बुधवार, ४ डिसेंबर, २०२४

1606. खुरप्या

      रामभाऊ आणि सीतावहिनी अगदी राम आणि सीतेसारखा जोडा. अतिशय प्रेमळ, पापभिरू, शांत स्वभावाचे, समाधानी जोडपं. चार बुकं शिकल्यामुळे त्यांच्या विचारांमध्ये प्रगल्भता होती. गावात कोणाचा तंटा झाला तरी रामभाऊंना सोडवायला बोलवायचे. शांततेत, समजुतीने रामभाऊ तंटा सोडवत असत. गावात उभयतांना खूप मान होता. कोंड्याचा मांडा करून दोघांनीही संसार केला. खूप कष्ट केले. शेतात घाम गाळला. चारही मुलांना उच्चशिक्षिण देऊन मार्गी लावले. मोठा मुलगा त्यांच्यासोबत रहात होता. धाकटा शहरात नोकरी करून त्याच्या कुटुंबासमवेत रहात होता. दोन मुली आपापल्या घरात सुखी होत्या. चारही मुलं पण आईवडिलांसारखी गुणाची. रामभाऊ आणि सीतावहिनी जशी माणुसकी जपत तसेच प्राणिमात्रांवर देखील तितकाच जीव लावत. कुत्रे, मांजरी, कोंबड्या, गायी - म्हशी सर्वांना पोटच्या पोरांप्रमाणे जपत. पण खुरप्यावर दोघांचा अतोनात जीव होता आणि त्याला कारणही तसेच होते.
        दोन वर्षांपूर्वी एकामागोमाग एक संकटांवर संकटांची जणू मालिकाच सुरू झालेली. शहरात असलेल्या धाकट्या मुलाचा अपघात झाला. दोन दिवस तो बेशुद्धावस्थेत होता. भाऊ आणि वहिनींची खूप वाईट अवस्था झाली होती. आपण खचलो तर पोराच्या बायको - मुलांना कोण आधार देणार? या जाणिवेने स्वतःचे दुःख बाजूला सारून सुनेच्या पाठीशी दोघे खंबीरपणे उभे राहिले. मुलगा पूर्ण बरा झाल्यावर आपल्या गावी परतले. ते नाही निस्तरतं तर एकदा मोठा नातू त्याच्या मित्रांसोबत खेळताना त्याच्या डाव्या डोळ्याला इजा झाली. त्या डोळ्याने त्याला दिसेनासे झाले. कितीतरी प्रख्यात डॉक्टरांना दाखवूनही यश मात्र आले नाही. जे काही विधिलिखित घडले ते मान्य करून पुन्हा आयुष्याशी झगडायला सारे कुटुंब उभे राहिले. 
      काही दिवसांनी त्यांच्या कोंबडीने दहा - बारा अंडी घातली आणि अंडी उबवायला बसली. त्या रात्रीत कुठूनसा एक मुंगूस येऊन त्याने त्या कोंबडीवर झडप घालून तिला खाल्ले. दोघा उभयतांना प्रश्न पडला की, कोंबडी नाही तर अंडी कशी उबणार? दोघांनी ठरवले किती वाचतील तितकी वाचतील पण आपण ही अंडी उबण्याची व्यवस्था करूया. पोल्ट्रीफार्म मध्ये बल्बच्या साहाय्याने अंडी उबवतात हे त्यांना ठाऊक होते. त्यांनी गवताचा पेंढा घेतला. त्यावर धान्याचा कोंडा पसरवला. त्यावर अंडी रचवली आणि एका बल्बच्या तापमानावर त्यांनी अंडी उबवायला ठेवली. बरोबर एकवीस दिवसांनी तीन अंड्यातून पिल्ले बाहेर आली. भाऊ आणि वहिनींना कमालीचा आनंद झाला. त्या पिल्लांना पण उपजत समजले असेल ह्या दोघांनी आपल्याला जीवनदान दिले आहे. ती पिल्लं त्या दोघांपाशीच घुटमळत राहायची. ती दोघे जातील तिथे मागे मागे फिरत राहायची. पिल्लांची आई नसल्याने ती दोघे स्वतःच्या हातावर दाणे ठेऊन पिल्लांना चारायची. एक वेगळंच नातं त्या पिल्लांबरोबर झाले होते त्यांचे. वेगळाच लळा लागलेला त्यांचा. त्या कोंबड्याच्या पिल्लांचं रामभाऊ अन सीतावहिनी यांच्याशी असणारे नाते, माणसांची जराही भीती न बाळगणारे ते एवढेसे जीव ह्यामुळे घरी येणार्‍या जाणाऱ्यांसाठी ती पिल्ले म्हणजे कौतुकाचा विषय झाला होता. अगदीच नवलाई अप्रूप वाटायचे परक्यांना. रामभाऊ आणि सीतावहिनींच्या नजरेआड पिल्लं गेली तरी त्यांचा जीव कासावीस होत असे. 
