नाशिकहून प्रकाशित होणाऱ्या दै. गावकरीच्या आजच्या रविवारच्या अंकातील आस्वाद पुरवणीत समाजभान या सदरात प्रसिद्ध झालेला माझा लेख.
( मा. संपादक, दै. गावकरी व त्यांच्या सर्व टीमचे मनःपूर्वक आभार.)
"मला माझं आयुष्यच नकोसं झालंय !"
"मला जगण्याची इच्छाच उरली नाही !"
"झालं तेवढं खूप झालं, आता आणखी नको!"
अशी वाक्यं बोलताना सतीश खूप आक्रमक झाला होता. त्याच्या वाक्यांची फेक इतकी आक्रमक होती की, तो ही वाक्यं समोरच्याला जणू फेकूनच मारतोय असं वाटावं. सतीशच्या तोंडी आलेली ही वाक्यं आपल्यापैकी कुणाच्याही तोंडी कधी ना कधी येत असतात. त्यामुळं ही वाक्यं आणि त्या वाक्यांतले शब्द परिचित असले तरी सतीशकडून केली जाणारी वाक्यांची फेक मात्र माझी काळजी वाढवणारी होती. सतीशचं हे आक्रमक रूप पाहून सतीशच्या मनातल्या मोठ्या आणि भयंकर वादळाचा अंदाज मला एव्हाना आला होता. असं असलं तरी सतीशचा आवेग ओसरण्याची प्रतिक्षा करणं एवढंच त्याक्षणी माझ्या हाती होतं.
गेली काही वर्षे सतीशच्या हाताला काम मिळत नाहीय. कोरोनाकाळात त्याचं काम बंद झालं होतं. कोरोना संपल्यावर त्याचं काम पुन्हा सुरु झालं खरं; परंतु सतीशची प्रकृति अचानक बिघडली. त्याला हृदयाचा त्रास सुरु झाला. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सतीशनं त्याची एन्जिओप्लास्टी करून घेतली. त्यानंतर सतीशला काही महिने सक्तीची विश्रांती घ्यावी लागली. त्यामुळं सतीशचं काम बंद होतं. हाताशी जमा असलेली सर्व पूंजी आजारपणात खर्च झाली होती. आता घर कसं चालवायचं? हा प्रश्न सतीशला भेडसावत होता. उधारी, उसणवारी करून घर किती दिवस चालणार होतं? मुलं मोठी झालेली असली तरी त्यांचं अर्थाजन अद्याप सुरु झालेलं नव्हतं. मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करताना सतीशनं कधीच आपला हात आखडता घेतला नव्हता. त्यामुळं त्याची काही उसणवारी परत देणं बाकी होतं. सतीश असा आजारलेला पाहून त्या लोकांनीही आपल्या रकमा परत देण्यासाठी सतीशकडे तगादा लावला होता. अशावेळी सतीशने आपल्या भावंडांकडे मदतीची मागणी केली. त्यावेळी सगळ्यांनी काही ना काही कारणं सांगून हात वर केले होते. हे सतीशच्या पचनी पडलं नव्हतं आणि म्हणूनच सतीशचा पारा चढला होता.
काही वेळाने सतीशचा आवेग ओसरु लागल्यावर मी त्याच्याशी बोलायला सुरुवात केली. मी सतीशच्या खांद्यावर हात ठेवून त्याला धीर देत म्हणालो- "अरे सतीश, इसी का नाम जिंदगी है! आज तूला जे वाटतंय ते प्रत्येक माणसाला त्याच्या आयुष्यात एकदा तरी वाटलेलं असतं. अतिशय शांत आणि सुरळीत सुरु असलेल्या आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असे उतार-चढाव येतच असतात. कुणाचं करीयर अडचणीत येतं. कुणाची नाती बिघडतात. कुणाची प्रकृति बिघडते. कुणाचा अपघात होतो किंवा कुणाच्या हातून एखादा व्यवहार बिघडतो. असं काही ना काही तरी बिघडत जाऊन घरात पैशांची अडचण निर्माण होते अन् अनपेक्षितपणे घराची सगळी घडी विस्कटून जाते. यालाच आपण बॅडपॅच असं म्हणत असतो. हा असा बॅडपॅच प्रत्येकाच्या आयुष्यात केव्हा ना केव्हा येतच असतो."
