बुधवार, १८ डिसेंबर, २०२४

1633. बापजन्म

     आज परत तो माणूस दिसला सुजाताबाईंना. त्यांचा मुलगा सौरभ आणि सुजाताबाईंचे यजमान सुधारकर साठे यांची ऑफिसला जायची घाई गडबडीची वेळ. स्वयंपाक करताना खिडकीतून बाहेर लक्ष गेलं आणि कोणीतरी कम्पाउंड वॉल वरून डोकावत असल्यासारखं वाटलं त्यांना. "हा माणूस रोज या वेळेला गेले दोन दिवस घुटमळतोय आपल्या घराजवळ आज बघतेच." असं म्हणत सुजाता साठे गेल्या लगबगीनं बाहेर. इतक्यात तो माणूस गायब झाला. एक दोन दिवस तसं दुर्लक्ष केलं खरं सुजाताबाईंनी पण आता काळजी वाटू लागली त्यांना. 
    आज पुन्हा तोच प्रकार झाला. सौरभ डबा विसरून तसाच गडबडीत ऑफिसला निघाला म्हणून धावतच गेल्या सुजाताबाई गेट जवळ. सौराभ कॉलनीच्या वळणावर पोहचलाही होता इतक्यात.  तो माणूस पुन्हा सुजाताबाईंना दिसला. बाईकवर जाणाऱ्या सौरभकडे नजरेआड होईपर्यंत एकटक पहात होता. आता मात्र धस्स झालं सुजाताबाईंच्या काळजात. "कोण असेल हा माणूस? या आधी कधी दिसला नाही कॉलनीत? आपल्या घराजवळ का घुटमळतोय? आणि सौरभकडे असं का पाहतोय? काही काळं बेरं नसेल ना त्याच्या मनात?"
आईच्या काळजात नाही ते विचार येऊन गेले. 
"काय ग बाई! मन चिंती ते वैरी न चिंती" असं म्हणत त्या आत गेल्या. पण मनातून काही सौरभ बद्दलची काळजी कमी होत नव्हती. त्या माणसाचा चेहरा, त्याच नेमकं सौराभ बाहेर पडायच्या वेळेला रोज बंगल्या बाहेर घुटमळणं, एक टक सौरभकडे पाहणं, सारखं सुजाताबाईंच्या डोळ्यासमोर येतं होतं.
 सुधाकरना ऑफिस मधून लवकरच यायला सांगितलं. झाला प्रकार त्यांच्या कानावर घातला.
"घरी गेल्यावर पाहू संध्याकाळी, त्यात काय इतकं" असा मानाशी विचार केला खरा साठेंनी  पण त्यांनाही चैन पडत नव्हती. आहेत ती कामे हाताखालच्या लोकांना सांगून ते ही दुपारी जेवायच्या वेळेला घरी आले.
"आपण पोलिसांना सांगूया का?" सुजाता बाई म्हणाल्या..
"अगं काय सांगणार? त्यानी काही केलंय का आपल्याला?" सुधाकरराव म्हणाले.
" अहो मग काही होण्याची वाट पाहायची का? ते काही नाही तुम्ही किमान कॉलनीच्या वॉचमॅनला तरी विचारा.
स्वाभाविक होतं काळजी करणं दोघांचं.
दोन गर्भपात झाल्यावर पदरात पडलेला सौरभ सुजाताबाईंच्या त्यामुळे अगदी तळ हातच्या फोडाप्रमाणे जपलं होतं त्यांनी सौरभला. एकुलत्या एका मुलाला साधं खरचटलं तरी जीव कसानुसा व्हायचा सुजाता बाईंचा.
फारसे दाखवत नसले तरी सुधाकरराव देखील सौरभच्या बाबतीत जरा हळवे होतेच.
छोटं आणि सुखी कुटुंब होतं तिघांचं. लहनाच्या मोठ्या होत जाणाऱ्या सौरभ सोबतच सुधाकररावांची आर्थिक आणि सामाजिक पत देखील वाढत गेली होती. यथावकाश बंगला, गाडी सगळ्या सोयी आल्या होत्या.  चोवीस वर्षांचा एकुलता एक मुलगा सौराभ MR झाला होता. तो ही स्थिरावत होता नोकरीत. अगदी दृष्ट लागेल असंच होतं सगळं.
मी जरा गेटवर जाऊन वॉचमनला विचारून येतो असं म्हणत सुधाकर साठे उठले, निघणार इतक्यात बेल वाजली.
" या वेळी कोण आलं असेल" म्हणून सुजाताबाईंनी दार उघडलं.
"आहो!" त्यांनी घाबरूनच हाक मारली साठेंना.
तसे साठे दाराजवळ पोहचले. सुजाताबाईनी वर्णन केलेला तोच माणूस दारात उभा होता. साधारण त्यांच्याच वयाचा. जुना जड भिंगाचा चष्मा तडकलेला, जुनाट शर्ट पॅन्ट, पांढऱ्या दाढीचे खुंट वाढलेलं. म्लान वाटतं होता. 
"हाच तो माणूस" असं नजरेने सुजाताबाई सांगायचा प्रयत्न करत होत्या.  
त्या माणसाने हात जोडले म्हणला,
"माफ करा मला! मी आसा घरा भोवती फिरतोय
वहिनी घाबरून गेल्या सकाळी. पण मला थोडं बोलायचं होतं, आत येऊ का?" 
कोरडाच आवंढा गिळला त्या माणसाने.  एकंदर त्याच्याकडे पाहून तो harmles असल्याची खात्री पटली सुधाकररवांना.
तिघे आत येऊन स्थिरावले.
"थोडं पाणी मिळेल का?" असं त्याने विचारताच सुजाताबाई आत गेल्या.
त्या माणसाने एक फोटो काढला स्वतःच्या खिश्यातून आणि सुधाकररावांच्या समोर धरला.
"अरे! हा तर सौरभचा फोटो. हा कधी काढला त्याने? तो ही या पोशाखात?" फेटा आणि सादरा, घातलेल्या आपल्याच मुलाच्या फोटोकडे पहात सुधाकरराव म्हणाले.
"सौरभ नाही तो. आनंदा आहे आमचा. तुम्ही ओळखलं नाही ना मला.
मी प्रकाश मोहिते. खारगाव"
हे नाव ऐकताच सुधाकरराव ताडकन उभे राहिले. 
चोवीस वर्षांपूर्वी कधीही न समोर येण्याचं वचन दिलेला माणूस आज चक्क त्यांच्या घरात समोर येऊन बसला होता.
दोघांच्याही स्मृतिपटलावर ती चोवीस वर्षांपूर्वीची रात्र एखाद्या चित्रफीती सारखी सरकत होती. एका छोट्या खारगाव सारख्या गावात पोस्टिंग होत सुधाकररावांच त्या वर्षी. 
 त्या वर्षी सुजाताबाई गरोदर राहिल्या आणि दिवसही भरत आले. आधीच दोन गर्भपात झाले होते त्यामुळं जरा जोखमीचे होतं हे बाळंतपण. शहर लांब आणि गावात सोयीसुविधा कमी.  दिवस भरले होते दोघेही बाळ होण्याची वाट पाहत होते. आई येणार होती सुजाताबाईंची दोन दिवसांनी पण दोन दिवस आधीच काळा सुरू झाल्या आणि लगोलग गावाच्या दवाखान्यात नेलं सुजाताबाईना. दवाखान्यात बाहेर येरझाऱ्या घालणारे सुधाकरराव आनंदाच्या बातमीची तुरतेंन वाट पाहत होते. काही वेळात डॉक्टर बाहेर आले खरे पण बातमी आनंदाची नव्हती. सुजाताबाई कशाबशा वाचल्या होत्या पण बाळ मात्र वाचलं नव्हतं. स्वतःचा शोक आवरता घेतला सुधारकररावांनी आधीच्या गर्भपाताने शरीर आणि मनाने खचगलेल्या आपल्या बायकोला ही बातमी काशी सांगावी हा यक्षप्रश्न होता त्यांच्या समोर. मनाने कच खाल्लेल्या आपल्या बायकोला गमावण्याची भीती वाटत होती साठेंना. सुजाता बाई बेशुद्ध होत्या अजून.
दवाखान्याच्या बाहेर असहाय्य बसलेले सुधाकरराव. इतक्यात एक हात पडला खांद्यावर त्यांच्या.
