बुधवार, ४ डिसेंबर, २०२४

1582. सखी, प्रिय सखी...

      माऊली टुर अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्सची बस बेंगलोरहून उटीच्या दिशेने धावत होती. गाडीत पुण्या मुंबईकडचे सुमारे पंचवीस प्रवासी सहलीला जात होते. बहुतेक प्रवासी पन्नाशीच्या पुढचे होते. प्रत्येक सीट दोन प्रवाशांसाठी असल्याने एका सीटवर नवराबायको जोडी बसली होती. अपवाद फक्त डाव्या बाजूला समोरुन चौथ्या सीटवर एक पंचावन्न छप्पन वर्षाचा गृहस्थ हातात पुस्तक घेऊन त्यात रममाण झाला होता. दुसरी उजव्या बाजूला समोरुन पाचव्या सीटवर ज्योती पारकर एकटीच बसली होती. असा लांबचा प्रवास ज्योती कित्येक वर्षांनी करत होती. मुलगा, सून मागेच लागली आणि त्यांनी या माऊली टूरच्या सहलीत नाव नोंदवले त्यामुळे ज्योती बाहेर पडली. असे असले तरी ज्योतीचा जीव अजून पारकर क्लॉथ आणि पारकर एंटरप्रायझेस मध्ये अडकला होता. गेली पंचवीस वर्षे कापड आणि तयार कपडे यांच्याभोवती तिचे आयुष्य गेले होते. तिचा मुलगा आशु आणि सून प्राजक्ता यांची तिला आठवण आली. सांभाळतात दोघेही व्यवसाय पण अजून माझे मार्गदर्शन लागतेच. आपण पण व्यवसायातून हळूहळू बाहेर पडावे असे म्हणतो, पण जमत नाही. पण आता निर्णय घ्यायलाच हवा इतकी वर्षे सतत कामात राहण्याची सवय त्यामुळे घरी बसून वेळ कसा जाणार ही चिंता. 
ज्योतीला तिच्या आयुष्याचा चित्रपट समोरुन सरकू लागला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात लहानशा गावात जन्म. तीन बहिणी आपण, घरची गरिबी. आपण सर्वात लहान. शाळेत हुशार होतो. विशेषतः भाषा विषय अतिशय चांगले. मराठी भाषा फार आवडायची. कविता सगळ्या तोंडपाठ. शाळेत शिकलेल्या कविता ज्योती आठवू लागली. कित्येक वर्षात कविता मनातल्या मनात सुध्दा म्हटल्या नाहीत. बारावीपर्यंत शिक्षण घेऊन शिवण क्लासात नाव घातले. बाजूच्याच गावातील पारकर टेलरचे स्थळ आले. दोन पारकर भाऊ, दोघेही टेलर. त्या चार पाच गावात चांगले कपडे शिवण्याबद्दल प्रसिध्द होते. मोठा भाऊ दिनू, त्याचे लग्न झालेले. धाकटा अरुण त्याचे स्थळ आले. मुलगा बरा आहे. अंगात कला आहे हे समजून आई बाबांनी लग्न लावून दिले. त्या काळात आपल्याला कुठे होते स्वातंत्र्य बरे वाईट म्हणायचे ? पदरी पडेल त्याच्याशी आयुष्यभर संसार करायची पध्दत. लग्नानंतर लक्षात आले सारा कारभार मोठ्या जावेच्या हातात. आपला नवरा पण वहिनीच्या पुढे बोलत नाही. दुकान मोठ्या भावाच्या हातात. सर्व पैसे भावाकडे जाणार. त्याच्याकडून त्याच्या बायकोकडे. काही हवे असेल तर मोठ्या जावेकडे मागावे लागे. ज्योतीला हे सहन होत नव्हते. यातून बाहेर पडायला हवे. तिने नवर्‍याच्या मागे तगादा लावला आपण वेंगुर्ल्याला जावू. माझी आते तिथे आहे. तिथे टेलरिंग दुकान काढू. मी कपडे विकीन. ज्योतीचा नवरा काही ऐकणारा नव्हता. मग तिच्या मोठ्या दिराला दारुचे व्यसन लागले. त्यात तो पैसे उडवू लागला. घरात पैसे येणे बंद झाले. त्यामुळे मोठी जाऊ आता तुम्ही वेगळे रहा आम्हाला तुमचा खर्च झेपत नाही असे म्हणू लागली. त्यामुळे तिच्या नवर्‍याचा नाईलाज झाला आणि शेवटी ती दोघं गाव सोडून वेंगुर्ल्याला आली. 
वेंगुर्ल्याला ज्योतीची आते राहत होती. आतेच्या नवर्‍याचे इस्त्रीचे दुकान होते. स्वतःचे घर होते. आत्येचा मुलगा मुंबईला नोकरीला होता. त्यामुळे ती दोघंच राहत होती. म्हणून ज्योती आणि अरुणची रहायची सोय झाली. ज्योती धडपडी होती.
 आजुबाजूला फिरुन कुठे भाड्याने दुकान गाळा मिळतो काय? हे शोधत राहिली. तिला थोडीशी आतमध्ये पण कमी भाड्याची जागा मिळाली. त्या जागेत पारकर टेलर्सचा बोर्ड लागला आणि आतेकडे पडून असलेल्या शिलाई मशिनवर काम सुरु झाले. ज्योतीच्या मावशीचे मुंबईत परकर, साड्या, ब्लाऊज कटपीस यांचे लहानशे दुकान होते. ज्योती मुंबईत गेली आणि मावशीच्या ओळखीने स्त्रियांसाठी लागणारे कपडे क्रेडिटवर घेऊन एसटी बसवर पार्सले घालून वेंगुर्ल्याला आणू लागली. तिला माहीत होते आपली या शहरात ओळख नाही तर कोणी आपल्याकडे येणार नाही. त्यासाठी आपण त्यांच्याकडे जायला हवे. म्हणून ती सायकलच्या मागेपुढे पिशव्या बांधून घरोघरी कपडे विकू लागली. लाघवी बोलणे, दुकानापेक्षा रेट कमी आणि चांगला दर्जा यामुळे तिचे कपडे खपू लागले. तिच्या तोंडी जाहिरातीमुळे तिच्या नवर्‍याकडे कपडे शिवायला येऊ लागले. एकंदरित दोन वर्षात तिने या व्यवसायात जम बसवला. दर पंधरा दिवसांनी तिला मुंबईला जावे लागे. मागचे पैसे देऊन पुढचा माल आणायचा. या दरम्यान तिला मुलगा झाला. आशु एक महिन्याचा झाला त्याला आतेकडे ठेवून ती मुंबईची वारी करु लागली. अशीच पाच वर्षे गेली. तिचा व्यापार आता जोरदार होऊ लागला. आता तिला मार्वेâटमध्ये एखादा गाळा मिळावा अशी इच्छा झाली. शोधता शोधता तिला तसा गाळा मिळाला. या गाळ्यात तिने मस्त फर्निचर केले आणि भरपूर माल भरला. फक्त स्त्रियांसाठी कपडे, सर्व सेल्सगर्ल मुलीच ठेवल्या. अशी पध्दत तळकोकणात तेव्हा नवीनच होती. त्यामुळे तिच्याकडे मुलींची तसेच स्त्रियांची गर्दी होऊ लागली. आता सरळ ट्रान्सपोर्टने माल यायला लागला. गणपती, दिवाळी, लग्नसराई या काळात तिला जेवायला वेळ मिळत नव्हता अशी गर्दी. तिचा नवरापण टेलरिंग बंद करुन तिच्या दुकानात काम करु लागला. 
एव्हाना आशु शाळेत जाऊ लागला. त्याच्याकडे लक्ष द्यायला आते होतीच म्हणून ती निर्धास्त होती. आशुपण अगदी गुणी निघाला. आपली आई सतत कामात असते हे पाहून तो फारसा हट्ट करायचा नाही. पण तिचे दुर्दैव तिच्या नवर्‍याला दारुचे व्यसन लागले. तिने त्याला खूप समजावले. ही दारु आयुष्याचा सत्यानाश करणार आहे. त्याचा मोठा भाऊ सुध्दा असाच दारुपायी आयुष्यातून बाद झाला. परंतु तिच्या नवर्‍यामध्ये कसलीही सुधारणा दिसेना. उलट त्याचे व्यसन दिवसेंदिवस वाढू लागले. शेवटी तिने निग्रहाने सांगितले, यापुढे दारु पिऊन दुकानात आलास तर बाहेर हाकलून लावीन. घरात पाय ठेवू देणार नाही. दिवाळी आलेली त्यामुळे भरपूर माल दुकानात आला. ती मुलींकडून पार्सले उघडवत होती. त्यावर दर चिकटवणे सुरु होते. एवढ्यात तिचा नवरा दारु पिऊन तर्र झालेला दुकानात शिरला. आणि कॅश काऊंटरवर जाऊन पैसे खिश्यात घालू लागला. तिच्या अंगाचा संताप संताप झाला. तिने कोपर्‍यात असलेली एक मोठी काठी उचलली आणि त्याच्या डोक्यात घातली. तो तिरमिरला आणि खाली पडला. तिने दुकानातील मुलींच्या सहाय्याने त्याला ओढून बाहेर काढले. आणि पुन्हा दारु पिऊन दुकानात आलास तर बघ तुझा जीव घेईन अशी तंबी दिली. थोड्या वेळाने तिचा नवरा उठून कुठेतरी गेला. तो रात्री येईल, उद्या येईल असे म्हणता म्हणता तो आलाच नाही. तिला वाटले कदाचित गावी गेला असेल. गावीपण तो गेला नाही. कदाचित नातेवाईकांकडे गेला असेल. पण तो कुठेच गेला नाही. दोन महिन्यांनी देवबाग किनार्‍यावर त्याचे प्रेत समुद्रात तरंगताना दिसले. 
तिचा व्यवसाय जोरात सुरु होता. घरी आते, तिचे यजमान लक्ष ठेवून होते. आशु शाळेत जात होता. आता तिच्या बँकेत पैसे जमा होऊ लागले. तसे तिला मोठ्या जागेचे वेध लागले. भर बाजारात मोठ्या इमारतीचे काम सुरु होते. त्या इमारतीत दुकानासाठी जागेची तिने चौकशी केली. तिच्या बँकेने पण सहाय्य केले. आणि दोन हजार शंभर स्क्वेअर फूटाची जागा तिने विकत घेतली. आता पारकर एंटरप्रायझेस नवीन प्रशस्त जागेत सुरु झाले. इथे नवीन पिढीसाठी सर्व ब्रँडचे तयार कपडे मिळू लागले. सर्व व्यवसाय कॉम्प्युटराईज झाले. धंदा खूप वाढला. नवीन तरुण सेल्समन, सेल्सगर्ल यांच्या नेमणूकी झाल्या. चार वर्षापूर्वी आशुपण धंद्यात आला. दोन्ही दुकानांचा कारभार त्याने हातात घेतला. आणि ज्योतीला विश्रांती मिळू लागली. आशुचे त्याच्या वर्गातील मैत्रीण प्राजक्ता हिच्याशी लग्न झाले आणि अजून दोन हात मदतीला आले. माऊली टूर अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्सची गाडी उटीच्या दिशेने धावत होती आणि ज्योतीला तिच्या आयुष्याचा चित्रपट डोळ्यासमोरुन सरकत होता. सर्वजण म्हणतात, आता साठी जवळ आली तुमच्या आवडीनिवडीत मन रमवा. तुमचे अपुरे छंद पूर्ण करा. तिच्या लक्षात येईना कसल्या होत्या आपल्या आवडी? कसले होते आपले छंद ? गेली पंचवीस तीस वर्षे गाडीला जुंपलेल्या बैलासारखे आपण राबत होतो. दिवसाचे किती तास कोण जाणे ? एवढ्यात गाडीतील ट्रॅव्हल मॅनेजर अनिता हिने माईक हातात घेतला.
‘‘चला मंडळी, अजून दोन तास प्रवास बाकी आहे. तेव्हा गाणी म्हणा, भेंड्या लावा. नाटुकले करा. पण झोपू नका. आजुबाजूचा निसर्ग पहा. पहा कस बाहेर धुकं पडलयं ते एन्जॉय करा. चला करा सुरुवात.’’ 
असं म्हणून तिनं पहिल्या बाकावरील वर्दे जोडीला सुचविले तुम्ही काय करताय? वर्देंनी हिंदी गाणी म्हटली. दुसर्‍या बाकावरील जाधव यांनी नक्कल केली. कोणी श्लोक म्हटले. तिने डाव्या बाजूला चौथ्या सीटवर एकट्याच बसलेल्या गृहस्थाकडे पाहून म्हटले, ‘‘अत्रे सर, तुम्ही काय म्हणताय?’’
