ती कशी काम करती असं सगळं  बघायचे होते. लोक आपल्या धंद्याची जाहिरात करत्यात नव्हं काम्पुटर वर..तसं कायतरी करता येतंय का बघायाचं होतं. मी चोरी केली..पण बघून झाल्यावर मी काम्पुटर परत आत आणून ठेवणार होतो. मी सावंत साहेबाना दोन चार येळ इचारलं होतं की मला एक दोन दिवस जुना तरी काम्पुटर द्या बघायला.  ते देणार होते अन विसरत होते म्हणून मला अशी दुर्बुद्धी झाली. मला माफ करा.”
नवीन शेठ च्या डोळ्यापुढे एक वेगळाच प्रसंग तरळत होता.
एक लहान १२-१३ वर्षाचा मुलगा साडीच्या दुकानातील माल कौतुकाने बघत एकदा उभा होता. तो मुलगा दुकानाचे कामकाज कसे चालते बघायला कुतूहलाने आत आला होता.. दुकानात आलेल्या नव्या साड्यातील एक भरजरी अबोली रंगाची साडी हातात घेऊन आपली आई त्या साडीत किती छान दिसेल या स्वप्नरंजनात असताना मॅनेजरने त्याची मान पकडली व पोलिसांच्या हवाली केले होते.
चोरी न करता त्याने पोलिसांचा मार खाल्ला होता. तुरुंगात चार दिवस घालवले होते. पोलिसांच्या माराने पडलेल्या वळांपेक्षा आईचे भरून आलेले डोळे बघून झालेल्या यातनांनी तो जास्त कळवळला होता. बाहेर पडल्यावर चोर म्हणून हिणवणाऱ्या गावातून तो व त्याची आई बाहेर पडून जवळच्या शहरात आले होते.
उत्सुकतेला चोरी म्हणणाऱ्या जगाला त्याला काही दाखवून द्यायचे होते. आईने दिलेले स्त्रीधन विकून त्याने एक छोटा गाळा घेऊन तिथे दुकान टाकले होते. आणि प्रयत्नांची शिकस्त करून आज एवढी मोठी शोरूम चालवणाऱ्या नवीनशेठना त्यांचा सारा संघर्ष डोळ्यापुढे झरझर जाताना दिसत होता.
बाबू समोर गयावया करत उभा होता.“शेटजी, विश्वास ठेवा माझ्यावर. मी कॉम्पुटर परत आत आणून ठेवणार होतो. हे लेटेश्ट माडेल आलंय असं कळलं आणि रहावलं नाही..काल मी "लोटस टेकनॉलॉजी अँड रिपेअर्स" केलेलं पेज तरी बघा."
पोलीस घाईने आले आणि बाबूच्या खांद्याला धरून त्याला आत नेणार तेवढ्यात नवीन शेठ ओरडले, "सोडा त्याला. सोडा.. बाबूला सोडा..
शेटजींचं वाक्य ऐकताच बाबूच्या डोळ्यात आशा आणि अश्रू एकत्र झाले.  तो ओढलेल्या शर्टची बाही सरळ करत शेटजींकडे बघू लागला..
शेठजी म्हणाले, "बाबू, माझ्या दुकानात काम करशील?"
"करतो साहेब. मला शिक्षण नाही पण मला खूप कळतंय कॉम्प्युटर मधलं " बाबू अजीजीने म्हणाला.
"माहित आहे मला. ये उद्यापासून कामाला. शिंदे साहेब, मला बाबू वर खटला भरायचा नाही."
शिंदे नाराजीने म्हणाले,”अहो शेटजी असं सोडू नका. ही मुलं अशीच रडारड करून सुटतात आणि परत चोऱ्या करतात.”
शेटजींनी हात जोडले. ते म्हणाले,”शिंदे साहेब, जशी गुन्हा सिध्द झाल्याविना शिक्षा द्यायची नसते तसंच गुन्ह्याचं कारण समजल्यावर त्याला माणूसकीचे निकष लावून विचार करावा की हा गुन्हा का घडला..एक आयुष्य तुरूंगात जाऊन बरबाद होऊ शकतं. सहा माणसांचं घर चालवतो हा मुलगा.. १६ वर्षे वय आहे त्याचं.. या वयाच्या सर्व मुलांना जशी टेक्नॅालॅाजीची ओढ आहे तशीच ओढ त्याला आहे..चूक झाली आहे पण त्याचं वेगळं प्रायश्चित्त त्यानं करावं असं मला वाटतं.”
ते बाबूला घेऊन बाहेर पडले व दुकानात आले. रस्त्यावरील एका गुंड पुढाऱ्याचा फोटो बघताना त्यांच्या मनात आलं.. या जगात नेहमी मोठे चोर नेहमी सुटतात व छोटे चोर पकडले जातात..
सामंतांनी बाबुला निळा शर्ट व काळी पॅंट दिली.  बाबू उत्साहाने तो युनिफॉर्म घालून आला.
नवीन शेठ म्हणाले," बाबुराव, इथे काम केलास तर मला चहा कोण देणार? असे कर चहाची गाडीच आत आणू.पलीकडच्या खोलीत छोटासा कॅफे बनवू.  तिथे चहा कॉफी पण बनवशील ना?”
बाबूने होय अशी अत्यंत समाधानाने मान हलवली.
"बाबू झालेल्या चुकीचे प्रायश्चित मात्र घेतलं पाहिजे बरका.”
“शेटजी, काय करू सांगा. जे सांगाल ते करतो.. बाबूच्या डोळ्यात प्रामाणिकपणा दिसत होता..
“त्या गजानना समोर उभा राहून त्याची मनापासून माफी माग.” शेटजी म्हणाले.
बाबू गजानना समोर हात जोडून उभा होता.
नवीन शेठ नी बाबूनं तयार केलेलं "लोटस टेक्नॅालॅाजी ॲंड रिपेअर्स" हे पेज बघितलं. बाबूनं बनवलेलं उत्कृष्ट वेब पेज बघून शेटजींनी स्मित हास्य केले. 
त्याच्या डोळ्यापुढे बाबूची काही वर्षानी उभी राहणारी शोरूम होती. कदाचित त्यांच्या शोरूम ला देखील टक्कर देणारी! पण त्याला असा यशस्वी झालेला बघण्यासाठी लागेल ती सारी मदत ते करणार होते..कारण..
चुकतो तोच माणूस असतो आणि काहीवेळा माफीच शिक्षेपेक्षा जास्त  प्रभावी असते.

© ® ज्योती रानडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...