शुक्रवार, २० डिसेंबर, २०२४

1638. त्याचं असं झालं

 त्याचं असं झालं… 
     मी एकदा दुपारी सांगली मधील क्लिनिकमध्ये बसलो होतो, मला मिरज येथील प्रसिद्ध कान नाक घसा तज्ञ डॉ डी के गोसावी यांच्याकडून फक्त ‘एक व्ही आय पी रुग्ण येणार आहे’, इतकेच माहिती होते, आणि ‘त्या मागील दाराने आत येतील.’ बरोबर साडे तीन वाजता मागील दारात एक गाडी थांबली, गाडीतून पांढरीशुभ्र साडी नेसलेली एक शालीन, डोक्यावरून पदर घेतलेली, नम्र स्त्री उतरली, तिने तिच्या जगप्रसिद्ध खळाळत्या हास्यमय आवाजात सांगितले, 
‘नमस्कार डॉक्टर साहेब, माझाच छातीचा एक्स रे काढायचा आहे!’
     अंदाजे तासभर ती माझ्या क्लिनिक मध्ये होती. एकूण आठ एक्स-रे मला काढायला लागले. त्या दरम्यान माझ्या गाण्याच्या आवडीमुळे आमच्या गप्पा चांगल्या रंगल्या, इतक्या की ‘सैंया’ चित्रपटातलं ‘काली काली रात रे, बडा सताये, तेरी याद में…’ हे गाणे आठवून आम्ही दोघांनी मिळून एकसुरात गुणगुणलो!
ती होती गान कोकिळा, स्वरशारदा लता मंगेशकर!

त्याचं असं झालं…
     दुपारी डॉ डी के गोसावी यांचा फोन आला, त्यांच्या मिरज इथल्या फार्म हाऊसवर गप्पा मारायला संध्याकाळी बोलावलं होतं. मी वेळेवर गेलो, टेबलावर स्कॉच आणि तीन ग्लास ठेवलेले होते, एक अस्ताव्यस्त केस वाढवलेला गोरापान लहान चणीचा माणूस बसला होता. डॉक्टरांनी ओळख करून दिली…
     हे कविवर्य बा भ बोरकर!
त्याचं असं झालं…
     ती व्यक्ती दोन वेळा माझ्या घरी राहिली होती, तोंडात पान सतत असल्यामुळे ओठाचा चंबू, चणीनं लहान, बुटके, गोल चेहरा, गोबरे गाल. त्यांचा छातीचा एक्स रे मी बघितला आणि म्हणालो, 
     “एक फुप्फुस अर्ध्यापेक्षा जास्त निकामी, दुसरं देखील हवेचे फुगे झाल्यामुळे (एम्फिझिमा) लवकरच कामातून बाद होणार!”
     तरिही ते गात होते, तासनतास!
     त्यांचं नाव पंडित कुमार गंधर्व! 

त्याचं असं झालं…
     मिरज रेल्वे स्टेशनवर मित्राला सोडायला गेलो होतो. खूप गर्दीमध्ये पाठीवर थाप पडली. मागं वळून बघितलं तर दोन मित्र होते. त्यांना मुंबईला जायचं होतं. इथं रेल्वे बदलावी लागायची, महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये त्यांना जागा मिळत नव्हती. रिझर्वेशन केलं नव्हतं.
     अगदी काकुळतीला येऊन त्यांनी मदतीसाठी विचारलं. त्याचवेळी माझा मित्र असलेला आमदार विक्रम घाटगे भेटला. त्यानं दोन बर्थ मिळवून दिले, त्या दोघांपैकी एक होता माझा खास मित्र मुकुंद जोशी आणि दुसरा होता
      आमचा मित्र सुनील गावस्कर!

त्याचं असं झालं…
     एकदा सांगली सिव्हील हॉस्पिटलसाठी एक्स रे मशीन खरेदी करण्यासाठी मुंबईमध्ये गेलो होतो. कामं आटोपून सचिवालयाजवळ फिरत असताना समोर स्टेट बँकेची इमारत होती. नुकताच आपल्या क्रिकेट टीमनं इंग्लंडमध्ये जाऊन त्यांच्यावर विजय मिळविला होता.
     सहज म्हणून वर गेलो. केबिनबाहेरील सेक्रेटरीकडे ‘ओल्ड फ्रेंड’ म्हणालो आणि स्वतःचं नाव न लिहिता चिठ्ठी दिली. आतून ती व्यक्ती स्वतः बाहेर आली. दार उघडल्याक्षणी मला मिठी मारून विचारलं, 
     “काय श्री, काय म्हणतोस?”
      ती व्यक्ती होती, भारताचा यशस्वी कर्णधार अजित वाडेकर!
 