"या बॅडपॅचला काही टाईम लिमिट नाही का?" सतीशनं भाबडेपणानं प्रश्न केला. माणूस कितीही मोठं दुःख सहन करू शकतो; पण त्यासाठी त्या दुःखाची एक्स्पायरी डेट त्याला ठाऊक असावी लागते! सतीश योग्य ट्रॅकवर येतोय याचा आनंद मला लपवता आला नाही. मी हलकसं हसलो. माझ्या हसण्यानं सतीशला उर्जा मिळाली असावी. तो बोलू लागला. त्याच्या आताच्या बोलण्यात आधीची आक्रमकता अजिबात नव्हती. एखाद्या समंजस, सूज्ञ, जाणकारानं आपलं म्हणणं मुद्देसूदपणे प्रतिपादित करावं असं काहीसं सतीश बोलत होता. तो म्हणाला- "एखाद्याच्या आयुष्यात हा बॅडपॅच चांगलाच रमतो. काही दिवस, काही महिने किंवा अगदी काही वर्षांपर्यंत हा बॅडपॅच रेंगाळू शकतो. अगदी अल्प काळासाठी आलेला हा बॅडपॅच एखाद्याचं अंतर्बाह्य आयुष्य गदागदा हलवून टाकतो. इतकं की एखाद्याला आपलं आयुष्य नकोसं वाटावं!" शब्दांत संयम राखूनही सतीश अधाशासारखा न थांबता बोलत होता. सतीशला मध्येच थांबवत मी विचारलं- "सतीश, तू शेतकरी कुटूंबातला मुलगा आहेस ना रे?" माझ्या या आकस्मिक प्रश्नानं भांबावून जात तो उत्तरला- "हो, पण त्याचा इथं काय संबंध आहे?" त्याच्या या प्रश्नाकडं दुर्लक्ष करीत मी त्याला पुढचा प्रश्न विचारला- "मला सांग सतीश, शेतातल्या पिकाची खुरपणी करतात हे तुला माहिती आहे का?" माझ्या या प्रश्नाला मान हलवून होकारार्थी उत्तर देणारा सतीश आता आणखी भांबावल्यागत झाला होता. त्याचं हे भांबावलेपण स्वाभाविक होतं. त्याच भांबावलेल्या अवस्थेत त्याला आणखी काही काळ ठेवत मी त्याला पिकाची खुरपणी का करतात? त्याने काय होतं? पिकात काय बदल होतो? खुरपणीचा पिकाला कसा फायदा होतो? असे आणखी काही प्रश्न विचारत गेलो. भांबावलेल्या सतीशनं माझ्या याही प्रश्नांची उत्तरं दिली आणि तो माझ्याकडं मोठ्या अपेक्षेनं पाहू लागला. मला ठाऊक आहे की, तुम्हा सर्व वाचकांचंही आता तसंच काहीसं झालं आहे.
वाचक मित्रहो, आपण शेतातल्या पिकाची खुरपणी करतो म्हणजे नेमकं काय करतो? तर आपण शेतातलं सगळं तण काढतो आणि पिकाच्या मुळाभोवतालची माती अधिक मोकळी व भुसभुशीत करतो. त्यांन काय होतं? तर त्या पिकाच्या मुळांची मातीवरची पकड निसटते. आपली मातीवरची ही निसटलेली पकड पुन्हा घट्ट व्हावी यासाठी ती पिकाची मूळं मातीत आणखी खोल जातात. ही मूळं मातीत जेवढी खोल जातील तेवढी पिकाची वाढ चांगली होते. वाचक मित्रहो, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी आलेला बॅडपॅचही असंच काम करीत असतो.
लेखातल्या सतीशसारखा अनुभव आपल्याला सर्वांना कधी ना कधी आलाच असेल. प्रत्येकवेळी हा अनुभव आपला स्वतःचा नसला तरी घर, शेजार, शाळा, कॉलेज, कार्यालय, व्यवसाय अशा सर्व ठिकाणी असा अनुभव देणारी अनेक माणसं आपल्याला भेटत असतात. त्यांच्याशी बोलताना काही वाक्यं आपल्याला हमखास ऐकू येतात. जसं की,
१. आपण कितीही नको म्हटलं किंवा टाळायचं ठरवलं तरी हा असा बॅडपॅच आपल्या आयुष्यात येत असतो.
२. कितीही नकोसा वाटला, कितीही त्रास झाला तरी हा बॅडपॅच आपल्याला भोगावाच लागतो.
३. या बॅडपॅचमध्ये आपलं कोण? परकं कोण हे कळतं !
आपल्या वाईट आणि पडत्या काळात आपल्यासोबत खंबीरपणे कोण उभं रहातं? कोण आपला हात सोडत नाही? कोण आपल्याला आधार देतं? हे या बॅडपॅचमुळे आपल्याला उमगत असतं!
वास्तविक वरील सर्व नकारात्मक वाक्यं आहेत. ती आपण खोडून काढायला हवीत. असं करताना आपण दुसऱ्याला दोष देणं, त्यांचे अवगुण अधोरेखित करणं, दुसऱ्यांच्या चुका शोधणं आणि स्वतः कसं बरोबर आहे हे सिद्ध करीत राहीलो तर आपला परिघ खूपच मर्यादित राहतो आणि अशा मर्यादेत राहिल्याने आपली वाढ खुंटण्याचा धोका वाढत असतो.त्यासाठी बॅडपॅचला बॅडपॅच न समजता आपल्या आयुष्याची खुरपणी समजायला हवं. आपल्यावर आलेली संकटं आपली मूळं अधिक खोल न्यायला हवीत असंच सूचवत असतात. आई-वडिल किंवा भावंडांनी हात वर केल्यावर सतीशसारखा त्रागा करण्याऐवजी आपण आपल्या नात्यांचा परिघ मोठा करायला हवा. घर, शेजार, शाळा, कॉलेज, कार्यालय, व्यवसाय अशा सर्व ठिकाणी आपला ऋणानुबंध निर्माण करायला हवा. आपल्या शारिरीक, मानसिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि सामाजिक गरजा भागविता येतील अशा सर्व प्रकारच्या क्षमता आपण वाढवायला हव्यात. आपला बॅडपॅच आहे हे खिलाडू वृत्तीने स्वीकारून, पुरेशी नम्रता अंगी बाळगून स्वतःला सतत दुरुस्त करीत रहायचं आणि पुढे वाटचाल करायची हे सूत्र आपण अंगिकारायला हवं; मात्र त्यासाठी माणूस म्हणून आपली प्रत्येकाची मूळं खोलवर जायला हवीत.
#लेखक#
अनिल वत्सला आत्माराम उदावंत
ज्येष्ठ प्रशिक्षक, समुपदेशक व साहित्यिक
सावेडी, अहमदनगर, संपर्क: ९७६६६६८२९५
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा