बुधवार, ४ डिसेंबर, २०२४

1592. संस्कार

      भिंतीवरच्या घड्याळात साडे नऊ वाजलेले पाहून जयंत रावांनी हातातलं वर्तमानपत्र बाजूला ठेवलं आणि शांत पणाने खुर्चीतून उठून ते रॅक मधील बुट आपल्या पायात चढवू लागले. तेव्हढ्यात आतून त्यांच्या टिफीन चे झाकण घट्ट लावत लावत प्रतिभा ताई आल्या आणि
"अहो हे घ्या तुमचा डबा. सरळच ठेवा बरं नाही तर भाजी सांडेल" असं म्हणत डबा तिथे टेबलवर ठेवला आणि आत जाण्यासाठी मागे वळणार तोच जयंत रावांचा मोठ्यानं हसण्याचा आवाज त्यांना आला आणि त्या थबकून थांबल्या ..
" अहो आज पण डबा? " जयंतरावांनी मंद पणें हसून त्यांच्याकडे पहात विचारलं. आता त्यांचं बूट घालून झालं होतं आणि एकदम प्रतिभा ताईंची ट्यूब पेटली.
" अग बाई ...विसरलेच की " 
अर्थात त्यांची यात चूक नव्हती. गेली तीस वर्षे जी दिनचर्या निरंतर अखंड  सुरू होती. त्याची सवय अचानक कशी बदलणार होती म्हणा !!
     जयंत सरमळकर. जसं काना मात्रा नसलेलं सरळ नाव तसाच  नाकासमोर  चालण्याचा सरळ स्वभाव. कोणाच्या अध्यात ना मध्यात. लग्नात प्रतिभा ताईंचा आणि नंतर नोकरीत ' विल्सन नरसिंग ' या खाजगी कंपनीचा हात त्यांनी जो पकडला तो आजतागायत सोडला नव्हता. या कंपनीत  इमाने इतबारे सुमारे तीस वर्षे नोकरी करून  झाल्यावर आज त्यांचा निवृत्तीचा दिवस होता. कामावर जाण्याचा शेवटचा दिवस ! आणि त्यामुळेच आज कंपनीत त्यांच्या साठी  निरोप  समारंभ आयोजित केला होता. सर्व स्टाफ साठी दुपारचं जेवण आणि त्यानंतर जयंत रावांचा सत्कार. असा छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात होता. कंपनीचे एम डी ' मोहन पारेख ' हे स्वतः या निरोप समारंभा साठी येणार होते. आणि या जेवणासाठी आणि समारंभासाठी जयंत रावांचा कुटुंबाला ही खास आमंत्रण होतं आणि म्हणूनच रोजच्या सवयीनुसार प्रतिभा ताई जयंतरावांचा ' टिफीन ' घेऊन आल्या तेव्हा जयंत रावांनी आश्चर्य चकित होत त्यांना विचारणा केली. कंपनी सोबतच्या इतक्या वर्षांच्या ऋणानुबंधांचा आजचा शेवटचा दिवस असल्याने जयंत रावांचा मनात आज समिश्र भावनांचा कल्लोळ माजला होता. इतक्या वर्षांची ही दिनचर्या, ते सगळे मित्र, कंपनीतील वरिष्ठ आणि कनिष्ठ असे सगळे सहकारी, दहा ने सहा ची ड्युटी. उद्यापासून सगळं बंद होणार याची रुखरुख त्यांना अस्वस्थ करीत होती. तर आता इतकी वर्षे  केवळ मनातच जपलेले चित्रकला, वाचन त्यांच्या बंगल्या तील बगीच्यात बागकाम आणि स्वामी समर्थांच्या मठात रोजची भक्ती भावाची हजेरी हे सगळे छंद आणि मनोरथ पूर्ण करण्यास भरपूर वेळ मिळणार होता.
"तुमचं आपलं सारखं ते कंपनी एके कंपनी. घराकडे बिलकुल लक्ष नाही" असं तुणतुणं वाजवणाऱ्या प्रतिभा ताईं करीता आता भरपूर वेळ देता येणार होता म्हणून कुठे तरी बरं ही वाटतं होतं. अर्थात. निवृत्ती पश्चात चे बदल आपण कसे अंगिकारायचे? याची काळजी त्यांनी स्वामींवर सोडली  आणि 
"दुपारी एक वाजेपर्यंत तू आणि सुलभा या. उगीच वेळ करू नका, पारेख  साहेब वेळेवर येणार आहेत बरं." अशी आठवण प्रतिभा ताईंना करून जयंत राव बाहेर पडले. 
ठरल्या प्रमाणे कंपनीत छोटासा पण नेटका ' निरोप समारंभ'  पार पडला.  जयंत रावांचे कुटुंबीय म्हणजे प्रतिभाताई आणि प्रतिभा ताईंची गावातच राहणारी  धाकटी बहिण सुलभा या दोघी उपस्थित होत्या.  स्वतःच्या  बिझनेस साठी मोठ्या शहरात स्थायिक झालेला मुलगा पंकज आणि तीन वर्षांपूर्वीच लग्न होऊन सासरी म्हणजे बंगलोर ला गेलेली कन्या पूर्वा यांना या कार्यक्रमासाठी येणं शक्य नव्हतंच . पण दोघांनी ही सकाळीच फोन करून ' बाबांना ' या खास दिवसासाठी शुभेच्छा दिल्या होत्या.
जयंत रावांबद्दल  जवळ जवळ प्रत्येकानेच आपापल्या भाषणात आदर आणि कौतुक व्यक्त केले होते. सत्कारा  नंतर च्या चहापाना दरम्यान त्यांचे मित्र आणि सहकारी आवर्जून चौकशी करीत होते
"मग आता उद्या पासून मजा आहे बुवा तुमची. मस्त वाचन. चित्र कला. बिनधास्त करणार तुम्ही." असं त्यांचे सहकारी पाटील यांनी म्हणताच.
"बघा हं नाही तर रोजच्या सवयीप्रमाणे उद्या पण दहा वाजता ऑफिसला याल ! " अशी हेड अकांऊटंट चाफेकर यांनी कोपरखळी मारताच एकच हशा पिकला.
"आणि आता उद्यापासून फक्त शनिवार रविवार न येता रोज स्वामी समर्थांच्या मठात यायचं .! .काय ?" अशी आठवण अधिक आग्रह जयंत रावांचे अध्यात्मिक मित्र आणि सहकारी रघुनाथ केळकर यांनी करून देताच जयंतरावांनी " नक्की ....! ' अशी खात्री देत त्यांना टाळी दिली.
       कार्यक्रम संपवून जड मनाने जयंतराव घरी आले आणि त्यांच्या आवडत्या आरामखुर्चीत बसून विचार करू लागले. एक प्रकारची पोकळी त्यांना जाणवत होती . स्वतः च्या अपूर्ण राहिलेल्या आवडी आणि छंद जोपासायचे होतेच परंतु सर्वात मोठी अडचण ही होती की त्यांची कंपनी खाजगी असल्याने  निवृत्ती पश्चात उदर निर्वाहासाठी पेंशन ची सोय नव्हती. नाही म्हणायला कंपनीने निवृत्त होताना  एक ढोबळ रक्कम त्यांना दिली होती. आता ही रक्कम आणि तुटपुंजी बचत यावर त्यांना पुढील दिवस व्यतीत करणे भाग होते. ते सध्या रहात असलेलं घर उमेदीच्या काळात त्यांनी प्लॉट घेऊन मोठ्या हौसेने बांधून घेतल होतं सुरुवातीला केवळ चार  सध्या खोल्या बांधल्या नंतर हळू हळू जमेल तसं  त्थोडं छान , टुमदार. आधुनिक करून घ्यायची खूप इच्छा होती. ज्या स्वामिंवर त्यांची नितांत श्रद्धा होती त्यांचं एक छोटंसं मंदिर बंगल्याच्या आवारात बांधण्याची सुप्त मनीषा देखील होती. पण नंतर संसाराचे रहाटगाडे ओढताना आणि दोन्ही मुलांची शिक्षणं लग्न. या जबाबदाऱ्या पार पाडता पाडता हे घर मात्र तसच राहिलं.
      पंकज ने त्याचं लग्न झाल्यावर दोन एक वर्षात मोठ्या शहरात स्थायिक होण्याचं ठरवलं तेव्हा ही त्यांना अशीच पोकळी आणि निराशा जाणवत होती. इतकी वर्षे नोकरी च्या व्यापात ही पोकळी कदाचित तेव्हढी जाणवली नव्हती पण आता मात्र या घरात दोघांनीच राहायचं ! ही उणीव मात्र नक्कीच जाणवणार होती. आणि आता केवळ निवृत्त झालो म्हणून इतक्या वर्षांचा इथला निवास सोडून मोठ्या शहरात पंकज कडे त्याच्या   फ्लॅट मधील मर्यादित जागेत जाऊन रहाणं त्यांना ' प्रशस्त ' वाटत नव्हतं. त्यापेक्षा मुलगा पंकज, सून प्रीती आणि त्यांचा  चार वर्षांचा लाडका नातू चिन्मय यांनीच आपल्या सोबत इथे या बंगल्यात येऊन रहावं असं त्यांना मनोमन वाटतं होतं पण पंकज ने तिकडे सुरू केलेल्या व्यवसायात आता त्याचा खूप चांगला जम बसला होता. त्यामुळे त्याला इथे येऊन राहणे  शक्य नव्हते हे ही जयंत राव जाणत होते. डोळे मिटून ते तसेच शांत पणे खुर्चीत पहुडले होते तेव्हढ्यात आतील खोलीत चालू असलेले प्रतिभा ताई आणि सुलभा यांचे संभाषण  त्यांच्या कानावर आले ...
"अग ताई !  शेवटी निवृत्त झालं की मुलं पण विचारत नाहीत आई बापाला. त्यांना कोणतीच जबाबदारी नको असते. त्या वैशालीच्या काकुचे काय झाले ठाऊक आहे ना? त्यांचं रहात घर मुलाने आणि सुनेने हडप करून परस्पर विकून टाकलं आणि काका काकू आले की रस्त्यावर. मुलाकडे रहायला गेल्यावर सूनबाई ने एव्हढा छळ मांडला की शेवटी वृद्धाश्रमात जाऊन रहाव लागलं. आता नातेवाईक तरी किती दिवस पुरणार?" 
सुलभा मोठ्या बहिणीचे कान भरण्याचे कार्य करीत होती . 
"अगं असं काही नाही, पंकज ला तू ओळखत नाहीस का? त्याला काळजी आहे आमची. उगीच कशाला एव्हढा टोकाचा विचार करायचा म्हणते मी ! '"
निरोप समारंभात जयंत रावांना मिळालेल्या भेटवस्तू, शाल वगैरे कपाटात ठेवत ठेवत प्रतिभा ताईंनी तिला उत्तर दिलं 
"अगं ताई तसं नसेल ही कदाचित पण उद्या मुलांच्या मनात काय येईल काय नाही हे सांगता येतंय का? आपण सावध राहिलेलं बरं ! आता हा बंगला विका आणि मोठ्या शहरात रहायला या असा हट्ट केला तर काय करणार?? बाकी मी आपलं वाटलं म्हणून सल्ला दिला " सुलभा चां होरा काही बदलला नव्हता.
" बघू ...पुढचं पुढं " हसत हसत प्रतिभा ताईंनी मोघम उत्तर देत विषयाला पूर्णविराम दिला. सुलभा संध्याकाळी उशिरा घरी गेली आणि जयंतराव व प्रतिभा ताई बराच वेळ काही ही न बोलता बाहेर वऱ्हांड्यात बसून होते.
     दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता करण्यासाठी म्हणून दोघे बसणार तेव्हढ्यात त्यांच्या बंगल्याच्या दारात गाडीचा हॉर्न वाजलेला ऐकून दोघे ही बाहेर आले आणि चकित झाले. पंकज , प्रीती आणि चिन्मय आले होते ,गाडी थांबताच चिन्मय दार उघडून सुसाट पळाला आणि आजोबांना जाऊन चिकटला. जयंत राव आणि प्रतिभा ताईंना हे आश्चर्य फार सुखद वाटलं. बऱ्याच महिन्यांनी खूप गप्पा रंगल्या, कालचा कार्यक्रम कसा झाला ? काय काय भेटवस्तू मिळाल्या. मग पंकज चां बिझनेस कसा जोरदार सुरू आहे आणि त्यामुळे तो त्याच्या बिझनेस ची अजून एक शाखा सुरू करणार आहे. त्याशिवाय मग लहानग्या चिन्मय ची मस्ती, आजी आजोबा सोबत बोबड्या गप्पा यात दिवस कसा निघून गेला ते समजलच नाही आणि जयंत रावांना काल पासून आलेला एकटेपणा आज कुठे तरी दूर पळून गेल्यासारखा वाटत होता. 
रात्री जेवणाच्या टेबलावर पंकज ने प्रस्ताव मांडला " बाबा ..आई आता तुम्ही दोघे काही दिवस आमच्या सोबत चला. मस्त आराम करा. या आधी तुम्हाला कधीच दोन चार दिवसांच्या वर आमच्या कडे राहता आलं नाही. आता काही टेंशन नाही !"