त्याचं असं झालं…
     सांगलीच्या पोलीस सांस्कृतिक भवनाच्या हॉलमध्ये माडीवर व्हरांड्यात मोडकळीस आलेल्या दोन खुर्च्या हातानं साफ करून दोन व्यक्ती बसल्या होत्या. एका पोलिसानं आणलेल्या मळकट किटलीमधून दोन कप चहाचे भरले. ते कप देखील कळकट आणि टवके उडालेले होते. चहा आणि बिस्कीट खात गप्पा मारत बसलेल्या त्या दोन व्यक्तिंपैकी एक म्हणजे मी होतो, आणि दुसरी व्यक्ती होती
भारताचे माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग!

त्याचं असं झालं…
     एकदा सकाळी माझे मित्र माधवराव आपटे यांचा फोन आला,
 “लगेच विलिंग्डन क्लब वर ये. आम्ही तिघं आहोत, चौथा पार्टनर हवाय.”
 मी गेलो. हातात रॅकेट, पायात महागडे बूट घालून माझी वाट पाहणारे ते होते
 प्रसिद्ध उद्योगपती श्री आदित्य बिर्ला! 

त्याचं असं झालं…
     सांगलीमध्ये एकदा १९९४ साली प्रभाताई कुलकर्णी यांच्या एका कारखान्याचा उद्घाटन समारंभ होता. सूत्रसंचालन मी करणार होतो. माझ्या इंग्रजी संभाषण कलेमुळे कारखाना दाखवण्याची जबाबदारी देखील माझीच होती. पाहुणे आले. समारंभ छान पार पडला, शेवटी पाहुण्यांनी माझी ओळख झाल्यावर एकाच वाक्य म्हणाले, 
“नेव्हर इमाजिंन्ड यु आर अ मेडिकल डॉक्टर!”
ती व्यक्ती होती श्री रतन टाटा!

त्याचं असं झालं…
     घरीच संध्याकाळी गप्पा रंगात आल्या होत्या. समोरची व्यक्ती सांगत होती,
 “आमच्या वाटेला हिरॉईन कधी येतच नाही. येतात त्या मर्कटचेष्टा करणाऱ्या बारबाला, स्कॉच बाटलीमधला कोरा काळा कडू चहा आम्हाला प्यावा लागतो आणि झिंगावं लागतं खोटं खोटं! आम्ही पडलो व्हिलन. आमच्या गोळीबारात कधी कुणी मारत नाही, उलट हिरोच्या मात्र प्रत्येक गोळीनं एकेक मुडदा पडतो.”
ती व्यक्ती होती सदाशिव अमरापूरकर!

त्याचं असं झालं…
     माझा मित्र डॉ आडिगा याचा फोन आला,
“आज रात्री साडेसात वाजता घरी जेवायला यायचंय.”
     मी सात वाजून सत्तावीस मिनिटांनी पोहोचलो. तिसऱ्या मजल्यावरल्या खोलीत तीन खुर्च्या होत्या. टेबलावर ‘जॉनी वॉकर’ होती. समोरच्या खुर्चीत एक वृद्ध सद्गृहस्थ बसले होते. गोरेपान, तुळतुळीत टक्कल, भुरभुरणारे किरकोळ पांढरे केस, सोनेरी काडीचा चष्मा, झब्बा आणि त्यावर असणारी सोनेरी बटणं.
ते होते ओंकारप्रसाद उर्फ ओ पी नय्यर!

त्याचं असं झालं…
     घरी ‘काका’ आले होते. गप्पांना सुरुवात होणार, तितक्यात लेदर बॅगमध्ये हात घालता घालता काका म्हणाले, 
“चला संध्येची वेळ झाली.”
मी म्हणालो, “काका तुम्ही माझ्या घरी आहात, तेंव्हा व्हिस्की माझी!”
गप्पा रंगात येत असताना मध्येच काका ओरडून माझ्या बायकोला म्हणाले,
“सुधाताई, आमचं अमृतप्राशन झाल गं, आता वाढ!”
     मला वाटलं, काका स्वतःच्या कवितेतली अनुभूती आणि त्यांचा जन्म उलगडून सांगत होते. त्यावेळी त्या ग्लासमध्ये जे काही असते, ती दारू नसतेच, ते असतं अमृत!
आणि काका म्हणजे साक्षात कविवर्य ‘मंगेश पाडगावकर’!