‘‘ मी माझ्या कविता म्हटल्या तर चालेल का?’’
‘‘अरे, तुम्ही कवी आहात, मग म्हणा.’’ कोणीतरी ओरडलं.
आणि प्रवीण अत्रेने आपल्या कविता म्हणायला सुरुवात केल्या. 
पहिली ठिणगी पडते तेव्हा,
विचार व्हावा पाणी ।
मनात सूर जपतो तेव्हाच,
शब्द होतात गाणी ।।
कधी कधी आठवण्याहून विसरण्यात मजा
बेरजेपेक्षा कधी कधी जोडून देते वजा ।
बाकी उरणं महत्त्वाचे, तेवढीच श्री शिल्लक 
कविता असेल साधी, पण विचार मात्र तल्लख ।।
ज्योतीला भारावल्यासारखे झाले. शाळेत असताना कविता तिचा जीव की प्राण होत्या. जीवनाच्या रहाटगाडग्यात ती सर्व विसरली. तिला ती ओळ पुन्हा आठवली. 
‘‘कधी कधी आठवण्याहून, विसरण्यात मजा, बेरजेपेक्षा कधी कधी जोडून देते वजा’’ काय विलक्षण कविता होती ही. ढगाळलेल्या वातावरणात मध्येच सूर्याची तिरीप अंगावर पडावी असे तिला वाटले. त्या कवितेनंतर इतर प्रवाशांनीही काही काही कार्यक्रम केले. पण ज्योतीचे त्याकडे लक्ष नव्हते. ती कविता पुन्हा पुन्हा आठवत राहिली. ‘‘बाकी उरण महत्त्वाचं, तेवढीच श्री शिल्लक’’ आहाहा काय विचार आहे सुंदर !
सर्वांचे कार्यक्रम संपले, तसे गाडीतील इतर प्रवासी डुलक्या काढू लागले. फक्त चौथ्या सीटवरील अत्रे सोडून. तो पुन्हा पुस्तकात मग्न झाला होता. तिने अत्रेंकडे पाहिले. तिच्या सीटवरुन त्याची एक बाजू दिसत होती. गोरा रंग, किंचित पांढुरके झालेले केस, काळा चष्मा, निळी जीन्स आणि पांढरा टीशर्ट. मध्यम उंचीचा असावा. मघाच्या कवितेतील ओळी आणि त्याचे अर्थ काढे काढेपर्यंत गाडी सायंकाळच्या चहा ब्रेकसाठी थांबली. एका रेस्टॉरंटच्या हिरवळीवर छोटी छोटी टेबले आणि सभोवती खुर्च्या. गाडीतील मंडळी आपआपल्या कुटुंबासह टेबलाभोवती बसली. ज्योतीची कुणाशी फारशी ओळख नव्हती. त्यामुळे ती एकटीच एका टेबलाच्या शेजारी बसली. एवढ्यात अत्रे गाडीतून सर्वात शेवटी उतरले. इकडे तिकडे रिकामी खुर्ची बघता बघता त्यांना ज्योतीसमोरची खुर्ची दिसली. त्यांनी ती खुर्ची मागे ओढली आणि तिच्याकडे पाहत म्हणाले, 
‘‘नमस्ते, मी प्रवीण अत्रे. मी इथे बसू शकतो का? ’’
‘‘हो, हो. बसा ना. मी ज्योती पारकर. मघा तुम्ही कविता म्हटली तेव्हा तुमचे आडनाव कळले अत्रे. आता तुमचे नाव कळले प्रवीण अत्रे.’’
‘‘तुम्ही ऐकली काय कविता? आश्चर्य आहे. सध्या कुणाला कथा, कविता वाचायला ऐकायला आवडत नाही. प्रत्येकजण व्हॉटस्अप, फेसबुकवर बिझी असतो. त्याच्याकडे छोटंमोठं येत असतं ते वाचायचं आणि फॉरवर्ड करायचं.’’
‘‘नाही नाही, मी तुमची कविता लक्षपूर्वक ऐकली. आणि मला जवळ जवळ पाठ पण झाली.’’
‘‘आश्चर्य आहे !’’
‘‘म्हणून दाखवू का?’’ आणि ज्योती कविता म्हणू लागली. 
पहिली ठिणगी पडते जेव्हा, विचार व्हावा पाणी
नको नको आलं माझ्या लक्षात. काय खायचं? 
कर्नाटकात डोसे इडली छान मिळतात. 
डोसा चालेल. 
ओके.
अत्रेने दोन डोश्यांची आणि कॉफीची ऑर्डर दिली. 
तुम्हाला कविता आवडतात की, तुम्ही कविता करता? 
छे हो, गेल्या कित्येक वर्षात मी कवितेची एक ओळ सुध्दा वाचलेली नाही. वेळच नाही मिळाला. आयुष्यभर धावत होते. आता थोडी विसावली. 
‘‘सतत धावू नये. अधुन मधून सावलीसाठी बसावे. कोकीळेचे कुहूकुहू ऐकावे, झर्‍याचे पाणी प्यावे.’’
ज्योतीच्या मनात आले, अत्रे किती छान बोलतात. तेवढ्यात गाडी सुरु होण्याचा इशारा आला. दोघांनी झटपट खाणे संपवले आणि गाडीत आपआपल्या जागेवर जाऊन बसली. उटीला पोहोचे पर्यंत काळोख पडला होता. हवा अतिशय थंड होती. ट्रॅव्हल्स कंपनीने एका तलावाशेजारील लॉज बुक केले होते. सर्व मंडळी झटपट प्रâेश झाली. हॉटेलवाल्याने लॉनवर शेकोटी पेटवली होती. आणि त्या भोवती खुर्च्या मांडून जेवण ठेवले होते. मस्त गरम गरम जेवण घेताना पूर्ण ग्रुप उत्साहीत झाला. ग्रुपमधील मुंबईचे वझे प्रवीण अत्रेंना पाहून म्हणाले, 
‘‘अत्रे, अरे काय गारवा आहे इथे, मस्त गारव्याची एखादी कविता असेल तर म्हणा.’’
