तो माझा मुलगा आहे, काहीही करेल, शेवटी मुलगा कोणाचा आहे. बापाच्या पाउलावर पावूल टाकत आहे. (अश्या वाक्याने तुम्हीच तुमची पीढी नासवत आहात..) मोबाइलमध्ये सगळी दुनिया सामावली जात असताना त्या वेगावर स्वार होणाऱ्या भल्याभल्यांची तंतरली आहे. अशा वेळी घराघरातल्या लहानग्यांचं नेमकं काय होत असेल? पोनरेग्राफी, व्यसनं, तथाकथित प्रेमप्रकरणं हे लहान वयातच जे येऊ नये ते सगळं येऊन आदळत असताना त्याला सामोऱ्या जाणाऱ्या आजच्या किशोरवयीन पिढीचं आजचं वास्तव काय आहे? या मुलांचं काय चाललंय ते पालकांना समजतंय की तेही गोंधळून गेलेत? त्यांनी आपल्या मुलांना कसं सांभाळायला हवं?
काही महिन्यांपासून व्हॉट्सअॅपवर फिरणारा एक संदेश..‘‘एका लहान मुलाची निरागस प्रार्थना.. देवा माझ्या बाबाच्या मोबाइलमधील सर्व मुलींना थंडीपासून बचाव करता येतील असे कपडे दे. त्या खूपच गरीब आहेत बिचाऱ्या..’’ मिनिटागणिक भरकटणाऱ्या आणि दोन घटका मौज म्हणून वाचल्या जाणाऱ्या संदेशाप्रमाणे हादेखील आला आणि विरून गेला. त्यामागचा गर्भितार्थ किती जणांच्या लक्षात आला? बाबाचा मोबाइल नंगू पंगू चित्रांनी भरलेलाआहे. हे वास्तव ठसठशीतपणे अधोरेखित करणारा हा संदेश किती जणांनी गांभीर्याने घेतला? घरातील छोटय़ाशा निरागस घटकाला त्यातील लैंगिकता समजली नाही, पण त्याहून थोडय़ा मोठय़ा, लैंगिकतेची जाणीव झालेल्या मुलाने ही चित्रं बघितली असतील, तर त्याची प्रतिक्रिया काय असेल? व्हॉट्सअॅप अथवा तत्सम माध्यमातून लाखो लोकांपर्यंत पोहचलेला हा संदेश एका अर्थाने डोळे उघडणाराच आहे. गेल्या काही वर्षांत किशोरवयीन मुलं चुकली आहेत, भरकटलेली आहेत, व्यसनांच्या विळख्यात अडकलेली आहेत हा जो सूर वारंवार ऐकू येतो त्यावर चर्चा करताना खरं त्याच्या मुळापर्यंत जाण्याची गरज आहे आणि या चर्चेची मुळे अशा छोटय़ाछोटय़ा घटकांमध्ये दडलेली आहेत.
आजच्या समाजात लक्षणीयरीत्या प्रभावी असणारं तरुणांचं वास्तव आज समाजाच्या सर्वच स्तरांना धडका देत असताना आजचा पालक हडबडतो आहे. आपली मुलं हाताबाहेर गेली म्हणून गोंधळून जात आहे, तर दुसरीकडे आम्ही काय गैर केलं म्हणून पौगंडावस्थेतील पिढी गांगरून जात आहे. आणि संपूर्ण समाजालाच कीड लागली म्हणून माध्यमं आगपाखड करू लागली आहेत. आमच्यावेळी असं काही नव्हतं म्हणून जुणेजाणते मध्येच आपल्या मतांची पिंक टाकून जात आहेत आणि गदारोळाचं चित्र उभं राहू लागलं आहे. तर सुजाण पालक विचार करू लागलेत, की सारंच संपलं आहे का? की काही आशेचा किरण बाकी आहे? आशेचे किरण तर अनेक आहेत. किशोरांच्या आयुष्यात प्रभावी असणाऱ्या या घटकांना ठामपणे तोंड देऊन त्यावर मात करणारीदेखील अनेक घरं आहेत. आपल्या पाल्याला चांगलेपणाची जाणीव करून देऊन त्यावर उपाय शोधणारे आणि समर्थपणे पुढे जाणारे पालकदेखील याच जगात आहेत. म्हणजेच आजचा हा समाज हा या दोहोंमध्ये विभागला आहे.
पालकांचा एकमेकांतील तुटलेला संवाद :
विवाहबाह्य़ संबंध हा केवळ मालिकांमध्ये, कथा-कादंबऱ्यांमध्ये दिसणारा घटक आज अनेकांच्या आयुष्यात चोरपावलांनी आला आहे. विवाहबाह्य़ संबंध म्हणजे केवळ शारीरिकसंबंध असं त्याचं स्वरूप नसून त्याला मानसिक भावभावनांचे देखील पदर आहेत. दिवसातील बहुतांश काळ नोकरी-व्यवसायासाठी बाहेर असल्यामुळे जसा पालकांचा मुलांबरोबरचा संवाद तुटत चालला आहे तसाच त्याचा परिणाम पालकांच्या एकमेकांतील संवादावरदेखील झाला आहे. परिणामी मुलं ज्या परिस्थितीतून जात आहेत त्याच परिस्थितीत आपणदेखील असल्याचं अनेक पालकांना वाटू शकतं. अर्थात मुलं जशी भरकटतात तसे आपणदेखील भरकटू शकतो किंवा भरकटलेले आहोत, हेच अनेकांना लक्षात येत नाही. आज अशा विवाहबाह्य़ संबंधांनी अनेक घरांत विसंवादाचं वादळ निर्माण होत असल्याचं या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात. स्वत:ची संवादाची गरज म्हणून कदाचित अनेक पालक यावर पांघरुण घालण्याचा प्रयत्न करतील, पण हेच आपली मुलं करीत असताना आपण त्याकडे कसं पाहणार आहोत, हा प्रश्न प्रत्येकाने एकदा तरी स्वत:ला विचारून पाहण्याची गरज आहे.
