एका लहानशा गावातील एका झाडावर खुप सारे कावळे बसले होते. पावसाळ्याचे दिवस होते. बाहेरील वातावरण ढगाने भरून आले होते.अगदी दुपारच्या वेळेस अंधार झाला होता. केव्हा पाऊस पडणे सुरू होईल हे सांगता येत नव्हते. त्यामुळे सर्वच पशुपक्षी आपापल्या घरट्यात जाऊन बसले होते. पण जागेच्या अभावी सर्वच कावळे आपल्याला सुरक्षित जागा मिळावी यासाठी जोर जोराने ओरडत एकमेकांशी भांडत होते. तेवढ्यात एक मैना उडत उडत आली अन् त्याच झाडावरील एका फांदीवर जाऊन बसली. या मैनेला झाडावर बसलेली पाहून सर्वच कावळे आपले भांडणं विसरून एकत्रितपणे मैनेवर धाऊन गेले. बिचारी मैना या कावळ्यांना विनवणी करत म्हणाली," मला आजच्या दिवस राहू द्या.मी माझ्या घरट्याचा रस्ता विसरली आहे. " पण कावळे काही ऐकायला तयार नव्हते. कावळ्यांनी मैनेची विनंती अमान्य केल्याने आता ती पण हट्टाने पेटून उठली. पण ती जोरात न ओरडता म्हणाली," झाडे तर ईश्वराचीच देणं आहे. मी तुमच्या बहिणीसारखी आहे. कृपया आजच्या दिवस मला राहू द्या." तरी पण कावळे ऐकायला तयार नव्हते.त्यांचे म्हणणे होते," आम्हाला तुझ्यासारखी बहीण नको. तु देवाचे नावं घेत आहे. त्यामुळे तु आता देवाकडेच जागा मागायला जा. ईश्वरच तुझी व्यवस्था करेल. तु इथून गेली नाही तर आम्ही सर्व जण तुटून पडू अन् तुझा जीव घेऊ." कावळे नेहमीच एकमेकांशी जोरजोरात भांडत असतात. पण दुसऱ्या कोणत्याही पक्ष्या विरूध्द लढा द्यायचा असल्यास ते सर्व एकत्रितपणे लढा देतात. हे त्याचे विशेष आहे.
कावळे काही ऐकायला तयार नाही हे लक्षात येताच मैनाने अगदी जवळच काही अंतरावर असलेल्या एका झाडावर आपले बस्तान बसवले. अन् काही वेळातच जोरात पाऊस सुरू झाला. सोबत गारा पडायला लागल्या. त्या गारा देखील मोठ्या आकाराच्या होत्या. कावळे पण या पावसामुळे आसरा शोधत होते. पण तो काही मिळत नव्हता. इकडे मैना ज्या झाडावर जाऊन बसली होती त्या झाडाची एक फांदी तुटून खाली पडली. त्यामुळे आपोआपच एक आडोसा तयार झाला अन् मैना या आडोसामध्ये जाऊन बसली. रात्रभर जोरात पाऊस असूनही त्यापासून आणि गारापासून मैना सुरक्षित राहिली.
सकाळ झाली. पाऊस थांबला होता. काही वेळात ती आपल्या घरी जायला निघाली . काही अंतरावरच अतिशय विचित्र दृश्य दिसले.रात्रीच्या पावसाने तसेच गाऱ्यांच्या माऱ्याने बहूतेक कावळे मरून पडलेले होते. हे दृश्य पाहून मैनेला फार दुःख झाले. या कावळ्यांपैकी एक कावळा मरण्याच्या दारात उभा असतांना मैनाला विचारले," मैना तु जिवंत कशी राहिली? यावर मैनाने उत्तर दिले," मी ज्या झाडावर बसले होते तेथे बसून मी ईश्वराची प्रार्थना केली. अन् त्यानेच मला या संकटातून वाचविले. दुःखात परमेश्वरच आपली सुटका करू शकतो हा माझा विश्वास सार्थ ठरला."
बोध
मनुष्याच्या आयुष्यात एकदा का संकटांची मालिका सुरू झाली की ती संपता संपत नाही. परंतू या संकटातून सुटका करून घेण्यासाठी जसे मनुष्याच्या प्रयत्नांची गरज आहे तशीच त्याला ईश्वराचे सुध्दा कळतन कळत सहकार्य मिळत असते. तात्पर्य काय की, ईश्वरच आपल्याला संकटातून सुटका करू शकतो. ती एक फार मोठी शक्ती आहे. अनेक अडचणींवर मात करू शकतो.अप्रत्यक्षपणे मदतच होते. फक्त आपला त्यावर विश्वास असायला हवा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा