शुक्रवार, २० जानेवारी, २०२३

175. नि:शब्द

         त्याला पाहून वेडीच झाली ती. आजच तर पहिल्यांदा पाहिलं... सकाळीच. वर्गात शिरताना दरवाजातच त्याला धडकणार होती ती. पण थोडक्यात वाचली आणि का वाचली ही हळहळ तिला नंतर होत राहिली. लाल रंगाचा आडव्या लाईनिंगचा शाहरुखने दिलवाले दुल्हनियाँ ले जायेंगे मध्ये घातला होता टी-शर्ट, तशाच घड्या केलेल्या बाह्या, चेहऱ्यावर एक मिश्किल हास्य, तिला आवडणारा ना गोरा ना काळा असा गहू वर्ण आणि आहे त्याच स्मार्टनेसमध्ये अजून भर घालणारा चष्मा... तिच्या स्वप्नातला राजकुमार वाटला तो. पहिल्याच भेटीत प्रेमात पडली ती त्याच्या...
     तिच्याच वर्गात आला होता तो. नवीनच प्रवेश घेतला आहे कॉलेजमध्ये हे तिला नंतर कळलं. काय बरं त्याचं नांव ... हं... प्रतीक... असंच तर सांगितलं मैत्रिणीने. नावही किती छान आहे. तिच्या प्रेमाचं ‘प्रतीकʼ... स्वत:शीच खूष झाली ती. त्याची प्रत्येक गोष्ट तिला छान वाटायला लागली. तिच्या मनात तो घर करुन गेला.
     दुसऱ्या दिवशी तर तिला कधी एकदा कॉलेजला जाते आणि त्याला परत एकदा पाहते असं झालं होतं. खरंच, कोणाला नुसतं पाहून, पहिल्याच भेटीत आपण प्रेमात पडू शकतो ह्यावर तिचा विश्वासच बसेना, पण असं झालं होतं खरं... आता कोणी त्याला क्रश म्हणो... आकर्षण म्हणो. तिला पर्वा नव्हती !!!!!
     आजची सकाळ पण मस्त उगवली होती. तिला जाग आली तीच मुळी कोकिळेच्या आवाजानी. तिच्या खोलीच्या खिडकीतून तिने बाहेर पाहिलं तर मस्त रिमझिम पाऊस पडत होता आणि अंगणातली फुलं वाऱ्यावर डोलत होती. तिने तो ओला, हवाहवासा सुगंध आपल्या श्वासात भरुन घेतला. तिला परत एकदा त्याची पहिली भेट आठवली. काल त्या भेटीनंतर वर्गात पण तिचं लक्ष नव्हतं. सर काय सांगातहेत सगळं तिच्या डोक्यावरुन जात होतं आणि नजर सतत त्याच्याकडं वळत होती. मुलांच्या रांगेत तो दुसऱ्याच बेंचवर काठावर बसला होता, त्याच्या हालचाली सहज टिपता येत होत्या आणि त्या टिपायची एकही संधी ती सोडत नव्हती. त्याच्या हालचालींना पण एक प्रकारचा स्मार्टनेस होता... कि तिला तो उगीचच जाणवत होता !!!!!!!! त्याची बसण्याची स्टाईल, सरांनी काही विचारल तर उत्तर देण्याची स्टाईल..... "वैजू.... ए.... वैजू.... उठायचं नाही का आज !!!!!  8 वाजत आले." आईच्या हाकेने तिची तंद्री भंग पावली. "कॉलेजला जाताना दांडेकर काकूंकडे निरोप देऊन जा. संध्याकाळी भिसी आहे म्हणावं. आमच्याकडं नक्की या.. आणि तू पण लवकर ये आज कॉलेजमधून." आईची टेप पुढे चालूच होती. तिने एक मोठा आळस दिला. ही आई पण ना... आकाशातून सरळ जमिनीवरच आणते... जाऊ दे... मला पण नाहीतरी आज लवकर जायचय कॉलेजला, त्या प्रतीकशी ओळख करायची आहे असा विचार करत ती उठली. आज कॉलेजची तयारी करताना एक वेगळा उत्साह होता तिच्यात. आपला सगळ्यात आवडता गुलाबी रंगाचा ड्रेस घातला तिने. तिच्या गोऱ्यापान वर्णाला तो खूपच शोभून दिसत होता. आपल्या घनदाट कुरळ्या केसांना बो मध्ये एकत्र बांधले एक हातात घड्याळ आणि एक हातात गुलाबी रंगाचंच मॅचिंग ब्रेस्लेट घातलं. कानातले पण गुलाबी रंगाचे. ती गुलाबीच होऊन गेली होती आज. आरशातील आपल्या छबीकडे बघून ती स्वत:शीच लाजली. जाताना आईने परत एकदा दांडेकर काकूंकडे जायची आठवण  करुन दिली. पहिले दांडेकर काकूंकडे जायचा तिला सर्वस्वी कंटाळा आला होता. तिला आधीच कॉलेज गाठायची घाई झाली होती. पण रस्त्यातच त्यांचे घर होते. आणि आईचा निरोप देणे भाग होते. तिने काकूंच्या घरी बाहेर अंगणात गाडी लावली व त्यांना निरोप देऊन बाहेर आली. तोच तिला समोर तो रस्त्यावर जाताना  दिसला. कॉलेजला चालला होता बहुतेक. त्याला बघूनच ती शहारली. मोहरुन गेली. गालावर नकळत लाली पसरली. त्याच्याशी बोलण्याची अनावर इच्छा मनात तरळून गेली. पायीच चालला होता तो. आणि ती तिच्या स्कूटीवर !!!! कशाला हव्यात गाड्या अन् घोड्या कॉलेजला जायलाख्‍ आईचे वाक्य तंतोतंत पटले तिला. स्कूटी इथेच ठेवून पायीच निघावे असंही वाटू लागलं... क्षणभर... पण मग ती त्याचे काय कारण सांगणार होती. शेवटी नाईलाजाने तिने गाडी स्टार्ट करायला घेतली. पण छे !!!!! ती सुरुच होईना. तिला गाडी सुरु न होण्याचा इतका आनंद कधी झाला नसेल. चार पाचदा किक मारुन पण काहीच फायदा झाला नाही. इतक्यात काकू बाहेर आल्या आणि तिला विचारु लागल्या, "गाडी सुरु होतेय की नाही????" तिने नाही म्हणताच त्या म्हणाल्या, "थांब, मी बोलावते कोणालातरी." ... आणि त्यांनी रस्त्यावरुन जाणाऱ्या त्यालाच बोलावलं, "गाडी सुरु होतं नाहीये.. बघता का जरा???" तिचे दांडेकर काकूंवरचे प्रेम उफाळून आले. त्यांनाच मिठीत घ्यायची इच्छा झाली तिला. मनातला आनंद चेहऱ्यावर दिसू न देता तिने एकदा त्याच्याकडे पाहिले. तो पण धीटपणे तिच्याकडे बघत होता. त्या छोट्या गावांत मुलं मान वर करुन पण मुलींकडे पहात नसताना त्याच्या नजरेतली धिटाई तिला आवडून गेली.
     तो आला.... जवळ ...... अगदी जवळ.... तिच्यापासून तर हातभर अंतरावर उभा होता तो. तिने बघितले त्याच्याकडे. पण तिला बोलायला काही सुचलेच नाही. ती फक्त बघतच राहिली. शेवटी तोच म्हणाला, "मी बघू का सुरु  करुन???" त्याच्या ह्या प्रश्नाने भानावर येत केविलवाणे हसत तिने गाडीच्या हँडलवरचा हात काढला आणि त्याने ते हँडल पकडले. हे करताना झालेला हाताचा ओझर स्पर्श तिच्या अंगावर मोरपिस फिरवून गेला. इतक्या जवळून त्याला दुसऱ्यांदा बघताना, त्याच्या इतक्या जवळ उभे असताना तिला खूप छान वाटत होते. हे क्षण संपूच नये... असे तिला न वाटले तर नवलच !!!!!! त्याने पण दोन-चार किक मारल्या तरी गाडी चालू व्हायचे नाव घेईना... थोडा वेळ प्रयत्न करुन तो म्हणाला, "इथे जवळच एक गॅरेज आहे. तिथेपर्यंत ढकलत घेऊन जाऊ आणि त्यालाच चालू करुन मागू???" तिचा होकार गृहीत धरुनच त्याने गाडी ढकलायला सुरवात पण केली. तिला खरंतर म्हणायचे होते, "नको... नेईन मी, तुम्हाला कशाला उगाच त्रास !!!" पण काही न बोलताच ती त्याच्या मागोमाग चालू लागली. कोणीच कोणासोबत बोलेना. थोडं पुढे गेल्यावर तो म्हणाला, "तुम्ही एस.आर.एस. कॉलेजमध्ये सेकंड इयर लाच शिकता ना?" तिने मानेनेच होकार दिला. "मी बघितलं काल तुम्हाला." तोच पुढे म्हणाला. "तू म्हटलं तरी चालेल. आपण एकाच वर्गात आहोत." ती कशीबशी म्हणाली. तो मंद हसला फक्त आणि म्हणाला, "मला काही नोट्स हव्या होत्या. मी थोडं उशीरच ॲडमिशन घेतलंय. ती हो म्हणणारच तोच समोरुन येणाऱ्या एका मुलीकडे बघून तो हसून "हाय..." म्हणाला. त्या मुलीच्या डोळ्यांत बघत खूप प्रेमाने विचारलं त्याने, "कशी आहेस?" ती पण त्याच्या डोळ्यांत बघत म्हणाली, "कशी असणार तुझ्याशिवाय? किती दिवस लावलेस इथे यायला." तो फक्त हसला आणि त्या दोघींची ओळख करुन देत म्हणाला, "प्रणाली, ही...." आणि त्याच्या लक्षात आले की आपण नावच विचारले नाही हिला. त्याने प्रश्नार्थक नजरेने वैजूकडे पाहिले... कसंनुस हसत ती म्हणाली, "...वैजू..." "हं... वैजू !!! आम्ही दोघं एकाच वर्गात आहोत. आताच ओळख झाली आमची आणि वैजू ही प्रणाली... माझी मैत्रीण... अगदी जीवभावाची मैत्रीण !!!! आधी आम्ही एकाच कॉलेजला होतो. मग हिच्या वडीलांची बदली इथे झाली म्हणून मी पण इथेच ॲडमिशन बदलून घेतले." तो पुढे बोलतच होता.
     मात्र तिच्या कानात काहीच शिरत नव्हते. उगाचच पापण्यांची उघडझाप करत डोळ्यांत आलेले पाणी परतवण्याचा ती प्रयत्न करत होती. कळी उमलायच्या आधीच मिटून गेली होती. तिच्या स्वप्नातला राजकुमार तिच्यापासून दूर दूर चालला होता. तिचे प्रेम व्यक्त व्हायच्या अगोदरच नि:शब्द झाले होते.

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...