बुधवार, ४ डिसेंबर, २०२४

1572. गुरुजींच्या खुर्चीची किमया

      परिपाठ संपला तशी लेकरं आपापल्या वर्गात जाऊन बसली. पहिली वीस मिनिटं मौन वाचनाची होती. वाचन संपलं आणि सुसंगत वाक्याचा परिच्छेद तयार करणं हा घटक सुरू झाला. आमची सर्वांची त्यावर चर्चा सुरू होती. लेकरं उत्साहात चर्चेत सहभागी झाली होती. पण ममता गुमसूम गुमसुम होती. तिच्या चेहऱ्यावर चिंता दिसत होती.  चर्चा थांबवून मी ममताला जवळ बोलवलं आणि काय झालं म्हणून विचारलं. शाळेत येताना तिनं वडिलांकडून वही, पेन घेण्यासाठी १०० रुपये आणले होते. ते पैसे ती आज मला देणार होती. मुलांना लागणाऱ्या अशा वस्तू मी तालुक्याच्या गावावरून आणून देत असतो. ममतालाही वह्या हव्या होत्या. त्यासाठीच हट्ट करून तिनं वडिलांकडून ते पैसे आणले होते. मात्र दप्तरात ठेवलेले पैसे आता दिसत नाहीत म्हणून ती रडू लागली. अर्थात, तिचे १०० रुपये कुणी काढून तरी घेतले होते किंवा दप्तरातून पडले तरी असावेत असं मला वाटलं. पैसे वर्गातल्या मुलांपैकीच कुणी तरी घेतले असावेत असं वाटत होतं. 
       खरं तर दप्तरातून पडलेले ते पैसे  प्रमाणिकपणे मुलांनी मला आणून द्यावेत ही अपेक्षा होती; पण शेवटी लेकरंच ती ! आता माझ्यासमोर प्रश्न होता, की पैसे तर लेकरांकडून काढायचे आहेत पण कसे काढावे? लेकरांना मी आवाहन केलं, की कुणाला पैसे सापडले असतील तर आणून द्या, त्याला आपण शाबासकी देवू.  पण त्याचा काही उपयोग झाला नाही. आता दुसरा उपाय होता तो मुलांच्या खिश्यांची आणि दप्तराची तपासणी करणं. मी तसं सुचवलं, तर लेकरंही तयार झाली. पण माझ्यातला गुरूजी मला तसं करण्याची परवानगी देत नव्हता. कारण या तपासणीत एखादं लेकरू सापडलं तर त्या त्याच्या कपाळावर आयुष्यभरासाठी 'चोर' म्हणून शिक्का बसेल. हा विचार मनात येताच माझ्या काळजात चर्रर्र झालं. बालपणापासून आपण मुलांच्या कपाळावर वेगवेगळे शिक्के मारतो; पण त्याचे परिणाम त्या लेकराला आयुष्यभर भोगावे लागतात. हे माझ्या विद्यार्थ्यांच्या नशिबी नको म्हणून मी सतत काळजी घेत असतो. गुरुजी म्हणून माझी प्रेम ह्या गोष्टीवर अपार निष्ठा आणि विश्वास आहे. प्रेमाची भाषाच शिकण्याची खरी सुरुवात असते. लेकरांना जवळ घेऊन मी बोलू लागलो, 
“मुलांनो, ममताच्या वडिलांना १०० रुपये कमावण्यासाठी किती मेहनत करावी लागली असेल. त्यांनी आठ दिवसानंतर ममताला हे पैसे दिले होते. तिला ते पैसे खाऊसाठी नाही, तर शिक्षणासाठी दिलेले होते. ममता शिकून मोठी व्हावी म्हणून दिले होते. तुमच्यासाठीही तुमचे आईवडील असेच कष्ट करतात. तुम्ही मोठं व्हावं असं त्यांना वाटतं. त्यांना जर कळलं, की माझा मुलगा / मुलगी चोरी करते, ती चोर आहे तर त्यांना किती वाईट वाटेल. बरोबर ना?" मी लेकरांशी असं बोलत असताना त्यांच्यातल्या अनेकंच्या चेहऱ्यावर रडू आलेलं मला दिसले. मी पुढे म्हणालो, “बाळांनो, मी तुमच्यावर खूप प्रेम करतो. मला आज वाईट वाटत आहे, की माझ्या वर्गात चोरी झाली. कोणीतरी चोर आहे हे आज सिद्ध होईल. माझा विद्यार्थी चोर म्हणून पुढे आल्यास मला मुळीच आवडणार नाही. आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. ऐका. आता मी तुमच्यासोबत खाली बसलो आहे; पण समोर जी खुर्ची आहे ना, ती मला सहज मिळालेली नाही. मला त्यासाठी खूप अभ्यास करावा लागला आहे. मी खूप जिद्दीने ती खुर्ची मिळवली आहे. त्या खुर्चीची जादू माहीत आहे का तुम्हाला? गुरुजींच्या या खुर्चीवर जो बसतो तो राष्ट्रपती, पंतप्रधान, जिल्हाधिकारी, डॉक्टर, इंजिनिअर अशी अनेक मोठी माणसं निर्माण करू शकतो. ही खुर्ची चोर कधीच निर्माण करत नाही. चोर निर्माण झाले, तर तो या खुर्चीचा आपमान आहे."
प्रेम आणि मोठा विश्वास आहे. मी काय बोलतो आहे हे तुम्हाला नक्कीच कळलं असेल असं  मला वाटतं." एवढं बोलून मी मुलांच्या डोळ्यांत पाहू लागलो. सर्वांच्या डोळ्यात पाणी होतं. मुलांचं मन मी जिंकलं होतं.
     लगेच मी मुलांना म्हणालो, "चला एक काम करू. आपण सर्वजण बाहेर जाऊ. वर्गात फक्त ही खुर्ची असेल. बाहेरून प्रत्येकानं आत यायचं, या खुर्चीचं दर्शन घ्यायचं आणि ज्यानं पैसे घेतले आहेत त्यानं ते इथे ठेवून जायचं. एका वेळी एकानंच वर्गात जायचं. पैसे ठेवून एखादा मुलगा गेला, तरी कोणी  कोणाला सांगणार नाही, चर्चा करणार नाही. प्रत्येक लेकरू आत जाऊ लागलं आणि खुर्चीचं दर्शन घेऊन बाहेर येऊ लागलं. शेवटी होती ममता. मी तिला विश्वासानं म्हणालो, "ममता जा त्या खुर्चीवरचे १०० रुपये घेऊन ये.” ममता माझ्या तोंडाकडे पाहू लागली; पण मी निश्चिंत होतो, कारण माझा माझ्या गुरुजीपणावर पूर्ण विश्वास होता. ममता १०० रुपये  घेऊन पळतच वर्गाबाहेर आली. माझा जीव भांड्यात पडला. माझ्या डोळ्यात आनंदाचे, जिंकल्याचे अश्रू होते. मी लेकरांना गळ्याला लावून घेतलं. माझ्यासोबत माझी लेकरंही रडू लागली. आज माझं एक लेकरू चोर  होण्यापासून किंबहुना चोर नावाचा शिक्का लागण्यापासून वाचलं. आज माझ्या गुरुजी नावाच्या खुर्चीची किमया माझ्यासह माझ्या लेकरांना कळाली.
😊

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...