जयंत रावांनी एकदा प्रतिभा ताईंकडे पाहिलं आणि समजावणीच्या सुरात म्हणाले 
" हो येऊ की ... त्यात काय ?.आता तर वेळच वेळ आहे ! येऊ आम्ही निवांत " 
" नाही नंतर नाही...आत्ताच !!! आम्ही तुम्हाला दोघांना घ्यायलाच आलोय. पंधरा तारखेला चिनू चां पाचवा वाढदिवस पण आहे. तुम्हाला यायलाच पाहिजे, पूर्वा पण येणार आहे म्हणतीये." 
पंकज आता निर्वाणीचा सुरात आग्रह करीत होता. अखेर हो नाही हो नाही करता करता जयंतराव आणि प्रतिभाताई नी येण्यास संमती दिली आणि चिन्मय च्या आनंदाला पारावार उरला नाही. 
मग  दोन तीन दिवसांनी. सुलभा ला घराकडे लक्ष ठेवायला सांगून हे आजी आजोबा नातवाच्या घरी राहायला गेले. सुरुवातीचे काही दिवस थोडेसे अवघड वाटल्यावर मात्र पंकज कडे जयंतराव आणि प्रतिभाताई व्यवस्थित रुळले ! पंकज त्याच्या बिझनेस चे बाहेरगावी दौरे , एजन्सी च्या मीटिंग यात खूप व्यस्त असायचा. प्रीती मात्र सासू सासर्‍यांची मनोभावे सेवा करीत होती आणि बाकी चिन्मय च्या रूपाने त्यांचा मस्त टाईमपास होतच होता. चिन्मय चां पाचवा वाढदिवस देखील मोठ्या उत्साहने आणि आनंदाने साजरा झाला. त्या निमित्ताने पूर्वा देखील आई बाबांना भेटून गेली. आणि असच एकदा रात्री जेवताना  पंकज ने बाबांना विचारलं 
"बाबा घराची किल्ली तुमच्या कडेच आहे ना? मला उद्या लागेल. एक दोन एजन्सी च्या मीटिंग आहेत आपल्या गावात ! मी उद्या परवा जाईन घरी"   
अर्थात यात काहीच वावगं नव्हतं, त्यामुळे  जयंत रावांनी "हो का ? अरे वां ! घेऊन जा की किल्ली "  असं उत्तर दिलं पण पंकज च्या पुढील प्रश्नाने मात्र जयंतराव आणि प्रतिभाताई दोघांच्या घशातील घास घशातच अडकला 
"बाबा आपल्या बंगल्याची कागदपत्रं घरात आहेत? की बँकेच्या लॉकर मध्ये ठेवली आहेत? मला जरा हवीयेत " 
हे ऐकुन जयंत रावांनी एकदम चमकुन प्रतिभा ताईंकडें पाहिलं आणि हे पंकज आणि प्रीती यांच्या नजरेतून काही सुटलं नाही.
"कागदपत्रं ना ? हो हो ...आहेत की घरातच आपल्या !  अं.... गोदरेज च्या कपाटात खालच्या ड्रावर मध्ये.. ! "  जयंतरावांचा उत्तरात चल बिचल स्पष्ट होती.
" पण कश्याला हवी आहेत रे कागदपत्रं...? काय झालं ?" अखेर न राहवून प्रतिभा ताईंनी विचारलंच . हे विचारताना सुलभाचे बोल त्यांच्या कानात रुंजी घालू लागले होते .
"अगं काही विशेष नाही. असच जरा काम होतं आई " पंकजने सहजपणे उत्तर दिलं . पण जयंतराव आणि प्रतिभा ताई दोघांची ही अस्वथता काही या उत्तरा मुळे कमी झाली नव्हती. आणि त्यात ही रात्री जेवणं झाल्यावर पंकज बाल्कनीत उभा राहून संजयशी म्हणजेच गावात बिल्डिंग कंस्ट्रक्शनचां उद्योग करणाऱ्या त्याच्या मित्राशी बोलत असलेलं जयंत रावांनी ऐकलं आणि मग मात्र त्यांचा उरला सुरला धीर ही खचलाच. पंकज दुसरे दिवशी सकाळी च गावाकडे जायला निघाला आणि दोन दिवसांनी परतला. तो पर्यंत इकडे प्रतिभा ताईनी प्रितीशी बोलता बोलता आडून आडून काही माहिती मिळते का याचा आदमास घ्यायचा प्रयत्न केला. पण आपल्याच गावात बिझनेस ची नवीन शाखा उघडण्यासाठी काही एजन्सी सोबत मीटिंग करायला तो गेलाय एव्हढच त्यांना समजलं.