     त्या तीन पिल्लांमध्ये दोन कोंबड्या आणि एक कोंबडा होता. त्यांनी कोंबड्याचं नाव खुरप्या आणि कोंबडीची नावे बकुळी आणि सगुणी ठेवले. पिल्लं आता भरभर मोठी होत होती. शेतातला सकस दाणापाणी खात होती. खुरप्याचं रूपांतर आता सुंदर ऐटबाज कोंबड्यात होऊ लागले होते. डोक्यावरील तुऱ्याने त्याच्या देखणेपणात भर पडली होती. भाऊ आणि वहिनी प्रेमभराने त्याला पाहत असत. सगळं आलबेल आहे वाटत असताना वळीवाच्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे राहत्या घराचे छप्पर उडाले. पावसामुळे घरात पाणी साचले. अत्यंत मानसिक, शारीरिक, आर्थिक त्रास सोसावा लागला. नव्याने घराची डागडुजी करावी लागली.
        रामभाऊ ओसरीवर बसून मनात विचार करत होते देव कुठली परीक्षा घेतो आहे आपली. एकावर एक संकटे येतंच राहिली आहेत. तितक्यात दारात एक भगत येऊन उभा राहिला आणि भाऊंना म्हणाला, "देव कोपलाय जनू तुझ्यावर. म्हनून तुझ्यावर संकटं येत हायेत. त्याला ह्ये तुझं कोंबडं बळी द्ये. समंदी संकटं जात्याल तुझ्या पाठची." असे म्हणून तो भगत निघून गेला. छोटंसं गाव असल्याने ही बातमी गावभर पसरली. 
         रामभाऊ शेताकडे जात असताना त्यांना गावकऱ्यांनी घेरलं.
        "रामभाऊ त्यो भगत बोलला हाय नव्हं तुमचं कोंबडं देवाला द्या म्हनून तर त्या भगताचं ऐका. खरं सांगतो त्यो. मागं मलाबी सांगितलं व्हतं तवा मी बी कोंबडं दिलं बळी. तवापासून माझ्या पाठची इडा पीडा गेलीय बघा." गावातील सदाशिव मोरे सांगू लागला. लगेच तिथे उभे असलेल्या पंधरा - वीस लोकांनी त्याची री ओढली. त्या भगताविषयीचे स्वतःचे अनुभव सांगू लागले. 
         डोक्यात विचारांचं वादळ बाळगत रामभाऊ घरी आले. "सीता, ए सीता! पाणी दे ग प्यायाला, लय डोचकं दुखतंया. गोळी आसंल तर ती बी दे."
          सीतावहिनी लगबगीने पाणी आणि गोळी घेऊन आल्या. "काय झालंया? कशानं डोकं दुखतंया?"
        " अग त्यो भगत सांगून गेला ना त्यादिवशी कोंबडं बळी द्या म्हनून तर आज गावातली लोकं बोलत व्हती की, त्या भगताचं ऐका म्हनून. त्यो खरं सांगतो आन आपल्या मागची इडा पीडा खरंच जाते. पर आपल्या मनाला ह्ये पटणार हाय व्हय? आपन पोरावानी जपलंय आपल्या खुरप्याला."
        "आवं लोकांचं काय ऐकतासा? आपल्याला ह्या गोष्टींवर जरा तरी ईश्वास हाय का? देवानं मानसं आन प्राणी जन्माला घातलं तर देव आपल्या लेकरांचा बळी मागल व्हय? लेकरावानी सांभाळलय खुरप्याला. धजावsल का मन आपलं? कायबी वंगाळ आणू नका मनात."
         "न्हाई ग, मला पटतच न्हाई, उगाच मन भरकटलं."
           त्यादिवशी पुरता हा विषय थांबला. पण रामभाऊंच्या पाठची संकटे काही पाठ सोडत नव्हती. सीतावहिनी विहिरीपाशी पाय घसरून पडल्या आणि त्यांच्या हाताला, कंबरेला जबरदस्त मुका मार बसला. पुन्हा गावकऱ्यांनी कोंबडं बळी द्या असा घोषा रामभाऊंच्या मागे लावला.
           "मी काय म्हनतो सीता? आपन खुरप्याला बळी न्हाई द्यायचा. पन मी त्याला ओढ्यापाशी सोडून येतो. माझ्या लय जीवावर आलंया पर ह्या संकटांपायी मी पार खचलोया ग." रामभाऊ काकुळतीला आलेले.
           "आव! कसं बोलवतं ओ तुमाला? काळजाचा तुकडा असा वाऱ्यावर सोडनार तुमी? तिथं ओढ्यावर कुठलं जनावर आसंल ते मारून टाकंल खुरप्याला. न्हाई बा मी न्हाई तयार या गोष्टीला." 
           "अग, मी पन मन घट करून सोडनार हाय त्याला. बघू आपल्या मागची इडापीडा जातेय का." असं म्हणून रामभाऊंनी मन घट्ट करून खुरप्याला एका पिशवीत टाकलं आणि ते ओढ्याकडे निघाले. नेमका मुलगा शेतावर गेलेला. बायको आणि सून नको नको म्हणत असताना सुद्धा अंदाजे एक - सव्वा किलोमीटरवर असलेल्या ओढ्यापाशी खुरप्याला सोडून जड अंतःकरणाने ते घरी आले. 
           इथे घरात सीतावहिनी, त्यांची सून, नातवंडं सगळे ओक्साबोक्शी रडत होते. त्यांचा मुलगा थोड्यावेळाने खुरप्याला शोधायला ओढ्यापाशी गेला. खूप शोधाशोध करून सुद्धा खुरप्या काही दिसला नाही. खिन्न मनाने तो घरी परतला. त्या दिवशी अख्खा दिवस कोणी जेवले नाही. रात्रभर कोणाच्या डोळ्याला डोळा लागला नाही. खुरप्याला सोडल्यामुळे रामभाऊंचं मन खात होतं. त्यांच्या डोळ्यांतून अश्रू पाझरत होते. 
         'कॉक - कॉक- कॉकॉक' पहाटे पहाटे अंगणात खुरप्याचा आवाज आला. पहिलं तर वाटलं भास झाला असेल पण खुरप्या पुन्हा आरवला आणि घरातल्यांना खात्री पटली की खुरप्या परत आला. सगळे अंगणाकडे पळत सुटले. पाहतो तर काय खरंच खुरप्या आला होता. रामभाऊंनी त्याला उचलले. प्रेमभराने त्याला घट्ट जवळ घेतले आणि बोलले, "कितीबी संकट येउदे, माझ्या कोनत्याबी लेकरांना असं वाऱ्यावर न्हाई सोडनार. लय पाप घडनार व्हत माझ्या हातानं. देवानं वाचीवलं मला या पापातून. खरंच तू देवाचं लेकरू हायेस. माझ्या राजा, माझ्या सोन्या." रामभाऊंच्या डोळ्यांतून अश्रू ओघळत होते. 
        खुरप्या रात्रभर कुठे राहिला असेल? त्याला परत घरचा रस्ता कसा सापडला असेल? तो मुंगूस, रान कुत्री, मोकाट कुत्री इतर जनावरे यांच्यापासून कसा वाचला असेल? कसा परत आला? एक नाही हजार प्रश्न रामभाऊंच्या डोक्यात येऊन गेले.
हे कसलं प्रेम? हा कसला लळा? कुठून आलं त्याला इतकं बळ? सगळा विचार करून रामभाऊंच हृदय मग अगदी भरून आलं. काहीही झाले तरी या खुरप्याला कधीच विकायचा नाही. कधीच कुठे सोडायचा नाही. त्याला जीवापाड जपायचे हे त्यांनी ठरवून टाकले आणि जणू रामभाऊंच्या मनातलं ओळखून खुरप्या त्याच्या स्टाईलने एक पाय वर करून पुन्हा आरवला कॉक - कॉक - कॉकॉक.
( समाप्त )

सौ. नेहा उजाळे
ठाणे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...