सोमवार, १६ डिसेंबर, २०२४

1624. बोन्साय

      सकाळी नेहमी प्रमाणे उठल्यावर माधव ने हातातला मोबाईल चाळायला सुरवात केली...अचानक तो ..राधिका.
राधिका. अशा हाका मारायला लागला. राधिका त्याची बायको धावतच बाहेर आली. ना बोलताच त्याने मोबाईल तिला दाखवला....
काय रे हे......काय झाले असे ....कधी....का रे....
तिच्या प्रश्नांनी तो कोलमडून पडला. आवेग ओसरताच तो उठला. थांब जरा कुंदा ताईला विचारतो. कुंदा ताई.
तू बोलत होतीस ना त्यांच्याशी. तुला काही बोलले होते का ते. कसली अडचण होती का त्यांना पैशाची किंवा आईशी काही भांडण झाले. 
माधव...माधव थांब ....जरा शांत हो. माधव कळले मला हि आताच का ग....कसे झाले .....काय घडले असेल.
नाही रे मलाही काही सुचत नाही आहे. पण तू धीर सोडू नकोस. मी आणि तुझे जिजू निघालो आहोत दोन तासात  पोहोचतो आहोत आम्ही. प्रशांत म्हणाला यायला लागेल तुम्हाला भारतात लगेच. तो जात होता ना रे रोज. मग तो  बोलला नाही का तुला काही. कुंदा ताई आल्यावर बोलू आपण मला काही सुचत नाही आहे. फोन ठेवल्यावर त्याने वळुन बघितले तर राधिका अजून तशीच बसून होती. त्याने खांद्यावर हात ठेवल्यावर ती उन्मळून पडली.
काय रे झाले हे...का....आपले काही चुकले का..मग बोलायचे ना..आपण ऐकले असते त्यांचे ..पण म्हणून असा इतका टोकाचा निर्णय...का आई अप्पांनी आत्महत्या केली असेल..भावना वेगाने तिला पुढे बोलता आले नाही.
मला नाही माहित का आणि कसे ते ...जरा तू शांत हो आणि मला एकटे सोड...
माधव..
हो please....leave me alone...त्याच्याकडे  बघत राधिका बेडरूमच्या बाहेर पडली आणि इकडे ऑफिसमधून फोन वर फोन यायला लागले. माधवने अतिशय शांत पण कठोर पणे सगळ्यांना सांत्वन करण्यासाठी येऊ नका असे सांगितले. तेवढ्यात प्रशांतचा फोन आला. परत एकदा नव्याने सगळे बोलून झाल्यावर प्रशांत म्हणाला. तू समजतोस तसे काहीही नव्हते मी कालही घरी गेलो होतो दोघेही खूप आनंदात होते थोडे थकल्यासारखे वाटले पण बाकी सगळे छान होते. तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अप्पांनी लिहिलेल्या पत्रात आहेत. अप्पांनी शेवटची इच्छा लिहून ठेवली आहे की तु आणि कुंदा आल्या शिवाय त्यांचे अंत्यसंस्कार करायचे नाही. कुंदा ताई दुपारी आल्यावर परत सगळे बोलून झाल्यावर पहिला आवेग ओसरल्यावर ते विमानतळावर निघाले. विमानात बसल्या क्षणी कुंदा आणि माधव च्या डोळ्यासमोरून त्यांचे बालपण येऊ लागले.
      मध्यम वर्गातले असले तरी आई अप्पांनी त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टी ची मागणी नेहमी पुरी केली होती. शिक्षणाच्या बाबतीत तर त्यांनी तुम्हाला जितके हवे तितके शिका म्हणत कायम पुढे जाण्याचा सल्ला देत राहिले. जे आम्ही नाही करू शकलो ते तुम्ही पूर्ण करा. आमचे आयुष्य झाले आता तुम्ही तुमच्या इच्छा पूर्ण करा असे सांगत अमेरिकेला पण त्यांच्या मदतीने च तर आलो आपण. जेव्हा इथेच स्थायिक व्हायचे ठरवले तेव्हाही त्यांनी ते तितक्याच समंजस पणाने स्वीकारले होते. रोजच्या अर्ध्या एका तासाच्या गप्पा. ठराविक तारखेला पाठवलेले पैसे हे सगळे चालूच होते. हा आता कित्येक वर्षात भेटलो मात्र नव्हतो. पण आपली चाललेली ओढाताण त्यांना दिसत होती त्याबद्दल कधी ते काही बोलले नाही. मग....मग अचानक असे काय घडले की इतका टोकाचा निर्णय त्यांना घ्यावा लागला. काळ पुढे चालला होता पण हे दोघेही जीवनात मागे डोकावून पाहण्यात दंग झाले होते.
      सतरा अठरा तासाचा प्रवास कधी संपला त्यांना कळलेच नाही. विमानतळावरून घरी पोहोचल्यावर इतक्या वर्षांनी आपण आलो आहोत हे लक्षात येताच त्यांच्या घशात आवंढा आला आणि आई आप्पांचे फोटो पाहून तो आणखीच टोचायला लागला. समोर प्रशांत दिसल्यावर परत एकदा माधवचा बांध फुटला. खूप वेळ त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून रडल्यावर प्रशांतने त्याला जागे केले. माधव आवर स्वतः ला खूप वेळ झाला आहे त्यांना जावून. आता आपल्याला आधी त्यांचे अंत्यसंस्कार करावे लागतील. मग त्यांच्या सगळ्या मित्रांना आणि निवडक नातेवाईक ह्यांच्या समोर त्यांनी लिहिलेले पत्र तुला वाचायचे आहे.
का. सगळे कशाला हवे आहेत. मला आणि ताईला लिहिले आहे ना हे पत्र मग बाहेरचे कशाला? माधवच्या नकळत त्याच्या डोळ्यातून परत अश्रू वाहू लागले. प्रचंड दुखावला गेला होता तो. गोंधळलेला होता. इतके प्रश्न अनुत्तरित ठेवूनं का गेलात तुम्ही अप्पा?
माधव झालेले तू बदलू शकत नाही आणि अप्पांनी लिहिलेल्या इच्छेचा मान तुला ठेवावा लागेल. लताने घरात काम करणाऱ्या मुलीने, सगळ्या मित्रांना नातेवाईकांना फोन करून बोलावून घेतले. सगळ्यांना हा फार मोठा धक्का बसला होता.पण हळू हळू  कुजबुज सुरु झाली.
     आई बापाची काही परवा राहिली नाही आज कालच्या मुलांना. काय माहित पैशाची अडचण आली असेल नाहीतर निराशेने घेरल असेल म्हातारा म्हातारी एकटीच किती वर्ष. आता आले मालमत्तेवर हक्क दाखवायला. प्रशांत हे सगळे खरंच त्यांचे होते. मी का ऐकून घ्यायचे ह्यांचे चला जाऊया इथून. माधव तुला हे सगळे ऐकावे लागेल आणि नंतर पत्र ही वाचावे लागेल. सगळे पार पडल्यावर काही जण निघून गेली पण काही जवळचे नातेवाईक आणि मित्र मात्र सगळे थांबले कारण लता ने त्यांना तशी विनंती केली होती. 
     कुंदा, माधव, राधिका, प्रमोद सगळे रागावला आहात आमच्यावर ना. काही ना कळवता का असे केले आम्ही विचार करत असाल. पण खरे सांगू का बाळांनो आम्हालाही कळले नाही हे का असे ठरवले ते आणि इतक्या सहजी ते पूर्णही केले. लहान पणापासून तुम्हाला आम्ही कधीही अडवले नाही कशालाही. अगदी भारत सोडून बाहेरच्या देशात स्थाईक झालात तेव्हाही नाही. गेल्या वर्षी माझी बायपासशस्त्रक्रिया झाली तेव्हा सगळ्या माझ्या मित्रांनी माझा हेवा केला होता इतक्या मोठ्या आणि चांगले हॉस्पिटल मध्ये तू माझी सोय केली होतीस माधवा, खरंच काही कमी नव्हते.
     पण खरे सांगू का रे घरी आल्यावर आम्ही दोघेही अंतर्मुख होऊन विचार करू लागलो आणि लक्षात आले की. आम्ही तुम्हाला आमची स्वप्न दिली, तुमच्या स्वप्नांना पंख दिले त्या पंखांना बळ दिले. वर वर जाण्याकरता शिड्या उपलब्ध करून दिल्या. पण एक चूक केली रे, की तुम्हाला ही जाणीव नाही कधी करून दिली की ही शिडी धरून आम्ही खाली उभे आहोत तुम्ही खाली येण्याची वाट पाहत. तुमच्या स्वप्नांना खत पाणी घालून आम्ही त्याचे वृक्ष करायचे सोडून त्याचे बोन्साय केले. खूप फळ फुले शोभा पण भरपूर पण सावली नाही. तुमचे रोजचे ठरविक वेळेला येणारे ते फोन त्याच त्याच गप्पा. ते दर महिन्याला आठवणीने येणार ते पैसे. सगळे सगळे होते पण त्यात काळजी नव्हती असे नाही पण कर्तव्य जास्त होते.
    अरे अचानक येऊन पिठल्याची फर्माईश करून गळ्यात पडण्याचे सुख नव्हते रे ह्या सगळ्यात. तुमच्या स्पर्शाची तहान आम्हाला आणखी तहानेलेल करत होती आणि तुम्हाला तर माहित आहे माझ्या आणि हिच्या  सहवासाची पाळ मुळे किती खोलवर गेली आहेत. एकमेकांवर जीवापाड प्रेम केले आम्ही. त्यामुळे ती पुढे गेली तर मी आणि मी गेलो तर तिचे काय होईल. तुम्ही न्याल रे आम्हाला. पण शेवटी आम्ही बांडगुळच तुमच्या संसारात. तिथे आम्ही रुजलो नसतो. मग आमच्या लक्षात आले तुम्ही फार चांगले आहात पण माणूस म्हणून घडविण्यात आम्ही चूक केली आहे. झाड कितीही उंच गेले तरी त्याची मुळे जमिनीत खोल गेलेली असतात त्याच्या सावलीत किती जण सुरक्षित असतात किंबहुना सावलीच शेवटी उपयोगी असते हे आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचविण्यात कमी पडलो. त्याचे हे प्रायश्चित आम्ही घेतले आहे. जी चूक आम्ही केली ती तुम्ही करू नका. मित्रांना आणि नातेवाइकांना मुद्दाम बोलावले कारण आमच्या मागे त्यांनी तुमच्याबद्दल कोणताही गैरसमज ठेवू नये आणि आम्हीं खरंच सुखी समाधानी होतो हे त्यांना कळावे म्हणून हा पत्र प्रपंच.
       विमानतळावर प्रशांतच्या खांद्यावर हात ठेवत. "प्रशांत अप्पांनी खरंच खूप छान निर्णय घेतला पत्र लिहून त्यांच्या भावना आमच्या पर्यंत पोहोचवण्याचा. भारतात राहून नाही तरी परदेशात राहूनही मी एवढे नक्कीच करू शकेन माझ्या मुलांना मी बोन्साय होण्यापासून वाचवू शकेन. अप्पांच्या ह्या बंगल्याचे सर्व अधिकार मी तुला दिले आहेत. ह्या मध्ये तू काहीतरी रोजगाराची संधी उपलब्ध करून तरुणांना मदत कर. पैशांची मदत मी करत राहीन. आपली मुले आपल्या जवळ आहेत ह्या भावनांनी त्यांचे आईबाप जेव्हा तुला आशीर्वाद देतील तीच खरी आई अप्पा ना श्रद्धांजली असेल."

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...