आयुष्यात प्रत्येकाला कधी ना कधी काही त्रासदायक किंवा दुःखद प्रसंगांना सामोरे जावे लागते. अशा वेळेस अनेकदा आपल्याला वाटते की लोकांनी आपल्याला विचारावे, आपल्याला समजून घ्यावे, आपल्याला सहानुभूती द्यावी. परंतु ही सहानुभूती खरोखरच आपल्याला मदत करते की आपला त्रास अधिक वाढवते हे आपल्याला समजत नाही.
आपला एखादा मित्र किंवा नातेवाईक कधी आजारी पडला, त्याला पॅरलेसीसचा अटॅक आला किंवा त्याची हृदयासंबंधी एखादी शस्त्रक्रिया झाली, की आपण त्याला बघायला जातो. बघायला गेल्यानंतर आपण "असं कसं झालं?" असं विचारतो. मग ती व्यक्ती संपूर्ण स्टोरी भावनिक होऊन आपल्याला सांगत असते. त्यावेळी आपण त्याच्या दुःखात सामील होऊन त्याला सहानुभूती देण्याचा प्रयत्न करत असतो. एक प्रकारे आपण त्याचे सांत्वनच करत असतो. "तू तर एवढा छान व्यायाम करतोस, तरी देखील असं कसं झालं?" इथपासून सुरू झालेली चर्चा मग "देव किती क्रूर आहे बघ" इथपर्यंत येऊन थांबते. या तुमच्या भेटीमुळे त्याला तात्पुरतं बरं वाटतं. त्याच्यासोबत आपण देखील भावूक होऊन जातो. परंतु असे केल्याने ती व्यक्ती त्या दुःखातून बाहेर येण्याऐवजी, आणखीनच खोल दुःखात बुडून जाते. सांत्वन आणि दुःख यांचा एक विचित्र परस्पर संबंध आहे. सांत्वन जेवढे अधिक, तेवढे दुःखही वाढते. सहानुभूतीमुळे आपले दुःख अधिक गहिरे होत जाते. सहानुभूतीमुळे दुःखाची आठवण अधिक वेळा होते आणि आपण त्या नकारात्मक भावनांच्या दलदलीत अडकत जातो.
एखाद्या व्यक्तीच्या घरी चोरी झाली, त्याचे भरपूर दागिने आणि पैसे लुटले गेले, की साहजिकच आपल्याला दुःख होते. अशावेळी त्याच्या घरी जाऊन त्याला सहानुभूती देण्याऐवजी त्याला धीर द्या. अशा प्रसंगात काही लोक काय म्हणतात," अरेरे, किती वाईट झाले हे. किती काबाडकष्ट करून तू ही संपत्ती जमवली होतीस. पण आपलं नशीबच खोटं म्हणायचं. तुझी प्रगती इतरांच्या डोळ्यांवर आली वाटतं, म्हणून आता इथून पुढे हाव करायची बंद कर." असं तुम्ही म्हटलं तर काय वाटेल? असली सहानुभूती काय कामाची?
त्याच्या ऐवजी त्याला आपण म्हणू शकतो की, "मित्रा, पैसा किंवा सोने चोरीला गेलं आहे, त्यासंबंधीची तक्रार देखील तू पोलिसात केली आहेस. आता त्याबद्दल जास्त विचार करू नकोस. पोलीस त्यांचं काम करतील. महत्त्वाचं म्हणजे त्या चोरट्याने तुला किंवा तुमच्या कुटुंबातल्या कुणाला मारलं नाही, इजा केली नाही हे खूप महत्त्वाचं. जर आपण चांगले असू तर, आपण पुन्हा पैसे कमावू शकतो, आपण पुन्हा सोनं घेऊ शकतो. त्यामुळे काळजी करू नकोस. एक वेळ पैसा गमावला तर पुन्हा मिळू शकतो, परंतु स्वतःमधील आत्मविश्वास गमावला तर काय होईल? त्यामुळे तुझ्यातील आत्मविश्वास कमी होऊ देऊ नकोस. तू काळजी करू नकोस. आम्ही सर्वजण तुझ्यासोबत आहोत, या प्रसंगाला धीराने तोंड दे." अशी वाक्ये ऐकल्यावर त्याला धीर तर मिळेलच, शिवाय त्याला जीवन जगण्याची प्रेरणा मिळेल. सहानुभूती देताना आपण नकळत त्या व्यक्तीच्या वेदना वाढवत असतो. त्या व्यक्तीच्या डोळ्यातून अश्रू येतात, मनातील वेदना वाढतात आणि ती व्यक्ती त्या परिस्थितीतून बाहेर पडण्याऐवजी त्यात अधिक अडकून जाते. हे टाळण्यासाठी त्याला सहानुभूती देण्याऐवजी त्याला आधार द्या, त्याला योग्य दिशा दाखवा त्याचा आत्मविश्वास वाढेल अशी वाक्ये बोला.
बरीच लोकं आपलं दुःख इतरांना सांगत असतात. "मी कशी अभागी आहे, माझ्या बाबतीत माझ्या सासरच्या मंडळींनी कसा अन्याय केला," याची स्टोरी त्या प्रत्येकाला रंगवून सांगत असतात. हे सांगण्यामागे समोरच्या व्यक्तीने त्यांना सहानुभूती दाखवावी अशी यांची अपेक्षा असते. तुमचं दुःख इतरांना सतत सांगितल्यामुळे तुमचे नातेसंबंध खराब होऊ लागतात. प्रत्येक वेळी तुमचं तेच तेच रडगाणे ऐकायला कुणालाही वेळ नसतो, त्यामुळे तुमचे नातेवाईक आणि मित्रपरिवार तुमच्यापासून लांब जावू लागतात. ही लोकं दुरावली गेली की आपल्याला अजून जास्त दुःख होतं. "माझ्या दुःखाच्या काळात मला कोणी साथ देत नाही" अशी आपली भावना होते व आपण देखील आपल्या भाऊ बहिणींना किंवा सासरच्या मंडळींना मनातून दूर लोटतो. नात्यांमध्ये कटूता येते. त्या व्यक्तींबद्दल नेहमी नकारात्मक व्हायब्रेशन्स ब्रम्हांडात गेल्यामुळे, नाती सुधारत नाहीत तर, उलट नात्यांचे बंध अधिक कमजोर होतात. त्यामुळे सहानुभूती मिळवण्यासाठी तुमचं दुःख कोणाला सांगत बसू नका. तुमचं दुःख आणि वेदना अशा व्यक्तीला सांगा की जी व्यक्ती तुमचं बोलणं ऐकून घेईल आणि तुम्हाला त्यातून बाहेर पडण्यासाठी योग्य मार्गदर्शन करेल. तुमचं दुःख सांगण्यामागे तुमचा उद्देश सहानुभूती मिळवण्याचा असायला नको, तर त्यातून मार्ग मिळवण्याचा हवा.
एखाद्या स्त्रीचा पती गेल्यावर तिला अतिव दुःख होते. अशा काळातच तिचे सासू-सासरे किंवा दीर त्यांच्यापासून लांब जातात. अशा वेळेस आपलं माणूस गेल्याचे दुःख आणि इतर नातेवाईक दूर गेल्याच्या वेदना होणे साहजिक आहे. परंतु या गोष्टी सारख्या उगाळत बसू नका. झालेल्या घटनेचा स्वीकार करा, ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत, त्याबद्दल जास्त खेद करू नका. आहे या परिस्थितीतून बाहेर कसे पडता येईल ते पहा. दुःखद प्रसंगामध्ये आपल्याला सहानुभूतीची नाही तर योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता असते.
सहानुभूती किंवा सांत्वन ही एक नकारात्मक ऊर्जा वाढवणारी गोष्ट आहे. त्यामुळे फक्त दुःख वाढते. त्याऐवजी सकारात्मक ऊर्जा घ्यायला व द्यायला शिका. एखाद्या आजारी व्यक्तीला तुम्ही असं म्हणू शकता की "तुझ्या आजारावर डॉक्टरांनी दिलेलं औषध काम करत आहे. तू टेन्शन घेऊ नकोस. थोडा वेळ ध्यानधारणा कर. तुला जमेल तसा योगा किंवा व्यायाम कर, यामुळे तुझ्यातील आत्मविश्वास वाढेल आणि तू लवकर या आजारातून बरा होशील."असे तुमचे धीराचे व प्रेरणा देणारे बोलणे ऐकल्यावर ती व्यक्ती आजारातून लवकर बरी होत असते. आपल्या मनाची ताकद कशी अमर्याद आहे, याविषयी त्या व्यक्तीला सांगा. त्या व्यक्तीला एखादा योगा किंवा ध्यान कसे करायचे हे शिकवा. यातून त्याला भेटण्यामागे तुमचा खरा व शुद्ध हेतू त्याला कळेल.
जेव्हा तुम्ही एखाद्याला भेटायला जाता, तेव्हा त्यांना सहानुभूती देऊ नका. त्याऐवजी त्यांना उभारी द्या. त्यांना दाखवा की त्यांच्या आयुष्यातील संघर्ष त्यांना अधिक मजबूत बनवू शकतो. प्रत्येक कठीण प्रसंग हे एक शिकण्याचे साधन आहे. अशा प्रसंगातूनच आपण घडत असतो. सकारात्मक विचार, योग्य मार्गदर्शन आणि आत्मशक्ती यांचा वापर करून कोणत्याही संकटातून बाहेर येणे सहज शक्य आहे. स्वतः सहानुभूती मिळवायला जाऊ नका आणि सहानुभूती मागणाऱ्या लोकांवर फार वेळ वाया घालवू नका. त्याऐवजी स्वतःला सकारात्मक आणि प्रेरणादायी लोकांच्या सहवासात ठेवा. कोणत्याही अवघड परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी एखाद्या चांगल्या समुपदेशकाची किंवा जीवन प्रशिक्षकाची मदत घ्या. तुमच्या परिस्थितीला दोष देणे थांबवा आणि त्या परिस्थितीतून बाहेर कसे पडता येईल यावर विचार करा.
मित्रांनो, सहानुभूती हा क्षणिक आधार आहे, परंतु त्याने आपल्यामध्ये नकारात्मकता वाढते. सहानुभूतीमुळे आपण जास्तच हळवे होत असतो. त्यामुळे आपल्यातील आत्मविश्वास कमी होत असतो. आपण हतबल झाल्यासारखे वागत असतो. अशा वागण्यामुळे जीवनातील प्रेरणा नाहीशी होते व आपल्या जीवनात येणाऱ्या आगामी संकटांना सामोरे जाताना आपली दमछाक होऊ लागते. त्या ऐवजी जीवनातील प्रत्येक कठीण प्रसंगांना एक संधी म्हणून पहा. आत्मशक्तीचा वापर करून, सतत प्रेरित राहून पुढे कसे जाता येईल याचा विचार करा. सहानुभूती मागणे सोडा आणि सकारात्मक विचार करून स्वतःला प्रेरित करा. प्रत्येक गोष्टीमध्ये आशावादी रहा. आशेच्या जोरावर आपण अनेक गोष्टी हाशील करू शकतो. त्यामुळे आजपासून सहानुभूती नको.
तुम्हाला खूप खूप प्रेम व आशीर्वाद 🙌🙌
धन्यवाद 🙏🏻
✍🏻श्री राजेंद्र कुलकर्णी
मॅनिफेस्टेशन गुरु व लाइफ कोच
मो. 9930653355/ 9167663355
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा