बाबा गणपती घेऊन आला, आई त्याच्या पायावर दूधपाणी घालायला एक पाऊल बाहेर आली आणि वाऱ्याने आपलं काम केलं. धडामकन दार लागलं. गणपती सकट आई बाबा घराबाहेर आणि घरात सहा महिन्याची मनूडी एकटी ! नुकती आंघोळ ऊरकून दुपट्यावर शांत निजलेली दाराच्या आवाजाने ती दचकली आणि तिने टाहो फोडला. विघ्नहर्ता हातात असताना घरावर विघ्न आलं. तशी मनुडी खरंच शहाणी होती. पण, कधी रडली तर वेळीच शांत करावी लागायची. नाहीतर तिला श्वास कोंडून धरायची खोड होती. चौदाव्या मजल्यावर घर होतं. ब्रह्मांडाचा नायक हातात असताना, दोघांना त्याचा विसर पडला. दोघं फक्त मनुडीचा टाहो ऐकत होते. आई तर रडायलाच लागली. बाबाचे तर मुर्ती धरून हात भरून आले होते. रावणासारखी त्याची अवस्था झाली. शास्त्राच्या नावाखाली अर्धवट माहीती होती. मुर्ती आणली की स्थानापन्न करायच्या आधी खाली ठेवायची नसते असं त्याने ऐकलं होतं. विषाची परीक्षा कोण घेणार? तुची माता, तुची पिता, तुची बंधू , तुची सखा म्हणताना त्याच्याच बद्दल इतकी भिती. भिती कसली? तर तो कोपेल याची. क्षणात सगळं आठवलं. घरच्यांच्या मनाविरूद्ध केलेलं लग्न, सगळ्यांशी तोडलेले संबंध.
दोघं दोघंच जगताना कधी शेजारीही डोकाऊन पाहीलं नव्हतं. त्यात शेजारच्या फ्लँटमधे अठरा पगडचे पेअींग गेस्ट राहतात म्हटल्यावर बघायचा प्रश्नच नव्हता. पण, आईचं रडणं ऐकल्यावर आपसूक शेजारचं दार ऊघडलं गेलं. सहा सात मुलांचा घोळका बाहेर आला. व्हाँट हँपंडचा गलका झाला. एकाने पटकन बाबाच्या हातातली मुर्ती जबाबदारीने आपल्या हातात घेतली. बावचळून गेलेल्या बाबाच्या ते लक्षातही आलं नाही. थकल्यासारखा तो मटकन खालीच बसला आणि पुढच्या क्षणी त्याच्या नकळत अनावर होत त्याने आपल्या मोठ्या भावाला फोन केला. आवाजावरून भावाने त्याची अवस्था ओळखली. तो फोनवर बोलत असताना शेजारच्या मुलांना कळलं. त्यानी आधी दोघांना घरात बोलावलं. बघतात तर त्यांच्या घरीही गणपति विराजमान होता. सगळे दोघांना त्यांच्या परीने धीर देत होते.
एका चुणचणीत मुलाने विचारलं, "आपके बेडरूम की विंडो खुली है क्या?
चौदावा मजला.
"विंडो ओपन असून काय ऊपयोग?" ती म्हणाली.
"दरवाजा तोड देते है"
पण ते ही लगेच होणारं काम नव्हतं.
आईशी बोलत बसायच्या आधीच दोघांनी त्यांच्या गॅलरीतून ढांग टाकली होती. चौदाव्या मजल्यावर थरारक धाडस दाखवत ती दोघं पॅरेफीटवरून मनुडीच्या बेडरूमपाशी पोहोचली. एकमेकाला हात देत दोघं खिडकीतून आत गेली. बघतात तर मनुडी कोणीतरी खेळवत असल्या सारखी खेळत होती खिदळत होती. मनूडीच्या रडण्याचा आवाज थांबल्यावर आई बाबाला वाटत होतं मनुडीने डोळे फिरवले असतील. मन चिंती ते वैरी नं चिंती म्हणतात तसा अनुभव ते घेत होते. मनुडी बाकी कशाला नाही पण एकटं रहायला घाबरते हे त्यांच्या लक्षात आलं होतं. भोवती माणसांचा वावर असेल तर तासंतास मुठी चोखत ती एकटी खेळत असायची. पण, जरा जरी एकटेपणाची जाणीव झाली तर भोकाड पसरून ती आपली दखल घ्यायला लावायची. म्हणून तर आई घरी राहूनच कामाचा व्याप सांभाळत होती. बाबापण मनूडीच्या ओढीनं घरी धाव घेत होता शिवाय एक मावशी बाईही मनुडीसाठी ठेवली होती.
सकाळी येउून ती रात्री जात असे. पण, नेमकी तिनेसुद्धा दोन दिवस गणपतीची सुट्टी मागितली होती. या दोन्ही मुलांनी आधी घरात प्रवेश मिळवून मनुडीला उचलली आणि धाडकन बंद झालेलं दार ततपरतेनं उघडलं. त्यांच्याकडेवर खुदू खुदू हसणाऱ्या मनुडीला बघून आई बाबाला काय वाटलं हे शब्दात सांगत बसायचा अट्टाहास मी करणार नाही.
पण, मनूडी एकटी असतानाही खेळत होती, या वर दोघांचा विश्वास बसेना. त्यांना काय माहीत ती एकटी होती? की कोणी गब्दूल पाहूणा मनुडीशी लडीवाळपणे खेळत होता? तो दिसायला भाग्य हवं किंवा ते कळायला तेवढीच श्रद्धा. इतक्यात याच्या फोनमुळे मोठा भाऊ मोठेपणाने नात्याचा मान राखत आई बाबांसह घरी पोहोचला. दूरावा असा कुठे राहीलाच नाही. मनुडीला बघून आजी आबांना गहीवरून आलं. तो मन मिलाप बघून शेजारच्या सडाफटींग मुलानाही उचंबळून आलं. मग मोठ्याने पूजा सांगितली धाकट्याने मनोभावे पूजा केली. दणक्यात आरती झाली. मोदकांची दिलेली आँर्डर ऐनवेळी वाढवण्यात आली आणि मग त्या गजाननासमोर भलीमोठी पंगत जेवायला बसली. प्रत्येकजण आपआपल्या भाषाबोली सहीत त्यात सहभागी झाला होता. मनुडीच्या आनंदाला तर ऊत आला होता.
लहान मूलं म्हणजे देवाचंच रूप म्हणतात. हे खर मानलं, तर मनुडीच्याच रूपाने तो विघ्नहर्ता खुदू खुदू हसत होता. सार्वजनीक गणपतीची मूळ संकल्पना आणि मुख्य उद्देश हाच असेल नाही?
गणपती बाप्पा मोरया
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा