तो राधेच्या आयुष्यात होता आणि अर्जुनाच्या ही आयुष्यात होता. प्रेम त्याने राधेवर ही केले आणि अर्जुना वरही केले. राधा आपली नव्हती आणि होणार ही नाही, याची पूर्ण जाणीव त्याला होती तसेच युद्धात अर्जुन जिंकूनही आपला काहीही फायदा होणार नाही ही पण जाणीव त्याला होती. पण हे असूनही त्याने ही दोन्ही नाती अतिशय समरस होवून निभावली !! एकदा गोकुळ सोडल्यावर परत तो कधीच राधेच्या आयुष्यात आला नाही आणि राज्याभिषेक झाल्यावर अर्जुनाच्याही आयुष्यात तो परत कधीच आला नाही. अत्यंत उत्कटपणे नाती निभावूनही त्या नात्यातून तो अलगदपणे बाजूला झाला... परत कधीच परतून न येण्यासाठी !! त्याची त्याला कधी खंत वाटली नाही ना कधी खेद झाला. राधेबरोबर प्रेमाचे हळूवार नाते त्याने जिवापाड जपले यात त्याला लोकापवादाला तोंड द्यावे लागल्यावरही राधेवर मनापासून प्रेम केल्याची खंत त्याला कधीच नव्हती, पण तरीही त्याचे बासरीचे सूर कधी बहरले नाहीत असे कधीच झाले नाही. ज्या उत्कटतेने त्याने राधे साठी बासरी वाजवली आणि तिला प्रेमाचा हळूवार, अलवार अनुभव दिला तसाच अर्जुनाबरोबर कौरवांच्या केलेल्या युद्धात कुरुक्षेत्रावर आपल्या अफलातून डावपेच आणि कूट नीतीने गाजवून सोडले. ज्या आपुलकीने राधेला तो जीवन का आणि कसे जगायचे, हे कोमल होऊन सांगत असे त्याच आपुलकीने अर्जुनाला शत्रूस कसे आणि का संपवायचे हेही सांगितले, एकापेक्षा एक अभेद्य, अमर आणि महावीर योद्धे त्याने लीलया वरच्या ढगात पाठवले जे त्याचे शत्रू कधीच नव्हते पण जोडलेले नाते जपताना त्याने 'हे तुझे, हे माझे' याचा लीलया त्याग केला होता. ज्या हळुवारपणे त्याची बोटे बासरीवर अलगद फिरत असताना जे मधुर स्वर निनादत... त्याच हळूवारपणे त्याची बोटे सुदर्शन चक्रंही बिनदिक्कत चालवत असत. हे सर्व करताना नात्यातील निरपेक्षता त्याने कधीच सोडली नाही. कारण तो कृष्ण होता...
"संभवामि युगे युगे" असे त्याचे स्वतःचेच वचन आहे. तो प्रत्येकाच्या आयुष्यात होता... आहे आणि राहीलही. गरज आहे ती आपल्याच आयुष्यात असलेल्या "त्या कृष्णाला" ओळखण्याची...ते जर तुम्ही ओळखू शकलात तर तुमचं आयुष्य नक्कीच कृष्णाची बासरी होईल. तो तुम्हाला त्याच्या बासरी इतकच प्रेमानं सांभाळेल हे त्रिकालाबाधित सत्य आहे..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा