शनिवार, २९ जुलै, २०२३

443. तुमच्या जावयाचं काळीज...

जावई : गुड मॉर्निंग पप्पा.  
सासरे : गुड मॉर्निंग जावईबापू.   
जावई : डिस्टर्ब तर नाही ना केलं?
सासरे : अहो बरं झालं, तुम्हीच कॉल केला.  
जावई : म्हणजे?
सासरे : धोंड्याचा महिना सुरु झालाय ना. 
जावई : मग?
सासरे : म्हणून मग मीच आमंत्रण देण्यासाठी, तुम्हाला कॉल करणार होतो.  
जावई : ओके. 
सासरे : मग कधी येताय?  
जावई : कुठे?
सासरे : आमच्याकडे धोंडे खायला. 
जावई : त्यासंदर्भातच बोलायचं आहे. 
सासरे : आमचं काही चुकलं तर नाही?
जावई : नाही ओ पप्पा. 
सासरे : मग?
जावई : काही प्रश्न विचारू?
सासरे : काय झालंय?
जावई : सहजच. 
सासरे : विचारा. 
जावई : तुम्हाला एकूण मुली किती?
सासरे : मस्करी करताय का?
जावई : सांगा तर.. 
सासरे : मला एकूण ३ मुली.  
जावई : १ मोठी आणि २ जुळ्या. 
सासरे : बरोबर.  
जावई : मुली झाल्यानंतर तुम्ही कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया केली. 
सासरे : हो. 
जावई : तुमच्या सर्वात मोठ्या मुलीचं लग्न किती वर्षांपूर्वी झालं? 
सासरे : ९ वर्षांपुवी. 
जावई : आणि नंतरच्या जुळ्या मुलींचं?
सासरे : तुमच्या लग्नाला ५ वर्षे झाली ना? 
जावई : बरोबर.  
सासरे : त्याचं काय?
जावई : माझ्या बहिणीचं लग्न मागच्या वर्षी झालं. 
सासरे : आम्ही मानपानात कमी पडलो का?
जावई : तसं नाहीये काही.  
सासरे : मग?
जावई : माझी बहीण वर्षभरात ९ वेळा माहेरी आली.  
सासरे : ओके.  
जावई : राखीपौर्णिमा, भाऊबीज, धोंडे, वटपौर्णिमा आणि इतर निमित्ताने..   
सासरे : मुलीचा हक्कच तो.  
जावई : पप्पा तुम्हाला तर ठाऊकच आहे. 
सासरे : काय?
जावई : मी लहान असतानाच माझे वडील.. 
सासरे : हो. म्हणूनच मी तुम्हाला अगदी माझ्या मुलासारखं समजतो.  
जावई : लग्न झाल्यापासून तुम्ही मला मार्गदर्शन करत आलात. 
सासरे : माझी जबाबदारीच ती. 
जावई : आणखी किती जबाबदाऱ्या निभावणार पप्पा?
सासरे : समजलो नाही बेटा. 
जावई : तुम्ही तुमच्या तिन्ही मुलींना ग्रॅज्युएशनपर्यंत शिकवलं.  
सासरे : स्वावलंबी व्हावं म्हणून. 
जावई : त्यांच्या शिक्षणावर तुम्ही लाखो रुपये खर्च केले.  
सासरे : हो.  
जावई : तिघींची लग्न अगदी थाटामाटात लावून दिली. 
सासरे : हो. 
जावई : तिघींची बाळंतपणं माहेरी करण्याचा हट्ट धरला.  
सासरे : हो.  
जावई : मी काल बसल्याबसल्या हिशोब केलाय पप्पा. 
सासरे : कसला?
जावई : मागच्या ५ वर्षांमध्ये, माझी बायको जेव्हा केव्हा माहेरी आली.. 
सासरे : त्याचं काय?
जावई : तुम्ही दरवेळी तिला साडी घेतली. 
सासरे : तिचे लाड मीच करणार..
जावई : आतापर्यंत माझ्या बायकोला तुम्ही अंदाजे महागड्या ३४ साड्या घेतल्या आहेत.   
सासरे : त्याचं आज काय?
जावई : लग्न झाल्यापासून तुम्ही आम्हाला १२ तोळ्याचे दागिने केलेत. 
सासरे : जावयाचा मानसन्मान आमचं कर्तव्य..    
जावई : तुम्ही जेवढा खर्च आमच्या दोघांवर केलात, तेवढाच खर्च..      
सासरे : तेवढाच खर्च?
जावई : तुम्ही तुमच्या इतर मुली व जावयांवरही केलात. 
सासरे : कारण माझ्यासाठी तुम्ही सर्वजण सारखे. 
जावई : जावयाच्या घरचा कुठलाही कौटुंबिक कार्यक्रम किंवा विवाह सोहळा असेल तर..   
सासरे : तर?
जावई : तुम्ही उभ्या पोषाखाने आमचा सन्मान करता.      
सासरे : हो. 
जावई : तसाच सन्मान तुम्ही तुमच्या इतर मुलींचा व जावयांचाही करता. 
सासरे : हो. 
जावई : त्याहिशोबाने दरवर्षी तुम्ही लाखो रुपये आमच्यावर खर्च करता.   
सासरे : हो. 
जावई : नातवंड्यांच्या गळ्यात सोन्याची चेन, वाढदिवसाला ड्रेस अन् सायकली..      
सासरे : जावईबापू..  
©️अक्षय भिंगारदिवे
जावई : पप्पा माझ्या लग्नाला ५ वर्षे झाली ना?
सासरे : हो. 
जावई : मुलींना लग्नात तुम्ही स्मार्ट एलईडी टीव्ही दिलेत.
सासरे : हो. 
जावई : घरी मात्र अजूनही जुनाच कलर टीव्ही वापरता. 
सासरे : चांगला चाललाय तो. 
जावई : भिंतींचे पोपडे पडायला सुरुवात झालेली असूनही, तुम्ही स्वतःच्या घराला रंग द्यायला तयार नाहीत.  
सासरे : करील करील म्हणतो अन् राहून जातं. 
जावई : पप्पा तुमचा फ्रिज मागच्या वर्षीपासून बंद आहे. 
सासरे : आम्ही दोघेच म्हाताराम्हातारी घरी असल्याने..  
जावई : स्वतःच्या मुली, जावई अन् नातवंडांवर लाखो रुपये खर्च करणारे तुम्ही.. 
सासरे : काय?
जावई : अजूनही जुनीच स्कुटर वापरता? 
सासरे : ती माझी आवडती आहे ना..  
जावई : पप्पा मागच्यावेळी आपण दोघे मार्केटमध्ये गेलो असताना, ती अचानक बंद पडली होती.   
सासरे : कधीतरी.. 
जावई : जावयांना ब्रेसलेट आणि घड्याळं गिफ्ट देणारे तुम्ही.. 
सासरे : काय?
जावई : स्वतः मात्र फुटलेल्या काचेचं घड्याळ वापरता.
सासरे : आता बस्स करा.   
जावई : दरवर्षी मला कपडे खरेदी करायला कोऱ्या करकरीत नोटा देता.   
सासरे : जावयाचा अभिमान वाटतो ना..   
जावई : आणि स्वतः मात्र जीर्ण झालेले कपडे वापरता. 
सासरे : बेटा थांब आता. 
जावई : माझ्या बहिणीला कधीच मी बापाची कमी जाणवू दिली नाही.  
सासरे : पाहिलंय ते मी.. 
जावई : म्हणूनच तर मागच्या वर्षभरात मला जाणवलं. 
सासरे : काय?
जावई : मुलीचा बाप होणं सोपं नसतं. 
सासरे : खरं आहे.   
जावई : लाडाकोडात वाढवलेल्या व जीवापाड जपलेल्या पोरीला तुम्ही माझ्या स्वाधीन केलं.  
सासरे : हो. 
जावई : ती आज प्रत्येक संकटात माझ्या खांद्याला खांदा लावून माझ्यासोबत उभी असते.  
सासरे : संस्कार कमी पडू नाही दिले मी..  
जावई : मग तरीही..   
सासरे : काय?
जावई : मी तुमच्याकडून मानपानाची अपेक्षा ठेवायला हवी?
सासरे : अहो..  
जावई : स्वतःच्या शरीराचा अंश दिला तुम्ही मला. तुमचे ते उपकार तर आयुष्यभर फिटणार नाहीत. 
सासरे : असं नका बोलू.  
जावई : पप्पा म्हणूनच मी ठरवलं आहे. 
सासरे : काय?
जावई : आजपर्यंत तुमची झाली ती पिळवणूक खूप झाली. 
सासरे : म्हणजे?
जावई : आता तुम्ही आमच्याकडे येऊन मानसन्मान स्वीकारायचा. 
सासरे : अहो पण.. 
जावई : पिढ्यानपिढ्या सुरु होती, ती परंपरा आता पुरे झाली. 
सासरे : का?
जावई : कारण आता मुली शिकून सवरून स्वावलंबी झाल्या आहेत. 
सासरे : हो. 
जावई : म्हणूनच संसाराच्या अर्ध्या जबाबदाऱ्या स्वेच्छेने त्या स्वतःच्या खांद्यावर घेतात.  
सासरे : सहमत. 
जावई : मोबाईलवरचा मेसेज चेक करा.  
सासरे : का बरं?
जावई : तुम्हाला मी ऑनलाईन १० हजार रुपये पाठवले आहेत.   
सासरे : कशाला?
जावई : तुम्ही नवे कपडे आणि सासूबाईंसाठी नवी साडी खरेदी करा.   
सासरे : अहो पण.. 
जावई : मला मुलगा समजता ना?  
सासरे : हो.  
जावई : मग यावेळी धोंडे खायला तुम्ही आमच्याकडे यायचं.    
सासरे : पण..  
जावई : यानिमित्ताने कळू द्या सगळ्या समाजाला.  
सासरे : काय?
जावई : धोंड्याचा महिना जरी सुरु असला, तरी..  
सासरे : तरी?
जावई : तुमच्या जावयाचं काळीज धोंडा नाही. 
©️अक्षय भिंगारदिवे, 
२५ जुलै २०२३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...