प्रवीण अत्रे म्हणू लागला - 
तीच प्रित, तीच रात, तोच राग मारवा
तोच श्चास, तीच आस, हवा हवासा गारवा...
कवितेतील गारवा हा शब्द आल्याबरोबर ग्रुपमधील मंडळीनी एकच गल्ला केला. टाळ्याचा कडकडाट केला. ज्योतीला पण आश्चर्य वाटले. प्रवीण अत्रेनी एवढ्या झटपट कविता कशी बनविली. आता वझे पुरते पेटले. अत्रे ! गारवा आला आता पुढे काय? 
अत्रे पुढे म्हणू लागले -
तेच भाल, गौर गाल, पुनवेचा चांदवा
तेच अधर, अधीर तेच, तोच आहे गोडवा...
हवा हवासा गारवा.
अत्रे कविता म्हणत होते, वातावरण धुंदफूंद झाले. ज्योतीला कविता ऐकत रहायची इच्छा होती. पण हवेतील थंडी खूप वाढली. तशी मंडळी आपआपल्या रुममध्ये गेली. ज्योती झोपण्याचा प्रयत्न करत होती. परंतु मघा अत्रेंनी म्हटलेली कविता तिच्या समोर हात जोडून उभी राहिली. 
तोच श्वास, तीच आस, हवा हवासा गारवा....
ज्योतीला वाटले आयुष्यातील पंचावन्न छप्पन वर्षात हृदय असे हळूवार असे झालेच नाही. आसक्ती, प्रेम वाटे पर्यंत लग्न झाले. पत्नीला मन असतं, प्रेम भावना असते हे कळेपर्यंत आई झाले. आणि पोटासाठी, मुलासाठी व्यवसायात उतरले आणि आणखी मोठे होण्याच्या नादात मनातील प्रेम भावना करपून गेली काही कळलेच नाही. ज्योतीला झोप लागली. पण झोपेतही गारवा आणि मारवा तिचा पिच्छा सोडत नव्हते. सहलीत दुसर्‍या दिवशी ज्योतीची अत्रेंची भेट झाली. तेव्हा ज्योती अत्रेंना म्हणाली - ‘‘तुम्हाला कविता कशा सुचतात?’’ अत्रे म्हणाले - तुम्हालाही सुचतील. तुम्ही मोठ्या कवींचे कविता संग्रह वाचत रहा. एकदा नव्हे, अनेक वेळा वाचा. त्यावेळी मन स्थिर ठेवा. काही कविता पाठ करा. गुणगुणत रहा. हळूहळू शब्द आपल्या ओठात येतात. प्रयत्न करा. 
‘‘मग असे कविता संग्रह कोठे मिळतील ? आणि कुणाचे कविता संग्रह वाचायचे?’’
‘‘आपली सहल परत गेली म्हणजे पुण्यात तुम्हाला पुस्तकांच्या दुकानात नेतो. तेथे हवे तेवढे कवी तुमच्या भेटीसाठी येतील. ती पुस्तके घरी न्या. मनापासून वाचा. आणि तुम्हाला खरचं मनापासून कविता आवडत असतील तर तुम्हाला निश्चित सुचतील.’’
‘‘मी शाळेत असताना छान कविता म्हणायचे. सर्व कविता पाठ होत्या. नंतर सर्व काही विसरले.’’
‘‘हरकत नाही, त्या शाळेतील कविता आठवा. त्या मनातल्या मनात म्हणायला लागा.’’
ज्योती गाडीत आपल्या सीटवर बसली. कित्येक वर्षानंतर तिला मराठे बाई डोळ्यासमोर आल्या. त्यांनी म्हटलेली कविता ऐकू येऊ लागली. 
ढगांचं घरटं सोडून दूर, पावसाचं पाखरु आलं गं दूर...
अलगद त्याच्या पंखावरुन, येईन भिजून, येईन भिजून...
वर्गातील मैत्रीण सुलभा दिसू लागली. यमुना दिसू लागली. ज्योतीचे मन कातर झाले. कुठे असतील आपल्या मैत्रिणी ? गेल्या कित्येक वर्षात आपण त्यांची चौकशीपण केली नाही. मराठे बाई असतील का हयात ? काल अत्रे म्हणाले - ‘‘कविता तुमच्या आजूबाजूला असतात, मनाचे अ‍ॅन्टीना जागृत ठेवा. त्याला कधी सिग्नल मिळतील सांगता यायचे नाही.’’ छान बोलतात अत्रे. आपण आपल्या मनाचे अ‍ॅन्टीना बंदच करुन टाकले होते. धंदा वाढविणे आणि पैसे मिळविणे हेच ध्येय ठेवले होते. आपल्या आयुष्यात कवितेला काही स्थान आहे का? नसेल तर अत्रेंच्या कविता का आवडतात आपल्याला? की आपल्यात एक झोपलेली कवयित्री आहे ? तिला उठवायला हवे आहे का ? 
माऊली ट्रॅव्हल्सची गाडी दक्षिण भारताचा दौरा करुन पुण्यात आली. प्रवीण अत्रेंनी ज्योतीला आप्पा बळवंत चौकात नेऊन पुस्तकांची दुकाने दाखविली. एवढी पुस्तकं दुकाने एका ठिकाणी ज्योती प्रथमच पाहत होती. प्रत्येक दुकानदार अत्रेंना हाक मारत होता. एका दुकानातून अत्रेंनी कुसुमाग्रजांचे विशाखा आणि मंगेश पाडगांवकरांचे सलाम खरेदी केले आणि ज्योतीला भेट म्हणून दिले. ज्योतीने त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणखी बरीच पुस्तके खरेदी केली. माऊली टूर्स मधील पुण्यातील लोक इथे उतरणार होते. अत्रे पण आपली बॅग घेऊन उतरले. सर्वांना बाय बाय करत गर्दीत दिसेनासे झाले. 
ज्योतीने कुसुमाग्रजांचा कविता संग्रह उघडला. 
‘‘पुरे झाले चंद्र सूर्य, पुर्‍या झाल्या तारा,
पुरे झाले नदी नाले, पुरा झाला वारा...
मोरा सारखा छाती काढून,
उभा रहा जाळा सारख्या नजरेत नजर बांधून पहा...
सांग तिला तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा....