त्याचं असं झालं…
     बंगल्याच्या दारात एक मर्सिडीज गाडी उभी होती. पांढरीशुभ्र लुंगी आणि नुकतीच अंघोळ केलेला उघडाबंब तुकतुकीत देह सांभाळत ती व्यक्ती मनापासून गाडी धूत आणि पुसत बसली होती. मीही त्यांच्याबरोबर हातात फडकं घेतलं आणि ती गाडी पुसायला लागलो. सकाळची वेळ. त्या वेळी दूरदर्शनवर रामायण मालिका सुरू होती. आमच्या घरात आणि आसपासच्या बंगल्यातदेखील त्याचा आवाज मोठा असल्यामुळे आमच्यापर्यंत येत होता. रविंद्र जैन यांचं संगीत रामायण मालिकेमध्ये भरपूर आहे. विविध प्रसंगात विविध रागांचा वापर केल्यामुळे मालिकेमध्ये रंगत आलीय. तिकडे तो राग ऐकला की गाडी धुता धुता इकडे ती व्यक्ती त्या रागांचं विस्तारण करून, विडंबन करत गंमतजमत करून गात होती. तिकडे रामायण संपलं, इकडे गाडी स्वच्छ धुवून झाली. मी ऐकत होतो आणि गाणारी व्यक्ती होती,
‘पंडित भीमसेन जोशी!
  
त्याचं असं झालं…
     गप्पा रंगात आल्या होत्या. आम्ही तिघंजण होतो. समोरच्या व्यक्तीला मी म्हणालो,
“अण्णा, आमच्या डॉक्टरी व्यवसायात आम्हाला देखील खुपसे रांगडे अनुभव येतात, पण फारच थोडी डॉक्टर मंडळी ते शब्दबद्ध करतात. असं का बरं?”
अण्णा म्हणाले, “आता मी गप्प बसतो. तुझ्याकडे आहे अशा अनुभवांचं गाठोडं. तू सांग तुझे अनुभव!” 
     पुढला तासभर मी बोलत होतो. अण्णा ऐकत होते, शांतपणे डोळे मिटून. त्या दोघांपैकी एक होता माझा नूमवि शाळेतला माझा जिगरी दोस्त गजानन सरपोतदार आणि दुसरे होते
गजानन दिगंबर माडगुळकर अर्थात गदिमा!

त्याचं असं झालं…
     सांगलीमध्ये रक्तपेढीचा कार्यक्रम होता. त्यासाठी पाहुणे गाडीनं येताना प्रवासात गाडीमधला एसी चालू होता. काचा बंद होत्या. अचानक काळा धूर येऊ लागला आणि आतमधले सर्वजण गुदमरू लागले. कशीबशी गाडी येऊन सांगलीत पोहोचली, तोपर्यंत सर्वजण उलटी, चक्कर आणि डोकेदुखीनं त्रस्त झाले होते. मी जातीनं उपचारात लक्ष घातलं. रक्तपेढीचा कार्यक्रम संध्याकाळी सुरू झाला. बोलताना पाहुणे उभे राहिले,
 “खरं म्हणजे आम्ही स्वर्गाचे दार ठोठावलं होतं, दार उघडलं नाही म्हणून परत आलो. रक्तदान करायच्या अगोदर देहदान करायची वेळ आली होती!”
श्रोत्यांना ती एक शाब्दिक कोटी वाटली, पण मला ते कारण माहिती होतं. ते पाहुणे होते
अर्थातच, भाई उर्फ पु लं देशपांडे!

त्याचं असं झालं…
     सांगलीमध्ये एका क्रिकेट मॅचसाठी महान क्रिकेटपटू आलेले होते. सकाळी रत्ना इंटरनॅशनल हॉटेलमधून फोन आला, मी गेलो. खोलीमध्ये तापानं फणफणलेला एक रुग्ण. त्याला तातडीनं मुंबईला हलवायला हवं होतं. तत्काळ थेट (तत्कालीन) मुख्यमंत्री वसंतदादा पाटील ह्यांना फोन करून विचारलं, कारण ते आणि त्यांचं विमान सांगलीमध्ये होतं. त्याच विमानातून त्या रुग्णाची सोय मुंबईमध्ये जाण्यासाठी केली.
तो रुग्ण होता, साक्षात सुनील गावस्कर!

त्याचं असं झालं…
     आम्ही दिल्लीला जाताना वाटेत भोपाळ स्टेशनवर थांबलो. स्टेशनवर मध्यप्रदेश डेअरीच्या स्टॉलवर थंड दुधाची बाटली मिळते, ती आणायला मी उतरलो. समोर झब्बा, लेंगा उपरणं घातलेले एक गृहस्थ. मी ओळखलं. पटकन नमस्कार केला. नंतर त्यांनी जे सांगितले त्यामुळे मी गहिवरलो. ते म्हणाले,
“कालच रामचा फोन आला होता, तुम्ही याच रेल्वेनं दिल्लीला चालला आहात, माझी गाडी दुसऱ्या प्लॅटफॉर्मवरून थोड्या वेळानं निघणार आहे, म्हणून तुम्हाला भेटायला आणि हा मिठाईचा पुडा घेऊन आलोय!”
अशी ती व्यक्ती होती
पद्मविभूषण पंडित कुमार गंधर्व!

त्याचं असं झालं…
     एकदा गाडीनं मुंबईहून सांगलीला जात असताना चहा-नाष्टासाठी साताऱ्यात हॉटेल रजताद्रीमध्ये न जाता शनिवार पेठेतल्या माझ्या मित्राच्या घरी गेलो. तो ओपीडीमध्ये होता. त्यानं घरी शिरा-भजी-चहा करायला सांगितला आणि समोरच्या टेबलाखाली ठेवलेले चार-पाच एक्सरे काढले. प्रत्येक एक्सरे ठराविक दिवसांनी घेतलेला होता. मी एक्सरे तज्ञ असल्यानं त्यानं मला दाखवले. सर्व काळजीपूर्वक बघितल्यावर मी फुप्फुसाचा कर्करोग असल्याचं निदान केलं. तो टीबी नसून कर्करोग होता.
स्वतः एम डी डॉक्टर असणारा तो मित्र म्हणाला, “अगदी बरोबर, मलाही तेच वाटतंय. तू कॅन्फर्म केलंस.”
चहा-नाष्टा झाल्यावर मी सहज म्हणालो,
“कुणाचे एक्स रे आहेत रे ते?”
त्यावर तो अतिशय शांतपणे म्हणाला,
“‘माझेच!”
   मी सुन्न! काही दिवसांचा सोबती असणारा तो प्रथितयश फिजिशियन म्हणजे सातारा शहरातील आजच्या जीवनज्योत रुग्णालयाचे एक संस्थापक,
कै. डॉ बाबा श्रीखंडे ! 
 
त्याचं असं झालं…
त्याचं असं झालं…
त्याचं असं झालं…
त्याचं असं झालं…
     ही यादी त्याच्या आयुष्यात न संपणारी आहे. आपसुकच मनामध्ये प्रश्न येतो की त्याचं ‘असं’ कसं झालं? आणि…
त्याचंच कसं झालं?
     हे रहस्य ओळखण्यासाठी आपण ‘त्याचं असं झालं’ हे पुस्तक वाचलं पाहिजे. हा लेखक आहे, सांगलीमधील प्रख्यात रेडिऑलॉजीस्ट आणि डॉ श्रीनिवास नाटेकर. पुस्तक वाचताना आपण विस्मयचकित होतो, की एखाद्याच्या कुंडलीमध्ये विधाता काय काय ‘योगायोग’ भरून ठेवतो !
     कधी ती व्यक्ती दीर्घायुषी असते तर कधी अल्पायुषी, जन्माच्या स्टेशनवर आपण मृत्यूचं तिकीट घेऊन चढलेलो असतो. आपलं उतरायचं स्टेशन कुठं येणार, कधी येणार हे आपल्याला माहीत नसतं. काळाची ही रेल्वेगाडी चालूच असते, एकाच गतीने जात असते. आपण त्यामध्ये नुसतं बसून राहायचं की शेजारच्या सहप्रवाशांची गप्पा मारायच्या किंवा आणि काय लेखन, कला, साहित्य, चित्र काढत बसायचं हे आपल आपण ठरवायचं असतं.
     ८५ वर्षाच्या या प्रवासामध्ये नाटेकर सरांना वाटेत अनेक प्रवासी मित्रमैत्रिणी भेटले. काही वेळ भेटले, आपापल्या स्टेशनवर उतरून निघून गेले, पण त्यामध्ये होते ते प्रथितयश कवी, लेखक, हिंदी-मराठी सिनेसंगीतातील गायक, संगीतकार, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे खेळाडू, प्रख्यात उद्योजक, लोकप्रिय राजकारणी, आणखी किती नावं सांगू? ही यादी न संपणारी !
     हे केवळ नशीब आहे का ही केवळ नियती आहे का की योगायोग? लेखक म्हणतो, परमेश्वराची कृपा असावी. परंतु मला असं वाटतं की ही लेखकाची एक तपश्चर्या असावी. समोरच्या व्यक्तीला न दुखवता त्याच्या हृदयामध्ये स्थान मिळवण्याची हातोटी असावी. लेखकाची ती एक कला असावी. ह्या पुस्तकाचं हेच वैशिष्ट्य आहे की याला अनुक्रमणिका नसली तरी चालते. कोणतंही पान केव्हाही उघडावं आणि वाचत बसावं. वाचत असता हसावं, चकित व्हावं. हे पुस्तक सध्या छापील स्वरुपात विक्रीस उपलब्ध नाही. परंतु किंडल किंवा ई-बुक उपलब्ध आहे.

लेखक -  डॉ श्रीनिवास नाटेकर 
प्रकाशन – चतुरंग

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...