" काय नशीब आहे ना. अहो दोन वेळचे खायचे वांदे आहेत आमचे आणि देवानी दोन-दोन लेखरं दिली एकाच वेळेला आम्हाला आणि तुम्ही चांगले नोकरदार तुमचे हात मात्र रिकामे. मी  प्रकाश मोहिते इथेच गावात छोटी मोठी कामं करतो. आताच बायको सुटली माझी. जुळ झालंय. काशी चेष्टा आहे. एखाद्याला सुखी करणारी गोष्ट दुसऱ्याला अडचण आहे" खिन्न हसला प्रकाश. आणि एकच कल्पना दोघांना एकदम सुचल्यासारखं पाहिलं दोघांनी एकमेकांकडे. साठेंनी आशेने पाहिलं प्रकाशाकडे. डॉक्टरांना विश्वासात घेऊन दोघांच्याही बायका शुद्धीवर येण्याआधी एक हताश बापाने एका हताश नवऱ्याच्या पदरात  त्याच्या बायकोच्यासाठी जीवनदान टाकलं आपल्या एका पोटच्या पोराच्या रुपात. एका बापाचा स्वार्थच होता खरा. एका पोराला भरभरून प्रेमासोबत दोन वेळच चांगलं खायला तरी मिळेल या भावनेनं त्याने एका मुलाला स्वाधीन केलं साठेंच्या.
"बायकोला सांगीन एकच बाळ वाचलं म्हणून" असं म्हणून परत कधीही न भेटण्याच वचन दिलं प्रकाशने त्याना. तोच प्रकाश आपल्या सौरभचा जन्मदाता बाप आज साठेंच्या समोर बसला होता. अगदीच हताश.
साठे त्याला काही विचारणार तोच सुजाताबाई बाहेर आल्या पाणी घेऊन. 
किचनच्या दारातुन साठेंनी त्यांच्या हातातून पाणी घेतलं आणि चहा साठी सांगून त्यांना परत आत पाठवलं. खरतर काही विशेष घाबरण्याचे कारण नाही असं सांगत आत टाळलं. तडे गेलेल्या चष्म्याच्या काचेतून प्रकाश घर निरखून पाहत होता. चोवीस वर्षांच्या सौरभचा प्रवास किती सुखी झाला असेल ते भिंतींवर लावलेल्या फोटोतून दिसतं होत. एकदा आपल्या हातातील आनंदच्या फोटोकडे  आणि एकदा सौरभच्या फोटोकडे पाहत होता प्रकाश.
हुबेहूब दिसत होतं... जुळे होते दोघ.. अगदीच काहीसा उंचीचा फरक असावा.
"काय झालं प्रकाश आज अचानक इतक्या वर्षांनी.. काही मदत... पैसे वगैरे...." साठे आपलं वाक्य पूर्ण करणार तोच एक हुंदगा सावरत परत हात जोडले प्रकाशने आणि मानेनेच नाही म्हणाला.
आनंद  माझा मुलगा. खारगावहून इकडं शहराकडे येत होतो आम्ही तिघे. नोकरी लागली होती आनंदला. म्हणला सोबत राहू.  आमच्या बसला अपघात झाला आणि जागीच गेला हो आनंदा आमचा." फोटो उराशी धरून एक आवंढा गिळला प्रकाशने. आनंदच्या फोटोकडे पाहताना सौरभचा होणार भास आणि अशी बातमी. साठेंच्याही काळजाचा ठोका चुकलाच एकदम. पण त्याहीपेक्षा आता वेगळीच भीती त्यांना वाटू लागली. चोवीस वर्षांपूर्वी पदरात टाकलेलं सुख परत मागितलं प्रकाशने तर. आधीच पैसे नको म्हणाला होता प्रकाश. त्याचं सांत्वन करू की तो जे मागायला आलाय ते देऊ की नाही म्हणू अशी त्रिशंकू अवस्था झाली होती साठेंची. प्रकाश थोडा सावरला. पाणी पिलं त्याने थोडं. म्हणाला
" घाबरू नका साठे साहेब. तुम्हाला वाटतंय तसं काही नाहीये. सौरभला मागायला आलोय मी पण काही वेळासाठीच" साठे आता चांगले गडबडले.
"अपघातात आनंदा जागीच गेला आणि बायकोला मात्र जबर दुखापत झाली माझ्या. इथंच सिटी हॉस्पिटल मध्ये आहे. डॉक्टर म्हणतात की जगायची नाही ती. बेशुद्ध आहे चार दिवसांपासून, कोमात काय म्हणतात तशी. शुद्धीवर होती तेंव्हा सारखी आनंदची  आठवण काढत होती. डॉक्टर म्हणले एव्हाना सुटायला पाहिजे होती.  पण मला माहिते तिचा जीव अडकला आहे पोरात. कसं सांगू तिला. कर्मानं कसला बापजन्म लादलाय माझ्यावर. एकाला स्वतःच्या हातानं दुसऱ्याला सोपवलं आणि एकाला स्वतःच्या हातानं अग्नि....." बोलता बोलता थांबला प्रकाश.
"सौराभ MR झालाय ना. त्याला पाहिलं त्या दिवशी हॉस्पिटल मध्ये. आणि एकदम आमचा आनंदा समोर आलंय असं वाटलं हो. एकदा फक्त त्याला माझ्या सोबत बायकोला भेटायला घेउन जाऊदे. त्याच्या स्पर्शानं कदाचित वाचेल ती. नाहीतर सुटेल तरी कायमची."
"त्या दिवशी पोर गमावलेला आणि बायकोच्या जीवाची काळजी असलेला एक बाप असाच हताश बसला होता. असेच हात जोडले होते त्याने. आज इतक्या वर्षांनी असाच पोर गमावलेला आणि बायकोची काळजी असणारा बाप आज हात जोडतोय." प्रकाश हमसून हमसून रडत होता.
साठे सुन्न होऊन बसले होते फक्त. एकदा आनंदच्या फोटोकडे तर एकदा सौरभच्या फोटोकडे पाहत. सुजाताबाई बाहेर आल्या चहा घेऊन तसा प्रकाश पटकन उठून निघून गेला. 
"काय हो ! कोण होता आणि असाच गेला चहा न घेता."
जुजबी उत्तर देऊन साठेंनी टाळलं सुजाता बाईंना. आणि खोलीत नुघून गेले. काय करावं हा प्रश्न होता त्यांच्या समोर. उत्तर खरतरं सोप्प होतं.
"पण इतके दिवस अनभिज्ञ असणाऱ्या सौरभला आणि सुजाताला काय सांगावं. आणि प्रकाशाची बायको वाचली आणि तिनं सौरभला....नाही म्हणजे वाचू दे ती..." विचारांनी थैमान घातलं साठेंच्या मनात. पण शेवटी निर्णय झाला त्यांचा. पंधरा दिवस झाले होते प्रकाश भेटून गेल्या पासून. आज त्याच्या बायकोचा तेरावा दिवस होता. साठेंनी सौरभला विश्वासात घेऊन सगळं खरं सांगितलं होतं. त्याच्या स्पर्शानं काही काळासाठी का होईना शुद्धीवर अली ती माऊली आणि पोराला डोळेभरून पाहिलं, भरभरून आशीर्वाद दिले आणि डोळे मिटले तिने. 
एका आईच्या जगण्याचं तर एका आईच्या मुक्तीच कारण ठरलेल्या सौरभने यथासांग सगळी कर्तव्य पार पडली होती आपल्या जन्मदात्री बद्दलची आणि हे सगळं गुपित ठेऊन त्याच्या आई बद्दलची.
     घाटाच्या पाऱ्यांवर प्रकाश शेजारी बसले होते साठे. आपल्या मुलांच्या अस्तित्वाचा खरेपणा कधीही आपापल्या बायकांच्या काळजीपोटी समोर न येऊन देणारे दोघं, नियतीनं आखून दिलेला बापजन्म जगणारे दोघं. भविष्याचा निर्णय त्यांनी सौरभवर सोडलेला आता. आईबद्दलची कर्तव्य पार पडणारा सौरभ या दोघांचे बापजन्म सार्थ ठरवेल यात तसूभरही शंका नव्हती दोघांना.

मधुरा कुलकर्णी.
मधुरंग,© ®

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

3100. तुम्ही फक्त या घराच्या सून नाही

 "वहिनी, प्लीज... आज माझे कॉलेजचे मित्र-मैत्रिणी घरी येणार आहेत. फक्त एकदा माझी अब्रू राखा ना…" 🙏 असं म्हणत सईने हातातली भाजीची ट...