आहाहा! हे कुसुमाग्रजांचे वैभव तिला आपले वाटत होते. आपली दुकाने विविध मिलची कापडे, रेडिमेड कपडे, नको नको. तिच्या लक्षात आले. हे कुसुमाग्रज, वसंत बापट, कवी ग्रेस हे सर्व आपल्याला आवडतयं, जवळचं वाटतयं...
गाडी मुंबईच्या दिशेने धावत होती. ज्योती कवितेत रमली होती. तिला शाळेत म्हटलेल्या कविता आठवू लागल्या. एका सुरात सुलभा, यमुनासह म्हटलेल्या. 
देवा तुझे किती सुंदर आकाश
सुंदर प्रकाश
मोठ्या वर्गात गेल्यानंतर बालकवींची कविता -
ऐल तटावर, पैल तटावर हिरवाळी घेऊन
निळा सावळा झरा वाहतो बेटा बेटातून...
चार घरांचे गाव चिमुकले, पैल टेकडीकडे...
शेतमळ्याची दाट लागली, हिरवी गर्दी पुढे...
बालकवींची ही कविता कित्येक वर्षानंतर तोंडात आली. कसे झाले हे ? राजापूरच्या गंगेचे झरे अचानक उसळतात म्हणे, तशा कविता उसळल्या का आपल्या मनातून ? ज्योती मुंबईत पोहोचली. रात्रीच्या जगदंबा ट्रॅव्हल्सने वेंगुर्ल्याला यायला निघाली. इकडे आई येणार म्हणून आशु आणि प्राजक्ता दहा दिवसांचा हिशोब घेऊन तयार होती. आई आली की दहा दिवसांतील रोजची विक्री, आलेला माल, संपलेला माल, बँकेचे पासबुक, नोकरवर्गाची हजेरी गैरहजेरी आई सर्व पटापटा विचारणार यात काही हयगय झालेली तिला चालत नाही. प्राजक्ता आलेला माल पुन्हा पुन्हा तपासत होती. आईच्या नजरेतून जरा काही सुटायचे नाही. आलेला माल कोणत्या मिलचा हे ती बरोबर ओळखेल. पंचवीस वर्षे या व्यवसायात काढली तिने. आईने सही करुन दिलेले चेकबुक आशु तपासत होता. यातील किती चेक वापरले किती नाही हे पुन्हा पुन्हा बघत होता.
गाडी वेंगुर्ल्यात आली. आशु स्कूटर घेऊन तयार होता. गाडी जवळ जाऊन आईचे सामान उतरुन घेतले. सर्व सामान खांद्याला लावून स्कूटरवर ठेवले. आता स्कूटर सुटली की आई धंद्याच्या एक एक गोष्टी विचारणार हे त्याला माहीत होते. पण आश्चर्य घर येई पर्यंत आईने त्याला पारकर एंटरप्रायझेसची एकही गोष्टी किंवा हिशेब विचारला नाही. आशु मनातल्या मनात म्हणाला आता घरी पोहोचलो की आई विचारेल. घरी गेल्यावर त्याने सर्व सामान तिच्या खोलीत ठेवले. त्याने पाहिले जाताना आईच्या दोन बॅगा होत्या. आणखी भरलेली बॅग नवीन दिसते. काय आणले असेल एवढे ? त्याला वाटले घरात आणि दुकानच्या सर्व स्टाफसाठी खाऊ आणला असेल. आता प्रâेश होईल, चहा घेईल आणि आणलेला खाऊ दाखवेल. प्राजक्ताने चहा आणून दिला. ज्योतीने चहा घेतला आणि नवीन बॅग उघडून त्यातील कवितेची पुस्तके कौतुकाने आशु आणि प्राजक्ताला दाखवू लागली. टुरमध्ये प्रवीण अत्रे नावाचे कवी कसे भेटले, त्यांच्या कविता ऐकल्या आणि त्यांच्यासोबत जाऊन पुण्यात एवढी कवितेची पुस्तके खरेदी केली. 
आशुला आपली आई कोणी वेगळीच वाटली. एवढी वर्षे पारकर एंटरप्रायझेस हे तिचे आयुष्य होते. त्याच्यापासून एक सेकंद ती लांब राहत नव्हती. आणि आता येऊन दोन तास झाले तरी एकदाही पारकर एंटरप्रायझेसचे नाव नाही. आल्यापासून तिची कवितेची पुस्तके आणि कविता यांचेच कौतुक. रात्रौ प्राजक्ताने जेवण वाढले तेव्हा आशुने दहा दिवसातील पारकर एंटरप्रायझेस मधील एक एक गोष्टी आईला सांगायला सुरुवात केली. सुरवातीला फक्त हु हु करणारी ज्योती आशुला म्हणाला, ‘‘आशु, पुरे कर तो हिशोब. आता यापुढे सर्व व्यवसाय तुम्ही दोघांनी बघायचा आहे. मी आता त्यातून अंग काढून घेणार. खरं म्हणजे मी याआधीच त्यातून बाहेर पडायला हवे होते. पण माझ्या मनाचा आनंद कोठे आहे हे लक्षात येत नव्हतं. या टुर दरम्यान लक्षात आले की माझी प्रिय सखी कोठे आहे? शाळेत असताना मराठे बाई सांगायच्या - ‘‘ज्योती, तू अत्यंत तन्मीयतने कविता म्हणतेस, तुझी आवड कवितेत आहे. कविता तुझी सखी आहे तिला जप.’’ पण आयुष्यात पायावर स्थिर होण्यासाठी धडपडले आणि सखीला विसरले. पण आशु आणि प्राजक्ता माझ्या आयुष्याचा पुढचा काळ ह्या सखी समवेत घालवणार. तुम्ही दोघे पारकर एंटरप्रायझेस सांभाळा. कधी कळी अडचण आली तर मी आहेच.’’ आशु आणि प्राजक्ताने मान हलवली.
दुसर्‍या दिवशी ज्योतीने बॅगेतील पुस्तके बाहेर काढली. कवी ग्रेस, शांता शेळके, इंदिरा संत, पाडगांवकर ते नव्या पिढीतले सौमित्र, निलश पाटील, महेश केळुसकर, संदिप खरे तिच्या अवतीभवती जमले. इंदिरा संतांचे पुस्तक तिने उघडले. 
किती वाटा, चुकल्यामुळे चुकलेल्या...
चुकल्यामुळे न भेटलेल्या... राहूनच गेलेल्या...
किती योगायोग... हुकलेले आणि न आलेले...
येऊनही न उमजलेले... धुक्यात किती राहून गेलेले...
ठरवलेले न ठरवलेले....
मग कवी ग्रेस -
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी जातो, तु मला शिकविलेले देते
भय इथले संपत नाही...
मग सुधीर मोघे यांचे पक्ष्यांचे ठसे मधील -
माझे मन तुझे झाले, तुझे मन माझे झाले...
माझे प्राण तुझे प्राण, उरलेल्या वेगळाले...
पुन्हा सुधीर मोघे यांची दुसरी कविता -
काही वाटा आयुष्यात उगीचका येतात ?
चार घटका सोबत करुन कुठे निघून जातात ?
एक वाट येते मिरवीत चिमणी पाऊल ठसे
शंख शिंपल्यानी भरुन वाहतात
काही वाटा आयुष्यात उगीचका येतात ?
ज्योतीला वाटले, शब्दांशी खेळण्यात किती गंमत आहे? प्रत्येक वेळी प्रत्येक शब्दाचा अर्थ वेगळाच लागतो. ज्योतीने कित्येक कविता तोंडपाठ केल्या. दिवाळी अंकात येणार्‍या नवनवीन कविता ती वाचू लागली. नवकविता पण समजून घेता यायला हवे. वेंगुर्ल्यातील ‘‘आनंदयात्री’’ म्हणून एक साहित्य ग्रुप होता तिथे आठवड्यातून एकदा कथा, कविता याबाबत चर्चा होत. खर्डेकर कॉलेजमधील प्रोफेसर्स, आजुबाजूचे शिक्षक, नवोदित लेखक, कवी या ग्रुपमध्ये असत. ज्योती या ग्रुपमध्ये जॉईन झाली. तिथे ती कवितेबद्दल चर्चा करु लागली. वेंगुर्ले कुडाळ भागात अनेक काव्या कार्यक्रम होत. ती कार्यक्रमात हजर असायची. ही मंडळी कविता कशा वाचतात, कुठल्या शब्दावर जोर देतात यावर तिचे बारीक लक्ष होते. सहा महिन्यानंतर ज्योतीला आत्मविश्वास वाटू लागला की, मी आता कविता करु शकेन. तिने पेपर समोर ओढला -
जेव्हा जेव्हा तुम्हाला हताश वाटेल,
किंवा उदास वाटेल
तेव्हा,
तुम्ही तुमच्यातल्याच दुसर्‍याला आवर्जुन भेटा
शेवटी तो तुमच्यातलाच दुसरा आहे, तुम्ही नाही...
१५ जुलै हा ज्योतीचा वाढदिवस. आशुचे लक्षात आले. या १५ जुलैला आई साठ वर्षे पूरी करणार. आशु प्राजक्ताने ठरविले. आईची एकशष्ठी साजरी करायची. आशुने आईला विचारले. काय काय करायचे तुझ्या एकशष्ठीला? ज्योती म्हणाली - माझ्या एकशष्ठीला कोणतेही धार्मिक विधी नकोत. फक्त काव्य वाचन ठेवायचं, ते पण एकाचचं. आशु म्हणाला, कुणाचं काव्य वाचन ठेऊया? ज्योती म्हणाली, प्रवीण अत्रेचं. ज्यांच्या प्रेरणेने मी कविता करु लागले, म्हणू लागले. त्यांना वेंगुर्ल्यात बोलवुया. त्यांच्या कविता मी कित्येक वर्षात ऐकल्या नाहीत. 
माऊली ट्रॅव्हल्सच्या ऑफिसमधून आशुने प्रवीण अत्रेंचा फोन मिळविला. दुसर्‍याच दिवशी आशुने फोन लावला. 
आशु - हॅलो ! प्रवीण अत्रे का ?
प्रवीण - हो, हां, बोलतोय, कोण आपण ?
आशु - मी आशुतोष पारकर, वेंगुर्ल्याहून बोलतोय. माझी आई ज्योती पारकर, चार वर्षापूर्वी माऊली टूर्सच्या सहलीत गेली होती. त्यावेळी तुम्हीपण त्या सहलीत होता. तुमच्या कविता तिला फार आवडायच्या. तुम्ही तिला पुण्यात कवितेंची पुस्तके घेऊन दिलात. 
प्रवीण - हो, हो, आठवलं. मग ती कविता वाचते का?
आशु - अहो त्यापासून तिचे आयुष्य बददले. तिने आमच्या घरच्या व्यवसायातून निवृत्ती घेतली. आता ती फक्त कवितेच्या विश्वात असते. आता ती कविता करते. थोड्याफार तिच्या कविता छापून पण येतात. 
प्रवीण - आनंद आहे. माझ्या लक्षात येतं, मी म्हटलेल्या कविता तिच्या तोंडपाठ व्हायच्या तेव्हाच मी ओळखलं हिला कवितेत अंग आहे. पण कौटुंबिक व्यापामुळे तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. 
आशु - अत्रे साहेब, मी आपणाला फोन अशा करता केला की, येत्या १५ जुलैला आईची एकषष्ठी वेंगुर्ल्यात साजरी करायची आहे. तिच्या इच्छेनुसार कोणतेही धार्मिक विधी न करता, तुमचे काव्यवाचन वेंगुल्यात व्हावे अशी तिची इच्छा आहे. तेव्हा तुम्ही येऊ शकाल का?
प्रवीण - अवश्य येईन. मी पण आता निवृत्त झालोय. खूप दिवसांनी मी माझ्या कविता म्हणेन. 
अशारितीने प्रवीण अत्रेंचे काव्यवाचन १५ जुलैला ठरले. आनंदयात्री गु्रपने प्रवीण अत्रेंचे काव्यवाचन आणि सहभोजन आयोजित केले. सर्व वर्तमानपत्रात ज्योती पारकर यांचा एकषष्ठी कार्यक्रम आणि प्रवीण अत्रेंचे काव्यवाचन अशा बातम्या आल्या. 
दि. १५ जुलै, 
स्थळ - साई दरबार हॉल, वेंगुर्ले
आनंदयात्री ग्रुप यांनी ज्योतीताई पारकर यांच्या एकशष्ठी निमित्त पुण्याचे कवी प्रवीण अत्रे यांच्या काव्यवाचनाचा कार्यक्रम आयोजित केला. वर्तमानपत्रात सतत या कार्यक्रमाची बातमी येत होती. त्यामुळे आणि आनंदयात्री ग्रुपच्या मेहनतीमुळे कार्यक्रमास तोबातोबा गर्दी होती. सायंकाळी ४ च्या सुमारास कार्यक्रम सुरु होण्याआधी हॉलमधील सर्व खुर्च्या भरलेल्या होत्या. शिवाय बाहेर व्हरांड्यात पॅसेजमध्ये लोक दाटीवाटीने उभे होते. थोडेफार उशिरा येणार्‍यांना आत प्रवेश मिळण्याची शक्यता नव्हती. परंतु आनंदयात्री ग्रुपच्या स्वयंसेवकांनी श्रोत्यांना कमीत कमी त्रास होईल या दृष्टीने खूप प्रयत्न केले. 
व्यासपीठावर ज्योतीताई पारकर यांच्याबाजूला आनंदयात्री ग्रुपच्या अध्यक्षा वृंदाताई कांबळी बसल्या होत्या. एवढ्यात आशु कवी प्रवीण अत्रेंना घेऊन आला. तशा जोरदार टाळ्या पडल्या. प्रवीण अत्रेंना पाहुन ज्योतीताई उभ्या राहिल्या. जवळ जवळ चार वर्षांनी प्रवीण अत्रे समोर उभे होते. ज्योतीताई पुढे आल्या. आणि त्यांनी आनंदयात्री ग्रुपमधील कांबळी मॅडम आणि इतर सर्वांची ओळख करुन दिली. आनंदयात्री ग्रुपमधील सुषमा प्रभुखानोलकर यांनी मान्यवरांचे आणि श्रोत्यांचे स्वागत केले. स्वागत करताना त्या म्हणाल्या, ‘‘ज्योतीताई पारकर यांना आम्ही वेंगुर्लेकर क्लॉथ मर्चंट म्हणून ओळखत होतो. गेल्या २५-३० वर्षांत पारकर एंटरप्रायझेस तालुक्यातील नं.१ चे कापड दुकान झाले आणि ४ वर्षापासून ज्योतीताईंनी घुमजाव केले. सर्व व्यापार मुलाच्या आणि सूनेच्या हातात दिला आणि स्वतःला कवितेमध्ये बुडवून घेतले. आता आम्ही त्यांच्या घरी गेलो तर आजुबाजूला कवी ग्रेस, वंसत बापट, आरती प्रभू, पाडगांवकर पासून ते गुरु ठाकूर, संदिप खरे ठाण मांडून बसलेले दिसतात. आज त्या साठ वर्षे पुर्ण करत आहेत. परंतु कोणतेही धार्मिक विधी न करता त्यांनी त्यांना ज्यांनी कवितेची ओढ लावली त्या प्रवीण अत्रे यांचे काव्यवाचन आयोजित केले. आणि अत्रे साहेब आमच्या वेंगुर्लेकरांच्या विनंतीला मान देऊन एवढ्या लांब आले. यानंतर अत्रे साहेबांना मी त्यांच्या कविता वाचायला सुरुवात करावी अशी विनंती करते. 
प्रवीण अत्रे उठले. त्यांनी चार वर्षापूर्वी एका टूरमध्ये आपली आणि ज्योतीताई यांची भेट झाली हे सांगून त्या टूरच्या प्रवासात आपण म्हटलेल्या कविता ऐकून त्यांच्यातील कवयित्री जागी झाली. एवढेच नव्हे तर गेली ४ वर्षे त्या कवितेत पूर्ण बुडून गेल्या हे ऐकून मला खूप आनंद झाला. प्रवीण अत्रेनी काव्यवाचन सुरु केले. 
नदीला घरात घ्यावे थेट, एवढी नाही हिंमत माझ्यात...
दारातून वाहत रहा, दूरातून पाहत रहा, इतकेच मी सांगू शकतो.
माझ्याच आदल्या वैâक जन्मांची ही पापं,
मी धोपटतोय तुझ्या काठावर...
कर क्षालन धुऊन पवित्र या जन्मात
उद्धार अंधार.... सोडीत मी दिवे तुझ्या पात्रात...
अत्रे एका पाठोपाठ एक कविता म्हणत होते आणि श्रोते तल्लीन झाले होते. दीड तासानंतर अत्रे थांबले.
‘‘वेंगुर्लेकर मंडळी, मी गेली दीड तास तुमच्या समोर कविता म्हणतोय, आता मी तुम्हा सर्वांच्यावतीने ज्योतीताई पारकर हिला विनंती करतो की, यापुढील कविता तिने सादर कराव्यात.’’ टाळ्यांचा एकदम कडकडाट झाला. ज्योती कावरीबावरी झाली. छे ! छे ! मला सवय नाही. मी कधी कविता म्हटलेली नाही. मला जमायचे नाही, इतक्या लोकांसमोर मला जमायचं नाही. परंतु श्रोत्यांनी ज्योतीताई ज्योतीताई अशा घोषणा द्यायला सुरुवात केल्या. वृंदाताई, प्रितम ओगले, आणि सीमा मराठेंनी तिच्या हाताला धरुन माईकसमोर उभे केले. 
ज्योतीने डोळे मिटून घेतले आणि ती हात जोडून सर्वांना म्हणाली - ‘‘मी आयुष्यात प्रथमच एवढ्या मोठ्या श्रोत्यांसमोर उभी आहे मला सांभाळून घ्या. शाळेत असताना मराठे बाईंनी मला कवितेची आवड लावली. मी कविता तन्मयतेने म्हणते हे पाहून त्या म्हणायच्या - ज्योती कवितेला सोडू नकोस, कविता तुझी सखी होईल.’’ आज मला मराठे बाईंची आठवण येते. मराठे बाई तुम्ही जेथे असाल तेथे माझा नमस्कार. दुसरे हे प्रवीण अत्रे. त्यांच्या कविता ऐकून माझ्या लक्षात आले आपला जन्म फक्त व्यवसाय करण्यासाठी नाही. कविता ही माझी पहिली आवड आहे. त्यांच्या भेटीनंतर मी कवितेत रमले. आता आयुष्याची सेकंड इनिंग माझ्या सखीसोबत.’’ असे म्हणून ज्योतीने आपल्या कविता म्हणायला सुरुवात केली. 
तू लिंपल्यास भिंती अज्ञानाच्या अन्
रेखलास त्यावर शब्दांचा प्रवास...
विहिरींच्या कडांवर उभे होते जडावलेले जीव
ओटीत घेतलास त्यांना,
आणि प्रकाश दाखवलास या जगातला...
माझ्या मैत्रिणी, त्यांना सांगायलाच हवं
केवळ कुंकूवाची चिरी रेखून कपाळावर
नाही होता येत, चौकटी उधळत व्यवस्था बदलणारी बाई
अर्थ जाणून घ्यावा लागतो प्रतिकांचा
आणि एक एक चिरा रचत
बांधाव्या लागतात भिंती नव्या घराच्या...
ज्योती आत्मविश्वासाने एक एक कविता म्हणत होती आणि श्रोते तल्लीन झाले होते. टाळ्या वाजत होत्या. प्रवीण अत्रे सुध्दा व्वा ! व्वा !! अशा शाबासकी देत होते. व्यासपीठावरील कांबळी बाई, अजित राऊळ, प्रसाद जोशी, शैलेश जामदार सारेजण मंत्रमुग्ध झाले होते. कार्यक्रमाच्या शेवटी -
घरादारासाठी लावतेस दिवा,
अंधाराचा रावा फडफडे
लावताना दिवा सुटलेली हवा,
विझलेली पेटताना तेलामध्ये वात, तशी दिनरात
गुदमरे बाई उंबर्‍यात, 
सैपांक रांधला, भुकेला दादला
भाजताना भाकर करपली 
तुझ्या पदरात, तुझ्या उदरात वंशाचा दगड रोवलेला
सर्व श्रोते भारावले होते. व्यासपीठावरील सर्वांच्या कौतुकाच्या नजरा ज्योतीवर होत्या. टाळ्यांचा कडकडात सुरुच होता. ज्योतीने सर्व श्रोत्यांना हात जोडून नमस्कार केला. व्यासपीठावरील सर्वांना नमस्कार केला. 
कार्यक्रम संपला आणि प्रेक्षकातील लोक ज्योतीचे अभिनंदन करायला व्यासपीठावर यायला लागले. ओळखीचे लोक, अनोळखी लोक तिच्या एकशष्ठी निमित्त आणि काव्य वाचनाचे कौतुक करत होते. एवढ्या कौतुकाची ज्योतीला सवय नव्हती. ती सद्गतीत झाली होती. प्रत्येकाचे पुन्हा पुन्हा आभार मानत होती. 
व्यासपीठावरील गर्दी थोडी कमी झाली. एवढ्यात दोन स्त्रिया प्रेक्षकांतून पायर्‍या चढून तिच्या दिशेने येताना दिसल्या. त्या वर आल्या आणि ज्योतीने निरखून पाहिले आणि पटकन ओळखले या तर शाळा मैत्रिणी - सुलभ आणि यमुना. ज्योती धावत त्यांच्या जवळ गेली. शाळा सुटल्यानंतर इतक्या वर्षात दोघी भेटल्याच नव्हत्या. आज कशा काय आल्या ? तिने कडकडून मिठी मारली. तिघांच्याही तोंडातून एकाचवेळी कविता बाहेर आली -
‘‘पाय सोडूनी जळात बसला असला औदुंबर’’ 
आणि यमुना म्हणाली - ज्योती किती वर्षांनी ही कविता आपण तिघांनी एकत्र म्हटली नाही? सुलभा म्हणाली - ज्योती तुझ्या कविता किती छान गं. अगदी शाळेची आठवण आली. त्यावेळी तू पुस्तकातल्या कविता जोरजोराने म्हणायचीस आणि आता स्वतःच्या कविता म्हणतेस. ज्योती तू केवढी मोठी कवयित्री झालीस गं. एवढं म्हणून त्या दोघी पटकन मागे वळल्या आणि पायर्‍या उतरल्या आणि एका वयस्क स्त्रीच्या हाताला धरुन पायर्‍या चढू लागल्या. ज्योती पाहत होती. कुणाला आणत आहेत या दोघी ? असा विचार येईपर्यंत सुलभा आणि यमुनाने त्या स्त्रीला हळूहळू पायर्‍या चढत वर आणले. ज्योती निरखून पाहत होती. क्षणार्धात तिच्या मेंदूला जाणीव झाली. आणि ती किंचाळली - ‘‘कोण मराठे बाई तुम्ही... ?’’ ज्योती धावली आणि तिने मराठे बाईंचे पाय धरले. डोळ्यात धारा लागल्या होत्या... आनंदाच्या. मराठे बाईंनापण आनंदाश्रू आवरत नव्हते. बाईंनी तिचे खांदे धरुन तिला वर उचलले. ‘‘बाई बाई तुम्ही कशा आलात? मला वाटत होतं माझं पहिलं वहिलं काव्यवाचन ऐकायला तुम्ही हव्या होतात, पण तुम्ही कशा आलात? तुम्हाला कोणी आणलं? सुलभा आणि यमुना एक सुरात बोलल्या - ‘‘आम्ही आणल’’ अगं आम्हा दोघींचीही घर माजगांवात आणि बाई मळेवाड मध्ये राहतात हे माहीत होतं. तुझ्या एकशष्ठीचे आणि काव्यवाचनाची बातमी पेपरमध्ये वाचली तेव्हा बाईंकडे जाऊन तुम्ही येणार का असे विचारले. तेव्हा बाईंनी एका सेकंदात मी येणारच म्हणून हट्ट धरुन बसल्या. म्हणून आज रिक्षा करुन त्यांना घेऊन आलो. 
मराठे बाईंनी ज्योतीच्या डोळ्यातले आनंदाश्रू पुसले. ‘‘झालीस गं मोठी ज्योती तू... केवढ्या धिटाईने स्वतःच्या कविता म्हटलेस, मला भारी कौतुक वाटलं. शाळेतील १२-१३ वर्षाची चुणचुणीत ज्योती डोळ्यासमोर उभी राहिली. मी तुला वर्गात सांगत असे. ज्योती, या सखीचा हात घट्ट धर.
‘‘सखी नव्हे, प्रिय प्रिय सखी..’’
मागे उभे राहून हे सर्व कौतुक पाहणारे प्रवीण अत्रे उद्गारले आणि सर्व एका सुरात म्हणाले -
‘‘नुसती सखी नव्हे, प्रिय प्रिय सखी...’’

प्रदीप केळुसकर
मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...