गावाकडून परतलेला पंकज एकदम खुश आणि समाधानी दिसत होता. प्रिती शी किचन मध्ये बोलताना " काम झालं आहे. संजय शी बोलून सगळं फायनल केलंय. मला परत एक दोन दा जावं लागेल गावी."  असं म्हटलेलं प्रतिभा ताईंनी ऐकलं आणि नंतर जयंत रावांना ही हे सांगितलं. पण जयंत रावांचा मूळचा भिडस्त आणि शांत स्वभाव असल्याने  हिम्मत करून पंकज ला " घराचं काय करतोय रे बाबा ?" हे विचारण्याची हिम्मत ही त्यांची झाली नाही.
असेच दिवस जात होते. महिना दीड महिना उलटला होता. या दीड महिन्यात  पंकज तीन चार वेळा गावाकडे जाऊन आला होता. एक दोनदा तर त्याच्या कडे असलेली भरपूर कॅश पाहून मात्र जयंतरावांची  खात्रीच पटली की आपलं घर याने एक तर बिल्डर ला विकून टाकलं किंवा ते पाडून तिथे अपार्टमेंट बांधायला घेतली असावी आणि या विचारांनीच त्यांना कससं झालं 
"पंकज अरे आता बरेच दिवस झाले रे. आम्ही आता परत जावं म्हणतो घरी आणि  येत्या गुरुवारी स्वामींचा प्रकटदिन देखील आहे.  मठात कार्यक्रम  आहेत त्यामुळे." अखेर जयंत रावांनी धीर करून विचारलेच आणि आता चमकुन एकमेकांकडे पहायची पाळी पंकज आणि प्रीती ची होती. 
" अं... होय... बाबा काहीच हरकत नाही ! गुरुवार चांगला दिवस आहे.. आपण सगळेच जाऊ घरी ... अजून दोन दिवस आहेत उद्या माझी एक मीटिंग आहे. परवा सकाळी आपण निघू." 
पंकज ने जाहीर केले आणि जयंतराव - प्रतिभाताईंचा जीव भांड्यात पडला. पण मनात  एक रुख रूख  देखील होती. चिंता होती. घराचं काय झालं असेल ?  या चल बिचल अवस्थेतच गुरुवारी सकाळी च पंकज च्या गाडीतून सगळे गावाला जाण्यासाठी निघाले. तीन साडे तीन तासांचा प्रवास कधी एकदा संपतोय असं जयंतराव आणि प्रतिभा ताईंना झालं होतं. अखेर गाडी येऊन घरा समोर थांबली आणि गाडीतून उतरलेले जयंत राव आणि प्रतिभा ताई एक मोठा धक्का बसल्या प्रमाणे एकमेकांकडे पाहू लागले. त्यांचा स्वतः च्या डोळ्यांवर विश्वास बसेना ! दोघे ही आता चमकुन पंकज - प्रीती कडे पाहत होते आणि पंकज प्रीती मात्र एकमेकांकडे मंद स्मित करत पहात होते.
       डोळे विस्फारून जयंतराव प्रतिभाताई बंगल्याकडे पहात पहात पुढे आले. त्यांचा तो आधीचा जुना बंगला दिसत नव्हता. बाहेरील गंजलेले तारांचे कुंपण नाहीसे झाले होते आणि त्याजागी एकदम सुंदर आणि आधुनिक कुंपण- भिंत आणि सरकते फाटक आले होते.  संपूर्ण बंगला अतिशय आकर्षक रीतीने रंगवण्यात आला होता. आवारातील बागेचे सुशोभीकरण करून त्यात छान छान झाडं लावली होती. अश्याच भारावलेल्या अवस्थेत दोघे आत आले आणि त्यांच्या तोंडाचा वासलेला आ अजून मोठा झाला. सगळ्या खोल्यांची सुंदर रीतीने रंगरंगोटी झाली होती. जुन्या फर्निचर ची जागा आता नवीन सुटसुटीत फर्निचर ने घेतली होती. घराचे हे असे आमूलाग्र परिवर्तन पाहून आता जयंत राव आणि प्रतिभा ताईंना भरून आलं होतं. ... 
"बाबा या इकडे. अजून काही दाखवायचं आहे तुम्हाला." पंकज चे शब्द ऐकुन जयंतराव भानावर आले.
पंकज त्यांना स्वयंपाक घराच्या मागील दाराने बाहेर घेऊन आला तर त्यांना समोर एक जिना दिसला. 
"आता हा जिना कुठून आला ?? " या विचारात असलेल्या जयंत रावांना हाताने धरून पंकज त्या जिन्याने गच्ची वर घेऊन गेला. तिथे एक छानशी टुमदार अभ्यासिका बनविण्यात आली होती. त्यात जयंतरावांच्या आवडीची सगळी पुस्तकं कपाटात भरून ठेवली होती. खोली बाहेर छोटीशी बैठक. फुलांच्या झाडाच्या कुंड्या अशी प्रसन्न सजावट करण्यात आली होती. आता हळू हळू जयंत राव आणि प्रतिभा ताईंच्या लक्षात सगळा प्रकार येऊ लागला होता. गेला महिना दीड महिना आपण तिकडे असताना पंकज इकडे येत होता ते या साठीच तर आणि आपण काय विचार करत होतो? दोघांना आतून खूप खजिल झाल्यासारखं वाटत होतं. काय बोलावं. कसं व्यक्त व्हावं हेच समजेना.
" बाबा अजून एक मोठं सरप्राइज आहे. या इकडे  खाली जाऊ आपण."   अस म्हणून पंकज सर्वांना खाली घेऊन आला आणि घराच्या उजव्या बाजूला घेऊन गेला आणि मग मात्र इतका वेळ संयमित असलेला बांध फुटला आणि जयंत राव घळा घळा रडू लागले. 
समोर फुलांच्या माळांनी सजवलेलं एक छान सुबक संगमरवरी मंदिर बांधण्यात आलं होतं आणि त्यात प्रसन्न अश्या स्वामींच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती ! आज प्रकट दिनी हे मंदिर आणि ही प्रसन्न मूर्ती समोर दिसणे हे एखाद्या चमत्काराहून  कमी नव्हतं ! आता आई बाबांना हाताने धरून त्या मंदिरा समोरच बांधलेल्या कट्ट्यावर बसवून पंकज त्यांच्या पायाशी बसला आणि सांगू लागला
"बाबा...आई हे सगळं आम्हाला खूप आधीच करायचं होतं. हे तुमचं  स्वप्न. स्वप्नातलं घर  बांधायची इच्छा. आमची स्वप्न पूर्ण करण्याच्या नादात अपूर्णच राहिली. बाबा तुम्ही आयुष्यभर आमच्या साठी कष्ट घेतले !! तर आता जेव्हा या कष्टातून सुटका झाल्यावर तुमच्या हक्काचे आरामाचे दिवस तुमच्या जगावे हे माझं कर्तव्य आहे. त्यामुळे मी काही मोठ काम केलं नाहीये. बाबा अहो आमच्या लहान पणापासून तुम्ही आम्हाला दिलेले हेच तर ' संस्कार ' आहेत. आणि अजून एक गोष्ट" हे म्हणताना पंकज ने प्रीती कडे पाहिले आणि प्रीती स्मित हास्य करीत पुढे आली आणि बोलू लागली ... 
"आम्ही एक निर्णय घेतलाय. पंकज चा तिकडचा बिझनेस तर आता व्यवस्थित सेट झालाय ! त्यात फार काही लक्ष घालायची गरज नाही. त्यामुळे तिथे एक मॅनेजर ठेवून आता या शहरात त्याने सुरू केलेलं त्याच ऑफिस तो सांभाळणार आहे आणि म्हणूनच आम्ही आता सगळे तुमच्या सोबतच इथे राहणार आहे." 
आता मात्र जयंत रावांचा आनंदाला पारावर उरला नाही आणि चिन्मयला शोभेल अशा आनंदात आणि उत्साहात टाळ्या वाजवल्या आणि पुढे येत पंकज ला मिठी मारली.
प्रतिभा ताईंनी ही पटकन साडीचा पदर डोळ्याला लावला हे सगळं सुरू असताना. सुलभा देखील सह कुटुंब तिथे आली आणि हा सगळा चमत्कार पाहून स्तिमित झाली आणि इतका वेळ  शांत असलेले जयंतराव बोलू लागले "पंकज, प्रीती आज या स्वामींच्या प्रकट दिनी तुम्ही दिलेली ही अविस्मरणीय भेट म्हणजे स्वामींचा प्रसाद आणि आशीर्वाद आहे ! "
खरंय संस्कार कधी वाया जात नाहीत  ! "
 
©सागर जोशी पुणे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...