बुधवार, १८ डिसेंबर, २०२४

1632. खा.. प्या.. नाचा आणि पायाखाली काचा

    गेल्या एक दोन दिवसात बघतोय ते नवलच. भारतीय लोकं आपल्या आपल्यातच Happy Thanksgiving चे मेसेजेस पाठवतायत. काही भारतात व्यवसाय करणाऱ्या कंपन्याही Thanksgiving साठी त्यांच्या products चं मार्केटिंग इथे करतायत. जणू काही Thanksgiving हा रामायण महाभारत काळापासून दसरा दिवाळी सारखा भारतात उत्साहाने साजरा केला जाणारा सण आहे.
    Valentine's Day, Halloween, Mother's Day, Father's Day, Women's Day, Men's Day, Daughter's Day ही असली सगळी थोतांडं गेल्या काही वर्षांपासून भारतात जाणीवपूर्वक रुजवली गेली आहेत आणि आता ते आपल्या जीवनाचे (दुर्दैवाने) अविभाज्य भाग असल्यासारखे आपणच डोक्यावर घेऊन नाचतोय. केवळ हे डेज साजरे करण्याच्या नावाखाली पाश्चात्य कंपन्या भारतात करोडो रुपयांचा व्यापार करतायत. कारण या सो कॉल्ड सणांना भारतीय मिठाई चालत नाही. चॉकलेट्स, केक, कॅंडीजच लागतात. पिझ्झा, बर्गर, पास्ताचीच महागडी हॉटेलं पार्टीसाठी लागतात (ही फारच सात्विक ठिकाणं इथे लिहिल्येत) भारतीय भेटवस्तू या दिवसात देणा-या आणि घेणा-यालाही down market वाटतात. या सणांना भारतीय पोशाख वर्ज्य आहेत. पाश्चिमात्य कपड्यांची या दिवसात डिजिटल बिझिनेस प्लॅटफॉर्म्सवर रेलचेल आहे. उचभ्रू वस्तींमध्ये हे सण साजरे करणं आणि अभिमानाने त्याचं समाज माध्यमांवर प्रदर्शन मांडणं हे स्टेटस सिम्बॉल मानलं जातंच, पण हे लोण मध्यमवर्गीय आणि निम्न आर्थिक स्तर असलेल्या लोकांमध्येही पसरलेलं बघून कीव कराविशी वाटते. मला आठवतंय आमच्या लहानपणी एखादी साधीशी चूक जरी आमच्या हातून अजाणता घडली आणि जर ती आजी आजोबांच्या नजरेस पडली, तर मुद्दाम थोड्या मोठ्या आवाजात (म्हणजे आजूबाजूला असणाऱ्या आई बाबांच्या कानावर जाईल इतक्याच) आजी म्हणायची. "लहानांना कळत नाही पण जाणत्यांना अक्कल नको, बरं वाईट काय ते मुलांना सांगण्याची". आणि काही दिवसांपूर्वीच इथे साक्षात एक माऊली आपल्या लहानग्याला Halloween साठी भुताखेतांचे दोन तीन मुखवटे try out करत, कोणता छान (?) दिसतोय ते कौतुकाने पाहात होती, हे बघितलं आणि धन्य झालो.
      मुळात उत्सव, सणवार आपण कशासाठी साजरे करतो तर त्या निमित्ताने नेहमी आपापल्या व्यापात व्यग्र असणारी माणसं, मित्रमंडळी, नातेवाईक यांच्याबरोबर एकत्र येतात. सहभोजन करतात, गाणी बजावणी, गप्पाटप्पा, बैठे खेळ, हास्यविनोदात संसारातल्या रोजच्या विवंचना बाजूला सारून चार घटका आनंदात घालवतात. एकमेकांची विचारपूस करतात. संसारातल्या या ना त्या कारणाने असणाऱ्या चिंता, काळजीच्या नकारात्मक जळमटांना झाडून टाकून सकारात्मक ऊर्जेने तनामनाला टवटवीत करतात. भारतात अजूनही आपल्या आजूबाजूला असलेले शेजारीपाजारी अडीअडचणीला धावून येतात. रोज रस्त्यांवरून येताजाता अनेक परिचित एकमेकांना हात करतात, स्मितहास्य करतात. म्हणजे माणसांचा वावर आपल्या आजूबाजूला सदैव असतो. त्यांची जागमाग असते. याउलट पाश्चात्य देशांमध्ये काही मोठी शहरं सोडली आणि ऑफिसेस, दुकानं वा मॉल्स सोडले तर एकूणच माणसांचा एक दुसऱ्याशी संपर्क हा खूप मर्यादित असतो. वेगवेगळी घरं असतात. Personal privacy च्या नावाखाली, फारच क्वचित शेजारच्यांशी संबंध येतो. त्यातून त्यांच्याकडे वर्षात जेमतेम सहा सात सण असतात. त्यातले मुख्य म्हणजे Halloween, Thanksgiving, Christmas आणि New Year हे प्रामुख्याने अतिशीत हवामानाच्या काळात, म्हणजे ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत येणारे. जेंव्हा माणसं दिसणं हेही दुरापास्त झालेलं असतं. लवकर होणारा मिट्ट अंधार आणि कडाक्याची थंडी यांनी थिजलेलं, उदास जनजीवन... अश्यावेळी मनोरंजनाच्या घराबाहेरील गतिविधि पूर्णपणे बंद झालेल्या असल्यामुळे, या चार सणांच्यावेळचा त्यांचा मित्रमंडळी, नातेवाईकांबरोबर घराघरात केलेला जल्लोष... त्यांच्या त्यावेळच्या खाण्यापिण्याच्या गोष्टी सुसंगत वाटतात. तिथे चालत आलेली पूर्वापार विभक्त कुटुंब पध्दती आणि आता तर महिनोन्महिने एकट्या दुकट्याचेच राहाणे. आईबापाचा, मुलामुलींचा, इतकच काय तर नोकरी धंद्यामुळे वेगळे राहाणा-या नवरा बायकोचा आवाजही कानावर पडत नाही अशी परिस्थिती असल्याने, Mother's Day, Father's Day, Daughter's Day वगैरे दिवस, उसनं अवसान आणि प्रेम आणून त्यांना साजरे करायची आवश्यकता भासते... अरे पण आपल्याकडे काय त्याचं?
    भारतातील वेगवेगळ्या प्रांतात आणि देशपातळीवर साजरे होणारे आणि सर्वसाधारणपणे सगळ्यांना माहिती असणारे केवळ प्रमुख वार्षिक उत्सव जरी विचारात घेतले तरी ते ५० च्या वर आहेत. आपल्या वेगवेगळ्या राज्यातील छोटे मोठे सण, उत्सव, जत्रा वगैरे जर मोजले तर ते २००० च्या आसपास आहेत. अश्यावेळी अजून ह्या लादलेल्या पाश्चात्य उत्सवाचं इथे कौतुक कशासाठी? आई बाप कितीही ओरडले, करवादले, तरीही बहुतांश तरूण, प्रौढ मंडळी आपापल्या परीने वृध्द मातापित्याची काळजी आजही घेत असतात, त्यांना हवं नको ते बघत असतात. आजही आपल्या तरूण मुलामुलीला ठरल्या वेळेपेक्षा घरी यायला तासभर जरी उशीर झाला आणि त्यांचा काही फोनबिन आला नाही. लागला नाही. तर आई बापाचा जीव वरखाली होत असतो आणि हे सगळं आजूबाजूला माणसांचा राबता असताना, विविध संसाधनं, प्रवासाचे विविध पर्याय सहज उपलब्ध असताना. ही काळजी, हे प्रेम रोज घरात त्याबद्दल न बोलताही एकमेकांना जाणवत असतं. अश्या सहजीवनात भारतातील करोडो परिवार आजही संसार करतायत. मग हे वर दिलेले इंपोर्टेड डेज आपल्या इथे साजरे करण्याचं औचित्य काय? मी स्वतःला अतिशय कर्मठ संस्कृती रक्षक वगैरे अजिबात मानत नाही. पण कार्यकारणभाव न समजता उमजता जर आजूबाजूला गोष्टी घडत असतील आणि तेही स्वतःला सुशिक्षित, लॉजिकल म्हणवून घेणाऱ्या समाजात, तर मला त्याचं जेवढं आश्चर्य वाटतं तेवढंच त्याचं दु:खही होतं. लॉजिकल, रॅशनल, प्रॅक्टिकल थिंकिंग या काय केवळ नोकरी धंद्याच्या ठिकाणी वापरायच्या गोष्टी आहेत? परिवार, समाज, संस्कृती, संस्कारांच्या बाबतीत वापरायच्या नाहीत? सत्यनारायणाची पूजा कशाला करायची? काय होतं आंघोळ न करता पूजा केली तर असे प्रश्न स्वतःला पुरोगामी म्हणवून घेणाऱ्यांना पडतात. पण माझ्या आईची मी रोज काळजी घेतो किंवा माझ्या मुलीवर माझं खूप प्रेम आहे तर हे उसने डेज मी का साजरे करायचे हा प्रश्न त्यांना पडत नाही?
     हे सगळं आपल्याकडे कोणी आणलाय? सामान्य अमेरिकन किंवा युरोपियन माणसांनी, ब्रिटीशांनी? तर त्याचं उत्तर 'नाही' हे आहे. कारण ही सगळी थोतांडं गेल्या तिसेक वर्षातली आहेत. एक उदाहरण देतो म्हणजे आपल्या आत कुठेतरी लख्ख प्रकाश पडेल. नोकरीच्या निमित्ताने माझे अमेरिकेत सलग सहासात वर्षं वास्तव्य झाले आहे. आम्ही अमेरिकेत आलो तेंव्हा माझी मुलगी साडेचार वर्षांची होती. तिचा तेथील शाळेत प्रवेश घेतला. दोन महिन्यांनी पालक - शिक्षक भेटीसाठी शाळेत गेलो. तिची प्रगती चांगली होती पण अमेरिकन उच्चार, इंग्रजी वगैरे कळण्यात तिला अडचणी येत होत्या. तेंव्हा माझ्या पत्नीने काळजीने त्या अमेरिकन शिक्षिकेला विचारलं की आम्ही घरीही तिच्याशी इंग्रजीतून बोलू का? त्यावेळी ब्लुमिंग्टनसारख्या छोट्या शहरातील त्या प्राथमिक शाळेतील तिशीतल्या अमेरिकेन शिक्षिकेने काय उत्तर दिलं असेल? ती म्हणाली. "अजिबात नाही. तुम्ही घरी तुमच्या मातृभाषेतच तिच्याबरोबर बोलत राहा. कारण ती लहान आहे. तिची आकलनशक्ती उत्तम आहे. इंग्रजी आणि इकडचे उच्चार ती अजून तीन चार महिन्यात सहज आत्मसात करेल आणि लिलया बोलायला लागेल. पण तुम्ही जर तुमच्या भाषेत तिच्याशी बोलणं सोडलंत तर तुमची भाषा ती एका वर्षात पूर्णपणे विसरून जाईल. तिला या दोन्ही भाषा चांगल्याच यायला हव्यात. तिचा तो हक्क आहे." मी तिच्या विचारांची समज आणि दिशा पाहून अवाक् झालो. आनंदही झाला. आपल्या इथल्या पाश्चात्यांच्या अंधानुकरणाने आंधळ्या झालेल्या सो कॉल्ड मॉडर्न आईबापांना तिचं उत्तर चपराक देईल. 
    मग हे डेज. हे रुजवलेले पाश्चात्य सण कोणी आणले? ते आणलेले नाहीत तर शिताफीने लादलेले आहेत, भांडवलशाहीच्या अनिर्बंध विस्ताराच्या राक्षसी महत्वाकांक्षेने पछाडलेल्या पाश्चात्य कंपन्यांनी. त्यांनी पसरवलेल्या या जाळ्यात आपण आणि पुढची पिढी ही केवळ गुरफटलेलीच नाहीये तर दुर्दैवाने ते गुरफटणं आपण अभिमानाने मिरवतोय. हे आपण का करतोय याचा विचारही करायची आवश्यकता कोणाला वाटत नाहीये. बाहेरून आणलेले हे डेज, हे सण अप्रत्यक्षपणे भारतातील पुढच्या पिढीला अतिशय वेगाने चंगळवादाच्या विवराकडे घेऊन जातायत. सतत आपल्याकडे जे नाही त्याबद्दल असंतुष्ट, असमाधानी असण्याच्या मनोविकाराकडे घेऊन जातायत. सारासार विवेकबुद्धी नष्ट करत जातायत. त्यातच सध्या सगळीकडे हम दो हमारा/हमारी एक ही परिस्थिती. त्यामुळे मागाल ते मिळताय ही स्थिती. त्यातूनच मग दर वर्ष दीड वर्षांनी ऐपत नसतानाही नवनवीन फोन घेण्याचा, दर पाच वर्षांनी नवीन गाड्या घेण्याचा हव्यास वाढीला लागलाय. सतत online कपडे, खाण्याचे पदार्थ मागवले जातायत. पण त्याने पोटही भरत नाहीये आणि मनही नाही. खोट्या सुखाच्या खरेदीत पैश्या परी पैसा जातोय आणि समाधानही हरवतंय. त्यांनी लादलेले डेज येतायत आणि जातायत पण चंगळवादाचं लागलेलं व्यसन काही सुटत नाहीये. मग आईबाप व नंतर त्यांची नोकरीला लागलेली मुलं अजून जास्त पैसा, पोझिशन मिळवण्यासाठी राब राब राबतायत, नोक-यांवर नोक-या बदलतायत, स्ट्रेस वाढवतायत, तरूण वयातच अनेक आजारांना निमंत्रण देतायत. अशावेळी आजीचं ते वाक्य आठवतं. "लहानांना कळत नाही पण जाणत्यांना अक्कल नको की मुलांना बरं वाईट काय ते सांगायची?" तेंव्हा, सर्व सुशिक्षित, सुविद्य आईबाबांनो सुजाण व्हा. लहान वयातच मुलांना योग्य वैचारिक दिशा द्या. तुम्ही स्वतःही प्रयत्नपूर्वक तसे वागा. मुलांना आपल्या सणवारांचं महत्व सांगा. कुटुंब पध्दतीचं महत्व सांगा. तुम्हाला सांगता येत नसेल अथवा सांगायला सवड नसेल तर मुलांच्या आजी आजोबांना ते आपल्या मुलांना सांगायची मुभा द्या. या बाबतीतही लॉजिकल व्हा. प्रॅक्टिकल राहा. खूप गरज आहे.

© चंद्र(शेखर) वझे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...