सोमवार, १६ डिसेंबर, २०२४

1608. घटस्फोट म्हणजे खेळ नाही

      साधारण पाच वर्षाआधी ची गोष्ट असेल. मी एका मैत्रिणीच्या बहिणीच्या लग्नाला गेले होते. लग्न खूप थाटामाटात पार पडले होते. नवरी आणि नवरदेव दोघेही खूप खुश होते. त्यानंतर जवळपास एका वर्षाने परत त्या मैत्रिणीच्या घरी जाण्याचा योग आला. तेव्हा तिची ताई तिच्या माहेरी होती. मी त्यांच्याशी बोलले तेव्हा त्या जरा उदास वाटल्या मला.
मी मैत्रिणीला विचारले ” काय ग प्रीती. जया ताई का नाराज दिसतेय. सर्वकाही ठीक तर आहे ना..?”
 ” अग. ताईंच्या घरी थोडा प्रॉब्लेम सुरू आहे म्हणून मागच्या दोन महिन्यांपासून ताई घरीच आहे.”
” पण नेमकं झालं तरी काय?”
” अग. ताईचे लग्न झाले तेव्हा ती बी. ए. च्या अंतिम वर्षाला होती. लग्नानंतर ताईने कॉलेज तर रेग्युलर केले नाही पण तिला परीक्षा द्यायची होती. जिजुंची पण तीच इच्छा होती की ताईने परीक्षा द्यावी. म्हणून मग ताई परीक्षेसाठी माहेरी आली आणि जवळपास महिनाभर माहेरीच होती. परीक्षेनंतर जेव्हा ती परत सासरी जायला लागली तेव्हा तिच्या सासूबाईंनी निरोप दिला की तिला आता सासरी यायची काहीच गरज नाही. म्हणावं बस माहेरी आणि देत बस हव्या तेवढ्या परीक्षा.”
” पण ताई तर फक्त परीक्षा द्यायलाच आली होती ना. मग तिच्या सासूबाईंना राग येण्याचे काय कारण?” मी विचारले.
” कारण ताईने परीक्षा द्यायची हा निर्णय परस्पर ताई आणि जिजुंनी घेतला होता आणि तेच तिच्या सासूबाईंना आवडल नाही. ताई इकडे येताच ताईच्या नणंद आणि सासूने जिजुंना ताईविरुद्ध भडकवायला सुरुवात केली. सुरुवातीला जिजुंनी त्यांचे काहीच ऐकले नाही. पण नंतर मात्र जिजुंच्या वागण्यात फरक दिसायला लागला आणि आता तर जिजु ताईचा फोन देखील उचलत नाहीयेत.” प्रीती म्हणाली.
” मग आता पुढे काय ठरवलंय?” मी विचारले. ” आई बाबा त्यांना समजवायला गेले होते पण तिच्या सासरच्यांनी आईबाबांचा पण अपमान केला. ते काही ऐकुन घ्यायलाच तयार नाहीत. ताईला वागवायला पण तयार नाहीत.” प्रीती.
” हळूहळू होईल सर्व ठीक. काळजी करू नकोस.” मी तिला धीर देत म्हणाले आणि तिथून निघाले.
       मनात मात्र एकच विचार होता. दोन्ही कुटुंबांनी चार महिन्यापूर्वीच थाटामाटाने दोघांचेही लग्न लावून दिले होते. लग्नात नवरदेव आणि नवरी दोघेही खूप खुश होते. त्यांना पाहून कोणीच असा विचार केला नसेल की अवघ्या चार महिन्यात त्यांचा संसार संपुष्टात येईल. कधीकधी वर्चस्वाच्या लढाईत घरातील ज्येष्ठ मंडळी मुलांचा संसार संपुष्टात आणतात. लहानसहान गोष्टींवरून नाती तुटतात. जयाताईच्या बाबतीत सुद्धा असेच झाले होते. जयाताईच्या घरच्यांनी तिच्या सासरच्या मंडळींना खूपदा समजावण्याचा प्रयत्न केला. अगदी हातापाया पडायला देखील तयार होते पण काहीच फायदा झाला नाही. शेवटी दोघांचा घटस्फोट झालाच. आणि त्यानंतर दोनच महिन्यांत तिच्या नवऱ्याने दुसरे लग्न देखील झाले. त्यानंतर जयाताईला सावरायला बरेच महिने लागले. त्यानंतर जयाताईने पुढचे शिक्षण घ्यायचे ठरवले. आणि हळूहळू मागचे सर्वकाही विसरून ती पुढे गेली. आणि बघता बघता चार वर्ष निघून गेली. जयाताई आता एका चांगल्या कंपनीमध्ये नोकरी करत होती. प्रितीचे ही यंदा लग्न पार पडले होते. मात्र जयाताईने अजूनही दुसऱ्या लग्नाचा विचार केला नव्हता. सध्या तिचे पूर्ण लक्ष तिच्या करीअर वर होते.
 पण एके दिवशी अचानक तिच्या घरी तिची सासू, सासरे आणि नवरा आले. त्यांना पाहून जयाताई आणि तिच्या आईवडिलांना आश्चर्य वाटले. त्यांच्या येण्याचे कारण विचारले असता त्यांना कळले की तिच्या नवऱ्याचा दुसऱ्यांदा सुध्दा घटस्फोट झालाय. मागच्या एका वर्षांपासून ते पुन्हा त्याच्यासाठी मुली शोधत होते पण लग्न काही जमत नव्हतं.
एकदा अचानक त्याने जयाताईला बाहेर कुठेतरी पाहिलं तेव्हा त्याला ती अधिक सुंदर आणि आत्मविश्वासाने भरलेली वाटली. जयाताईने अजुन लग्न केले नाही हे त्यांना माहिती होते आणि आता अचानक त्यांना उपरती झाली की जयाताईच त्यांच्या मुलासाठी योग्य आहे. त्यांना वाटले की जयाताईचे आईवडील त्यांच्या या प्रस्तावाने खूप खुश होतील. आणि तिला पुन्हा स्वीकारून आपण तिच्यावर फार मोठे उपकार करत आहोत.
” तर मग आपण लवकरच दोघांचे लग्न लावून देऊयात.” तिच्या सासुबाई म्हणाल्या.
” पण आम्ही अजुन लग्नाला होकार दिलेला नाही.” जयाताईचे बाबा म्हणाले. 
”पण हरकत काय आहे दोघांच्या लग्नाला. नाहीतरी अजूनही जयाचे लग्न होऊ शकले नाही. मग आपण मागचे सर्वकाही विसरून एकत्र यायला काय हरकत आहे?” सासुबाई म्हणाल्या.
 ” हरकत आहे. घटस्फोट म्हणजे काय गम्मत आहे का? आम्हाला एकदा तुमचा अनुभव आलेला असताना पुन्हा तुमच्याशी सोयरिक करणे म्हणजे मूर्खपणाच होईल. अगदी क्षुल्लक कारणावरून तुम्ही तुमच्या मुलाचा संसार मोडलात. एखादे खूप मोठे कारण असते तर आम्हीही समजू शकलो असतो. घरच्या मोठ्या मंडळींनी तर मुलांच्या चुका त्यांच्या लक्षात आणून द्यायच्या असतात पण तुम्ही तर स्वतःच मुलाला चूक करायला भाग पाडलं आणि माझ्या जयाचे लग्न झाले नाही ह्याचा अर्थ असा नव्हे की तिला चांगले स्थळं मिळत नाहीय तर मला आता तीच्याबाबतीत अजिबात घाई करायची नाहीय. तिच्या लग्नाच्या बाबतीत माझा निर्णय चुकला पण तीच चूक मला दुसऱ्यांदा करायची नाहीय. मी माझ्या मुलीसाठी एखादा चांगला, सुशिक्षित आणि तिच्यावर प्रेम करणारा नवरा शोधणार आहे. तुमच्यासारखा श्रीमंत नसला तरी चालेल. मग थोडा उशीर झाला तरी चालेल. ” बाबा म्हणाले.
” पण ह्यांचा घटस्फोट व्हायच्या आधी तर तुम्ही आमच्या हातापाया पडायला सुद्धा तयार होतात जयाला वागवा म्हणून.” सासुबाई म्हणाल्या.
” तेव्हा मी एक लाचार बाप होतो. मला माझ्या मुलीचा मोडणारा संसार पाहवणार नव्हता. तिच्या सुखासाठी मी तुम्हाला विनवण्या करत होतो. पण आता असं वाटतं की जे झालं ते बरंच झालं. निदान आज माझी मुलगी स्वतःच्या पायावर उभी आहे. स्वाभिमानाने जगतेय.” बाबा म्हणाले.
”पण तुम्ही एकदा विचार तर करून पाहा..” सासुबाई म्हणाल्या. 
”आमचा विचार झालाय. आता तुम्ही येऊ शकता.” जयाताईचे बाबा म्हणाले. जयाताईचे बाबा असे काही बोलतील असे तिच्या सासूबाईंना वाटलेच नव्हते. त्यांना वाटले होते की त्यांचा प्रस्ताव ते आनंदाने स्वीकारतील. पण त्यांचे बोलणे ऐकून जयाताईचे सासू, सासरे आणि तिचा नवरा तिघेही खाली मान घालून तिथून निघून गेले. जयाताईला मात्र तिच्या वडिलांचा अभिमान वाटला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...