अनुकरण हा तर मुलांचा स्थायिभाव असतो, हे विसरून चालणार नाही.
या परिस्थितीवर मात करणं शक्य आहे, पण त्यासाठी गरज आहे ती परिस्थितीचे साकल्याने आकलन करण्याची, ती अभ्यासण्याची आणि त्यावर उत्तर शोधण्याची. म्हणूनच या विषयावर मानसोपचारतज्ज्ञ, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांच्याशी चर्चा करून या विषयाची व्याप्ती समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पहिलंप्रेम, पहिलंचुंबन, पहिलीसिगारेट, पहिलीदारू, पहिलं व्यसन करण्याचं पूर्वीचं वय कमी होऊन आज १३-१४ वयापर्यंत येऊन ठेपलं आहे. अगदी नववी-दहावीतील मुला-मुलींनी एकत्र येऊन दारू पिणं (ड्रिंक्स घेणं) हे आज अगदी सर्वच स्तरातील घरांत आणि शहरांत आढळणारं ढळढळीत वास्तव आहे. त्यातच अमली पदार्थाच्या वाढत्या फैलावाची त्याला जोड मिळाली आहे.’’ वयाच्या विशीपर्यंत दोन वेळा ब्रेकअप होणं हेदेखील सर्रास होऊ लागल आहे.‘‘स्मार्टफोनमुळं आज प्रेमाचं पॅकेजच तयार झालं आहे. बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंड आहे हा आजचा स्टेटस सिम्बॉल झाला आहे. तर जोडीला प्रेम, व्यसन, व्हिडीओ गेम हे तणाव दूर करण्याचे पर्याय ठरू लागले आहेत.’’
शालेय वयात व्यसनांच्या विळख्यात अडकण्याची शक्यता अधिक असल्याचं शिक्षकदेखील नमूद करतात. सुगंधी सुपारीपासून सुरू झालेला प्रवास गुटखा, सिगारेटपर्यंत कधी जाऊन पोहोचतो हेच कळत नाही. पौगंडावस्थेत प्रेमात पडणे, त्याचा मानसिक त्रास होणे, कधी कधी ते शरीरसंबंधापर्यंत पोहोचणे आणि त्यातून अनेक प्रश्न निर्माण होणे, सिगारेट, गुटखा, अमली पदार्थाचे व्यसन लागणे, नैराश्यामुळे पाल्याने पोनरेग्राफीच्या आहारी जाणे, अॅडिक्ट होणे, नैराश्यामुळे आत्महत्येच्या प्रयत्नांपर्यंत मजल जात आहे.
संवाद साधण्याची मोहीम उघडावी लागेल.
शालेय वयात आईबाबांपेक्षा मुलांचा शाळेत अधिक काळ व्यतीत होत असतो. अशा वेळेस शिक्षकांशी असणारे संबंध हा खूप महत्त्वाचा घटक आहे. एके काळी शाळेतला शिक्षक हा मुलांच्या सर्वागीण जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावत असे. मुलांच्या वागण्या-बोलण्यावर त्याचा प्रभाव असे. मुलांच्या अडचणी त्याला माहिती असत. त्यावरील उपाय शोधण्याचा तो प्रयत्न करीत असे. आज हा शिक्षक विद्यार्थ्यांमधील संवाद काही प्रमाणात तरी तुटला आहे. इतकेच नाही तर आजचा शिक्षक या बाबत काहीसा उदासीनच झाला आहे, किशोरवयीन विद्यार्थ्यांसाठी शिक्षक हा खरं तर मित्रासारखा वाटला पाहिजे. पण आज ही परिस्थिती नाहीये. घरातील विसंवादाला मुलं मित्रांमध्ये उत्तर शोधायचा प्रयत्न करतात. अशा वेळेस आपल्यावर असणारी बंधनं झुगारून देणाऱ्या मुलांकडे झुकण्याची प्रवृत्ती वाढत जाते. हाच प्रभाव मुलींच्या बाबतीत प्रेमात पडण्याला कारणीभूत ठरतो. मग अशा हिरोगिरी करणाऱ्या मुलांच्या जाळ्यात अडकण्याचा संभव वाढतो. त्यातच शाळांमधून दिल्या जाणाऱ्या लैंगिक शिक्षणाचा दर्जा पुरेसा म्हणण्या इतका देखील नाही. किंबहुना मुलांच्या भावना, न्यूनगंड यांचा विचार करता त्यांच्या शंकांचं निरसन करण्यासाठी आजचं लैंगिक_शिक्षण आणि शिक्षक दोघंही कमी पडतात. इतकंच नाही तर शिक्षकांना हे शिक्षण देताना कसं बोलायचं याबद्दलच न्यूनगंड आजही आहे,तो आधी दूर करावा लागेल.
हुशार पालक वेळीच सावध व्हा. मुलांना वेळ द्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा