स्वामी विवेकानंद म्हणतात की, "Give me "Hundred Nachiketa" and I will change the World." हे वाक्य मी लहानपणा पासून ऐकत होतो. पण 'नचिकेत' म्हणजे काय त्याचा अर्थ लागला नाही. आधी आजीने आणि मग नंतर फार उशिरा कोणीतरी नचिकेताची गोष्ट सांगितली तेव्हा विवेकानंदाच्या वाक्याचा अर्थ कळला. खरंतर नचिकेताची कथा ही कठोपनिषदातील आहे, ज्यात नचिकेत या नावाचा, एका मोठ्या राजाचा मुलगा त्याच्या वडिलांना सांगतो की, "तुमची सर्व संपत्ती दान करा. सिंह जशी दुसऱ्याने केलेली शिकार खात नाही, तसंच मी तुमचं राज्य चालवणार नाही. माझ्यात दम असेल तर मी स्वतःच साम्राज्य उभा करेन."
नंतर राजा "सर्वस्वदक्षिणा यज्ञ" करतो, की ज्यात आपलं सर्वस्व दान करायचं असतं. यज्ञ चालु असतानाच छोटा नचिकेत त्याच्या बाबांना विचारतो की, "तुम्ही मला कुणाला दान केलंय? कारण त्या यज्ञाचा नियम असतो की, "आपल्याला सर्वात प्रिय असलेली गोष्ट सुद्धा दान करायची असते आणि त्या राजाला सर्वात प्रिय असतो तो नचिकेत." पण राजाला त्याला दान करायची इच्छा नसते. पण नचिकेत त्याला वारंवार विचारत रहातो की, तुम्ही मला कुणाला दान केलंय? मला कुणाला दान केलंय? शेवटी वैतागून बाबा म्हणतात की "जा मी तुला यमाला दान केलंय!" (आपण घरी आईला वैताग दिल्यावर आई जसं म्हणते ना कधी कधी की, "जा मर तिकडे" तसंच काहीसं हे.)
मग नंतर नचिकेत यमाच्या घरी जातो. पण तिथे यम नसल्याने तीन दिवस त्याची उपाशी-तापाशी वाट पाहत बसतो. यम त्याचं 'समर्पण' पाहून म्हणतो की "तीन वर माग!"
नचिकेत यमाला सांगतो की,
१) "मी वडिलांना न सांगताच इकडे आलोय तर मी जेव्हा परत घरी जाईन तेव्हा त्यांना माझा राग येऊ देऊ नकोस."
२) दुसरा वर तो मागतो तो "अग्नी विद्येचा", त्यामुळेच अग्निविद्येला "नचिकेत-अग्नि" म्हणून पण ओळखलं जातं.
आणि
३) तिसरा वर मागतो तो म्हणजे आत्मज्ञान आणि मृत्यूविषयी.
"तो विचारतो की मृत्यू म्हणजे नेमके काय? आपण मरतो म्हणजे नेमकं शरीरातून काय निघून जातं? जर आत्मा असेल तर देहापासून वेगळे झाल्यावर त्याची गती काय असते?" वगैरे !
तेव्हा यम त्याला म्हणतो की, "तू मला संपुर्ण पृथ्वीचं राज्य माग, हजारो वर्षांचं आयुष्य माग, हजारो सुंदर स्त्रिया माग, जगातील सगळे उपभोग माग" पण मला "मृत्यूचे रहस्य आणि आत्मज्ञान विचारू नकोस."
नचिकेत त्या सगळ्या गोष्टींना नकार देतो आणि म्हणतो की, "या सगळ्या गोष्टी नश्वर आहेत म्हणून मला अशी गोष्ट दे की जी नष्ट होणार नाही. ती म्हणजे आत्मज्ञान !"
एवढ्या सगळ्या प्रलोभनांवर लाथ मारण्याची नचिकेताची वृत्ती पाहून यमराज त्याला शेवटी म्हणतो की, "तूच खरा आत्मज्ञानाचा अधिकारी आहेस."
तिथून पुढे 'यम आणि नचिकेत' याचा प्रश्नोत्तराच्या रुपात अतिशय जबरदस्त संवाद आहे, आणि तोच संवाद ह्या उपनिषदाचा गाभा आहे.
हीच - "प्रलोभनांवर लाथ मारण्याची वृत्ती असणारे शंभर तरुण जर मला मिळाले, तर मी जग बदलून टाकीन असं विवेकानंद म्हणाले होते". असे तरुण की जे कुठल्याच भौतिक गोष्टीत अडकणार नाहीत आणि आपल्या कर्माला त्यांचा धर्म मानतील.
कठोपनिषदाप्रमाणे अशीं एकूण 108 उपनिषदे आहेत. यातील अकरा उपनिषदे प्रमुख मानण्यात येतात. भारतीय संस्कृती काय आहे आणि जगातील ४० मोठमोठ्या संस्कृती नष्ट झाल्या असतानासुद्धा, भारतीय संस्कृती का टिकली याचे उत्तर उपनिषदात मिळते. आपल्याला आजही ज्या प्रकारचे किंवा ज्या दर्जाचे प्रश्न पडत नाहीत ते उपनिषदांनी विचारलेले आहेत आणि त्याचे निरसनही केले आहे.
केनोपनिषद तर अशा अनेकानेक प्रश्नाचे उत्तर देतं. कठोपनिषद, मांडुक्योपनिषद, तैत्तिरीय उपनिषद, ईशावास्योपनिषद इत्यादी उपनिषद मी वाचले आहेत. एकदम जबरदस्त ज्ञान, अनुभूती येते. श्रेयस आणि प्रेयस मधलं द्वंद्व उपनिषदांनी उत्तम रित्या सोडवलं आहे. प्रेयस म्हणजे आपल्याला आकर्षित करणाऱ्या किंवा आवडणाऱ्या गोष्टी थोड्या Easy Gratification आणि श्रेयस म्हणजे आपल्यासाठी हितकारी गोष्टी ज्या खऱ्या अर्थाने आयुष्यात आनंद निर्माण करतात म्हणजे Delayed Gratification. उपनिषद आणि भारतीय तत्वज्ञान मूळ पुस्तकातून समजून घेणे कधीही चांगलं. पण इंटरनेटच्या अति वापराने आपला अटेंशन स्पॅन खूप कमी झालाय. पुस्तक वाचायला जी एकाग्रता पाहिजे ती कमी झालीय म्हणून उपनिषदे समजून घ्यायची सुरुवात करायची असेल तर अजून एक उपाय आहे तो म्हणजे, "उपनिषद् गंगा" ही मालिका पाहणे. "उपनिषद् गंगा" काही वर्षापूर्वी दूरदर्शन वर येऊन गेली. चिन्मय आश्रमाने तयार केल्यामुळे जास्त authentic आहे. यात "उपनिषदातील ज्ञान" वेगवेगळ्या कथांच्या माध्यमातून समजावलेय. अतिशय चांगलं लेखन, दमदार संवाद, तितकाच दमदार अभिनय अन् तत्त्वज्ञानाला सोपं करून सांगण्याची पद्धत यामुळे ही मालिका चांगली जमून आलीये.
यात तुम्हाला, औरंगजेबाचा भाऊ दाराशिकोह भेटेल की ज्याने उपनिषदांचे भाषांतर फारसी भाषेमध्ये केले होते व त्याच भाषांतरावरुन ते इंग्रजी भाषेत भाषांतरित झाले आणि जगभरात त्यांचा प्रसार झाला. आर्य चाणक्य ही भेटेल की ज्यांनी शूद्र वर्गात मोडणाऱ्या चंद्रगुप्ताला सम्राट करण्यासाठी, ब्राम्हण आणि क्षत्रियांशी लढा दिला. भगवान बुद्धही भेटतील, अष्टावक्र आणि राजा जनक यांच्यातील अद्भुत संवाद ऐकायला मिळेल. तसेच त्या काळातील विदुषी म्हणजे मैत्रेयी, गार्गी, कात्यायनी यांचे ज्ञानपूर्व संवाद पाहायला, ऐकायला मिळतील. यातील अनेक अनेक गोष्टी तुम्हाला तुमचा 'स्व' जाणून घ्यायला मदत करतील. ज्यांना Existential प्रश्न पडतात, त्यांनी तर नक्की पहावी ही मालिका. भारतीय संस्कृतीला "सनातन संस्कृती" का म्हणतात हे लक्षात येईल. सनातन शब्दाचा अर्थ असा आहे की, "काळाच्या नश्वर शक्तीच्या मर्यादा ओलांडूनही टिकून राहिलेली गोष्ट." म्हणून बघा ही मालिका. सर्वांनाच हितावह आहे.
आज काल तयार झालेल्या Narrative ला खरं मानून आपल्याच परंपरेला आणि संस्कृतीला शिव्या घालण्याआधी, त्यात काही मेरीट आहे का? ते तपासून पहा आपल्या आयुष्यातील त्याची उपयुक्तता समजून घ्या. हजारो वर्षांच्या परकीय आक्रमकांना ही संस्कृती पुरून उरली आहे, पुढेही टिकेलच. फक्त आपण आपली भूमिका ठरवून घ्यायची आहे की, नेमकं आपल्याला आणि समाजाला काय हितकारक आहे ते ! Google search वर Upanishad Ganga series टाईप केल्यावर "उपनिषद्-गंगा" चे सगळे एपिसोड तुम्हाला या ठिकाणी पाहता येतील. पहिला एपिसोड इंट्रोडक्टरी आहे, दुसऱ्या एपिसोड पासून वेगवेगळ्या गोष्टी सुरू होतात. रोज एक-दोन एपिसोड पाहत चला, त्यावर चिंतन करा, आयुष्यातील त्याची उपयुक्तता तपासून बघा आणि मग आचरणात आणा. ते तुम्हाला भौतिक सुखाबरोबरच मानसिक स्थैर्य आणि आत्मिक आनंद पण मिळवून देईल.
शुभम् भवतु
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा